नाम घेतां मन निवे । जिव्हे अमृतचि स्त्रवे । होताती बरवे । ऎसे शकुन लाभाचे ॥१॥
मन रंगले रंगले । तुझ्या चरणी स्थिरावलें । केलिया विठ्ठलें । ऎसी कृपा जाणावी ॥२॥
झालें भोजनसें दिसें । चिरा पडोनि ठेला इच्छे । धालियाच्या ऎसे । अंगा येती उदगार ॥३॥
सुख भेटीं आलें सुखा । निध सांपडला मुखा । तुका म्हणे लेखा । आतां नाहीं आनंदा ॥४॥
*
यज्ञ भूतांच्या पाळणा । भेद कारिय कारणा । पावावया उपासना । ब्रह्मस्थानीं प्रस्थान ॥१॥
एक परी पडिलें भागीं । फ़ळ बीजचिये अंगीं । धन्य तोचि जगीं । आदिअ अंत सांभाळी ॥२॥
आवश्‍वक तो शेवट । येर अवघी खटपट । चालों जाणें वाट । ऎसा विरळा एखादा ॥३॥
तुका होवोनि निराळा । क्षराअक्षरा वेगळा । पाहे निगमकळा । बोले विठ्ठलप्रसादे ॥४॥
*
देखोनि हरखली अंड । पुत्र झाला म्हणॆ रांड । तंव तो झाला भांड । चाहाड चोरटा शिंदळ ॥१॥
जाय तिकडे पीडी लोकां । जोडी भांडवल थुंका । थोर झाला चुका । वर कां नाहीं घातली ॥२॥
भूमि कांपे त्याच्या भारें । कुंभपाकाचीं शरीरें । बोलें निष्ठुर उत्तरें । पापदृष्टि मळिण चित्त ॥३॥
दुराचारी तो चांडाळ । पाप सांगतें विटाळ । तुका म्हणॆ खळ । म्हणॊनियां निषिद्ध तो ॥४॥
*
ऎसे ऎसियानें भेटती ते साधु । ज्यांच्या दर्शनें तुटे भवबंधु । जे कां सच्चिदानंदी नित्यानंदु । जे कां मोक्षसिद्धि तीर्थवंदु रे ॥१॥
भाव सर्व कारण मूळ बंदु । सदा समबुद्धि नास्तिक्य भेदु । भूतकृपा मोडी द्वेषकंदु । शत्रु मित्र पुत्र समकरीं बंधू रे ॥२॥
मन बुद्धि काया वाचा शुद्ध करी । रुप सर्वत्र देखोनि नमस्कारीं । लघूत्व सर्व भावें अंगीकारीं । सांडी मांडी मी तूं पण ऎशी थोर रे ॥३॥
अर्थकामचाड नाहीं चित्ता । मानामान मोह माया मिथ्या । वर्ते समाधानी जाणॊनि नेणता । साधु भेट देती तया अवचिता रे ॥४॥
मनीं दृढ धरीं विश्‍वास । नाहीं सांडीमांडीचा सायास । साधुदर्शन नित्यकाळ त्यास । तुका म्हणे जो विटला जाणीवेस रे ॥५॥
*
पुण्य फ़ळलें बहुतां दिवसां । भाग्य उदयाचा ठसा । झालों सन्मुख तो कैसा । सन्तचरण पावलों ॥१॥
आजि फ़िटलें माझे कोडें । भवदु:खाचें सांकडे । कोंदाटले पुढें । परब्रम्ह सांवळें ॥२॥
आलिंगने संताचिया । दिव्य झाली माझी काया । मस्तक हें पायां । वरी त्यांच्या ठेवितां ॥३॥
तुका म्हणे धन्य झालो । सुखें संतांचिया धालों । लोटांगणीं आलों । पुढें भार देखोनी ॥४॥
*
धन्य दिवस आजी दर्शन संतांचें । नांदें तया घरीं दैवत पंढरीचें ॥१॥
धन्य पुण्यरुप कैसा झाला संसार । देव आणि भक्त दुजा नाहीं विचार ॥२॥
धन्य पूर्व पुण्य ओढवलें निरुतें । संतांचे दर्शन झालें भाग्यें बहुतें ॥३॥
तुका म्हणे धन्य आम्हां जोडिली जोडी । संतांचे चरण आतां जीवें न सोडीं ॥४॥
*
देवो ऎकें हे विनंती । मज नकोरे हे मुक्ति । तया इच्छा गति । हेंचि सुख आगळॆं ॥१॥
या या वैष्णवांचे घरी । प्रेमसुख इच्छा करी । रिद्धिसिद्धि व्दारीं । कर जोडुनी तुष्ठती ॥२॥
नको वैकुंठीचा वास । असे तया सुखा नाश । अद्भुत हा रस । कथाकाळीं नामाचा ॥३॥
तुका म्हणे आम्हां । जन्म गोड यासाठीं ॥४॥
*
तेथे सुखाची वसति । गाती वैष्णव नाचती । दिंड्या पताका झळकती । जे गर्जती हरिनामें ॥१॥
दोषा झाली घेघेमारी । पळती भरले दिशा चारी । न येती माघारीं । नाहीं उरी परताया ॥२॥
विसरोनि देवपणा । उभा पंढरीचा राणा । विटोनि निर्गुणा । रुप धरिलें गोजिरें ॥३॥
पोट सेवितां न धाये । भुक भुकेलीच राहे । तुका म्हणे पाहे । कोणा वास मुक्तिची ॥४॥
*
बहु भितो जाणपणा । आड न यो नारायणा । घेईन प्रेमपान्हा । भक्तिसुख निवाडें ॥१॥
यासी तुळे ऎसें कांही । दुजे त्रिभुवनीं नाहीं । काला भात दही । ब्रह्मदिकां दुर्लभ ॥२॥
निमिषार्ध संतसंगती । वास वैकुंठी कल्पांती । मोक्षपदें येती । ते विश्रांती बापुडी ॥३॥
तुका म्हणे हेंचि देई । मीतूंपणा खंड नाही । बोलिले त्या नाहीं । अभेदाची आवडी ॥४॥
*
वाट वैकुंठीं पाहाती । भक्त कै पा येथें येती । तयां जन्ममरणखंती । नाहीं चित्तीं परलोक ॥१॥
धन्य धन्य हरिचे दास । तयां सुलभ गर्भवास । ब्रह्मादिक करिती आस । तीर्थे वास भेटीची ॥२॥
कथा श्रवण व्हावयास । यमधर्मा थोर आस । पाहे रात्रंदिवस । वाट कर जोडोनि ॥३॥
रिद्धिसिद्धि न पाचारितां । त्या धुंडिती हरिभक्ता । मोक्ष सायुज्यता । वाट पाहे भक्तांची ॥४॥
असती जेथें उभे ठेले । सदा प्रेमसुखें धाले । आणीकही उद्धरिले । महादोषी चांडाळ ॥५॥
सकळ करिती त्यांची आस । सर्वभावें ते उदास । धन्य भाग्य त्यांस । तुका म्हणे दर्शनें ॥६॥
*
अखंड जया तुझी प्रीती । मज दे तयाची संगति । मग मी कमळापति । तुज बा नाणीं कांटाळा ॥१॥
पडोनि राहेन तये ठायीं । उगाचि संतांचिये पायीं । न मगें न करीं कांहीं । तुझी आण गा विठोवा ॥२॥
तुम्ही आम्ही पीडों जेणें । दोन्ही वारती एकानें । बैसलों धरणें । हाका देत दाराशी ॥३॥
तुका म्हणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला । न पाहिजे केला । अवघा माझा अव्हेर ॥४॥
*
धन्य पुंडलिका बहु बरें केलें । निधान आणिलें पंढरिये ॥१॥
न करीं आळस आलिया संसारी । पाहें पा पंढरी भूवैकुंठ ॥२॥
न पविजे केल्या तपाचिया राशी । तें जनलोकासी । दाखविलें ॥३॥
सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव । शास्त्रांनीं हा निवडिला ॥४॥
विष्णुपद गया रामधाम काशी । अवघीं पायापाशीं विठोबाच्या ॥५॥
तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस । तात्काळ हा नाश अहंकाराचा ॥६॥
*
पावलों पंढरी वैकूंठभुवन । धन्य आजि दिन सोनियाचा ॥१॥
पावलों पंढरी आनंदगजरे । वाजतील तुरे शंखभेरी ॥२॥
पावलों पंढरी क्षेम आलिंगनीं । संत या सज्जनीं निवविलों ॥३॥
पावलों पंढरी पार नाहीं सुखा । भेटला हा सखा मायबाप ॥४॥
पावलों पंढरी येरझार खुंटलीं । माउली वोळली प्रेमपान्हा ॥५॥
पावलो पंढरी आपुलें माहेर । नाहीं संवसार तुका म्हणे ॥६॥
*
कास घालोनि बळकट । झालों कळीकाळावरी नीट । केली पायवाट । भवसिंधु वरुनि ॥१॥
या रे या रे लहान थोर । याति भलती नारीनर । करावा विचार । न लगे चिंता कोणासी ॥२॥
कामी गुंतले रिकामे । जपी तपी येथें जमे । लाविले दमामे । मुक्त आणि मुमुक्षा ॥३॥
एकंदर शिक्का । पाठविला येही लोका । आलों म्हणे तुका । मी नामाचा धारक ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel