“ती गांधाळांची चूक आहे. खादीकडे केवळ आर्थिक दृष्टीने पाहा. ज्या खेड्यातील उपाशी बंधुभगिनींसाठी आजच्या परिस्थितीत मी काही करू शकत नाही, त्यांना जर या खादीने घास मिळत असेल, तर घेऊ दे. मला खादी—याच एका विचाराने खादी वापरा असे महात्माजी म्हणतात. आपद्धमं म्हणून तरी आज ती सर्वांनी वापरायला हवी. तिच्या पाठीमागे तत्तवज्ञान काय आहे ते ज्याचा तो जाणे. आपण ते आपल्या बोडक्यावर कोणी लादले तर लादून घेऊ नये. त्या भीतीने खादी न वापरणे म्हणजे भीरुता आहे,” स्वामी म्हणाले.

“पुष्कळ वेळ झाला. तुम्हाला त्रास झाला,” नारायण म्हणाला.

“त्रास नाही. तुमचे विचार ऐकून आनंद झाला. आमच्यापुढे तुम्ही जा. तुमचे व महात्माजींचे फारसे मतभेद नाहीत. यंत्र व हिंसा हेच दोन मुद्दे राहातात. हिंसा मनांत आणिली तरी शक्य नाही. आणि यंत्रे स्वराज्य आल्याशिवाय कोणी उभारू शकत नाही. म्हणून मतभेदाच्या दोन्ही गोष्टी स्वराज्यांत पाहू. आज एका झेंड्याखाली काम करू या. महात्माजी श्रीमंतांना गरीब करीत आहेत. गिरणीवाल्यांपासून पैसे घेऊन ग्रामोद्योग करीत आहोत व गिरणीवाल्यांचे कापड घेऊ नका असा प्रचार करीत आहेत. त्यांचेच पैसे घेऊन त्यांना मारीत आहेत. श्रीमंत व गरीब असे वर्गभेद पाडण्याऐवजी चांगले व वाईट असे वर्गभेद पडले तर बरे. ही सत् व असत् यांची चरस होऊ दे. जो श्रीमंत मनुष्य खरोखर सज्जन आहे, तो खरोखर भिकारीच आहे. दामाजी का श्रीमंत होता? तो क्षणांत दरिद्री झाला. सज्जनांचा वर्ग व दुर्जनांचा वर्ग असे वर्ग आपण पाडू या. महात्माजींच्या एका डोळस परंतु निस्सीम भक्ताने एकदा सांगितले की, ‘जमीनदारांची जमीन आम्ही वाटून देऊ. त्यांच्याजवळ ठेवणार नाही.’ मला तरी खोल पाहिले तर तुमच्यांत व त्यांच्यांत फारसा भेद कोठे दिसत नाही. म्हणून मी सर्वांचा आहे. राष्ट्रांत धडपड सुरू झाली आहे, ध्येयासाठी धडपड सुरू झाली आहे, तेजस्वी ज्ञानासाठी धडपड सुरू झाली आहे, विचारांना खणखणून, वाजवून, पारखून घेण्याची वृत्ती उत्पन्न झाली आहे हेच भाग्य आहे. जे राष्ट्र धडपडू लागले, जागे होऊ लागले, डोळे चोळू पाहू लागले, त्याचा उज्जव भविष्यकाळ आहे! श्रद्धेमध्ये भेद असतील, परंतु प्रत्येक पक्ष आपापल्या श्रद्धेसाठी किती तडफडतो, किती त्याग करतो, किती बलिदान करतो हे पाहिले पाहिजे. व त्या त्या त्यागमय श्रद्धेबद्दल पूज्यभाव दाखविला पाहिजे. भाई लाकांचा त्याग अपार आहे. ते चणेकुरमु-यांवर राहातात, रात्रंदिवस श्रमतात, संघटना करतात, उपहास सहन करीत झेंडा उंच राखतात, याबद्दल माझा माथा मी त्यांच्यापुढे नमवीन. श्रद्धाभेद असला तरी त्याग व तळमळ ही पवित्र व पूज्यच आहेत,” स्वामी म्हणाले.

“नारायणाला थोडे गाता येते,” रघुनाथ म्हणाला.

“होय का रे नारायण?” नामदेवाने विचारले.

“फार येत नाही,” नारायण म्हणाला.

“म्हणा की एखादे गाणे,” स्वामी म्हणाले.

नारायणाने आढेवेढे घेतले नाहीत. त्याने एक लहानसे गोड गाणे म्हटले.

मोहुन फसशिल वेड्या
रूप जगाचे पाहुन साचे।।मोह०।।
वरून जल ते दिसते नितळे
पंकजाल परि तळि त्याचे।।मोह०।।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel