आलिंगन घडे । मोक्ष सायुज्यता जोडे ॥१॥
ऎसा संतांचा महिमा । झाली बोलायची सीमा ॥२॥
तीर्थे पर्वकाळ । अवघीं पायांणें सकळ ॥३॥
तुका म्हणॆ देवा । त्याची केली पावे सेवा ॥४॥
*
ऎसा ज्याचा अनुभव । विश्वदेव सत्यत्वें ॥१॥
देव तयाजवळी असे । पाप नासे दर्शनें ॥२॥
काम क्रोधा नाहीं चाली । भूतीं झाली समाता ॥३॥
तुका म्हणॆ भेदा-भेद । गेला वाद खंडोनी ॥४॥
*
उजळलें भाग्य आतां । अवघी चिंता वारली ॥१॥
संतदर्शनें हा लाभ । पाद्मनाभ जोडला ॥२॥
संपुष्ट हे ह्रुदयपेटीं । करुनि पोटीं सांठवूं ॥३॥
तुका म्हणे होता ठेवा । तो या भावा सांपडला ॥४॥
*
काय वाणूं आतां न पुरे हे वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसे ॥१॥
थोरीव सांडिली आपुली परिसें । नेणे शिवों कैसें लोखंडासी ॥२॥
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती । देह कष्टविती परउपकारें ॥३॥
भूतांची दया हे भांडवल संतां । आपुली ममता नाहीं देहीं ॥४॥
तुका म्हणे सुख पराविया सुखें । अमृत हें मुखें स्त्रवतसे ॥५॥
*
काय सांगो आतां संतांचे उपकार । मज निरंतर जागविती ॥१॥
काय द्यावे त्यासी व्हावे उतराई । ठेवितां हा पायीं जीवा थोडा ॥२॥
सहज बोलणें हीत उपदेश । करुनि सायास शिकविती ॥३॥
तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्तीं । तैसे मज येती साभाळीत ॥४॥
*
कोण पुण्यें यांचा होईन सेवक । जिहीं द्वंद्वंदिक दुराविलें ॥१॥
ऎसी वर्मे मज दावीं नारायणा । अंतरींच्या खुणा प्रकटोनी ॥२॥
बहु अवघड असे संत भेटी । तरी जगजेठी करुणा केली ॥३॥
तुका म्हणे मग नये वृत्तीवरीं । सुखाचे शेजारीं पहुडईन ॥४॥
*
जे कां रंजले गांजलें । त्यासी म्हणे जो आपुले ॥१॥
तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ॥२॥
मृदु सबाह्य नवनीत । तैसें सज्जनाचें चित्त ॥३॥
ज्यासी आपंगिता नाही । त्यासी धरी जो ह्रुदयी ॥४॥
दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ॥५॥
तुका म्हणे सांगु किती । तोचि भगविंताची मूर्ती ॥६॥
*
तुम्ही संत मायबाप कृपावंत । काय मी पतित कीर्ति वानूं ॥१॥
अवतार तुम्हां धराया कारण । उद्धराया जन जड जीव ॥२॥
वाढवया सुख भक्ति भाव धर्म । कुळाचार नाम विठोबाचें ॥३॥
तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी । तैसें तुम्ही जगीं संतजन ॥४॥
*
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वेद अच्युत सर्वकाळ ॥१॥
तयाच्या चिंतनें तरतील दोषी । जळतील रासी पातकांच्या ॥२॥
देव इच्छी रज चरणींची माती । धावत चालती मागें मागें ॥३॥
काय त्या उरलें वेगळें आणिक । वैकुंठनायक जया कंठीं ॥४॥
तुका म्हणे देव भक्तांचा संगम । तेथें ओघ नाम त्रिवेणीचा ॥५॥
*
पाप ताप दैन्य जाय उठाउठी । झालिया भेटी हरिदासांची ॥१॥
ऎसें बळ नाही आणिकाचें अंगी । तपें तीर्थें जगी दानें व्रतें ॥२॥
चरणींचे रज वंदी शूळपाणी । नाचती कीर्तनीं त्याचें माथा ॥३॥
भव तरावया उत्तम हे नाव । भिजों नेदीं पाय हात कांही ॥४॥
तुका म्हणॆ मना झालें समाधान । देखिल्या चरण वैष्णावांचे ॥५॥
*
भक्त ऎसे जाणां जे देहीं उदास । गेले आशापाश निवारुनि ॥१॥
विषय तो त्यांचा झाला नारायण । नावडे धन जन माता पिता ॥२॥
निर्वाणी गोविंद असे मागें पुढें । कांहींच सांकडें पडों नेदी ॥३॥
तुका म्हणे सत्य कर्मा व्हावें साह्य । घातलिया भय नरका जाणें ॥४॥
*
शुद्ध बीजपोटीं । फ़ळें रसाळ गोमटीं ॥१॥
मुखीं अमृताची वाणी । देह देवाचे कारणीं ॥२॥
सर्वांगी निर्मळ । चित्त जैसें गंगाजळ ॥३॥
तुका म्हणे जाती । ताप दर्शनें विश्रांती ॥४॥
*
संतचरणरज लागतां सहज । वासनेचें बीज जळोन जाय ॥१॥
मग रामनामीं उपजे आवडी । सुख घडोघडी वाढों लागे ॥२॥
कंठी प्रेम दाटे नयनीं नीर लोटे । ह्रुदयी प्रगटे नामरुप ॥३॥
तुका म्हणे साधन सुलभ गोमटें । परि उपतिष्ठे पूर्वपुण्यें ॥४॥
*
संतांनी सरता केलों तैशापरी । चंदनाने बोरी व्यापियेली ॥१॥
गुण दोष याति न विचारी कांहीं । ठाव दिला पायीं आपुलिया ॥२॥
तुका म्हणॆ आलें समर्थांच्या मना। तरी होय राणा रंक त्याचा ॥३॥
*
सर्व सुखें आजि येथेंचि वोळलीं । संतांची देखिलीं चरणांबुजें ॥१॥
सर्व काळ होतों आठवीत मनीं । फ़िटली ते धणी येणें काळें ॥२॥
तुका म्हणे वाचा राहिली कुंठित । पुढें झालें चित्त समाधान ॥३॥
*
नव्हती ते संत करितां कवित्व । संतांचे ते आप्त नव्हती संत ॥१॥
येथें नाही वेश सरतें आडनांव । निवडे घावडाव व्हावा अंगी ॥२॥
नव्हती ते संत धरितां भोपाळा । पांघरती वाकाळा नव्हती संत ॥३॥
नव्हती ते संत करितां कीर्तन । सांगतां पुराण नव्हती संत ॥४॥
नव्हती ते संत वेदाच्या पठणॆं । कर्म आचरणें नव्हती संत ॥५॥
नव्हती संत करितां तप तीर्थाटण । सेविलिया वन नव्हती संत ॥६॥
नव्हती संत माळा मुद्रांच्या भुषणें । भस्म उधळणें नव्हती संत ॥७॥
तुका म्हणे नाहीं निरसला देह । तोंवरी अवघे हे सांसारिक ॥८॥
*
जाणे भक्तीचा जिव्हाळा । तोचि दैवाचा पुतळा ॥१॥
आणिक नये माझ्या मना । हो कां पंडित शहाणा ॥२॥
नाम रुपीं जडलें चित्त । त्याचा दास मी अंकित ॥३॥
तुका म्हणे नवविध । भक्ति जाणे तोचि शुद्ध ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.