*
उदार तूं हरी । ऎसी कीर्ति चराचरीं । अनंत हे थोरी । गर्जताती पवाडे ॥१॥
तुझे पायीं माझा भाव । पुसी जन्ममरण ठाव । देवाचा तूं देव । स्वामी सकळां ब्रह्मांडा ॥२॥
मागणें तें तुज मागों । जीवभाव तुज सांगो । लागों तरी लागों । पायां तुमच्या दातारा ॥३॥
दिसों देसी कीविलवाणें । तरी तुजचि हे उणें । तुका म्हणे जिणें माझे तुज अधीन ॥४॥
*
नव्हे गुरुदास्य संसारिया । वैराग्य तरी भेणें कापें विषयां । तैसें नाम नव्हे पंढरीराया । जया सायास न लगती ॥१॥
म्हणोनि गोड सर्वभावें । आंघोळी न लगे तोंडे धुवावें । आर्तचाड जीवें । नलगे भ्यावें संसारा ॥२॥
कर्म तंव न पुरे संसारिक । धर्म तव फ़ळदायक । नाम विठ्ठलाचें एक । नाशी दु :ख भवाचें ॥३॥
न लगे सांडणे मांडणें । आगमनिगमाचें देखणें । अवघे तुका म्हणे । विठ्ठल नामें आटलें ॥४॥
*
कळे ना कळे ज्या धर्म । ऎका सांगतों रे वर्म । माझ्या विठोबाचें नाम । अट्टाहासें उच्चारा ॥१॥
तो या दाखवील वाटा । जया पाहिजे त्या निटा । कृपावंत मोठा । पाहिजे तो कळवळा ॥२॥
पुसतां चुका होतो वाटा । सवें बोळावा गोमटा । मोडों नेदी कांटा । घेऊं सांटा चोरासी ॥३॥
तुका म्हणे मोल । नलगे द्यावें वेचा बोल । विठ्ठल विठ्ठल । ऎसा छंद मनासी ॥४॥
*
कै वाहावे जीवन । कै पलंगीं शयन ॥१॥
जैसी जैसी वेळ पडे । तैसें तैसें होणें घडे ॥२॥
कै भोज्य नानापरी । कै कोरड्या भाकरी ॥३॥
कैं बैसावें वहनीं । कै पायीं अनवाणी ॥४॥
कैं उत्तम प्रावणें ।कैं वसनें तीं जीणें ॥५॥
कैं सकळ संपत्ती । कैं भोगणें विपत्ती ॥६॥
कैं सज्जनाशीं संग । कैं दुर्जनाशीं योग ॥७॥
तुका म्हणे जाण । सुख दु:ख तें समान ॥८॥
*
कथा त्रिवेणीसंगम । देव भक्त आणि नाम । तेथींचें उत्तम । चरणरज वंदिता ॥१॥
जळती दोषांचे डोंगर । शुद्ध होती नारी नर । गाती ऎकती सादर । जे पवित्र हरिकथा ॥२॥
तीर्थें तया ठाया । येती पुनीत व्हावया । पर्वकाळ पायां । तळीं वसे वैष्णवां ॥३॥
अनुपम्य हा महिमा । नाही द्यावया उपमा । तुका म्हणॆ ब्रह्मा । नेणें वर्णू या सुखा ॥४॥
*
यमधर्म सांगे दूतां । तुम्हां नाहीं तेथें सत्ता । जेथें होय हरिकथा । सदा घोष नामाचा ॥१॥
नका जाऊं तया गावां । नामधारकाच्या शिवां । सुदर्शन यावा । घरटी फ़िरे भोंवतीं ॥२॥
चक्र गदा घेउनि हरि । उभा असे त्याचें व्दारी । लक्ष्मी कामारी । रिद्धिसिद्धिसहित ॥३॥
ते बळिया शिरोमणी । हरिभक्त ये मेदिनी । तुका म्हणे कानीं । यम सांगे दुतांचे ॥४॥
*
परमअमृतें रसना ओलावली । मनाची राहिली वृत्ति पायीं ॥१॥
सकळहीं तेथें वोळलीं मंगळें । वृष्टि केली जळें आनंदाच्या ॥२॥
सकळ इंद्रिये झालीं ब्रह्मरुप । ओतलें स्वरुप माजी तया ॥३॥
तुका म्हणे जेथें वसे भक्तराव । तेथें नांदे देव संदेह नाहीं ॥४॥
*
तेचि संत तेचि संत । ज्यांचा हेत विठ्ठलीं ॥१॥
नेणती कांहीं टाणेटोणे । नामस्मरणावांचुनी ॥२॥
काया वाचा आणि मनें । धालें चिंतनें डुल्लती ॥३॥
निळा म्हणे विरक्त देहीं। आठवचि नाहीं विषयांचा॥४॥
*
मार्ग दाउनि गेले आधीं । दयानिधी संत पुढें ॥१॥
तेणेंचि पंथे चालों जातां । न पडे गुंता कोठेंकांही ॥२॥
मोडोनियां नाना मतें देती सिद्धांतें सौरसु ॥३॥
निळा म्हणे ऎसे संत । कृपावंत सुखसिंधु ॥४॥
*
मुख्य महाविष्णु चैतन्याचें मूळ । सांप्रदाय फ़ळ तेथोनियां ॥१॥
हंसरुपी ब्रह्मा उपदेशीं श्रीहरी । चतु:श्लोकीं चारी भागवत ॥२॥
तें गुज विधाता सांगें नारदासी । नारदें व्यासासी उपदेशिलें ॥३॥
राघव चैतन्य केलें अनुष्ठान । त्यासी द्वैपायनें कृपा केली ॥४॥
कृपा करुनि हस्त ठेवियेला शिरीं । बोध तो अंतरीं ठसावला ॥५॥
राघवां चरणीं केशव शरण । बाबाजीशीं पूर्ण कृपा त्याची ॥६॥
बाबजीनें स्वप्नीं येऊनि तुकयाला । अनुग्रह दिला निज प्रीति ॥७॥
जगद्गुरु तुका अवतार नामयाचा । संप्रदाय सकळांचा येथुनियां ॥८॥
निळा म्हणे मज उपदेश केला । संप्रदाय दिला सकळ जना ॥९॥
*
पूर्ण केला पूर्ण केला । पूर्ण केला मनोरथ ॥१॥
घरा आले घरा आले । घरा आले कृपाळू ॥२॥
सांभाळिले सांभाळिले । सांभाळीले अनाथा ॥३॥
केला निळा केला निळा । केला निळा पावन ॥४॥
*
इस तन धनकी कौन बढाई । देखत नयनोंमे मिट्टी मिलाई ॥धृ॥
अपने खातिर महल बनाया । आपही जाकर जंगल सोया ॥१॥
हड्डी जले जैसे लकडीकी मोली । बाल जले जैसी घासकी पोली ॥२॥
कहत कबीरा सुन मेरे गुनिया । आप मुवे पिछे डुब गई दुनिया ॥३॥
*
हरिसे कोई नहीं बडा । दिवाने क्यों गफ़लतमें पडा ॥धृ॥
प्रल्हाद बेटा हरिसे लपटा । जभी खंभ कडकडा ॥१॥
गोपीचंद बचन सुनकर । महल मुलुख सब छोडा ॥२॥
हनुमानने सेवा कीन्ही । ले द्रोणागिरी उडा ॥३॥
पुंडलिकने सेवा कीन्ही । विठ्ठल बिटपर खडा ॥४॥
कहत कबीरा सुन भाई साधु । हरीचरण चित जडा ॥५॥
*
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.