१८७०
"गीतेचा नववा अध्याय वाचीत जा "
एकदा श्री दुपारी चार वाजता मारुती मंदिरात आले. त्यावेळी भाऊसाहेब केतकर म्हसवडला पगार वाटण्यासाठी जात असता वाटेत गोंदवल्याच्या मारुतीमंदिरात श्रींना भेटले. श्रींना पाहून भाऊसाहेबांनी उठून त्यांचे स्वागत केले. त्यावेळी श्रींनी डोक्याला गणेशटोपी, कपाळाला मोठे केशरी गंध, अंगात कफनी, हातात माळ व पायात खडावा असा वेष धारण केला होता. श्रींनी त्यांची चौकशी केली व सांगितले, "मी या गावचा कुलकर्णी आहे, गावात कोणी आला तर त्याच्या जेवण्याखाण्याची सोय करणे हे माझे कर्तव्यच आहे." त्यावेळी बर्‍याच गप्पा झाला. दुसरे दिवशी श्री सकाळी भाऊसाहेबांच्याकडे पुन्हा आले, त्यावेळी ते गीतेचा अध्याय वाचण्याच्या बेतात होते. श्रींनी विचारले, "तुम्ही देवाधर्माचे काय करता ?" त्यावर भाऊसाहेब म्हणाले, "विशेष काही नाही, दोन वेळा संध्या करतो आणि गीता वाचतो." त्यावर श्री म्हणाले, "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा." त्यानंतर भाऊसाहेब पुन्हा गोंदवल्यास आले व श्रींना भेटले. श्री म्हणाले, "आजाआपण माझ्याकडे जेवायला या." त्यावर भाऊसाहेब म्हणाले, "मीच आपल्याला जेवायला बोलावणार होतो, माझ्याकडे स्वयंपाकी असतो." त्यावर श्री म्हणाले, "छे, छे आपणच माझ्याकडे आले पाहिजे. भाऊसाहेबांचा नाईलाज झाला व ते श्रींच्याकडे जेवायला गेले. जेवणखाण होऊन विश्रांति झाल्यावर भाऊसाहेब म्हसवडला जाण्यास निघाले. श्री तेथे आले व म्हणाले,
"आपण आता कोठे जाणार ?" भाऊसाहेब म्हणाले, "मी म्हसवडला जायला निघालो आहे." श्री त्यांना म्हणाले, "तुमच्या टांग्यात एका माणसाची जागा आहे का ? आणखी कुणी येणार आहे का ?" भाऊसाहेब म्हणाले, "नाही." त्यावर श्रींनी विचारले, "मी आपल्याबरोबर येऊ का ?" त्यावर भाऊसाहेब म्हणाले, "चला माझी हरकत नाही." त्यानंतर श्री भाऊसाहेबांना म्हणाले, "मला नेण्यासाठी तुम्ही माझ्या आईची परवानगी काढा, ती बघा दारातच उभी आहे." भाऊसाहेब गीताबाईला विचारण्यास गेले, त्याबरोबर गीताबाई एकदम कडाडल्या, "अहो, तो एकदा बाहेर गेला तर ९ वर्षांनी परत आला, त्याला परत आणून सोडण्याची खात्री देत असाल तर तुम्ही घेऊन जा." श्री जवळच उभे होते. त्यांच्याकडे पहात भाऊसाहेब बोलले, "बघा बुवा, तुमची आई तर असे म्हणते "
त्यावर श्री म्हणाले, "छे, छे तसे होणार नाही, मी २/३ दिवसात आपल्याबरोबर परत येईत." आईला नमस्कार करून श्री भाऊसाहेबांच्याबरोबर जाण्यास निघाले. म्हसवडला पोचल्यावर श्री म्हणाले, "माझ्या ओळखीची मंडळी येथे आहेत, त्यांच्याकडे मी उतरायला जातो." असे सांगून श्री निघून गेले व तेथून पंढरपूरला गेले. पंढरपूरहून श्री दोन दिवसांनी गोंदवल्यास आले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel