मुंबई. शनिवारची दुपार. मरीन ड्राईव्ह जवळच्या एका कंपनीच्या ऑफिसमध्ये दुपारचे जेवण सुरू होते. रामनाथन यांना जास्त भुक नसल्याने ते फक्त आज इडली सांबार खात होते. कुळकर्णी बाई चपाती भाजी खात होत्या. तर गुप्ताजी हिशेबात मग्न होते. त्यांना जेवायची सवड नव्हती. राजू शिपाई बाहेर बाकड्यावर बसून धूम मचाले हे गाणे ऐकत होता. बॉस विरेंद्र शाह जेवण आटोपून फोनवर काहितरी बोलत होते.

अचानक ...धडाम... धुम्म .. धस्स!! असा अवाज आला, ऑफिसची खिडकी फुटली, खिडकीतून एक जाळी आली, आणि त्या जाळीने रामनाथन ची ईडली ओढली आणि बघता बघता ईडली खिडली बाहेर खेचली गेली.

रामनाथन तावातावाने फुटलेल्या खिडकीतून बाहेर डोकावले, तर त्यांना भुकेला स्पायडरमॅन खिडकीबाहेर लटकून ईडली खातांना दिसला.

रामनाथन : ए, लाल बुरख्या माझी इडली मला परत दे.

स्पायडरमॅन : नाही देत. मला खुप भुक लागली आहे.

रामनाथन : तू येथे का आलास ते सांग आधी?

स्पायडरमॅन : अमेरिकेतल्या लोकांचे प्रश्न सोडवत होतो. अमेरिकेतले पोलीस मी आल्यापासून स्वस्थ बसून आहेत. माझ्यावरच अवलंबून आहेत. आज एका चोराचा पाठलाग करत होतो विमानाने. अरबी समुद्रावरून विमान जात होते. अचानक एक हेलीकॉप्टर उडत गेले आणि त्यामागे एक काळ्या बुरख्यावाला एक मनुष्य थांबून थांबून उडत होता. क्रीश होता बहुतेक. पण कृश नव्हता तो. चांगले बलदंड बाहू होते त्याचे. त्याचेशी टक्कर झाली आणि काय सांगू , या इमारतीवर येवून आदळलो. खुप गरम होते आहे मला. आणि सकाळपासून काहीच खाल्ले नव्हते. म्हणून तुमची ईडली खाल्ली....

रामनाथन : पण एक जाळी सोडली असती की हो ... लगेच विमानाला लटकून जावू शकला असता...

स्पायडरमॅन : अहो आता चाळीशी पार केली. वय झालं. चार पाच जाळ्या सोडून बघितल्या. हातातून. पायातून सुद्धा सोडल्या. पण आजकाल जाळ्या खुपच बारीक होत चालल्या आहेत हो. लगेच तुटतात. पावर कुठे गेली काय माहीती?

कुलकर्णी बाई : असूंदेत. असूंदेत. ये बाबा. मध्ये ये. बैस येथे. थोड्या जाळ्या सोड. मला हव्यात. स्वेटर विणायचे आहे.

स्पायडरमॅनने थोड्या जाळ्या त्यांना दिल्या. स्पायडरमॅनच्या दोऱ्यांनी स्वत :ला गुरफटून घेवून त्यांना आनंद झाला.

त्या म्हणाल्या, "भाजी चपाती हवी का?" स्पायडरमॅन : नको आता. पोट भरलंय. पण मला ना या सगळ्या क्रिमीनल्स चा कंटाळा आलाय. येथे आलोच आहे तर काही नोकरी मिळेल का मला हे विचारायचे होते... येथे मला जास्त कोणी ओळखणार नाहीत. वाटल्यास मी बुरखा काढून फिरत जाईन.... कुठे आहेत तुमचे बॉस? मला नोकरी हवी आहे.

गुप्ताजी म्हणाले," जा आत. जा की. आमचे बॉस बसलेत. माग त्यांना नोकरी.

स्पायडरमॅन केबीन मध्ये गेला. शाह म्हणाले, " कोण आपण?"

स्पायडरमॅन : मी स्पायडरमॅन.

शाह : चित्रविचित्र कपडे का घातलेस असे? हां आले लक्षात , तूच का तो पीटर परकर..?

स्पायडरमॅन : परकर नाही पार्कर.

शाह : काय क्वालीफिकेशन आहेत तुझे?

स्पायडरमॅन : वयाची तिशी होती तेव्हा जाळं सोडायचा वेग होता चारशे सत्तर किलोमीटर प्रती सेकंद आणि जाळेही काही साधेसूधे नाही, दोरखंडाएवढे जाळे.. आता वेग थोडा कमी आहे आणि जाळे थोडे बारीक झाले आहे...

शाह : अच्छा.. मी एक करू शकतो तुझ्यासाठी... तू पार्ट टाईम की फुल टाईम जॉब शोधतो आहेस?

स्पायडरमॅन : चालेल कोणताही.

शाह : मग मी असे करतो. तु रोज सकाळी शार्प नऊ वाजता येत जा. मी सांगेल तेवढी जाळी सोडत जा. मी ती विकेल. दहा वाजता परत गेला तरी चालेल. बघू मार्केटमध्ये काय कसे विकले जाते. त्यानुसार तुला नफ्यातला वाटा देत जाईन . चालेल?

स्पायडरमॅन ने होकार दिला. ऑफिसमधल्या सगळ्यांना या सगळ्या प्रकाराबद्दल माहिती नव्हते. बॉसने हे कुणालाच न सांगण्याचे वचन स्पायडरमॅनकडून घेतले. सौदा पक्का झाल्यावर स्पायडरमॅनने केबीनच्या खिडकीतून उडी मारली.

थोडा वेळ समुद्राजवळच्या दगडांवर शांतपणे बसून झाल्यावर स्पायडरमॅन विचार करू लागला," मला अमेरीकेपासून काही दिवस दूर राहायचे आहे. बघूया त्यांना माझी आठवण येते का ते! तोपर्यंत अजून एखादा जॉब शोधायला हवा."

असे म्हणून तो आनंदाने रस्त्यावर चालू लागला.... अचानक उन्हामुळे त्याला चक्कर आली आणि त्याची टक्कर सुनील शेट्टिच्या कारशी झाली. कार थांबवून सुनील शेट्टी बाहेर आला....

सुनील : अरे अरे. माफ कर. बैस गाडीत ( गाडीत बसल्यावर ) कोण आहेस तू? कोणत्या देशातला आहेस?

पीटर : मी, ...पीटर पार्कर... पण हे कुणाला सांगू नका. मीच स्पायडरमॅन असतो. पण तुम्ही तर अरनॉल्ड श्वार्झनेगर सारखे दिसता..

सुनील : वा! छान. आभारी आहे. आहे का एखादा हॉलीवूड मध्ये रोल? आणि तुझे भारतात यायचे प्रायोजन?

पीटर : मी कंटाळलो आहे सध्या सगळ्या गुन्हेगारांना... पोलीस मग स्वस्थ बसून राहातात मी गुन्हेगारांना पकडत असलो की! मला एका ऑफीसमध्ये पार्ट टाईम जॉब मिळाला आहे. आणखी एखादा रोल आहे का माझ्यासाठी बॉलीवूडमध्ये? मी तुम्हाला स्टीवन स्पीलबर्ग चा पत्ता देतो आणि तुम्हालाही हॉलीवूडमध्ये रोल मोळवून देतो.

सुनील : चालेल. चल मी एका ठीकाणी तुला घेवून चलतो.

(दूर एका पर्वतावरच्या गुहेमध्ये अक्षय, अनील, सैफ, कत्रीना वगैरे मंडळी रेस लावत लावत येतात आणि अचानक गुहेत वेल्डींग करू लागतात. चर्र चर्र असा आवाज येतो. आणि गातात "रेस वेल्डींग की.."

तेथे सुनील आणि पीटर येतात. त्यांना हे वेल्डींग चे गाणे बघून आश्चर्य वाटते. दोघेसुद्धा वेल्डींग करतात आणि नाचून गाणे म्हणतात. मग सुनील पीटरला रेस मध्ये काम मिळवून देतो. पीटर सुनीलला स्टीवनचा पत्ता देतो. त्या रात्री स्पायडरमॅन सुनील चे अभार मानून एका हॉटेलमध्ये थांबतो. रेस ची शूटींग पुढच्या एका रविवारी होणार असते.)

सकाळी सहज फिरायला जायचे म्हणून तो साध्या कपड्यांत सी.एस.टी. स्थानकावर आला. तिकीट काढून लोकलमध्ये बसला. दादर आल्यावर पीटरचा जीव गर्दीमुळे गुदमरू लागला. दरवाज्यातून त्याने बघीतले तर हजारो लोक लटकत होते. तो विचार करू लागला," बापरे, येथे तर माझ्यापेक्षा धोकेदायक पद्धतीने सगळे लटकत आहेत."

घाटकोपर आल्यावर गर्दीमुळे पीटर रेल्वे स्थानकावर फेकला गेला. लोकांनी त्याला होस्पीटलमध्ये दाखल केले. हॉस्पीटल मध्ये तीन दिवस आराम केल्यावर चवथ्या दिवशी त्याला डिसचार्ज मिळणार असतो. त्याच्या आदल्या रात्री, हॉस्पीटलच्या खिडकीतून एक कीडा (कोळी) रागारागाने पीटरकडे बघत होता. कोळी म्हणाला," ए. उठ. बाहेर ये...पटकन "

किडा रागारागाने बघू लागला. किड्याने बाहेर बोलावताच चटकन घाबरून पीटर बेडवरून उठला आणि खिडकीबाहेर बघू लागला.

किडा : मित्रा, काय चालवलयंस काय हे? एक तर, मी तुला चावल्यानंतर तू मला एकदाही भेटला नाहीस? विसरलास का तू माझे 'उपकार चाव्याचे'? आणि आता पळून आलास अमेरिकेतून हां? आणि काय करतो आहेस या देशात?

पीटर : (घाबरून) आं अं ... त्याचे असे झाले की... मी कंटाळलो आहे या सगळ्या प्रकाराला.... तेच ते गुंड, तेच ते बदमाश, त्याच जाळ्या... आणि वय पण झाले ना राव माझे. सोडून सोडून किती जाळ्या सोडणार मी?

किडाः मित्रा, मी तुला माफ तर करू शकतो, मला विसरल्याबद्दल, पण, अमेरिकेतील लोकांनी गुप्तचरांद्वारे कधीच तुझा ठावठीकाणा शोधला आहे आणि त्यांनी एक प्लॅन पण केला आहे. त्यांनी मला शोधून काढले आणि चार पाच लोकांना चावायला सांगितले आहे.... ते आणखी स्पायडरमॅन बनवायच्या विचारात आहेत... त्या आधी मी चोरून तुझ्या ठावठीकाण्याबद्दल ऐकले आणि खास तुला सांगण्यासाठी गुपचूप पळून आलो... आणि तू? मला विसरला होतास?

पीटर : मला माफ कर. मी चुकलो. पण आपण आता करायचे काय? काही दिवस थांब माझेकडे, मला बरे होवू दे. माझी बॉलीवूडच्या चित्रपटातील शूटींग पुर्ण होवू दे, मग बघूया काय करायचे ते.... चालेल ?

तेवढ्यात नर्स आत आली. म्हणाली," बाहेर शुभाष घई आलेत. अर्जंट तुम्हाला त्यांना भेटायचे आहे."

खिडकी पटकन बंद करून पीटर म्हणाला," ठीक आहे, बोलवा त्यांना आत"

... सुभाष घई म्हणाले,"हे बघ. आता सगळ्या बातम्या देणाऱ्या वाहिन्यांनी सगळीकडे जाहीर करून टाकलेले आहे कि तू खरा स्पायडरमॅन असून तू भारतात आहेस. आणि अमेरिकेत आता चार लोकांना चावण्यासाठी तो रेडिओऍक्टिव्ह कोळी शोधण्याच्या प्रयत्नात अमेरिकन सरकार आहे. तो कोळी पळून भारतात आलेला आहे हे ही त्यांना माहीत झाले आहे. मला तुझ्या सोबत काही मराठी चित्रपट बनवायचे आहेत. तेव्हा आता तुझा प्लॅन काय? तू रेस चित्रपट पूर्ण करणार की मझ्या चित्रपटात काम करणार की अमेरिकेत परत जाणार की आधी बरा होणार आहेस? उद्या प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी सकाळीच हॉस्पीटल मध्ये येतील आणि तुला हजारो प्रश्न विचारतील. त्या आधी तू येथून गायब हो आणि माझेकडे चल."

कोळी हे सगळे ऐकत होता, तो आत आला आणि म्हणाला, " नमस्कार, सुभाषजी. मीच तो कोळी."

सुभाष : " बरे मग. आता काय करणार तुम्ही दोघे?"

कोळी : " माझा विचार आहे, पुन्हा पीटरला चावण्याचा आणि त्याला त्याची शक्ती पुन्हा देण्याचा, दोन वेळा मी त्याला चावेल. दोन्ही हातांना आणि पायांना चावेल. मग पीटर सगळ्या चित्रपटात स्टंट सीन करेल. आणि मग आम्ही अमेरिकेत परत जावू. "

पीटर : " आयडिया छान आहे. पण तोपर्यंत राहायचे कुठे?"

सुभाष : " तुमच्या राहाण्याची चिंता नका करू. मी करेन व्यवस्था. मिडिया वाल्यांना पण आपण सगळे सांगू आणि त्यांना विनंती करू की..."

तेवढ्यात त्या रुममध्ये शाहरूख आला. " क क क क कीडा, कुठे आहे? मला तुमचा सगळा डाव माहिती झाला. 'परदेस' जाण्याचा. मी ऐकत होतो. पडद्या आ आ आ आडून ! मी सगळ्यांना बोलावले आहे येथे. पोलीस येत आहेत. पकडायला तुम्हाला! "

किडा : " आता वेळ आली आहे पीटरला पुन्हा चावण्याची. "

किडा चावण्यासाठी पीटर्कडे जावू लागला. तो पीटरला चावणार एवढ्यात सुनील शेट्टी ने प्रवेश केला आणि पीटर ला बाजूला सारून स्वत : किड्यासमोर गेला. हे सगळे एवढ्या वेगाने घडले की कोळी सुनीलला चावला. पायाला. आणि तेवढ्यात तेथे सनी देओल आला.... कीडा संतापून सनी देओलला कडाडून चावला.... (क्रमश :)

सुनील: तू मला सांगीतले होतेस पीटर की स्टीवन स्पीलबर्ग मला एखादा चांगला रोल देईल, पण तो मला फोनवर म्हणाला की तो आता 'डायनोसोर-मॅन' सिनेमा काढतोय आणि त्यात तो मला घ्यायचे म्हणतोय. म्हणजे मी डायनोसोर मध्ये रुपांतरीत झाल्यावर खरा हिरो डायनोसोर असेल, मी नाहीच... आणि हे तुला सांगायला आलो तर हा काय प्रकार चालू आहे? चावाचावी? हे बरोबर नाही. मी 'बलवान' आहे. या 'पृथ्वी' वर मी तुझी अशी 'हेरा फेरी' खपवून घेणार नाही.

पीटर: पण, माझे ऐक तर!...

सुभाष: अरे वा! माझ्या नव्या मराठी चित्रपटाचे नाव सुचले.. अशी ही चावाचावी ...

सनी: हे मी आता किड्याच्या चाव्याने 'घायल' झाल्यामुळे तुम्हा सगळ्यांसाठी 'घातक' सिद्ध होईन...

या सगळ्या गोंधळात कोळी बिचारा पीटरला चावण्यासाठी पुढे जाऊ लागला. तेवढ्यात एका चॅनेलची पत्रकार आणि गोविंदा तेथे येतात. गोविंदा मध्ये आल्याने कोळीचा नेम चुकून तो गोविंदाला चावला आणि अचानक कोळी जोराजोरात हसायला लागला.

पीटर: अरे मित्रा ... चाव मला पटकन! वेळ दडवू नकोस!

चॅनेलची पत्रकार: स्पायडर जी, ' सुपरस्टार न्यूज चॅनेलतर्फे' मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचेत.''सध्या मेरी जेन कुठे आहे?','पहिल्या मधुचंद्राच्या वेळेस मेरी जेनचा घुंघट तुम्ही बाजूला करण्या ऐवजी तीनेच तुमचा मुखवटावजा घुंघट बाजूला केला असेल, तेव्हा तुम्हाला काय वाटले?','या कोळ्याचे उपकार तुम्ही का व कसे विसरले?','तुम्ही आमचे हे सुपरस्टार न्यूज चॅनेल बघता का कधी?', आमच्या चॅनेलची टॅगलाईन "खबरें ऐसी तैसी.. कुछ भी...कही से भी, कैसे भी.." तुम्हाला कशी वाटते...?'

नाना पाटेकर तेथे आला: हे 'कॅमेरावाली बाई' चूप बस की! पूर्वीच्या 'कलमवाल्या बाया' आता 'कॅमेरावाल्या' झाल्यात , म्हणून काय काहीही प्रश्न विचारणार? स्वतःला 'क्रांतीवीर' समजता की काय तुम्ही?"

पीटरला काय करावे समजेना. तो कोळ्याचे हसणे थांबण्याची वाट बघू लागला...

..... छत फोडून क्रीश तेथे आला.

क्रीश: मी डॉक्टर सिद्धांत आर्य चा पाठलाग करत होतो आणि तू मध्ये आलास पीटर आणि त्यांचे हेलीकॉप्टर दूर निघून गेले... का मध्ये आलास तू? माझे टार्गेट मिस झाले...

सगळीकडे बातमी समजल्या मुळे हॉस्पीटलमध्ये खुप गर्दी झाली... कोळी चावला की पीटरला लगेच बरे वाटणार होते. पण किड्याचे हसणे थांबेना... शेवटी पीटरने कोळ्यावर झेप घेतली आणि कोळ्याने पटापट पीटरला चावायला सुरूवात केली... तेवढ्यात 'संपतराव संपाते' आणि 'समजूतराव समजूते' हे दोन मंत्री तेथे आले आणि कोळ्याला पीटरच्या हातून हिसकावू लागलेत.. 'संपतरावांनी' कोळ्याला हिसकावले आणि कीडा त्यांना संतापून कडाडून चावला ...

.. आणि क्षणार्धात किडयाचा मृत्यू झाला...
मंत्र्याला चावल्यामुळे किड्याला मरणोत्तर प्रतिकात्मक अटक झाली. पोलीस रुममध्ये चाललेला गोंधळ बघत होते.

सनी , गोविंदा एकमेकांवर जाळे सोडत होते. सुभाषनी तेथेच शूटींग करायला सुरूवात केली.

स्पायडरमॅन कधी रडला नव्हे एवढा रडला. सुपरस्टार चॅनेलची पत्रकार 'कु. प्रश्नावली प्रश्नकारिता' धो धो रडणाऱ्या स्पायडरमॅनला खुप प्रश्न विचारू लागाली. एखादा माणुस खुप भावनाविवश झाल्यावर सारखे प्रश्न विचारून भांडावून सोडणे हा चॅनेल पत्रकारांचा आवडता छंद आहे.

कु. प्रश्नावली : " कसे वाटते आहे आपल्याला आता? तुमच्या शक्तीचा जन्मदाताच आता या जगात नाही. कसे वाटते, अहो सांगा ना, कसे वाटते आपल्याला?"

पीटर : " खुप रडू येते आहे. तुम्ही काय केलं असतं? हसला असता का? हं?"

कु. प्रश्नावली : " नाही हो. मीही रडले असते. बरं मला एक सांगा, मेरी जेन कुठे आहे... मी आधीही हा प्रश्न विचारला, आपण उत्तर दिले नाही?"

पीटर : " कोणते मीठ खाता तुम्ही? ...म्हणजे माझ्या जखमेवर चोळण्यासाठी तुम्ही ते मीठ बरोबर आणले असेलच, नाही का?"

कु. प्रश्नावली : " कसली जखम?"

पीटर : " अहो, काय सांगू, ती ग्रीन गोब्लीन बरोबर पळून गेली...तीला जाळ्या जाळ्यांपेक्षा तो जादूच्या विमानावर उभा राहून उडणारा तो हिरवा गबलू आवडला."

कु. प्रश्नावली : " मग तेव्हा कसे वाटले आपल्याला?"

आता मात्र स्पायडरमॅन संतापला. त्याने नवीनच मिळालेल्या शक्तीच्या आधारे कु. प्रश्नावली च्या ओठांना सील केले. नंतर उचलून तीला उडत उडत सुपरस्टार चॅनेलच्या ऑफिसमध्ये नेवून सोडले. तेव्हा बातम्या चालूच होत्या...

वृत्तनिवेदक : " आताच आपण बघितले की स्पायडरमॅन कडून आमच्या पत्रकाराचे तोंड बंद करण्यात आले आहे. हा अन्याय असून लोकशाहीचा अपमान आहे.... आता आम्ही मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करणार आहोत...."

पुढे ऐकायला स्पायडरमॅन थांबला नाही. प्रतिस्पर्धी चॅनेल कडे जावून त्याने आपले म्हणणे मांडले. म्हणून त्याचेविरुद्ध सुपरस्टार चॅनेल तक्रार करू शकले नाही.

नंतर त्याने भारत सरकारकडे किड्याचा पुतळा उभारायची विनंती केली.

त्यानंतर किड्याचा पुतळा उभारण्यात आला. स्पायडरमॅन मुंबईत आल्याची आठवण म्हणून.

मग विरेंद्र शहांना तसेच मरीन ड्राईव्हच्या त्या ऑफिसमधल्या सगळ्या जणांना भेटून स्पायडरमॅन हवेत दिसेनासा झाला. तो अमेरिकेत पोचला.

त्याला कळले की मेरी जेनला ग्रीन गोब्लीन ने पळवून नेले होते व तीला असे सांगायला सांगीतले होते की ती स्वतःच्या मर्जीने त्याच्यासोबत गेली होती. 'हिरव्या गबलू' चा पुन्हा पराभव करून स्पायडरमॅनने मेरी जेनला सोडवले.

अमेरीकन सरकार खुष झाले. त्यांनी स्पायडरमॅन ची डुप्लीकेटस बनवायचा विचार सोडून दिला...

इकडे बॉलीवुडमध्ये 'चावले गेलेले' कलाकार चित्रपटात स्टंट सीन करू लागले..

रेस चित्रपट स्पायडरमॅनशिवायच पूर्ण झाला.

अशा प्रकारे, स्पायडरमॅनच्या जीवाची मुंबई झाली...
आणि किड्याचा मात्र जीव गेला.

(समाप्त)

कृपया आपल्या प्रतिक्रिया कथेच्या खाली आपल्या  gmail ने login करून जरूर द्या किंवा मला इमेल ने प्रतिक्रिया पाठवा. कथा आवडल्यास माझा ब्लॉग सर्वाना वाचायला सांगा तसेच फेसबुक, ट्विटर वर जरूर शेअर करा. धन्यवाद!! sonar.nimish@gmail.com
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel