श्रीगणेशाय नमः ॥ श्री कृष्णाय नमः ॥
जय दीनदयाळा रुक्मिणीपती ॥ व्यापूनी उरलासीं त्रिजगतीं ॥ श्रुति शास्त्रें तुज वर्णिती ॥ अद्भुत कीर्ति न वर्णवे ॥१॥
वर्णितां तुझें महिमान ॥ शिणलीं अठराही पुराणें जाण ॥ वाद घालितां साही दर्शन ॥ तयांसी खूण कळेन ॥२॥
तुझें गुणचरित्र अपार ॥ वर्णितां शिणला धरणीधर ॥ तुझिया गुणांसी नाहीं पार ॥ जिव्हा साचार चिरल्या कीं ॥३॥
मग तो लज्जायमान होऊनियां ॥ निजांगाची केली शय्या ॥ सहस्र फणांची देवराया ॥ केली छाया तुजलागीं ॥४॥
तुझें वर्णावया महिमान ॥ सरस्वतीनें केला पण ॥ पयोब्धीची शाई करून ॥ वर्णीत गुण शारदा ॥५॥
अठरा भार वनस्पती ॥ यांची लेखणी घेऊनि हातीं ॥ पृथ्वीचा कागद घेऊनि प्रीतीं ॥ गुण वर्णिती जाहली ॥६॥
समुद्राची सरली शाई ॥ गुण वर्णितां न पुरे मही ॥ ब्रह्मकुमारी लागली पायीं ॥ तुझे नवलाई देखोनि ॥७॥
तुझे गुण अलोलिक ॥ वर्णितां थोरांसी पडलें टक ॥ अनंत ब्रह्मांडें सकळिक ॥ त्यांचा नायक तूं अससी ॥८॥
ऐसा तूं व्यापक अनंता ॥ सर्वां ठायीं तुझीच सत्ता ॥ विश्वीं भरूनि जगन्नाथा ॥ विश्वनाथा उरलासी ॥९॥
तुझे भक्त रुक्मिणीपती ॥ त्यांचीं चरित्रें मज आवडती ॥ तुवां उजळोनि माझी मती ॥ ग्रंथ युक्ती बोलवीं ॥१०॥
आतां श्रोते संतजन ॥ तिहीं मज द्यावें अवधान ॥ मागील अध्यायीं निरूपण ॥ केलें श्रवण सकळिकीं ॥११॥
द्वारकेहूनि येतां जाण ॥ व्याघ्र बोधिला पिपाजीनें ॥ हिंसाकर्म टाकिलें त्याणें ॥ गलित पर्णें खातसे ॥१२॥
तो व्याघ्र नव्हेचि साचार ॥ साक्षात् तो पार्वतीवर ॥ घ्यावयासी जातां अवतार ॥ तों दृष्टीस व्याघ्रांबर देखिलें ॥१३॥
ध्यानांत येतां तामसगुण ॥ म्हणोनि जाहला पंचानन ॥ जेवीं जागृतींत असतां ध्यान ॥ तैसेंचि स्वप्न दिसतसे ॥१४॥
तेवीं अवतार घेतां धूर्जटी ॥ व्याघ्रचर्म देखिले दृष्टीं ॥ म्हणोनि व्याघ्राचिये पोटीं ॥ उठाउठीं अवतरला ॥१५॥
सप्त दिवस होतांचि जाण ॥ देह ठेविला तयान ॥ पुन्हां जुन्यागडीं नागर ब्राह्मण ॥ त्याचें उदरीं जन्मला ॥१६॥
दिवसेंदिवस थोर जाहला ॥ मायबापें व्रतबंध केला ॥ सप्त वर्षें होतां तयाला ॥ जननी जनिता अंतरलीं ॥१७॥
चुलतबंधु होते सकळ ॥ त्यांनीं केला प्रतिपाळ ॥ गांवचीं मुलें खेळती सकळ ॥ त्यांत खेळ खेळत ॥१८॥
इटीदांडू लगोरिया ॥ चुंबाचुंबी लपंडाया ॥ हमामा हुंमरी घालोनियां ॥ पाणबुडीया खेळती ॥१९॥
वाघोडी आणि आट्यापाड्या ॥ झिज्या बोकट अगलगाट्या ॥ भोंवरे चक्रें फेरवाट्या ॥ देती काठ्या सत्वर ॥२०॥
अनेक प्रकारचे अनेक खेळ ॥ बाळलीलें खेळती सकळ ॥ ऐसा लोटला कांहीं काळ ॥ तंव अपूर्व वर्तलें ॥२१॥
ऐसे बाळपणींचे खेळ ॥ खेळतां वृथा गेला काळ ॥ आयुष्य वेंचलें सकळ ॥ नाहीं घननीळ आठविला ॥२२॥
असो आतां तेते अवसरीं ॥ खेळ खेळोनि नानापरी ॥ नरसी मेहता अति सत्वरीं ॥ निजमंदिरीं पातला ॥२३॥
म्हणे वहिनी मजकारण ॥ तृषा लागली द्या जीवन ॥ येरी म्हणे काय कष्ट करून ॥ श्रम पावोन आलासी ॥२४॥
फार पोरटें द्वाडवाण ॥ मायबापें बोळविलीं येणें ॥ रात्रंदिवस खेळ खेळोन ॥ करी भोजन यथेच्छ ॥२५॥
विद्याभ्यास न करितां ॥ जिणें वागविसी तूं वृथा ॥ पुढें रडेल तुझी कांता ॥ वृथापुष्टा चटोरा ॥२६॥
वडील बंधूची कांता ॥ ऐसीं दुर्वचनें बोलतां ॥ पश्चात्ताप जाहला चित्ता ॥ नरसी मेहेता ऊठिला ॥२७॥
तेथोनि उठोनि त्वरित ॥ दूर गेला अरण्यांत ॥ म्हणे प्राक्तन माझें विपरीत ॥ कर्म बळवंत दुस्तर ॥२८॥
बाळपणीं मरतां माता ॥ तारुण्यपणीं निजकांता ॥ वृद्धपणीं पुत्रशोक होतां ॥ ईश्वरी क्षोभ या नांव ॥२९॥
पूर्वजन्मीं कर्म केलें ॥ तयाचें फळ ओढवलें ॥ ऐसें बोलतां ते वेळे ॥ तों पुढें देखिलें अरण्य ॥३०॥
गांवापासोनि कोस दोन ॥ येतां देखिलें महारण्य़ ॥ नरसी मेहेता विलोकून ॥ पाहता जाहला सभोंवता ॥३१॥
पुढें अकस्मात पाहत ॥ तों शिवालय देखिलें अवचित ॥ नरसी मेहेता प्रवेशे आंत ॥ तंव कैलास नाथ देखिला ॥३२॥
ओसाड अरण्य म्हणून ॥ नाहीं मनुष्याचें आगमन ॥ धीर धरूनि निजमनीं जाण ॥ वंदिले चरण शिवाचे ॥३३॥
उपमन्यु ब्राह्मणकुमार ॥ दुग्ध मागे वाटीभर ॥ माता न देतां सत्वर ॥ रुसोनियां बैसला ॥३४॥
कीं उत्तनपाद क्षितीपाळ ॥ तयाचा पुत्र ध्रुवबाळ ॥ रुसोनि गेला तत्काळ ॥ वैकुंठपाळ आराधिला ॥३५॥
तयाचेपरी नरसी मेहेता ॥ अनुताप धरूनि निजचित्ता ॥ म्हणे विश्वंभरा विश्वनाथा ॥ मज अनाथा अपंगीं ॥३६॥
पिनाकपाणी पार्वतीरमण ॥ त्याचें अंगावरी केलें शयन ॥ वर्जिलें अन्नादि फळभक्षण ॥ उदकपान न करी तो ॥३७॥
सप्त दिवस लोटतां जाण ॥ कैलासपति विस्मितमन ॥ म्हणे सर्व शरीर मजलागून ॥ वाहिलें येणें निजनिष्ठें ॥३८॥
गंध अक्षता सुमन चंदनें ॥ नानापरींचीं दिव्य रत्नें ॥ मुक्ताहार सुवर्णभूषणें ॥ मजकारणें अर्पिती ॥३९॥
द्रव्य वेंचूनि अगणित ॥ कोणी शिवालयें बांधीत ॥ भागीरथीचें उदक त्वरित ॥ कोणी अर्पीत आवडीं ॥४०॥
बिल्वपत्रांची लाखोली ॥ आणोनि वाहाती तत्काळीं ॥ परी सर्व शरीर कोणे काळीं ॥ नाहीं मजलागीं अर्पिलें ॥४१॥
शरीराचा लोभ धरून ॥ नानापरीचें करिती साधन ॥ वृथा गेलें त्यांचें ज्ञान ॥ त्यांसी जगज्जीवन भेटेना ॥४२॥
नरसी मेहेत्याचा दृढ भाव ॥ देखोनि तुष्टला सदाशिव ॥ सगुण स्वरूप महादेव ॥ प्रकट करी ते वेळे ॥४३॥
जो दशभुज पंचानन ॥ गळां पन्नागांचें भूषण ॥ मस्तकीं जटा पिंगटवर्ण ॥ विभूतिचर्चन सर्वांगीं ॥४४॥
ऐसें स्वरूप प्रकट करूनी ॥ काय करी पिनाकपाणी ॥ नरसी मेहेत्यासी उठवूनी ॥ अभयवचनीं बोलत ॥४५॥
म्हणे रे बाळका निजभक्ता ॥ प्रसन्न जाहलों तुज आतां ॥ काय कामना वाटते चित्ता ॥ ते सर्वथा मज सांग ॥४६॥
नरसी मेहेत्यानें ऐकोनि वचन ॥ कैलासपतीचे धरिले चरण ॥ प्रसन्न जाहलेत मजलागून ॥ अभयवचन देऊनि ॥४७॥
तरी मी तों बाळक अज्ञान ॥ मज न कळेचि उत्तम मागणें ॥ तुम्हांसी आवडे जीवाहून ॥ तें मज देईं नीलकंठा ॥४८॥
जैसें मातेचें अज्ञान बाळ ॥ त्यास न कळेचि उचित काळ ॥ परी जननीस आवडे सर्वकाळ ॥ अलंकार लववी निजप्रीतीं ॥४९॥
तेवीं तुम्ही आजि विश्वनाथा ॥ प्रसन्नमुखें वर ओपितां ॥ तरी जें आवडेल तुमचें चित्ता ॥ तेंचि अनाथा मज द्यावें ॥५०॥
हास्यवदन पिनाकपाणी ॥ विस्मित जाहले निजमनीं ॥ म्हणे ऐसा चतुर भक्त कोणी ॥ नाहीं नयनीं देखिला ॥५१॥
नरसी मेहेत्याकारण ॥ मागुती शिव बोले वचन ॥ सकळ देवांचें देवतार्चन ॥ तो श्रीकृष्ण मज आवडे ॥५२॥
गंगे पार्वतीस न सांगतां ॥ मी जपतसें श्रीकृष्णनाथा ॥ त्याहून विशेष भक्तकथा ॥ मज तत्त्वतां आवडे ॥५३॥
माझिया जीवींचें निजगुज ॥ तें तूं दाखवीं म्हणसी मज ॥ याचकें नृपासी मागतां राज्य ॥ नव्हेचि काज सर्वथा ॥५४॥
कृपणासी मागतां निजधन ॥ सुखी नव्हती याचकजन ॥ कामिकासी मागतां स्त्रीदान ॥ न पावे सन्मान याचक ॥५५॥
येरू म्हणे पिनाकपाणी ॥ नानापरीचे दृष्टांत देऊनी ॥ समजावितां मजलागोनि ॥ परी संशय मनीं वाटतसे ॥५६॥
बळिराजा उदार देखोन ॥ याचकरूपें श्रीवामन ॥ जातांचि देऊनि राज्यदान ॥ आत्मनिवेदन केलें कीं ॥५७॥
हरिश्चंद्र राजा सात्विक पूर्ण ॥ विश्वामित्र याचक मागतां दान ॥ राज्य कांता पुत्र देउन ॥ निजसत्व तेणें रक्षिलें ॥५८॥
तेवीं उदार कैलासपती ॥ प्रसन्न जाहलेती मजप्रती ॥ तरी तुम्हां लागली जयाची प्रीती ॥ तोच निश्चतीं मज दावा ॥५९॥
वचन ऐकोनियां देख ॥ काय बोलती त्रिपुरांतक ॥ श्रीकृष्णलीला अलोकिक ॥ त्या मज देख आवडती ॥६०॥
श्रीकृष्णलीला
श्रीकृष्णलीला अद्भुत जनीं ॥ गोकुळीं क्रीडला चक्रपाणी ॥ तें रासमंडळ मजलागूनी ॥ जीवाहूनि आवडे ॥६१॥
मित्रकन्येचिया कांठीं ॥ गोपींसीं क्रीडे जगजेठी ॥ मजला त्याची प्रीति मोठी ॥ जातसें दिठीं पाहावया ॥६२॥
रासमंडळ रचोनि सांग ॥ नृत्य करितो श्रीरंग ॥ मीही वाजवी मृदंग ॥ ताल सांग बैसोनि ॥६३॥
तेंचि दाखवीन तुजप्रती ॥ म्हणोनि अभय दिधलें हातीं ॥ गोपीचा वेष तयाप्रती ॥ दिधला निश्चितीं नीलकंठें ॥६४॥
सवें घेऊनि त्यालागोनी ॥ त्वरें चालिले पिनाकपाणी ॥ रासमंडळीं येऊनी ॥ चक्रपाणि वंदिला ॥६५॥
ऐसें ऐकतां वचन ॥ आशंका धरितील विचक्षण ॥ म्हणाल रासमंडळीं क्रीडोन ॥ गेला श्रीकृष्ण द्वापारीं ॥६६॥
कलियुगीं भक्त नरसी मेहेता ॥ येथें कां लिहिली कृष्णकथा ॥ ऐसी आशंका धराल चित्ता ॥ तरी हे वृथा कविता न म्हणावी ॥६७॥
मथुरा गोकुळ वृंदावनीं ॥ अद्यापि क्रीडतो चक्रपाणी ॥ भाविक भक्त जे त्यांलागूनी ॥ दिसे नयनीं हरिलीला ॥६८॥
हे कथा भविष्योत्तरपुराणीं ॥ स्वयें बोलिले श्रीव्यासमुनी ॥ कलियुगीं भक्तशिरोमणी ॥ त्यांचीं कथनें वर्णिलीं ॥६९॥
जैसी मर्यादावेळ उल्लंघून ॥ प्रवेश न करी समुद्रजीवन ॥ तैसें कवीश्वराचें वचन ॥ झाल्यावांचोनि वदेना ॥७०॥
कीं आयुष्य सरल्यावांचोनी ॥ काळ न दंडी जीव कोणी ॥ तेवीं कवीश्वराची निजवाणी ॥ झाल्यावांचोनि वदेना ॥७१॥
कीं दिनमान घटिका न होता पूर्ण ॥ न मावळे सूर्यनारायण ॥ तेवीं चरित्र वर्तल्यावांचोन ॥ कवि तें लेखन न करिती ॥७२॥
न मिळतां पतीचिया मता ॥ न वर्ते जेवीं पतिव्रता ॥ तेवीं कवीश्वरांची वाणी वृथा ॥ असत्या कथा न वदे कीं ॥७३॥
कीं स्वयंपाक करावयालागून ॥ प्रार्थूनि आणिली शेजारीण ॥ ते आपुले पदरची सामग्री घेऊन ॥ न येचि जाण सर्वथा ॥७४॥
पाककर्त्री असली चतुर ॥ तरी अन्न करील रुचिकर ॥ तेवीं कवि दृष्टांत चार ॥ देईल साचार निरूपणीं ॥७५॥
परी मुळींचें पद सांडोनि सर्वथा ॥ असत्य ग्रंथ न वदे कवयिता ॥ म्हणोनि प्रार्थना करितों पंडितां ॥ विकल्प चित्तीं न धरावा ॥७६॥
श्रीभीमातीरवासी रुक्मिणीरमण ॥ तोचि बुद्धीचा दाता चैतन्यघन ॥ तोचि बोलवी ग्रंथनिरूपण ॥ येरवीं अज्ञान महीपति ॥७७॥
आतां ऐका भाविक जन ॥ मागील कथेसी द्यावें अवधान ॥ नरसी मेहेत्यासी पार्वतीरमण ॥ आले घेऊन हरिलीले ॥७८॥
कालिंदीतटीं अति अद्भुत ॥ वृक्ष लागले गगनचुंबित ॥ दवणा केतकी पारिजात ॥ पारवे घुमत हरिलीले ॥७९॥
चूतवृक्ष आणि जांबुळी ॥ आंवळी निंबोणी रायकेळी ॥ बकुळी आणि रामसीताफळी ॥ डोळे पाडळी सुवासें ॥८०॥
बिल्व वट आणि गोंधणी ॥ अश्वत्थ रुद्राक्ष सारमणी ॥ चंपक दाळिंबी बहुलसुमनीं ॥ कृष्णरंगणीं डोलतो ॥८१॥
पिंपरी शेवगे महारुख ॥ पासवणी आणि सेलाटक ॥ फणस मोठे गगनीं डोलत ॥ यदुनायक देखोनी ॥८२॥
भोंवता वृक्षांचा परिघ देखा ॥ आंत लागली पुष्पवाटिका ॥ मोगरे जाई सेवंतिका ॥ कृष्णनायिका देखती ॥८३॥
सहस्रफडी पिंवळी सेवंती ॥ भोंयचाफे जासुंद सेवंती ॥ कापुरवेली गुलाब शोभती ॥ चरित्र पाहती कृषाचें ॥८४॥
सरांटे श्याम हंसराशी ॥ बटमोगरे गुलाब सुवासी ॥ गुलचनी आरक्त आणि तुलसी ॥ कुंजवनासी लागल्या ॥८५॥
वसंतें येऊनि आपण ॥ शृगारिलें कुंजवन ॥ तेथें यशोदेचा नंदन ॥ क्रीडे आपण स्वलीलें ॥८६॥
कृष्णदृष्टीचा महिमा थोरू ॥ सरांटे होती कल्पतरू ॥ ओहळउदकाची सरू ॥ अमृततुषारू करीना ॥८७॥
तेथें क्रीडतसे श्रीरंग ॥ खडे जाहले पद्मराग ॥ बरड गोटे अमोघ ॥ परिस अभंग ते जाहले ॥८८॥
असो आतां बहु जाणा ॥ चाष चातक पक्षी मनमोहना ॥ कपोत चिमण्या साळोक्या वामना ॥ कृष्णकीर्तना डोलती ॥८९॥
असो आतां बहु भाषण ॥ कालिंदीतटीं हें उपवन ॥ लागलें अति शोभायमान ॥ तेथें श्रीकृष्ण क्रीडत ॥९०॥
नरसी मेहेता आणि उमापती ॥ तेथें येऊनि सत्वरगती ॥ भावें नमिला तो श्रीपती ॥ क्षेम प्रीतीं दीधलें ॥९१॥
साक्षात् परब्रह्म श्रीकृष्णमूर्ती ॥ गोपी त्या अवतरल्या निजश्रुती ॥ वेणु वाजवितां श्रीपती ॥ गोळा होती निजछंदें ॥९२॥
सभोंवत्या मिळोनि वज्रांगना ॥ मध्यें घननीळ वैकुंठराणा ॥ गोपिका देखोनि मनमोहना ॥ धांवूनि चरणां लागल्या ॥९३॥
श्रीकृष्णचरण अति सुकुमार ॥ ध्वज वज्रांकुश तोडर ॥ ब्रह्मा पोटींचा निजकुमर ॥ चरण साचार न पावेचि ॥९४॥
पवित्रपणें पाहतां जाण ॥ तरी गंगा चरणीचें जीवन ॥ म्हणोनि मस्तकीं उभारमणें ॥ धरिली जाण आवडी ॥९५॥
वांकी नेपुरें चरणीं गर्जती ॥ म्हणती धन्य असों आम्ही त्रिजगतीं ॥ आम्हांवरी तुष्टोनि कमलापती ॥ चरणीं निश्चितीं स्थापिलें ॥९६॥
नखें देखूनि निशापती ॥ परम लज्जित जाहला चित्तीं ॥ तोडार गर्जे कोणे रीतीं ॥ दुरितें नासती हरिचरणीं ॥९७॥
पोटर्य़ा जानु जंघा सुरेख ॥ कटीं पीतांबर वेष्टिला देख ॥ कोटि विद्युल्लता लखलख ॥ जडल्या देख निजांगें ॥९८॥
आजुनुबाहु श्रीपति ॥ दोनी भुजा दंड मिरवती ॥ विधाता जन्मला नाभीप्रती ॥ अंत निश्चितीं न कळे त्या ॥९९॥
विशाळ उदर तनू सांवळीं ॥ हृदयीं शोभे सुंदर त्रिवळी ॥ निरुपम दिसे रोमावळी ॥ श्रीवत्सनवाळी काय वर्णूं ॥१००॥
सर्व आनंद होऊनि गोळा ॥ तो एकवटला मुखकमळा ॥ अधरामृताचा सोहळा ॥ जाणे कमळा निजमुखें ॥१॥
कमलदलाऐसे जाण ॥ विशाळ श्रीकृष्णाचे नयन ॥ सरळ नासिक विराजमान ॥ वसंत येऊन राहिला ॥२॥
कर्णीं कुंडलें अति सोज्ज्वळ ॥ भोंवया सुरेख विशाल भाळ ॥ मस्तकीं शोभती केश कुरळ ॥ मयूरपिच्छें वेष्टिलीं ॥३॥
श्रीकृष्णाचा मुकुट पाहोनी ॥ लज्जित जाहला वासरमणी ॥ कंठींचा कौस्तुभ होऊनी ॥ भास्कर मनीं निवाला ॥४॥
आकाश जैसें निर्मळ जाण ॥ त्यावरी शोभे तारागण ॥ तैसीं पदकावरी महारत्नें ॥ कृष्णभूषणें लखलखित ॥५॥
कंठीं एकावळी शोभत ॥ आपद वैजयंती डोलत ॥ नानापुष्पांचे हार निश्चित ॥ गळां घातले निजभक्तीं ॥६॥
सर्वांगीं चंदन चर्चिलें देख ॥ भाळी कस्तूरीमळवट सुरेख ॥ तुळसीमाळा यदुनायक ॥ लेतसे देख निजप्रीतीं ॥७॥
ऐसें परब्रह्मरूप सगुण ॥ मुखें करित वेणुवादन ॥ तटस्थ राहिले गोपींचे नयन ॥ श्रीकृष्णध्यान देखोनि ॥८॥
सुस्वर मुरली वाजवी कान्हा ॥ भोंवत्या नाचती व्रजांगना ॥ आलापिती गीत नाना ॥ मनमोहना गोविंदा ॥९॥
तंत वितंत घनसुस्वर ॥ पांवा मोहरी आणि झल्लर ॥ वाद्यें वाजती मनोहर ॥ आलाप घेती निजमुखें ॥११०॥
मृदंग वाजवी पार्वतीरमण ॥ त्यावरी नाचती व्रजांगना ॥ तालसंकेत वैकुंठराणा ॥ दावितो खुणा अंतरींच्या ॥११॥
कृष्णासी म्हणती व्रजसुंदरी ॥ तूं व्यापक अससी सर्वांतरीं ॥ तुझा काम धरूनि अंतरीं ॥ आलों लवकरी श्रीकृष्णा ॥१२॥
आम्ही व्रजांगना अनेक ॥ तूं शारंगधर दिससी एक ॥ तुझें रूप पाहतांचि देख ॥ रतिनायक खवळला ॥१३॥
कृष्णा तुझें पाहतां वदन ॥ मुखासी वाटे द्यावें चुंबन ॥ हृदयीं हृदय एक करून ॥ द्यावें आलिंगन तुजलागीं ॥१४॥
ऐसें बोलतां गोपनारी ॥ अनेक रूपें नटला हरी ॥ जैसा भाव जयाचें अंतरीं ॥ तैसाचि मुरारी होतसे ॥१५॥
जितुक्या होत्या व्रजांगना ॥ तितुकीं रूपें घेतसे कान्हा ॥ हातीं धरूनि जगज्जीवना ॥ व्रजांगना नाचती ॥१६॥
हातीं धरूनि घनसांवळा ॥ व्रजांगना धरिती गळा ॥ सगुण रूप पाहती डोळां ॥ चुंबन अबला देताती ॥१७॥
दोघे कृष्ण दोघी गवळणी ॥ एकमेकांचा हात धरूनी ॥ ऐसें रासमंडळ रचोनी ॥चक्रपाणी भोगिती ॥१८॥
कृष्णतनू अति सुकुमार ॥ हृदय विशाळ माज चिवळ ॥ वक्षःस्थळीं रोमावळ ॥ देखतां विठ्ठल व्रजनारी ॥१९॥
धरूनियां श्रीकृष्णकर ॥ गोपी ठेविती हृदयवर ॥ मुख चुंबोनि वारंवार ॥ घालिती तांबूल निजमुखीं ॥१२०॥
जयाचें चित्तीं जैसा काम ॥ तैसा पुरवी मेघश्याम ॥ श्रीकृष्ण सर्वांचा विश्राम ॥ जपतो नाम नीलग्रीव ॥२१॥
रासमंडळ रचोनि युक्तीं ॥ अनेक गोपी गाती नाचती ॥ नरसी मेहेत्यासी श्रीपती ॥ ओळखी निश्चितीं तत्काळ ॥२२॥
अठरा भार वनस्पतींसी ॥ पाहतां वेगळी निवडे तुळसी ॥ तेवीं नरसी मेहेत्यासी श्रीपती ॥ ओळखी निश्चितीं तत्काल ॥२३॥
कीं आकाश भरलें तारागणीं ॥ त्यांत निवडे ध्रुवचांदणी ॥ तेवीं नरसी मेहत्यासी नयनीं ॥ चक्रपाणी ओळखिती ॥२४॥
की नवग्रह पाहतां नयनीं ॥ त्यांत निवडे वासरमणी ॥ तेवीं नरसी मेहेत्यासी देखोनि नयनीं ॥ श्रीकृष्ण मनीं विस्मित ॥२५॥
कीं सिद्ध साधक बैसले थोर ॥ त्यांत वेगळा अनसूयाकुमार ॥ तेवीं नरसी मेहेत्यासी शारंगधर ॥ ओळखी साचार निजदृष्टीं ॥२६॥
शिवासी म्हणे व्रजभूषण ॥ नूतन गोपी आणिली कोण ॥ आज मित्रपणासी हें वचन ॥ केलें जाण नीलकंठा ॥२७॥
माझी तुझी प्रीति जवळी ॥ म्हणोनि आणितों रासमंडळीं ॥ ऐसें बोलतां वनमाळी ॥ चंद्रमौळी हांसले ॥२८॥
नरसी मेहेत्यासी पार्वतीरमण ॥ नेत्रसंकेतें दावी खूण ॥ त्यानें तत्काळ येऊन ॥ श्रीकृष्ण चरण वंदिले ॥२९॥
सदाशिव म्हणे कृष्णनाथा ॥ तुझा दास नरसी मेहेता ॥ तयाची पुरातनकथा ॥ तुज सविस्तर सांगेन ॥१३०॥
पूर्वजन्मीं तामसगुण ॥ महाव्याध्र हा पंचानन ॥ अरण्यांत असतां पिपाजीनें ॥ नामस्मरण सांगितलें ॥३१॥
तुझें करितां नामस्मरण ॥ दुरितें नासलीं संपूर्ण ॥ जुन्यागडीं नागर ब्राह्मण ॥ तेथें जन्म पावला ॥३२॥
बाळपणीं मातापिता ॥ याचीं निवर्तलीं असतां ॥ यानें शरीर श्रीकृष्णनाथा ॥ मज सर्वथा अर्पिलें ॥३३॥
सप्त दिवसपर्यंत येणें ॥ वर्जिलें अन्नउदकपान ॥ मी संतुष्ट होऊनि निजमन ॥ जाहलों प्रसन्न यालागीं ॥३४॥
मज उत्तर दिधलें येणें ॥ मज उचित न कळेचि मागणें ॥ जें आवडे तुजकारणें ॥ तें मज देणें नीलकंठा ॥३५॥
मज आवडसी तूं जगज्जीवन ॥ म्हणोनि आलों येथें घेऊन ॥ तरी याचें मस्तकीं हस्त ठेवून ॥ देईं वरदान श्रीकृष्णा ॥३६॥
ऐसें ऐकूनि कमळापती ॥ नरसी मेहेत्यासी धरिलें हातीं ॥ अभय देऊनि कृपामूर्ती ॥ आलिंगन प्रीतीं दीधलें ॥३७॥
पुढती बोले चक्रपाणी ॥ त्वां रासमंडळ देखिलें नयनीं ॥ याचे प्रबंध रचोनी ॥ सांगें श्रवणीं सकळांच्या ॥३८॥
माझी गुणचरित्रलीला ॥ नित्य दिसेल तुझिया डोळां ॥ ऐसा वर घनसांवळा ॥ देता जाहला तयासी ॥३९॥
शिवासी म्हणे श्रीकृष्ण ॥ आतां जावें यासी घेऊन ॥ ऐसें ऐकूनि उमारमण ॥ केलें नमन सत्वर ॥१४०॥
