१८६५
"महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा.
मी आपल्याला शरण आहे."
कलकत्त्याच्या हरिहाटानंतर नर्मदेच्या काठाकाठाने प्रवास करीत श्री इंदूरला आले. त्यावेळी श्रींची अवस्था फार विलक्षण होती सहजबोलता बोलता त्यांची समाधी लागत असे. अशी समाधी लागली म्हणजे त्यांचे शरीर लाकडासारखे होई व पुष्कळ काळपर्यंत ते सांभाळावे लागे. संध्याकाळी गावाबाहेरच्या शेतात गाई चस्त होत्या, जवळच पाण्याचे डबके होते. एका मुलाशी बोलता बोलता श्रींची समाधी लागली. अंधार पडू लागला. वाटेने एक गवळी त्याच्या घरी परतत असता चिखलात कोण बसले आहे हे पाहण्यासाठी तो श्रींच्या जवळ आला. त्याने स्वच्छ पाण्याने श्रींना धुवून काढले व जवळच्याच एका मारुतीच्या मंदिरात श्रींना उचलून नेऊन ठेवले. इंदूरमधील एक श्रीमंत इनामदार रोज मारुतीमंदिरात दर्शनाला येत व नंतर आपल्या बागेत जाऊन विश्रांती घेत. नित्याप्रमाणे ते दर्शनाला आले असता श्री त्यांच्या द्दष्टीस पडले व हा कोणी सिद्ध पुरुष आहे असे वाटून त्यांनी श्रींना साष्टांग नमस्कार घातला व आमच्या बागेमध्ये रहायला या अशी विनंती केली. ते श्रींना बागेत घेऊन गेले. तेथे तो गवळी रोजश्रींच्या दर्शनाला यायचा व सकाळ संध्याकाळी आपल्या गायीचे धारोष्ण दूध प्यायला द्यायचा. इंदूरमध्ये हाच श्रींचा पहिला शिष्य. इनामदारांच्या बायकेने "या बैराग्याला आपल्या बागेत कशाला आणलेत, हे लोक फार लबाड असतात, मीच त्याची परीक्षा घेते " असे म्हणून तिखटाचे गोळे करून घेऊन आली. "इनामदारांनी तुमच्यासाठी लाडू पाठविले आहेत ते खा व मग हे पाणी प्या " असे म्हणून जीजींनी ( इनामदारांच्या बायकोने ) ते लाडू श्रींना खायला घातले. श्रींनी ते सर्व लाडू खाऊन "माय, लाडू किती छान झाले, मला आणखी खायला घेऊन येईन " जीजीच्या मनात एक भयंकर कल्पना आली. स्वयंपाक घरातील शेगडीमधील फुललेले निखारे परातीत घालून जीजी श्रींच्याकडे आली म्हणाली "आजहा नवीन पदार्थ आणला आहे, पोटभर खा." श्री तिच्याकडे पाहून हसले व चिमटयाने एक एक निखारा उचलून तोंडात टाकू लागले., सर्व निखारे संपल्यावर जीजींकडे पहात श्री म्हणाले, "माय बरे लागतात, आणखी थोडे असले तर दे " असे म्हणून हात पुढे पसरला. जीजींचा चेहरा खर्रकन उतरला, तोंडाला कोरड पडली, हातपाय कापू लागले, तिची बोबडी वळली, डोळ्यांतून पाणी वाहू लागले. श्रींकडे वळून म्हणाली, "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." असे म्हणून श्रींचे पाय धरले. श्री म्हणाले, "बाळ कोण मनुष्य कसा आहे हे आपल्याला कळत नाही, म्हणून अशी कोणाची परीक्षा करू नये. संतांची परीक्षा निराळ्या प्रकारे करायची असते. आता झाले ते झाले, ते सगळे विसरून जा. आजपासून नामस्मरण करण्यास आरंभ कर. राम तुझे कल्याण करील हे निश्र्चित समज " नंतर जीजीने श्रींना आपल्या घरी नेले व एखाद्या राजासारखी त्यांची व ताईची खूप गटटी जमली. अहोरात्र ती त्यांच्यापाशी असायची. एके दिवशी एक बैरागी श्रींच्या दर्शनाला आला, पण श्री ताईबरोबर खेळताना पाहून आपण अयोग्य माणसाकडे आलो असे पाहून तो परत जाऊ लागल. श्रींनी त्यांना थांबवून घेतले. त्यांची सर्व हकिकत ऐकून घेतली व तुमच्या काही शंका असल्यास या ताईला विचारा असे म्हणून तिच्या पाठीवर थाप मारून ’समाधी लाव ’ असे सांगितले व हिला आपले काहीही प्रश्र विचारा असे बैराग्याला सांगितले. सगळ्या प्रश्रांची खडाखड उत्तरे देऊन, त्या बैराग्याचे गाडे कुठे अडत होते तेही तिने सांगितले. त्यावर बैरागी एकदम थक्क झाला. व श्रींचे पाय पकडून "माला क्षमा करा. माझे पूर्ण समाधान झाले. मी आनंदाने जातो म्हणाले." श्रींची त्याला आपल्याजवळ काही दिवस ठेवून घेतले व योगाच्या क्रिया दाखविल्या व नंतर पाठवून दिले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel