“तुमचा किती जीवनात उपयोग होत आहे, ते तुम्हास माहीत नाही. अनेकांना ओलावा तुमच्यामुळे मिळत आहे. नदीला कोठे माहीत असते की किती तृणवेलींना ती ओलावा देते! किती जलचरांना, स्थलचरांना ती आधार देते! नदीला ओलावा देत वाहणे हे माहीत! ओलावा, देत आहे याची जाणीवही तिला नसते. वाहणे, काट्याकुट्यांतून वाहणे, पाणी असेपर्यंत रात्रंदिवस वाहाणे हेंच तिला माहीत. तुमच्या जीवनाच्या प्रवाहामुळे आजूबाजूच्या अनेक लोकांच्या जीवनाच्या मळ्यांस ओलावा मिळतो. ते मळे फुलतात, ओसाड मळे हंसतात! आपण किती फुले फुलविली हे सूर्याला माहीत नाही, आपण किती जमिनी भिजविल्या हे मेघाला माहीत नाही, आपण किती जणांना स्वच्छ हवा दिली हे वा-याला माहीत नाही, किती जणांना मला पाहून आनंद झाला हे चंद्राला माहीत नाही! सारे कर्म करीत आहेत. शांतपणे आपापली कर्मे अविरत करीत आहेत. स्वामी! तुम्हाला पाहून आमची हृदये फुलतात? तुम्ही हंसलेत म्हणजे आम्हांला अमर रसायन मिळते. तुम्ही खिन्न झालेत म्हणजे आमची किती उमेद खचते. किती उत्साह जातो, किती धैर्य गळते याची तुम्हाला कल्पना नाही. चला. उठा. आमच्यासाठी हंसा, खेळा, काम करा. आमच्या आनंदासाठी, आमच्या सुखासाठी, आमच्या बर-यासाठी, ” रघुनाथ म्हणाला.

“किती रे तुम्ही चांगले बोलता? जसे कवि व तत्त्वज्ञानीच, ” स्वामी म्हणाले.

“ ‘बोलविता धनी वेगळाची!’ तुम्हींच असे बोलायला शिवकविलेत. तुम्हीच ही काव्ये, हे विचार गेली चार वर्षे ओतीत आहात. तुमचेच तुम्हाला मिळत आहे. तुम्ही आशा पेरलीत, आशा घ्या, ” रघुनाथ म्हणाला.

“येता ना जेवायला? सारी वाट पाहत असतील. वेणूसुद्धा आज आश्रमातच जेवायला आली आहे, ” रघुनाथ म्हणाला.

“आईला का नाही बोलाविले? तुझी आई पुढेमागे आश्रमाचीच आई होईल. रघुनाथची आई सर्वांची आई होईल, ” स्वामी म्हणाले.

“आई नको म्हणाली. तिला तितका मोकळेपणा वाटत नाही अजून. गांव आहे. कोणी काही म्हणेल, फुकट जेवतात म्हणेल. चला तुम्ही, ” रघुनाथ म्हणाला.

स्वामी उठले. नामदेव रघुऩाथ त्यांचा हाथ धरून निघाले.

भिका, जानकू वाट पाहात होते. प्रचारक मुलांबरोबर निघून गेले होते. वेणू तेथे बसली होती.

“वेणू म्हणजे आश्रमाचे संगीत आहे, ” स्वामी म्हणाले.

“वेणू कांतते किती छान ‘आंधळ्या मुलीचे हे सूत आहे,’ असे सांगितले तर कुणाला खरेहि वाटणार नाही,” जानकू म्हणाला.

“तुम्ही धोतर न्यायला विसराल हो. सकाळी ना जाणार? वेणूने विचारले.

“हो, ” नामदेव म्हणाला.

“भाऊ! त्यांच्या पिशवीत धोतर घालून ठेव, ” वेणू म्हणाली.

भिकाने पाने मांडली. सारे एकदम जेवायला बसले.

“नामदेव, तुम्ही बडोद्याला जाणार. आपल्या येथील काही खादी तिकडे पुढेमागे खपवा. मी पाठवून देईन कोणा येणाराजाणाराबरोबर, ” स्वामी म्हणाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel