*
सर्वात्मकपण । माझें हिरोनि नेतो कोण ॥१॥
मनीं भक्तीची आवडी । हेवा व्हावी ऎशी जोडी ॥२॥
घेईन जन्मांतरे । हेंचि करावया खरें ॥३॥
तुका म्हणे देवा । ऋणी करुनि ठेवूं सेवा ॥४॥
*
संसाराचे अंगीं अवघींच व्यसनें । आम्ही या कीर्तनें शुद्ध झालों ॥१॥
आतां हें सोवळें झालें त्रिभुवन । विषम धोऊन सांडियेलें ॥२॥
ब्रह्मपुरीं वास करणें अखंड । न देखिजे तोंड विटाळाचे ॥३॥
तुका म्हणे आम्हां एकान्ताचा वास । ब्रह्मी ब्रह्मरस सेवूं सदा ॥४॥
*
सर्व संगीं वीट आला । तूं एकला आवडसी ॥१॥
दिली आतां मिठी । जगजेठी न सोडीं ॥२॥
बहु झालों खेदक्षीण । येणें शीण तो नासे ॥३॥
तुका म्हणे गंगे वास । बहु त्या आस स्थळाची ॥४॥
*
तुजविण कोणां । शरण जाऊं नारायणा ॥१॥
ऎसा न देखें मी कोणी । दुजा तिहीं त्रिभुवनीं ॥२॥
पाहिलीं पुराणें । धोडोळिलीं दरुषणें ॥३॥
तुका म्हणॆ ठायीं । जडुन ठेलों तुझ्या पायीं ॥४॥
*
येथें दुसरी न सरे आटी । देवो भेटी जावया ॥१॥
तोचि ध्यावा एक चित्तें । करुनि रितें कलेवर ॥२॥
षड्‍ऊर्मी ह्रदयांत । यांचा अंत पुरवूनि ॥३॥
तुका म्हणे खुंटे आस । तेथें वास करी तो ॥४॥
*
येणें बोधें आम्ही असों सर्वकाळ । करुं हे निर्मळ हरिकथा ॥१॥
आम्ही भूमीवरी एक पै दैवाचें । निधान हें वाचे सांपडलें ॥२॥
तरतील कुळें दोन्ही उभयतां । गातां आइकता सुखरुप ॥३॥
न चळे हा मंत्र न म्हणें यातीकुळ । नलगे काळ वेळ विचारावी ॥४॥
तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा । सांठविन हांवा ह्रदयांत ॥५॥
*
आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा । म्हणोनि व्यभिचारा टेकलियें ॥१॥
रात्रंदिवस मज पाहिजे जवळी । क्षण त्या निराळी न गमे घडी ॥२॥
नाम गोष्टी माझी सोय सांदा आतां । रातलें अनंता तुका म्हणे ॥३॥
*
हाचि नेम आतां न फ़िरें माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥
घररिघी झालें पट्टराणी बळें । वरिलें सावळें परब्रह्म ॥२॥
बळियाचा अंगसंग झाला आतां । नाहीं भय चिंता तुका म्हणॆ ॥३॥
*
अवघा भार वाटे देवा । संतसेवा न करितां ॥१॥
कसोटी हे असे हातीं । सत्य मूर्तीं भगवंत ॥२॥
चुकलोंसा दिसे पंथ । गेले संत तो ऎसा ॥३॥
तुका म्हणे सोंग वायां । कारण या अनुभवें ॥४॥
*
पिकलिया सेंद कडुपण गेलें । तैसें आम्हां केलें पांडूरंगें ॥१॥
काम क्रोध लोभ निमाले ठायींचि । सर्व आनंदाची सृष्टि झाली ॥२॥
आठव नाठव गेले भावाभाव । झाला स्वयमेव पांडुरंग ॥३॥
तुका म्हणे भाग्य या नांवें म्हणीजे । संसारीं जन्मीजे याचिलागीं ॥४॥
*
मुक्त होता परि बळें झाला बद्ध । घेऊनियां छंद माझें माझें ॥१॥
पाप पुण्य अंगी घेतलें जडून । वर्म नेणें कोण करिता तो ॥२॥
तुका म्हणॆ गेलें व्यर्थ वायांविण । जैसा मृग शीण मृगजळीं ॥३॥
*
माझे गडी कोण कोण । निवडा भिन्न यांतुनी ॥१॥
आप आपणामध्ये मिळों । एक खेळों एकाशीं ॥२॥
घाबरियांच्या मोडा काड्या । धडा भ्याडा वळतियां ॥३॥
तुका म्हणे देवापाशीं । विटाळशी नसावी ॥४॥
*
हरिदासाचिये घरीं । मज उपजवा जन्मांतरीं ॥१॥
म्हणसी कांही मागा । हेंचि देगा पांडुरंगा ॥२॥
संता लोटांगणीं । जातां लाज नको मनीं ॥३॥
तुका म्हणे अंगीं । शक्ति देई नाचे रंगीं ॥४॥
*
हरि तुझें नाम गाईन अखंड । याविण पाखंड नेणें कांहीं ॥१॥
अंतरीं विश्‍वास अखंड नामाचा । काया मनें वाचा हेंचि देई ॥२॥
तुका म्हणे आतां देई संतसंग । तुझे नामी रंग भरो मना ॥३॥
*
हें तों एक संतांठायीं । लाभ पायीं उत्तम ॥१॥
म्हणवितां त्यांचे दास । पुढें आस उरेना ॥२॥
कृपादान केले संतीं । कल्पांतींही सरेना ॥३॥
तुका म्हणे संतसेवा । हेचि देवा उत्तम ॥४॥
*
जन्मा आलों त्याचें । आजि फ़ळ झालें साचें ॥१॥
तुम्ही सांभाळिलें संतीं । भय निरसली खंती ॥२॥
कृतकृत्य झालों । इचछा केली ते पावलों ॥३॥
तुका म्हणे काळ । आतां करुं न शके बळ ॥४॥
*
कोण पुण्य़ कोणा गांठी । ज्यासी ऎसियांची भेटी ॥१॥
जिहीं हरी धरिला मनीं । दिलें संसारासी पाणी ॥२॥
कोण हा भाग्याचा । ऎसियासी बोले वाचा ॥३॥
तुका म्हणे त्याचे भेटी । होय संसारासी तुटी ॥४॥
*
घातला दुकान । देती आलियासी दान ॥१॥
संत उदार उदार । भरलें अनंत भांडार ॥२॥
मागत्याची पुरे । धणी आणिकांसी उरे ॥३॥
तुका म्हणे पोतें । देवें भरिलें नव्हें रितें ॥४॥
*
उठाउठी अभिमान । जाय ऎसें स्थळ कोण ॥१॥
तें या पंढरीस घडे । खळां पाझर रोकडे ॥२॥
नेत्रीं अश्रूचिया धारा । कोठें रोमांच शरीरा ॥३॥
तुका म्हणे काला । कोठें अभे देखिला ॥४॥
*
हित व्हावें तरी दंभ दुरी ठेवा । चित्तशुद्धि सेवा देवाची हे ॥१॥
आवडी विठ्ठल गाइजे एकान्तीं । अलभ्य ते येती लाभ धरा ॥२॥
आणिकां अंतरी न द्यावी वसती । कारावी हे शांती वासनेची ॥३॥
तुका म्हणॆ बाण हाचि निर्वाणींचा । वाउगी हे वाचा वेचूं नये ॥४॥
*
उपाधि वेगळे तुम्ही निर्विकार । कांहींच संसार तुम्हां नाहीं ॥१॥
ऎसें मज करुनि ठेवा नारायणा । समूळ वासना नुरवावी ॥२॥
नि :संग तुम्हासी राहणें एकट । नाही कटकट साहों येत ॥३॥
तुका म्हणे नाहीं मिळों येत शिळा । रंगासी सकळा स्फ़टिकाची ॥४॥



आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel