१८९९
"सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा
म्हणजे वासनेचे आपोआप तळपट होते."
श्री एकादशीला पंढरपूरला जात असत. तेथे सांगलीचे शिवभक्त श्री विष्णुपंत नगरकर यांची भेट झाली. त्याआधी श्रींनी त्यांना द्दष्टांत देऊन श्रीशंकर व श्रीकृष्ण एकच आहेत असे दाखवून देऊन ’मला येऊन भेट ’ असे सांगितले होते. त्याप्रमाणे श्रींना भेटल्यावर त्यांनी श्रींच्या चरणावर मस्तक ठेवले. श्री म्हणाले, "श्रीकृष्ण व श्रीशंकर एकाच परमात्म्याची दोन व्यक्त रूपे आहेत. हरिहरांमध्ये भेद नाही. विष्णुभक्तांची निंदा करण्याचे सोडून दे. त्यामुळे शिवाच्या उपासनेला कमीपणा येतो. आजपासून रोजशाळिग्रामाची पूजा करीत जा. विष्णूचे पूजन केल्याने शिव खात्रीने प्रसन्न होईल." विष्णुपंताच्या डोळ्यातून पाणी बाहू लागले. श्री शंकराच्या पूजेसाठी आणलेल्या साहित्याने त्याने श्रींची पूजा केली. श्रींजवळ त्यांनी अनुग्रहाची याचना केली. तेव्हा श्रींनी त्यांना रामनामच दिले. श्रीशंकरांना प्रिय असणारे रामनामच आपण घ्यावे असे त्यांना सांगितले. विष्णुपंतांचे पूर्ण समाधान झाले. श्री गोंदवल्यास राहू लागल्यावर श्रींकडे येणार्‍यांची संख्या खूप वाढली. इकडे इंदूरला गोदुबाईच्या मुलाच्या मुंजीत, पंगत बसली असता तूप वेळच्या वेळी आले नसल्याने पंगत खोळंबली. गोदुबाईंनी श्रींच्या तसबिरीसमोर उभे राहून "महाराज !" अशी कळवळून हाक मारली. श्री तसबिरीतून बाहेर आले व खोळंबलेल्या पंगतीला तुपाच्या भांड्यातून होते तेवढे तूप वाढले. तीनशे पान जेवून उठले तरी भांडयाती तूप सर्वांना पुरले व पुनः तितकेच शिल्लक उरले. अनेक जण श्रींचे दर्शन घेऊन गेले. श्री पुनः देवघरात गेले "आता मी येतो " असे गोदूबाईला सांगू तेथून गुप्त झाले. म्हणूनच श्री ब्रह्यानंद आरतीत म्हणतात, "इद्द लिद्द, दुरिन भक्तगे दर्शन कोट्टबने " ( एक ठिकाणी राहून दूर ठिकाणी असलेल्या भक्ताला श्री दर्शन देतात. ) श्रींना पहिल्या पत्नीपासून मुलगा झाला. पण तो तार्‍हेपणीच वारला. दुसर्‍या पत्नीपासून दोन
मुलगे व एक मुलगी झाली. ही मुलेही लहानपणीच वारली. श्रींची ही मुलगी गोरी असून दिसायला सुरेख होती. ती फारशी रडायची नाही. म्हणून श्री तिला ’शांता ’ या नावाने हाक मारीत. ती दीड वर्षाची झाली तरी तिला बोलता येत नसे. पण मंदिरामध्ये भजन सुरू झाले की तिकडे जाण्यासाठी तिची धडपड चालू होई. रोज न चुकता ती रामाचे तीर्थ घेई व श्रींच्या पानातले चार घास खाई. श्री निरूपणाला बसले की तासभर ती श्रींच्या तोंडाकडे बघत स्वस्थ बसत असे. "शांते, तुला काय समजले गं ?" असा प्रश्र केला तर गोडपणे हसून उत्तर देई. एकदा तुळशीला प्रदक्षिणा घालताना एका बाईने शांतीच्या गळ्यात कौतुकाने आपल्या गळ्यातील पोवळ्याची माळ घातली. श्री तेथे आले व म्हणाले, "शांते, तुझ्या गळ्यातील माळ मला दे." शांतीने गळ्यातून माळ काढायचे सुचवले. मावशीने माळ काढून तिच्या हातात दिली. तिने ती तशीच श्रींच्या हातात ठेवली. श्री तिला म्हणाले, "तुला ही माळ नको का ?" त्याबरोबर तिने जवळच असलेल्या तुळशीचे पान तोडले व श्रींच्या हातातील माळेवर ठेवले. श्री तिला म्हणाले, "शांते, भाग्याने लाभलेली संगती तुझे कल्याण करील " पुढे ६ महिन्यांनी ती मुलगी कालवश झाली. ती गेल्यावर श्री म्हणाले, "कोणाच्या पोटी कोण जन्म घेतो हे सामान्य माणसांना कळणे शक्य नसते. फक्त सत्पुरुषांनाच ते कळते. पुष्कळ वेळा चांगले अधिकारी जीव एखाद्या लहानशा वासनेत अडकून पडतात. तेथे त्यांची ती वासना तृप्त होण्यास वेळ लागत नाही. म्हणून लहानपणीच ते जग सोडून जातात. त्यांच्या मृत्यूचे दुःख करणे बरोबर नाही, सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्‍ट धरावा म्हणजे वासनेचे आपोआप तळपट होऊन जाते."

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel