भागीरथीच्या तीरी कान्यकुब्जनगरीत रेणू राजाच्या यज्ञातून रेणुकेने प्रवेश केला. ही रेणुका म्हणजे अदिती व पार्वती यांचे एकत्र रूप होय.
भृगुऋषींचा मुलगा च्यवन याचा मुलगा ऋचिक ऋषी गोदावरीच्या काठी राहत होता. त्याने सोमवंशी राजाची कन्या सत्यवती हिच्याशी विवाह केला. पुढे सत्यवतीच्या पोटी शंकर व कश्यप एकरूप होऊन जन्माला आले. ऋचिक ऋषीने त्या मुलाचे नाव जमदग्नी ठेवले. एकदा ऋचिक ऋषींच्या आश्रमात अनेक ऋषी आले व त्यांनी काशीयात्रेला जाण्याचा विचार केला. त्याप्रमाणे ते सर्व जण जमदग्नीला घेऊन यात्रेला निघाले. कान्यकुब्जनगरीचा राजा रेणू याने आपल्या मुलीचे स्वयंवर मांडले आहे असे कळल्यावर ते ऋषी समारंभ पाहण्यासाठी मंडपात गेले. अनेक देशांचे राजे, राजपुत्र रेणुकेच्या प्राप्तीसाठी आले होते. रेणुकेने त्या सर्वांसमोरूनच जाऊन केवळ समारंभ पाहण्यासाठी आलेल्या जगदग्नीच्या गळ्यात माळ घातली. हे पाहून सर्व राजांना संताप आला व त्यांनी रेणुकेला पळवून नेण्याचा विचार केला. त्याप्रमाणे त्यांनी सैन्य एकत्र करून रेणू राजाशी युद्ध पुकारले. त्या मोठ्या सैन्याबरोबर लढून आपल्याला विजय कसा मिळणार, अशी रेणू राजाला चिंता वाटू लागली. तेव्हा जमदग्नीने आपले क्षात्रतेज प्रकट केले. त्याने आपल्या विलक्षण युद्धकौशल्याने सर्व राजांना पळवून लावले.
मग रेणू राजाने जमदग्नी व रेणुकेचा थाटामाटात विवाह करून दिला. त्याने जमदग्नीला घोडे, हत्ती, रथ, शहरे, रत्नभांडार इ. देऊन कन्यादान केले व भागीरथीच्या काठी राहण्याची विनंती केली. या समयी इंद्राने जमदग्नीला कामधेनू व कल्पतरू दिला. जमदग्नी रेणुकेसह भागीरथीच्या काठी राहू लागला.
पुढे रेणुकेच्या पोटी भगवंतांनी परशुरामाच्या रूपात अवतार घेतला.