श्रीगणेशाय नमः ॥ श्रीक्षीराब्धिवासाय नमः ॥
जयज्य क्षीराब्धिवासा मेघश्यामा ॥ अनंतरूपा अनंतनामा ॥ अनंतअवतारा पुरुषोत्तमा ॥ निगमांसी महिमा न कळे तुझा ॥१॥
जयजय वैकुठविलासिया ॥ गुणसमुद्रा करुणालया ॥ चरणीं महिमा जाणोनियां ॥ समुद्रतनया तल्लीन ॥२॥
जय गोकुलवासा घननीलवर्णा ॥ गोरसचोरा मनमोहना ॥ मथुरावासिया कंसमर्दना ॥ धर्मस्थापना श्रीहरे ॥३॥
जय द्वारकावासी गरुडध्वजा ॥ लीलानाटकी अधोक्षजा ॥ अनुपमस्वरूप महिमा तुझा ॥ भीमकात्मजा एक जाणे ॥४॥
जय जय भीमातीरनिवासिया ॥ पुंडलीकवरदानिया ॥ भक्तांसी अभय देऊनियां ॥ करिसी छाया कृपेची ॥५॥
त्वां अघटित केलें रुक्मिणीपती ॥ ग्रंथ लिहविला मूढाहातीं ॥ मशका मभय देऊनियां प्रीतीं ॥ मेरु त्याहातीं उचलविला ॥६॥
मिळवूनियां रीस वानर ॥ त्यांहातीं घेवविलें लंकानगर ॥ कीं ज्ञानदेवें देऊनि रेडिया वर ॥ श्रुति साचार वदविल्या ॥७॥
कीं परिसें आपला देऊनि गुण ॥ लोहाचें केलें शुद्ध कांचन ॥ कीं गंगेनें आपुलें पवित्रपण ॥ ओहळासी अर्पण केलें कीं ॥८॥
नातरी कस्तूरीनें आपुलें संगतीं देखा ॥ ताजव्यांत जोखविली मृत्तिका ॥ तेवीं माझीं वचनें वैकुंठनायका ॥ ग्रंथीं लिहविलीं निजकृपें ॥९॥
तूं सर्वांवरिष्ठ अधोक्षजा ॥ प्रीतीनें करितोसेसे निजभक्तपूजा ॥ नानाउपचार मांडितां वोजा ॥ करितां लाजा न येसी तूं ॥१०॥
निज भक्त गाती तुझीं स्तोत्रें ॥ तुज आवडती त्यांचीं चरित्रें ॥ मज पुढें करूनि निमित्तमात्र ॥ वक्ता स्वतंत्र तूं एक ॥११॥
आतां सावधान होइंजे श्रोतां ॥ शिखराध्यायासी आली कथा ॥ जैसें कां दधिमंथन करितां ॥ तों नवनीत अवचित देखिलें॥१२॥
नातरी चूतवृक्षासी घालितां पाणी ॥ तों अमृत फळ देखिलें नयनीं ॥ कां पदक जडिलें रत्नकोंदणीं ॥ तें कंठीं येऊनि पडियेलें ॥१३॥
कां पाकनिष्पत्तीची करितां खटपट ॥ तंव अकस्मात लाभे पक्वान्नताट ॥ कीं क्षेत्रीं करितां कष्ट ॥ पीक धनवट आलें कीं ॥१४॥
नातरी पंढरीस उत्साह जाहला ॥मग पौर्णिमेस मांडिला गोपाळकाला ॥ तैसा शेवटील अध्याय मजला ॥ आहे भासला त्या रीतीं ॥१५॥
अनंत संतांच्या कथा गहन ॥ संख्ह्या मोजितां अध्याय छप्पन्न ॥ कीं देशींचीं महारत्नें जाण ॥ सतेजपणें लखलखिती ॥१६॥
कीं छप्पन्न भाषांचा अन्वय ॥ तो हा ग्रंथ भक्तविजय ॥ श्रवणेंच भाविक पावती जय ॥ हें सांगूं काय निजमुखें ॥१७॥
कीं छप्पन्न देशींचीं शस्त्रें तीक्ष्ण ॥ क्षमाकालिका हातीं घेऊन ॥ क्रोधमहिषावरी चढोन ॥ आली ऐसें वाटतसे ॥१८॥
कीं छप्पन्न देशींच्या सरिता थोर । प्रेमरसाचें घेऊन नीर ॥ श्रीपांडुरंग आनंदसागर ॥ त्यासीं धुंडिती निजप्रीतीं ॥१९॥
कीं छप्पन देशींचे नृपराज ॥ घेऊन हातीं विजयध्वज ॥ ममतेचें परचक्र उडवूनि सहज ॥ भद्रसायुज्य भोगिती ॥२०॥
या छप्पन्नांवरिष्ठ शिरोमणी ॥ हा सत्तावन्नावा परिसा कानीं ॥ जैसें जेवणाशेवटीं प्रीतींकरूनी ॥ दध्योंदन घेती श्रीमंत ॥२१॥
मागील अध्यायाचे अंतीं जाण ॥ यवनांनीं छळिले उद्धवचिद्धन ॥ मग मारुतीनें चमत्कार दाखवून ॥ महोत्साह पूर्णं करविला ॥२२॥
आतां विसोबा सराफ प्रेमळ भक्त ॥ पंढरीक्षेत्रीं होता राहात ॥ देवघेव सावकारी करीत॥ असोनि विरक्त संसारी ॥२३॥
चौघे पुत्र आणि कांता ॥ तो सदा अनुकूल पतिव्रता ॥ भ्रतारवचन न मोडी सर्वथा ॥ काळ कठिण पडतांही ॥२४॥
प्रपंचधंदा करितां जाण ॥ विसोबा असत्य न बोले वचन ॥ क्षुधार्थियांसी घालावें अन्न ॥ करूनि सन्मान आदरें ॥२५॥
तों खरपड पडिलें अति कठिण ॥ दोन पायल्यांची झाली धारण ॥ ब्राह्मण क्षुधातुर होऊन ॥ सदनीं येऊन बैसती ॥२६॥
दुष्काळीं करितां अन्नदान ॥ धनधान्य गेलें सरोन ॥ तथापि याचकांकारण ॥ दातयाचें जीवन कळेना ॥२७॥
मातेचें दुग्ध निःशेष आटे ॥ तरी बाळक स्तनासी झगटे ॥ कीं प्रजेनें भरिले उदंड तोटे ॥ तरी राजासी खोटें वाटतसे ॥२८॥
बाप सदैव कीं दुर्बळा ॥ हें सर्वथा नेणवे बाळकाला ॥ तेवीं दातयाचें दुःख याचकाला ॥ अंतरीं सर्वथा कळेना ॥२९॥
विसोबाचिया सदनाप्रती ॥ येऊनि बैसती अन्नार्थी ॥ तितुक्यांसही यथाशक्ती ॥ भोजन याचकां निजसत्वें ॥३०॥
कोठें हात न चालता जाण ॥ मोडिले अलंकार आणि भूषण ॥ मग थोर थोर भांडीं विकून ॥ घाली भोजन याचकां ॥३१॥
टाकोनि लौकिक ममता ॥ टाकोनि संसाराची चिंता ॥ सांडोनि निजदेहाची आस्था ॥ पंढरीनाथा ध्यातसे ॥३२॥
क्षुधितांसी द्यावया नाहीं अन्न ॥ ग्रामांत कोणी न देती उसण ॥ म्हणती विसोबा सावकारी बुडवून ॥ दिवा लावून बैसला ॥३३॥
एक म्हणती अज्ञानी निश्चित ॥ तयासी न कळे आपुलें हित ॥ प्रंपच करूनि परमार्थ ॥ सज्ञानी साधिती विवेकें ॥३४॥
आतां विसोबासी जे पातेजती ॥ त्यांचीही ऐसी होईल गती ॥ नरनारी बोलती येणें रीती ॥ निंदा करिती सकळिक ॥३५॥
एक म्हणती संचित खोटें ॥ धनधान्य आपुलें जेथिंच्या तेथें ॥ अन्न घालितां यात्रेकर्यांतें ॥ आळस यातें न येचि कीं ॥३६॥
असो कासेगांवांत होता पठाण ॥ तयासी न कळे हें वर्तमान ॥ त्यापासूनि कर्ज घेऊन ॥ क्षुधितांसी अन्न घालीतसे ॥३७॥
द्रव्य अखंड घेऊनि येत ॥ गणती जाहली शतें सात ॥ दुहोतरा रोखा लिहूनि त्वरित ॥ दिधला निश्चित तयासी ॥३८॥
तंव एक रामपुरीबावा सिद्धपुरुष ॥ ते यात्रेसी आले पंढरीस ॥ विसोबाचें सत्त्व पहावयास ॥ सोंग कुश्चळ घेतलें ॥३९॥
म्हणे त्याची कैसी आहे स्थिती ॥ सम विषम पाहणें भूतीं ॥ कीं सारिखीच करुणा सर्वांप्रती ॥ हें आपण निश्चितीं पाहावें ॥४०॥
मोरींतील दुर्ग्तंधकर्दम घेतला ॥ तो आपुले अंगासी लाविला ॥ माजासी चिंध्यांचा कडदोरा बांधिला ॥ लंगोटी नेसला अमंगळ ॥४१॥
जेवावयासी पाहिजे पात्र ॥ म्हणोनि हातीं घेतलें खापर ॥ यामिनी लोटली एक प्रहर ॥ आले सत्वर मंदिरा ॥४२॥
वेडियासारखी मारूनि हांक ॥ म्हणे माझें पोटीं लागली भूक ॥ वचन ऐकोनि सम्यक ॥ विसोबा बाहेर पातले ॥४३॥
ओळखिले नसतां महापुरुष ॥ म्हणे स्वामी कृपा केली विशेष ॥ तरी भोजन करूनि सावकाश ॥ जावें आश्रमास आपुल्या ॥४४॥
मग अन्नपात्र ठेवूनि सत्वर ॥ आपण बैसले त्यासमोर ॥ तों अंगास कर्दम लागला फार ॥ दुर्गंधि थोर सुटलीसे ॥४५॥
उष्ण उदक करूनि त्वरित ॥ त्यासी धुतलें आपुले हातें ॥ मग अंग पुसोनि स्वस्थचित्तें ॥ दुसरी कौपीन नेसविली ॥४६॥
गंधाक्षत अर्चनसोहळा ॥ तुळसीमाळा घातल्या गळां ॥ भेजन घालोनि त्याजला ॥ नमस्कार केला साष्टांग ॥४७॥
तुळसीदळ मुखसुद्धीसी ॥ देऊनि बोळविलें अतीतासी ॥ रामपुरी विचारी मानसीं ॥ म्हणे आत्मज्ञान यासी ठसाविलें ॥४८॥
व्याघ्र गायी आणि वृश्चिक ॥ यांवरी सारिखा भाव देख ॥ धुंडोनि पाहतां परीक्षक ॥ तरी विरळा एक भेटेल कीं ॥४९॥
कीं राजा आणि दरिद्री ॥ दोहींचा सन्मान सारिखाच करी ॥ शोधूनि पाहतां पृथ्वीवरी ॥ बहुत यापरी नसती कीं ॥५०॥
परद्रव्य आणि परस्त्री जाण ॥ दृष्टीस लेखीं जैसें वमन ॥ धुंडाळोनियां त्रिभुवन ॥ पाहतां बहुत नसती कीं ॥५१॥
अनाथ याचक आणि ब्राह्मण ॥ दोहींचें सारिखें जो करी पूजन ॥ त्याचें गृहीं रुक्मिणीरमण ॥ रात्रंदिवस तिष्ठतसे ॥५२॥
विसोबाची ऐसी वृत्ती ॥ म्हणूनि पूजिलें मजप्रती ॥ ऐसें समजोनि आपुलें चित्तीं ॥ आश्रमाप्रती ते गेले ॥५३॥
तंव कासेगांवींच्या पठाणाकारण ॥ वृत्तांत सांगे जाऊनि दुर्जन ॥ कीं विसोबा दिवाळें काढून ॥ दिवा लावून बैसला ॥५४॥
तरी तुवां जाऊनि ऐशा समयीं ॥ आपुलें द्रव्य मागून घेईं ॥ मग तो पंढरीस लवलाहीं ॥ येऊनि काय बोलिला ॥५५॥
विसोबासी म्हणे ते अवसरीं ॥ माझें द्रव्य दे झडकरी ॥ नाहीं तरी तुझ्या द्वारीं ॥ धरणें बैसतों ये वेळे ॥५६॥
ऐसी ऐकोनियां मात ॥ चिंतावला प्रेमळ भक्त ॥ म्हणे द्यावया ऐवज नाहीं दिसत ॥ कैसी मात करावी ॥५७॥
मग धैर्य धरूनि निजमानसीं ॥ काय बोले सावकारासी ॥ आजपासूनि सातवे दिवसीं ॥ द्रव्य तुम्हांसी पाठवीन ॥५८॥
