श्रीगणेशाय नम: ।
नामधारक म्हणे सिध्दासी । पुढें कथा वर्तली कैसी । ते विस्तारोनी आम्हांसी । कृपा करोनि सांगावी ॥१॥
नामधारका श्रीमंता । ऐकेन म्हणसी गुरुचरित्रा । तुज होतील पुत्रपौत्रा । सदा श्रियांतुक तूं होसी ॥२॥
सांगेन कथा एक विचित्र । जेणें होती पतित पवित्र । ऐसे श्रीगुरुचरित्र । तत्परेंसी परियेसी ॥३॥
गाणगापुरीं असतां गुरु । सण दिपवाळी आला थोरू । शिष्य आले पाचारू । आपले घरी यावें भिक्षेसी ॥४॥
सप्त शिष्य बोलाविती । एकाहून एक अधिक प्रीती । सातहीजणपायां पडती । यावें आपुल्या घरासी ॥५॥
एकेक ग्राम एकेक देशीं । श्रीगुरु म्हणती शिष्यासीं । समस्ता घरीं यावें कैसी । तुम्ही मनीं विचार करा ॥६॥
तुम्हीं वाटावें आपणातें । कोठें आधी यावें निरूपा तें । तेथें जाऊं निश्चिते । शिष्याधीन आम्ही असो ॥७॥
आपणांत आपण पुसती । समस्त आधीं नेऊं म्हणती  । एकमेकां झगडती । आपुला स्वामी म्हणोनिया ॥८॥
श्रीगुरु वारिती तयांसी । तुम्ही भांडतां कासयासी । आम्ही गुरु सातांसी । एका घरी येऊं आम्ही ॥९॥
ऐसे वचन एकोनि । समस्त विनविती कर जोडोनि । स्वामी प्रपंचे न पाहावा मनीं । समर्थ दुर्बळ म्हणूं नये ॥१०॥
समस्तांसी पहावें समान । न विचारावें न्यून पूर्ण । उपेक्षिसी दुर्बळ म्हणोन । गंगाप्रवेश करूं आम्ही ॥११॥
विदुराचिया घरासी । श्रीकृष्ण जाय भक्तीसीं । कौरवराजमंदिरासी । न वेचे भक्तवत्सल ॥१२॥
आम्ही समस्त तुझे दास । कोणासी न करावें उदास । जो निरोप द्याल आम्हांस । तेचिं करूं आपण म्हणती ॥१३॥
ऐसें म्हणोनिया समस्त । करिती साष्टांग दंडवत । समस्त आम्हां पहा हो म्हणत । ऐसें विनवती श्रीगुरुसी ॥१४॥
श्रीगुरु म्हणती समस्तांसी येऊं तुमचे घरासी । चिंता न धरा हो मानसीं । भाक आमुची घ्या म्हणती ॥१५॥
ऐसें ऐकोनि गुरुवचन । विनविताती सातही जण । समस्तांसी म्हणतां येईन । कोणी करावा भरवंसा ॥१६॥
श्रीगुरु मुनी विचारती । अज्ञान लोक हे नेणती । आतां सांगू एकांती । एक एकातें बोलावून ॥१७॥
जवळी बोलावोनि एकासी । कानीं सांगती तयासी । आम्ही येतों तुझे ग्रामासी । कोणाजवळी न सांगावे ॥१८॥
ऐसी भाक त्यासी देती । उठोनि गावां जा म्हणती येऊं तुझ्या ग्रामाप्रती । संशय मनीं न धरावा ॥१९॥
ऐसें सांगोनि तयासी । पाठविले ग्रामासी । बोलावून दुसर्‍यासी । येणेचि रीती सांगितलें ॥२०॥
ऐसें सातही जणां देखा । समजवोनि गुरुनायका । पाठविले तुम्ही ऐका । महदाश्चर्य वर्तलें ॥२१॥
एकमेकां न सांगत । गेले सातही भक्त । श्रीगुरु आले मठांत । अति विनोद प्रवर्तला ॥२२॥
ग्रामांतील भक्तजन । ऐसें कौतुक ऐकोन । विनविताती कर जोडोन । आम्हां सांडोनि जातां स्वामी ॥२३॥
तयांसी म्हणती श्रीगुरुनाथ । राहूं आम्ही नाही जातं । न करा चिंता मनांत । आम्ही  येथेंचि असों देखा ॥२४॥
ऐशा संधीस श्रीगुरुसी । होऊं आली जवळी निशी । दिपावळीची त्रयोदशी । रात्रीं मंगळस्नान करावें ॥२५॥
आठरूप झाले आपण । अपार महिमा नारायण । सात ठाईंतही गेले जाण । गाणगापुरीं होतेची ॥२६॥
ऐसी दिपवाळी झाली । समस्तां ठायीं पूजा घेतली । पुन: एकचि मूर्ति ठेली । गौप्यरूपें कोणी नेणें ॥२७॥
कार्तिकमासीं पौर्णिमेसी । करावया दीपाराधनेसी । समस्त आले परियेसीं । गाणगापुरीं गुरुजवळी ॥२८॥
समस्तही नमस्कारिती । भेटी दहावे दिवशीं म्हणती । एकमेकांत झगडती । म्हणती आपुले घरीं गुरु होते ॥२९॥
एक सत्य मिथ्या म्हणत । समस्त शिष्य खुणा दाखवित । आपण दिल्हें तें हें वस्त्र । श्रीगुरुजवळी असे ॥३०॥
समस्त राहिले तटस्थ । ग्रामस्थ लोक असत्य म्हणत । आम्हांजवळी गुरु असत । दीपवाळी येथेंची केली ॥३१॥
विस्मय करिती सकळ जन । म्हणती त्रैमूर्ति हाचि आपण । अपार महिमा नारायण । अवतार असे श्रीहरिचा ॥३२॥
ऐसे मिळोनि भक्त समस्ती । नानापरी स्तोत्रें करिती । न कळे महिमा तुमचा म्हणती । वेदमूर्ति गुरुनाथा ॥३३॥
तूंचि विश्वव्यापक होसी । महिमा न कळे आम्हांसी । काय वर्णूं चरणासी । त्रैमूर्ति तूंचि एक ॥३४॥
नानापरी स्तुति करिती । दीपाराधना अतिप्रीती । ब्राम्हणभोजन अतिभक्ति । करिते झाले भक्तजन ॥३५॥
श्रीगुरुमहिमा झालीं जगतीं । सिध्द सांगे नामधारकप्रती । भूमंडळी झाली ख्याति । श्रीनृसिंहसरस्वतीची ॥३६॥
म्हणे सरस्वतीगंगाधरु । जवळीं असतां कल्पतरु । न ओळखितां अंध बधिरू । वायां कष्टती दैन्यरीतीं ॥३७॥
भजा भजा हो श्रीगुरुसी । जें जें काम्य तुमचें मानसीं । सिध्द होईल त्वरितेंसी । आम्हां प्रचीती आली असे ॥३८॥
अमृत मिळतां पानांसी । क्षार कटु आवडे मूर्खासी । ज्ञानवंत भक्तजनांसी । नामामृत गुरुचें ॥३९॥
श्रीगुरुसेवा तुम्ही करा । ऐसा पिटी मी डांगोरा । सांगती शास्त्र अपारा । गुरु तोचि त्रैमूर्ति ॥४०॥
गुरुवेगळी गति नाहीं । जे नंदिती नर देहीं । वेदशास्त्रें बोलती पाहीं । सूकरयोनींत जन्मती ॥४१॥
तुम्ही म्हणाल मज ऐसें । आपुले इच्छेने लिहिलें कैसें । वेदशास्त्री सांगितले ऐसें । असे तरी अंगिकारा ॥४२॥
संसारसागर धुरंधर । उतरावया पैल पार । गुरुविणें निर्धार । तारक कोण त्रिजगीं ॥४३॥
निर्जळ संसार अरण्यांत । पवई घालणें असे अमृत । सेवा सेवा हो तुम्ही समस्त । अमरत्व तुम्हां होईल ॥४४॥
श्रीगुरुनृसिंहसरस्वती । अवतार असे त्रिमूर्ति । गाणगाग्रामी असे ख्याति । आतां असे प्रत्यक्ष ॥४५॥
जे जाती तया स्थाना । तात्काळ होती मनकामना । काहीं न करा हो अनुमाना । प्रत्यक्ष देव तेथें असे ॥४६॥
आम्ही सांगतों तुम्हा हित । प्रशस्त झालिया तुमचें चित्त । गाणगापुरी जावें त्वरित । म्हणे सरस्वतीगंगाधर ॥४७॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । सिध्दमुनि संवादत । अष्टरूपें श्रीगुरु धरित । सप्तचत्वारिंशोद्याय हा ॥४८॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिध्दनामधारकसंवादे अनेकस्वरूपधारणं नाम
सप्तत्वारिंशोध्याय ॥४७॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ॥ ओवीसंख्या ॥४८॥
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel