श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
आजि नवल जाहलें अद्भुत ॥ जे भक्तविजय पातला वसंत ॥ म्हणोनि सज्जनजनवनांत ॥ गौरव बहु उदेलें ॥१॥
अर्थाची प्रभा फांकतां जाण ॥ बोधाचा शीतळ सुटला पवन ॥ तेणें जिज्ञासुवृक्षासी अंकुरण ॥ फुटों पाहे एकसरें ॥२॥
अर्थाच्या पल्लवशाखा ॥ सज्ञानपुष्पें आलीं देखा ॥ विज्ञानस्थिति अमोलिका ॥ फळें आलीं अविनाश ॥३॥
ऐसें श्रृंगारूनि वन ॥ दिसे अति शोभायमान ॥ त्रिविधतापें संतप्त जन ॥ ते बैसले येऊन छायेसी ॥४॥
जीवन्मुक्त जे राजहंस ॥ ते ये स्थळीं क्रीडावयास ॥ निजभक्तकथा अति सुरस ॥ सेविती राजस निजप्रीतीं ॥५॥
कोणी अज्ञान आहेत जन ॥ ते दुरूनि विलोकिती हें वन ॥ पुष्पीं फळीं शोभायमान ॥ देखतां संपूर्ण मन निवालें ॥६॥
मागिले अध्यायीं कथा गोमटी ॥ कूर्मदासासी भेटले जगजेठीं ॥ तयासी सांभाळूनि कृपादृष्टीं करीत सुखगोष्टी निजप्रेमें ॥७॥
आतां वैराग्यामाजीं शिरोमणी ॥ राका कुंभार वैष्णव ज्ञानी ॥ त्याचे चरित्र रसाळ वाणी ॥ परिसा श्रवणीं भाविक हो ॥८॥
बांका तयाची कांता ॥ परम भाविक पतिव्रता ॥ कन्या जाहली लावण्यसरिता ॥ वंका नाम तियेचें ॥९॥
तो गुजराथी कुंभार निश्चित ॥ नांदत होता पंढरींत ॥ भाजनें विकून नगरांत ॥ भजन करीत श्रीहरीचें ॥१०॥
ऐसें होतां दिवस बहुत ॥ नवल वर्तलें अघटित ॥ हिरवीं भाजनें वाळवून निश्चित ॥ माजघरांत ठेविलीं ॥११॥
तों घरीं मांजर व्याली जाण ॥ डेरियांत पिलीं ठेविलीं तिण ॥ रात्रंदिवस घरटी धालून ॥ स्तनपान करवीतसे ॥१२॥
तंव कोणे एके दिवसीं ॥ हिंडावया गेली बिळासीं ॥ कुलालें भाजनें आव्यापासीं ॥ नेलीं वेगेंसीं न कळतां ॥१३॥
पिलीं होतीं जयांत ॥ तोही डेरा घातला आव्यांत ॥ इंधनें घालोनि त्वरित ॥ कृशानु तेव्हां पेटविला ॥१४॥
प्रदीप्त जेव्हां जाहला अग्न ॥ तंव मांजर आली फेरी करून ॥ घरांत पाहे विलोकून ॥ तों न पडत पिलीं दृष्टीसी ॥१५॥
बाहेर येऊन उठाउठीं ॥ आव्याभोंवतीं घाली घिरटी ॥ कुलाल उमजला तेव्हां पोटीं ॥ ललाट पिटी निजकरें ॥१६॥
कांतेसी म्हणे हायहाय ॥ मजपासूनि घडला अन्याय ॥ ते धांवत आली लवलाह्य ॥ म्हणे काह जाहलें हो ॥१७॥
कंठ होऊन सद्गदित ॥ राका कांतेप्रति सांगत ॥ पिलीं होतीं भाजनांत ॥ तीं मीं नकळत जाळिलीं ॥१८॥
मोहें ओरडे त्यांची जननी ॥ घिरट्या घाली आपुलें सदनीं ॥ काय करूं या संकटलागूनी ॥ अंग धरणीं टाकिलें ॥१९॥
राका बांका उभयतां ॥ म्हणती धांवधांव पंढरीनाथा ॥ लाक्षागृहीं पंडुसुतां ॥ राखिलें जळतां कैशापरी ॥२०॥
कढयींत पडिले मंडूक सान ॥ तळीं पेटला बहु कृशान ॥ तेणें केलें तुझें चिंतन ॥ संकट जाणून ते वेळीं ॥२१॥
त्यास पावलासी रुक्मिणीकांता ॥ उदक न तापेचि सर्वथा ॥ तैशाच परी या आकांता ॥ पंढरीनाथा पाव वेगीं ॥२२॥
अघटित संकट घातलें माय ॥ परी तूं करिसील तें नव्हेचि काय ॥ प्रल्हाद अग्नींत वांचला पाह्य ॥ तुझे पाय आठवितां ॥२३॥
हे मार्जारयोनि तमोगुण ॥ सर्वथा न घडे तुझें चिंतन ॥ परी तूं कृपासागर चैतन्यघन ॥ वांचवीं प्राण पिलियांचे ॥२४॥
कांता म्हणे भ्रतारासी ॥ कांहीं नवस करा देवासी ॥ तेणें तरी हृषीकेशी ॥ अति वेगेंसी पावेल ॥२५॥
राका बोले प्रतिउत्तर ॥ अग्नींत पिलें वांचवील जर ॥ मी सर्वथा न करीं संसार ॥ शारंगधर पावलिया ॥२६॥
ऐसें कल्पोनियां अंतरीं ॥ उभयतां निजलीं धरणीवरी ॥ म्हणती धांव पाव श्रीहरी ॥ संकट निवारीं दिनाचें ॥२७॥
नेत्रीं ढळढळां अश्रु वाहात ॥ गात्रें विरळ पडलीं समस्त ॥ धुळीनें भरलें अंग सत्य ॥ वायु अद्भुत सुटलासे ॥२८॥
सतीनें घेतलें असतां वाण ॥ तो भ्रतार जाहला गतप्राण ॥ मग कांतेसी नाठवे देहभान ॥ सहगमन करीतसे ॥३०॥
असो दोनरात्रपर्यंत ॥ आव्यामाजी कृशानु जळत ॥ तोंपर्यंत कुलाल तेथ ॥ पडला निश्चेष्ट मेदिनीं ॥३१॥
नवसासी पावेल श्रीहरी ॥ ही आशा धरूनि अंतरीं ॥ बांकाही तेथें रुदन करी ॥ म्हणे धांव सत्वरी विठ्ठला ॥३२॥
तिसरे दिवशीं कृशानु शांत ॥ होऊनि भाजनें दिसती समस्त ॥ मांजर भोंवतीं घिरट्या घालीत ॥ मोहें ओरडत अट्टाहासें ॥३३॥
तों अघटित करी रुक्मिणी कांत ॥ श्रोते परिसा भाग्यवंत ॥ आव्यामाजी पिलीं बाहात ॥ जननीची मात ऐकूनि ॥३४॥
कुंभार आणि त्याची कांता ॥ पाहती जाहलीं उभयतां ॥ तों आव्यामाजी डेरा होता ॥ तो हिरवा अवचितां देखिला ॥३५॥
त्यांत मांजरीचीं पिलीं तीन ॥ जीवंत देखिलीं निजदृष्टीनें ॥ म्हणे मज पावला रुक्मिणीरमण ॥ भक्तभूषण कृपाळु ॥३६॥
तीन दिवसपर्यंत देख ॥ नाहीं घेतलें अन्न उदक ॥ सुकोनि मुख गेलें अधिक ॥ लतें उल्हासें टवटवलें ॥३७॥
दीपकासी स्नेहसूत्र पावल्या सहज ॥ तो जैसा दिसे तेजःपुंज ॥ कीं उर्वीवरी वर्षतां मेघराज ॥ तृणबीज वाढे जैसें ॥३८॥
नातरी कांसवी न पाजितां पिलियांस ॥ दृष्टीनेंचि करी क्षुधेचा नाश ॥ कीं द्रव्य सांपडतां कृपणास ॥ चित्त उल्हासे तयाचें ॥३९॥
कां पूर्वेस उगवतांचि वासरमणी ॥ सरोवरीं विकसती कमलिनी । राका कुंभाराचें मनीं ॥ तैशाचपरी उल्हास ॥४०॥
सकळ पंढरीचे लोक बोलती ॥ धन्य याची सप्रेम भक्ती ॥ संकतीं पावला रुक्मिणीपती ॥ अघटित कीर्ति हे जाहली ॥४१॥
राका कांतेसी वचन बोलत ॥ म्यां नवसिला होतां पंढरीनाथ ॥ कीं पिलीं वांचली अग्नींत ॥ तरी प्रपंच निश्चित करीनां ॥४२॥
संकटीं पावला जगज्जीवन ॥ आतां कासया संसारभान ॥ ऐसा अनुताप मनीं धरून ॥ गांवींचे ब्राह्मण पाचारिले ॥४३॥
शुद्ध भावार्थ धरूनि चित्तीं ॥ घर लुटविलें विप्रांहातीं ॥ आपण कौपीन नेसोनि प्रीतीं ॥ कांतेप्रती एक दीधली ॥४४॥
उदरप्रवृत्तीकारण ॥ काष्ठें वेंचिती रानांतून ॥ त्यांचें अन्न विकत घेऊन ॥ अतिथीस भोजन घालिती ॥४५॥
शेष राहिलें जें मागें ॥ तें कन्येसमवेत भक्षिती तिघें ॥ अहोरात्र सप्रेमरंगें ॥ चित्तीं पांडुरंग आठविती ॥४६॥
बिंदीच्या चिंध्या वेंचूनी ॥ त्या गुंडाळूनि लिंगस्थानीं ॥ याविरहित वस्त्र दिल्हें कोणीं ॥ तरी तें नयनीं न पाहती ॥४७॥
सिंपियाचे दारापासीं ॥ चिंध्या वेंचित एके दिवसीं ॥ तंव काय बोले नामवंशी ॥ वैराग्य कासया घेतलें ॥४८॥
पलिते करावयासी जाण ॥ चिरगुटें पाहिजेत आम्हांकारण ॥ ऐसें बोलिला तो कृपण ॥ अज्ञानपणें तयासी ॥४९॥
राका म्हणे कांतेप्रती ॥ जे निष्कारणीं पडिले क्षितीं ॥ तरी ते घेऊन भलत्या रीतीं ॥ काया निगुती झांकिजे ॥५०॥
ब्राह्मण भोजन करूनि जाण ॥ बाहेर टाकिती उच्छिष्टपान ॥ तें ढोंगास गुंडाळून ॥ गुदस्थान झांकिती ॥५१॥
उदंड बैरागी आहेत जनीं ॥ परी याचे साम्यतेसी न कोणी ॥ दृष्टांत योजितां कवीची वाणी ॥ जाहली असे कुंठित ॥५२॥
पृथ्वीचें वजन करावया रोकडें ॥ जैसें विस्तीर्ण नाहीं परडें ॥ तेवीं भगवद्भक्तांचे पवाडे ॥ वर्णितां वेडें मन होय ॥५३॥
भास्कर धरवेल मुष्टींत ॥ समीर कोंडवेल पिंजर्यांत ॥ परी भगवद्भक्तांची अनुपम स्थित ॥ वर्णितां कुंठित होय वाणी ॥५४॥
पराचे जीव वांचवावे प्राणें ॥ यास्तव संसार टाकिला कोणें ॥ क्षुद्र दैवतांचीं करूनि आराधनें ॥ पुत्र धन इच्छिती ॥५५॥
कच्चा पावशेर वांटीन शेरणी ॥ गजांतलक्ष्मी दे भवानी ॥ जेवीं गाजरांची तुळा द्विजांसी अर्पूनी ॥ अंतीं विमानीं बैसेन म्हणे ॥५६॥
तैसा संसारिक नव्हे कुंभार राका ॥ अघटित नवस केला देखा ॥ संकट पडलें वैकुंठनायका ॥ निजभक्तसखा पावला ॥५७॥
जाज्वल्य अनुताप धरिला मनीं ॥ जयाचे साम्यतेसी न पावे कोणी ॥ वंका कन्या सुलक्षणी ॥ स्नानालागोनि ते गेली ॥५८॥
तों नामयाची कन्या ते अवसरीं ॥ धूत होती भीमातीरीं ॥ वस्त्र आपटितां शिळेवरी ॥ शिंतोडे बाहेरी उडताती ॥५९॥
वंका म्हणे तिजलावूनी ॥ हळूचि आपटीं वो साजणी ॥ मी आतांचि स्नान करूनी ॥ मानसपूजनीं बैसलें ॥६०॥
ते म्हणे जातीची कुंभार ॥ आणि सोवळें दिसतें फार ॥ सुखाची टाकूनि संसार ॥ दारोदार हिंडतसां ॥६१॥
कामनिक भक्त तुझा पिता ॥ नवस केला पंढरीनाथा ॥ संकट घालोनि रुक्मिणीकांत ॥ संसारगुंता उगविला ॥६२॥
वंका म्हणे तिजलागोनी ॥ रडका नामा प्रसिद्ध जनीं ॥ बौद्धरूप असतां चक्रपाणी ॥ डोयी फोडून बोलविला ॥६३॥
ऐसें बोलूनि येरयेरां ॥ गेल्या आपुलाले घरा ॥ तों कीर्तनीं रिझवोनि रुक्मिणीवरा ॥ नामदेव मंदिरा पातले ॥६४॥
भीमातीरीं जाहलें भांडण ॥ तें वृत्त सांगीतलें आत्मजेन ॥ म्हणे ताता तुजलागून ॥ लाविलें दूषण ऐक तिणें ॥६५॥
म्हणे कलियुगीं बौद्धावतार निश्चित ॥ आणि राउळीं जाऊनि नामा भक्त ॥ डोयी फोडोनी प्रेमयुक्त ॥ रुक्मिणीकांत बोलविला ॥६६॥
आणि माझा पिता निरपक्ष खरा ॥ शुष्क काष्ठांचा आणोनि भारा ॥ तो विकूनियां बाजारा ॥ भरितो उदरा आपुल्या ॥६७॥
कन्येचें वचन ऐकोनी ॥ नामदेव विस्मित जाहले मनीं ॥ मग महाद्वारासी जाऊनी ॥ चक्रपाणि प्रार्थिला ॥६८॥
म्हणे देवा ऐक मात ॥ राका कुंभार तुझा भक्त ॥ तो निरपेक्ष किंवा कामयुक्त ॥ सांग त्वरित मजलागीं ॥६९॥
ऐसें पुसतां भक्त प्रेमळ ॥ हांसूनि बोले घननीळ ॥ त्याजऐसा वैराग्यशीळ ॥ न दिसे सकळ पृथ्वींत ॥७०॥
नामा म्हणे वैकुंठपती ॥ मज दाखवीं त्याची स्थिती ॥ अवश्य म्हणोनि निजप्रीतीं ॥ धरिला हातीं विष्णुदास ॥७१॥
रुक्मिणी नामा आणि सांवळा ॥ तिघें चालिलीं तये वेळां ॥ भास्कर मध्यान्हासी आला ॥ द्वादश कळा तपतसे ॥७२॥
तों अरण्यामाजी राका भक्त ॥ काष्ठें स्वहस्तें वेंचीत ॥ गुप्तपणें रुक्मिणीकांत ॥ कौतुक पाहात दुष्टीसी ॥७३॥
बांका तयाची निजकांता ॥ परम भाविक पतिव्रता ॥ कन्येसी घेऊनि उभयतां ॥ अरण्यपंथा चालली ॥७४॥
दोन काष्ठें एकसरसीं ॥ अवचित पडलीं दृष्टीसी ॥ कोणीं ठेविलीं असतील तैसीं ॥ म्हणूनि तयांसी न घेती ॥७५॥
वृक्षाअंगीं असलिया तत्त्वतां ॥ तरी मोडूनि न घेती सर्वथा ॥ आपसुखें पडलीं असतां ॥ हळूचि घेती वेंचूनी ॥७६॥
भूमीवरी पाय पडतां देखा ॥ जीवें जातील पिपीलिका ॥ म्हणूनियां कुंभार राका ॥ पाहूनि चाले वनांत ॥७७॥
हें कौतुक देखोनि दृष्टीसी ॥ विस्मित जाहले हृषीकेशी ॥ खुणावूनि रुक्मिणीसी ॥ नामयासी बोलत ॥७८॥
म्हणे विषयीं विरक्त आहे देखा ॥ माझा निजभक्त कुंभार राका ॥ दांभिक लौकिक टाकूनि निका ॥ निष्काम एका मज भजे ॥७९॥
नामा म्हणे रुक्मिणी माये ॥ यासी कांहीं देऊनि पाहें ॥ हातींचें कंकण लवलाहें ॥ नामयापासीं दीधलें ॥८०॥
स्रजूं न शके चतुरानन ॥ ऐसें अमूल्य जडितरत्न ॥ जयाचे मोलासी दिधलें त्रिभुवन ॥ तरी न येचि तेणें सर्वथा ॥८१॥
ऐसें कंकण काढोनि रुक्मिणी ॥ टाकूनि देत त्या काननीं ॥ त्यावरी शुष्क काष्ठ उचलोनी ॥ विश्वजननी ठेवीतसे ॥८२॥
निजभक्त नामा वैष्णववीर ॥ रुक्मिणी आणि शारंगधर ॥ गुप्तरूपें वारंवार ॥ विलोकूनियां पाहाती ॥८३॥
तों राका आणि त्याची कांता ॥ काष्ठें वेंचीत उभयतां ॥ सुवर्णकंकण लागतें तत्त्वतां ॥ तें कांटुक अवचितां उचलिलें ॥८४॥
दृष्टीस पाहतां न्याहाळूनी ॥ तों रत्नें जडलीं हेमकोंदणी ॥ जें अमूल्य पाहतां त्रिभुवनीं ॥ साम्यतेसी नयनीं दिसेना ॥८५॥
राका कुंभार अति विरक्त ॥ काष्ठें ढकलूनि दिधलें त्वरित ॥ कांतेसी म्हणे हा अनर्थ ॥ दृष्टी त्वरित पाहें तूं ॥८६॥
ती म्हणे करितां ईश्वरभजन ॥ पुढें ओढवलें हें विघ्न ॥ कवणें सिद्धि आड येऊन ॥ दिधलें कंकण आपणां ॥८७॥
आपण प्रपंच टाकोनियां ॥ शरण गेलों पंढरीराया ॥ हेमकंकण कासया ॥ पाहिजे वायां आपणासी ॥८८॥
त्यावरी काष्ठ पडलें होतें ॥ तेंही टाकूनि दिधलें त्वरितें ॥ जैसें श्वान शिवतां अन्नातें ॥ तें द्विज न घेती सर्वथा ॥८९॥
नीर पडतां धरणीं ॥ तें चातक न घेती निंद्य म्हणूनी ॥ कां स्नेह मर्दितां अंगालागुनी ॥ मक्षिका स्पर्श न करीच ॥९०॥
तेवीं प्रसन्न होऊनि रुक्मिणी माता ॥ कंकण दिधलें निजभक्ता ॥ त्यावरी काष्ठ पडलें तत्त्वतां ॥ तें टाकूनि उभयतां चालिलीं ॥९१॥
नामा म्हणे जगज्जीवना ॥ विश्वव्यापका भक्तभूषणा ॥ राका कुंभार तुझिया भजना ॥ सप्रेम भावें विनटला ॥९२॥
सगुण साक्षात् दर्शन ॥ यासी द्यावें जी आपण ॥ ऐसें ऐकतां रुक्मिणीरमण ॥ हास्यवदन जाहले ॥९३॥
म्हणे म्यां सांगीतली याची स्तुती ॥ तैसीच आली की तुज प्रतीती ॥ कीं अजून संशय वाटतो चित्तीं ॥ सांग मजप्रति लवलाहें ॥९४॥
यावरी नामा उत्तर देत ॥ निरपेक्ष राका प्रेमळ भक्त ॥ याचे साम्यतेसी निश्चित ॥ माझेंही चित्त न ये कीं ॥९५॥
मग नामा आणि हरि रुक्मीण ॥ प्रकट जाहलीं तिघें जण ॥ राका कुंभार पाचारून ॥ दिधलें दर्शन तयासी ॥९६॥
चतुर्भुज हरि सांवळा ॥ कासे पीतांबर शोभे पिंवळा ॥ मुकुट कुंडलें वनमाळा ॥ देखिला डोळां साक्षात ॥९७॥
राका बांका उभयतांनीं ॥ आलिंगन दिधलें तयेक्षणीं ॥ मग मिठी घालोनियां चरणीं ॥ चक्रपाणि नमियेला ॥९८॥
आतां वैष्णवांमाजी अति विरक्त ॥ गोरा कुंभार प्रेमळ भक्त ॥ त्याचें चरित्र अति अद्भुत ॥ परिसा भक्त हो निजप्रीतीं ॥९९॥
तरढोकी नामाभिधान ॥ तया गांवींचें त्यास वतन ॥ गृह दारा प्रपंच असोन ॥ करित भजन श्रीहरीचें ॥१००॥
खातां जेवितां गमन करितां ॥ बसतां उठतां विश्रांति घेतां ॥ प्रपंच धंदा मडकीं घडितां ॥ पंढरीनाथा जपतसे ॥१॥
कानीं ऐकतां प्रपंचगोष्टी ॥ नातरी चराचर पाहतां दृष्टीं ॥ दश इंद्रियांची पाहतां राहाटी ॥ चित्तीं जगजेठी अखंड ॥२॥
बरें वाईट सुख दुःख जाण ॥ नेणेचि कांहीं मानापमान ॥ राव रंक आणि इतर जन ॥ चित्तीं समाधान सारिखें ॥३॥
तंव कोणें एके दिवसीं ॥ कांता गेली उदकासी ॥ तानें बाळक खेळावयासी ॥ अंगणामाजीं सोडिलें ॥४॥
मृतिकेचें करूनि आळें ॥ चिखल केला तये वेळे ॥ त्यावरी गोरा झांकोनि डोळे ॥ तुडवीत बळें निजछंदें ॥५॥
हृदयीं चिंतिलीसे विठ्ठलमूर्ती ॥ सप्रेम जळें अश्रु वाहाती ॥ किंचित नाठवे देहस्फूर्ती ॥ अद्वैतरूपीं विनटला ॥६॥
तों अंगणीं बाळक होतें खेळत ॥ ते मृत्तिकेजवळी आलें रांगत ॥ कर्दम गोला करितां आंत ॥ तेंही तुडविलें त्यासरिसें ॥७॥
कांता आली घेऊनि जीवना ॥ मोहे स्तनीं दाटला पान्हा ॥ बाळक विलोकी अंगणा ॥ तंव ते नयना न दिसेचि ॥८॥
मग भ्रतारासन्निध येऊनी ॥ तया पुसतसे तये क्षणीं ॥ तुम्हांपासीं अपत्य टाकोनी ॥ जीवनालागोनि मी गेलें ॥९॥
तें कोठेंचि न दिसे आतां ॥ वेगीं सांगावें प्राणनाथा ॥ खालीं दृष्टी करूनि पाहतां तंव रुधिर अवचित्तां देखिलें ॥११०॥
अस्थि मांस एके ठायीं ॥ कर्दमीं देखिलें ते समयीं ॥ हृदय पिटोनि लवलाहीं ॥ शोक करीत आक्रोशें ॥११॥
मग भ्रतारासी काय बोलत ॥ बाळक तुडविलें मृत्तिकेंत ॥ देहभान नाहीं किंचित ॥ कैसें विपरीत हें केलें ॥१२॥
संसारासी घातलें पाणी ॥ देव काढिला शोधोनी ॥ आतां सत्वर जाऊन येथूनी ॥ प्राण त्यागीन सत्वर ॥१३॥
ऐसे ऐकोनि कठिणोत्तर ॥ किंचित आला देहावर ॥ म्हणे ध्यानभंग त्वां साचार ॥ केला विचार न करितां ॥१४॥
माझ्या हृदयकमळांत ॥ बैसला होता रुक्मिणीकांत ॥ तुवां विक्षेप घालोनि त्वरित ॥ पंढरीनाथ दवडिला ॥१५॥
यास्तव क्रोध धरूनि अंतरीं ॥ चक्रदंड घेतला निजकरीं ॥ कांतेस मारावया सत्वरीं ॥ सन्निध आला ते समयीं ॥१६॥
येरी भयभीत होऊनी ॥ भ्रतारासी बोले वचनीं ॥ हातबोट लावाल मजलागूनी ॥ तरी तुम्हांसी आण विठोबाची ॥१७॥
शपथ ऐकोनियां कानीं ॥ निवांत बैसला एके स्थानीं ॥ क्षमा शांति धरूनि मनीं ॥ नामस्मरणीं लागला ॥१८॥
नर नारी मिळोनि वाडियांत ॥ एकमेकांसी बोलती मात ॥ म्हणती बाळक तुडविलें चिखलांत ॥ देखिलें विपरीत आजि आम्हीं ॥१९॥
एक म्हणती धडचि पिसा ॥ भ्रतार तुझा जाहला कैसा ॥ एक म्हणति महिमाच ऐसा ॥ श्रीहरिभजनीं लागतां ॥१२०॥
ऐसें नानापरी त्रिविधजन ॥ अपशब्द बोलती हेलणा करून ॥ परी तो नायकोनि त्यांचें वचन ॥ श्रीहरिभजन करितसे ॥२१॥
राजबिदींतून वारण ॥ चालतां दंड भुंकती श्वान ॥ परी तें ध्यानीं न आणून ॥ करी तो गमन यथासुखें ॥२२॥
कीं पंडितांच्या सभेंत ॥ मूर्ख चावटी करी बहुत ॥ परी नायकोनि त्याची मात ॥ पाहाती शास्त्रार्थ निजदृष्टीं ॥२३॥
नातरी अगस्त्यऋषीस देखोन ॥ पयोब्धि अट्टहासें करी गर्जन ॥ परी तें कांहीं ध्यानीं न आणून ॥ करी अनुष्ठान निजनिष्ठें ॥२४॥
कीं विनतासुताचिया समोर ॥ क्रोधें फोंपावती विखार ॥ परी तयासी भय अणुमात्र ॥ न वाटेचि सर्वथा ॥२५॥
तेवीं निंदा करितां नारी नर ॥ परी गोरा नायके त्यांचें उत्तर ॥ एकाग्र मन करूनि स्थिर ॥ रुक्मिणीवर जपतसे ॥२६॥
निजपुत्र मातीत तुडविला ॥ हाही आठव नाहीं त्याजला ॥ ध्यानांत आणोनि श्रीविठ्ठला ॥ संसारदुःखा न गणीच ॥२७॥
ऐसे कांहीं दिवस लोटतां ॥ मनांत विचारी निजकांता ॥ भ्रतारांसीं अबोला धरितां ॥ शेवट सर्वथा नव्हेचि ॥२८॥
राजयापासोनि अन्याय जाहला ॥ तरी प्रजांनीं काय करावें त्याला ॥ तेवीं पतीस शिक्षा करावया ॥ अधिकार मजला नसे कीं ॥२९॥
चरणक्षालन करावयासी ॥ सन्निध आली एके दिवसीं ॥ येरू परता सरोनि तिसी ॥ काय बोलिला तें ऐका ॥१३०॥
हात बोट न लावीं म्हणऊन ॥ शपथ घातलीस मजकारण ॥ ती माझ्या विठोबाची आण ॥ न मोडीं जाण सर्वथा ॥३१॥
कांता म्हणे भ्रतारासी ॥ मी अमर्याद बोलिले तुम्हांसी ॥ ते क्षमा करूनि मजसी ॥ अंगीकारिलें पाहिजे ॥३२॥
करितां प्रपंचखटपट ॥ बोलिलें बरें वाईट ॥ तुम्हीं बैसलेत धरूनि हट ॥ तरी कैसा शेवट होईल ॥३३॥
आव्यांत मडकी असतां देख ॥ सहज लागती एकासी एक ॥ तेवीं प्रपंच करितां देख ॥ बोलती अनेक अपशब्द ॥३४॥
गोरा म्हणे तिजप्रती ॥ पश्चिमेस उगवेल गभस्ती ॥ परी मीं निश्चय धरिला चित्तीं ॥ कल्पातींही सोडींना ॥३५॥
समीर अडकेल पिजर्यांत ॥ आकाश सांठवेल घटांत ॥ तरी माझा नेम निश्चित ॥ न टळे सर्वथा जाण वो ॥३६॥
तृणामाजी झांकेल कृशान ॥ कीं मेघासी भिऊनि पळेल पवन ॥ परी मी रुक्मिणीवराची आण ॥ न मोडींच जाण सर्वथा ॥३७॥
सागरी बुडेल तुंबिनीफळ ॥ बागुलासी भिऊनि पळेल काळ ॥ तरी माझा निश्चय अढळ ॥ न ढळे सर्वथा कल्पांतीं ॥३८॥
ऐसें बोलत वैष्णव भक्त ॥ मग कांता राहिली निवांत ॥ पोटीं नाहींच कीं अपत्य ॥ चिंताक्रांत मानसीं ॥३९॥
ऐसा विचार करितां रात्रंदिवस ॥ म्हणे दुसरा विवाह करावा यास ॥ तेणें तरी वाढेल वंश ॥ मग माहेरासी पातली ॥१४०॥
मातापित्यांसी ते वेळां ॥ सकळ वृत्तांत सांगीतला ॥ म्हणे भ्रतारानें टाकिलें मजला ॥ वंश बुडाला दिसताहे ॥४१॥
गोत्रज पाहात होतें उणें ॥ तैसेंच केलें नारायणें ॥ आम्हांसी हांसती सोयरे पिशुनें ॥ बुडालें संतान म्हणोनियां ॥४२॥
माझा तों त्याग केला तयान ॥ आतां करावें दुसरें लग्न ॥ तरी गृहस्थिति न कळतां जाण ॥ देईल कोण सवतीवरी ॥४३॥
तरी कनिष्ठ कन्या कुमारी घरीं ॥ ते माझ्या भ्रतारासी द्या नोवरी ॥ ऐसें म्हणोनि ते अवसरीं ॥ चरण धरी पितयाचे ॥४४॥
ओंटी पसरूनि मायेजवळी ॥ अश्रुपात आणिले नेत्रकमळीं ॥ म्हणे मी मागतें एवढी चोळी ॥ बोळवण केली पाहिजे ॥४५॥
ऐसीं करुणावचनें बोलतां ॥ अवश्य म्हणती मातापिता ॥ विप्र बोलावून तत्त्वतां ॥ लग्ननिश्चय पैं केला ॥४६॥
मग घरासी येऊन त्वरेनें ॥ सर्व साहित्य केलें तिणें ॥ वस्त्रें अळंकार भूषणें ॥ केलीं पूर्ण सिद्ध तेव्हां ॥४७॥
मूळ पाठवूनि ते वेळे ॥ सोयरे गोत्रज मिळविले ॥ लग्न तत्काळ निधालें ॥ वाद्यगजरेंकरूनि ॥४८॥
वर्हाडी मार्गीं करिती चिंता ॥ म्हणती देवासाठीं टाकिली कांता ॥ हें विपरीत आमुचें चित्ता ॥ सर्वथा न माने गृहस्थ हो ॥४९॥
अविंधासी नावडे गायत्रीपूजन ॥ खरासी नावडे लावितां चंदन ॥ तेवीं निंदकासी वैष्णवजन ॥ नावडती जाण सर्वथा ॥१५०॥
भ्रष्टासी नावडे शुद्ध आचार ॥ अंत्यजासी नावडे शास्त्रविचार ॥ भूतांसी नावडे कीर्तनगजर ॥ कीं विवेकविचार मूर्खासी ॥५१॥
रोगिया नावडे पयःपान ॥ तस्करा नावडे निर्मळ चांदण ॥ कृपणासी नांवडे द्रव्यदान ॥ बधिरासी गायन रुचेना ॥५२॥
मांसखायिरासी कैंची माया ॥ हिंसकासी नावडे भूतदया ॥ दारिद्रियासी कल्पतरुच्छाया ॥ प्रारब्धकर्में नावडे ॥५३॥
तेवीं निजभक्तांची निष्ठा ऐसी ॥ देखोनि नावडे अभक्तांसी ॥ असो यापरी लग्नासी ॥ गेले सत्वर तेधवां ॥५४॥
देवकप्रतिष्ठा करूनि जाण ॥ जाहलें सर्वांचें भोजन ॥ अंतःपट धरूनि ब्राह्मण ॥ मंगळाष्टकें बोलती ॥५५॥
लक्ष्मीकांतासी चिंतोनि सत्वर ॥ सावधान म्हणती द्विजवर ॥ अंतःपट सोडितांचि सत्वर ॥ जाहला गजर वाद्यांचा ॥५६॥
चार दिवस सोहळा करून ॥ नगरांत निघाली मिरवण ॥ सासू सारसा दोघें जण ॥ विचार करिती मनांत ॥५७॥
म्हणती ज्येष्ठ कनिष्ठ दोघी जणी ॥ कन्या दिधल्या यालागोनी ॥ एकीची नावड घेतली मनीं ॥ हांसतील जन आपणासी ॥५८॥
दोनी नेत्र सारिखेचि जाण ॥ तेवीं दोघी आपल्यासी तत्समान ॥ तरी जामातासी घालोनि आण ॥ पाणि ग्रहण करवावें ॥५९॥
गोरियासी म्हणती ते अवसरीं ॥ कन्या उभयतां तुमचे पदरीं ॥ यांचा सांभाळ संसारीं ॥ बरोबरी करावा ॥१६०॥
अधिक उणें होतांचि जाण ॥ तरी तुम्हांसी विठोबाची आण ॥ ऐकोनियां ऐसें वचन ॥ अवश्य म्हणे तयासी ॥६१॥
म्हणे कृपा करितां जगज्जीवन ॥ आपोआप तुटे बंधन ॥ निजभक्तांसी विषयाचरण ॥ लागों नेदीच सर्वथा ॥६२॥
ऐसा संतोष मानूनि चित्तीं ॥ सदनासी आला सत्वरगती ॥ वस्त्रें भूषणें कांतेप्रती ॥ देत सारखीं समान ॥६३॥
परी ज्येष्ठ कांता जैशा रीतीं ॥ तैसेंचि लेखी कनिष्ठेप्रती ॥ ऐसी देखोनियां स्थिती ॥ चिंता करी मनांत ॥६४॥
ज्येष्ठ कांता पुसे त्यासी ॥ कनिष्ठ कां न ये मनासी ॥ येरू म्हणे आण मजसी ॥ तुझ्या बापें घातली ॥६५॥
कीं अधिक उणें करितां जाण ॥ तुम्हांसी विठोबाची असे आण ॥ ऐसें श्वशुर बोलिला वचन ॥ तें म्यां दृढ धरियेलें ॥६६॥
ऐसें भ्रतार बोलतांचि जाण ॥ कनिष्ठ कांता करी रुदन ॥ म्हणे बाई मजकारण ॥ कैसें गोंवून टाकिलें ॥६७॥
मग ती म्हणे मायबहिणी ॥ कष्टी नको होऊं साजणी ॥ निशाकाळीं दोघी जणी ॥ चित्त पाहूं तयाचें ॥६८॥
निशाकाळीं वैष्णवभक्त ॥ जाहला देखोनि निद्रित ॥ कांता सन्निध येऊनि तेथ ॥ शयन करिती शेजारीं ॥६९॥
दोन्ही कर घेऊनि सत्वरीं ॥ उभयतां ठेविती हृदयावरी ॥ गोरा सावध होऊनि सत्वरीं ॥ आश्चर्य करी मनांत ॥७०॥
म्हणे मनांत नसतां विषयध्यान ॥ निजकरें मोडोनि टाकिली आण ॥ ऐसा अनुताप मनीं धरून ॥ काय करिता जाहला ॥७१॥
असिलता घेऊनि त्वरित ॥ खांबासी बांधिली उभय हस्तें ॥ सदृढ करूनियां चित्त ॥ कर तोडोनि टाकिले ॥७२॥
भजन करीत बैसला सत्वर ॥ तों उदयासी पावला दिनकर ॥ कांता देखोनि थोंटे कर ॥ शोक करिती आक्रोशें ॥७३॥
म्हणती विपरीत जाहलें जाण ॥ आतां प्रपंचधंदा करील कोण ॥ देशोदेशीं आम्हां हांसती पिशुन ॥ वर्तणूक देखोन आमुची ॥७४॥
संतान वाढवावयाकारण ॥ म्हणोनि दुसरें केलें लग्न ॥ परी ईश्वरी क्षोभापुढें यत्न ॥ काय चालती आमुचे ॥७५॥
तेव्हा गोरा म्हणे उभय कांतांप्रती ॥ वायांचि शोक कराल चित्तीं ॥ शिरीं असतां रुक्मिणीपती ॥ कासया खंटी करावी ॥७६॥
कामधेनूऐसी गाय ॥ सदैव ज्याला लाधली होय ॥ तयासी खाण्याची चिंता काय ॥ करणें नलगे सर्वथा ॥७७॥
कल्पतरूतळीं बैसतां जाण ॥ अन्नवस्त्रासी कायसी वाण ॥ तेवीं प्रसन्न असतां रुक्मिणीरमण ॥ संसारबंधन कायसें ॥७८॥
नातरी परीस जोडलिया हातीं ॥ त्यासी काय उणें धनसंपत्ती ॥ तेवीं विठ्ठलनामीं जडल्या प्रीती ॥ संसारगुंती बाधेना ॥७९॥
कीं सुधारस प्राशन करितां पोटभरी ॥ सकळ व्याधी पळती दूरी ॥ तेवीं मुखीं जपतां रामकृष्णहरी ॥ भवरोग निर्धारीं बाधेना ॥१८०॥
यापरी कांतांसी समजावून ॥ अखंड चित्तीं समाधान ॥ अहोरात्र करी नामस्मरण ॥ नाहीं खंडन क्षणमात्र ॥८१॥
तों आली आषाढी एकादशी ॥ गोरियाचे आनंद मानसीं ॥ कुटुंबासह यात्रेसी ॥ पंढरीक्षेत्रीं पातला ॥८२॥
चंद्रभागेंत करूनि स्नान ॥ घेतलें पुंडलीकाचें दर्शन ॥ क्षणमात्रें प्रदक्षिणा करून ॥ महाद्वारासी पातला ॥८३॥
दोघी कांतांसमवेत जाण ॥ सद्भावें घातलें लोटांगण ॥ देऊनि देवासी आलिंगन ॥ वंदिलें चरण सद्भावें ॥८४॥
तंव टाळ दिंडी घेऊनि करीं ॥ नामा उभा गरुडपारीं ॥ प्रेमें आनंदें कीर्तन करी ॥ उल्हास गजरीं नामाचे ॥८५॥
विणे वाजती मृदंग ॥ कीर्तनीं आला बहुत रंग ॥ पुढें नाचत पांडुरंग ॥ भक्तभवभंग ॥ कृपाळू ॥८६॥
निवृत्ति ज्ञानदेव सांवता ॥ सोपान जगमित्र पढियंता ॥ सप्रेम नामयाची कथा ॥ श्रवण करीत बैसले ॥८७॥
आणिक संत महंत सज्जन ॥ बहुत मिळाले वैष्णवजन ॥ प्रेमानंदें भजन कीर्तन ॥ ऐकताती निजप्रीतीं ॥८८॥
तंव ऊर्ध्व हात करूनि देखा ॥ नामदेवें करविल्या पताका ॥ स्वमुखें सांगत सकळ लोकां ॥ तैशाचि ध्वजा उभारिल्या ॥८९॥
प्रेमआल्हादें पिटोनि टाळी ॥ हरिनामें गर्जती ते वेळीं ॥ तंव गोरियाचें नेत्रकमळीं ॥ अश्रुपात लोटले ॥१९०॥
म्हणे देवा रुक्मिणीकांता ॥ मज कां मोकलोनि दिधलें आतां ॥ थोटे हात वरी करितां ॥ लाज चित्ता वाटतसे ॥९१॥
कमललोचना कमलापती ॥ तूंचि माझी धनसंपत्ति ॥ तुजवांचोनि त्रिजगतीं ॥ कोणी जिवलग दिसेना ॥९२॥
तुजवरी घातला सर्व भार ॥ आणिक नाहीं मज आधार ॥ ऐशा रीतीं गोरा कुंभार ॥ करुणा फार भाकीतसे ॥९३॥
ऐसी करुणा ऐकोनि त्वरित ॥ सत्वर पातला रुक्मिणीकांत ॥ गोरियाचे पहिल्यासारिखे हात ॥ फुटले त्वरित ते समयीं ॥९४॥
आनंदें होऊनि निर्भरें ॥ टाळ्या वाजवी नामगजरें ॥ हें नवल देखोनि जयजयकारें ॥ सकळ भक्त गर्जती ॥९५॥
म्हणती भक्तांमाजी वैष्णव वीर ॥ गोरा कुंभार भक्त थोर ॥ यासी प्रसन्न रुक्मिणीवर ॥ फुटले कर हरिकीर्तनीं ॥९६॥
ऐसें कौतुक दृष्टीस देखतां ॥ उठली गोर्याची ज्येष्ठ कांता ॥ हात जोडोनि पंढरीनाथा ॥ काय बोले ते समयीं ॥९७॥
म्हणे आपुले दासासी कृपादृष्टीं ॥ तुवां पाहिलें जगजेठी ॥ आणि मी बाळकाविण होतें कष्टी ॥ करुणा पोटीं कां नये ॥९८॥
तूं कृपासागर जगज्जीवन ॥ ऐसें बोलती भक्तजन ॥ आम्ही कष्टी होतसों दीन ॥ बाळक तान्हें न देखतां ॥९९॥
तुझें नाम घेतां रुक्मिणीपती ॥ विदेही जाहला आमुचा पती ॥ लेंकरूं तुडविलें घेऊनि मातीं ॥ तें असे चित्तीं तुज ठावें ॥२००॥
ऐसी करुणा ऐकोनि कानीं ॥ प्रसन्न जाहले चक्रपाणी ॥ रांगत बाळ सभेंतूनी ॥ अकस्मात पातलें ॥१॥
तें देखतांचि दृष्टीसी ॥ आश्चर्य वाटलें सकळांसी ॥ माय धांवूनियां वेगेंसीं ॥ मोहें पोटासीं धरियेलें ॥२॥
मग म्हणे माता रुक्मीण ॥ आजपासूनि तुझी मोकळी आण ॥ स्वस्त्रियांचा त्याग न करीं जाण ॥ आज्ञा प्रमाण आमुची ॥३॥
ऐसें बोलतां भमिकबाळी ॥ आनंदली भक्तमंडळी ॥ जयजयकारें पिटोनि टाळी ॥ कीर्तनमेळीं डोलत ॥४॥
मग उजळूनि मंगळारती ॥ ओंवाळिला रुक्मिणीपती ॥ पुढिले अध्यायीं रसउत्पत्ती ॥ सादर श्रोतीं परिसिजे ॥५॥
त्या निजभक्तकथा सुंदर ॥ वदवील पुढें रुक्मिणीवर ॥ महीपति तयाचा किंकर ॥ म्हणवी साचार निजप्रीतीं ॥६॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ भाविक भक्त ॥ सप्तदशाध्याय रसाळ हा ॥२०७॥
॥ अध्याय ॥१७॥ ॥ ओंव्या ॥२०७॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.