करुनी आरती । चक्रपाणि ओंवाळिती ॥१॥
आजि पुरले नवस । धन्य काळ हा दीवस ॥२॥
पाहा वो सकळां । पुण्यवंत तुम्ही बाळा ॥३॥
तुका वाहे टाळी । उभा सन्निध जवळीं ॥४॥
*
प्रेम सप्रेम आरती । गोविंदातें ओवाळीती ॥१॥
धन्य धन्य ते लोचनी । नित्य करिती अवलोकन ॥२॥
बाळा प्रौढा आणि मुग्धा । ओंवाळिती परमानन्दा ॥३॥
नामा म्हणे केशवातें । देखुनी राहिलों तटस्थें ॥४॥
*
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुंडलिका भेटी परब्रम्हा आलें गा । चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥
जयदेव जयदेव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा पावे जीवलगा । जयदेव जयदेव ॥धृ॥
तुळसीमाळा गळां कर ठेऊन कटीं । कांसे पीताबंर कस्तुरी लल्लाटीं । देव सुरवर नित्य येती भेटी । गरुड हनुमंत पुढे उभे राहाती ॥२॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमाजी स्नानें जे करिती । दर्शन हेळामत्रे तया होय मुक्ति । केशवासी नामदेव भावें ओवाळिती ॥३॥
*
आरती ज्ञानराजा । महा कैवल्य तेजा । सेविती साधु संत । मनु वेधला माझा ॥१॥
आरती ज्ञानराजा ॥धृ॥
लोपलें ज्ञान जगीं । हित नेणती कोणी । अवतार पांडुरंग । नांव ठेविलें ज्ञानी ॥२॥
प्रगट गुह्य बोले । विश्व ब्रह्माचि केले । रामा जनार्दनीं । पायीं टकचि ठेले ॥३॥
*
आरती एकनाथा । महाराजा समर्था । त्रिभुवनीं तूंचि थोर। सदगुरु जगन्नाथा ॥१॥
आरती एकनाथा ॥धृ॥
एकनाथ नाम सार । वेदशास्त्रांचें गुज संसार दु:ख नासे । महामंत्रांचें बीज ॥२॥
एकनाथ नाम घेतां । सुख वाटलें चित्ता । अनंत गोपाळ दासा । धणी न पुरे गातां ॥३॥
*
आरती तुकारामा । स्वामी सद्गुरुधामा । सच्चिदानंद मूर्ति । पाया दाखवी आम्हां ॥१॥
आरती तुकारामा ॥धृ॥
राघवे सागरांत । पाषाण तारिलें । तैसे तुकोबाचे अभंग रक्षिलें ॥२॥
तुकितां तुळनेसी । ब्रह्म तुकासी आलें । म्हणोनि रामेश्वरे । चरणीं मस्तक ठेविलें ॥३॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.