इच्छामात्रेंकरूनि त्यासी ॥ आणोनि बैसविलें राउळासी ॥ अभय देऊनि निजभक्तासी कैसासवासी पैं गेला ॥४१॥
शिवालयीं बैसूनि जाण ॥ नरसी मेहेता करी कीर्तन ॥ रात्रंदिवस नामस्मरण ॥ करी सप्रेम आवडी ॥४२॥
श्रीकृष्णलीलाकथामृत ॥ गाऊनि प्रेमें नृत्य करीत ॥ निर्लज्ज होवोनि निश्चित ॥ गुण वर्णित श्रीहरीचे ॥४३॥
रासमंडळ खेळला श्रीपती ॥ तें नरसी मेहेत्यानें लिहिलें ग्रंथीं ॥ त्या देशीं अद्यापि लोक गाती ॥ भाषा गुजराती असे कीं ॥४४॥
असो मागील निरूपण ॥ नरसी मेहेता मंदिराहून ॥ वनांत गेला कीं रुसोन ॥ बंधुजन पाहती ॥४५॥
तंव अरण्यांत चरती गोधन ॥ त्यांसवें येती गोपजन ॥ ते नरसी मेहेत्याचें कीर्तन ॥ करिती श्रवण आवडीं ॥४६॥
गृहासी येऊनि त्वरित ॥ बंधूसी सांगती वृत्तांत ॥ म्हणती नरसी मेहेता शिवालयांट ॥ गुण वर्णित हरीचे ॥४७॥
ऐसी मात ऐकोनि कानीं ॥ संतोष जाहला त्याच्या मनीं ॥ नरसी मेहेत्यासी समजावूनी ॥ निजसदनीं आणिला ॥४८॥
कोणी गांवींचे भाविक जन ॥ अध्यात्मशास्त्रीं होते निपुण ॥ म्हणती यावर तुष्टला नारायण ॥ दिसतें चिन्ह पालटलें ॥४९॥
गंगेसीं ओहळ मिळतां जाण ॥ तयासी आलें पवित्रपण ॥ तेवीं कृपा करितां जगज्जीवन ॥ सात्विक लक्षण या आलें ॥१५०॥
गांवींचा एक होता ब्राह्मण ॥ परम भाविक वैष्णवजन ॥ त्याणें करूनि कन्यादान ॥ केलें लग्न तयाचें ॥५१॥
लोहासी परीस लागतां जाण ॥ त्याचें तत्काळचि होय सुवर्ण ॥ तेवीं कृपा करितां नारायण ॥ मग काय उणें तयासी ॥५२॥
न करी कोणाचें उपार्जन ॥ राव रंक सारखेचि जाण ॥ दीन आणि श्रीमंत जन ॥ लेखी समान दृष्टीसी ॥५३॥
गृहस्थाश्रम केल्यावर ॥ दिवसेंदिवस जाहला थोर ॥ एक कन्या एक पुत्र ॥ संतान तया जाहलें असे ॥५४॥
पुढें रसाळ निरूपण ॥ श्रोतीं व्हावें सावधान ॥ नरसी मेहेत्याच्या पुत्राचें लग्न ॥ अंगें श्रीकृष्ण करील ॥५५॥
अहो भक्तचरित्रकथा अमोलिका ॥ कीं हे सुगंधपुष्पांची वाटिका ॥ द्वारकावासी श्रीकृष्णसखा ॥ तो वसंत देखा माधव ॥५६॥
महाराष्ट्र ओंव्या फुलें मोकळीं ॥ हार गुंफोनि नानापरी ॥ महीपति होऊन फुलारी ॥ वैष्णवमेळीं पातला ॥५७॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ सप्तविंशाध्याय रसाळ हा ॥१५८॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ अध्याय ॥२७॥ ओंव्या ॥१५८॥
॥ श्रीभक्तविजय सप्तविंशाध्याय समाप्त ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.