तो म्हणे ब्राह्मणा विश्वास नाहीं मातें ॥ तरी कोणी साक्षी ठेवीं येथें ॥ मग मिळवूनि चवघां गृहस्थांतें ॥ वायदा सांगत त्यांपासीं ॥५९॥
गृहस्थ पठाणासी सांगती बुद्धी ॥ विसोबा असत्य न बोले कधीं ॥ सातवे दिवसीं आधीं ॥ द्रव्य पाठवूनि देईल ॥६०॥
ऐसें ऐकूनि उत्तर ॥ तेथूनि उठिला सावकार ॥ म्हणे गोष्टी समजूनि दूरवर ॥ आमचा लांझा वारावा ॥६१॥
ऐसें म्हणोनि ते समयीं ॥ पठाण गेला कासेगांवीं ॥ म्हणे वायदा पुरतां लवलाहीं ॥ द्रव्य घेईन क्षणमात्रें ॥६२॥
असो सहा दिवस लोटलियावर ॥ विसोबा मानसीं चिंतातुर ॥ म्हणे वाट पाहील सावकार ॥ कैसा विचार करावा ॥६३॥
असत्य बोलिलों नव्हतों गोष्टी ॥ ती आतां प्राक्तनीं आली शेवटीं ॥ ऐसा उद्वेग करी पोटीं ॥ विवेकदृष्टी करूनियां ॥६४॥
करीत बैसला देवपूजन ॥ परी कदापि स्वस्थ नव्हे मन ॥ ऋणकर्याचें लागले ध्यान ॥ चंचळपण आंवरेना ॥६५॥
ऐसें संकट देखोन ॥ काय करीत रुक्मिणीरमण ॥ विसोबाचा गुमाता पुरातन ॥ त्याचें स्वरूप धरियेलें ॥६६॥
मुद्दल सातशतें द्रव्य होतें ॥ तें व्याजासुद्धां घेऊनि पंढरीनाथ ॥ कासेगांवीं जाऊनि त्वरित ॥ पठाणासी बोलत तेधवां ॥६७॥
मी विसोबाचा गुमास्ता पुरातन ॥ विदित असे तुम्हांकारण ॥ तुमचा वायदा पुरला म्हणोन ॥ मजला येथें पाठविलें ॥६८॥
तरी व्याजमुद्दल हिशेब करूनी ॥ द्रव्य घ्यावें तुम्हीं मोजूनी ॥ ऐसें बोलतां चक्रपाणी ॥ सावकार मनीं विस्मित ॥६९॥
मग पठाण पुसे ब्राह्मणाला ॥ द्रव्य मिळत नव्हतें त्याजला ॥ आणिक कोण सावकार पाहिला ॥ आश्चर्य आम्हांला वाटतसे ॥७०॥
यावरी बोले रुक्मिणीपती ॥ विसोबाची सात्त्विक वृत्ती ॥ असत्य न बोलेचि कल्पांतीं ॥ निश्चय चित्तीं असों द्या ॥७१॥
सन्निध बैसोनि जगज्जीवन ॥ रोखा आणविला त्यापासूनि ॥ म्हणे चवघे गृहस्थ बोलावून ॥ हिशेब करूनि घेईं कां ॥७२॥
साक्ष ठेवूनि गांवींच्या लोकां ॥ खरा करूनि दिधला पैका ॥ त्यापासूनि घेऊनि रोखा ॥ निजभक्तसखा काय करी ॥७३॥
सत्वर येऊनि पंढरपुरीं ॥ गेला विसोबाचें घरीं ॥ किंचित रोखा फाडोनि शिरीं ॥ पुस्तकाभीतरीं बांधिला ॥७४॥
गीतेची पोथी सोडूनि पाहात ॥ तों आपुलें नांवाचें देखिलें खत ॥ हस्ताक्षर ओळखितांचि त्वरित ॥ विसोबा विस्मित मानसीं ॥७५॥
म्हणे याचें वारिलें नसतां ऋण ॥ रोखा कोणीं आणिला फाडोन ॥ कांतापुत्रांसी वर्तमान ॥ पुसता जाहला तेधवां ॥७६॥
फाटक्या खतासी देऊनि ठिगळ ॥ मागुती जोडिलें तत्काळ ॥ म्हणे ज्याचें त्यासी ये वेळ ॥ नेऊनि द्यावें आतांचि ॥७७॥
ऐसें म्हणूनि भाविक भक्त ॥ कांसेगांवीं गेले त्वरित ॥ तंव पठाण भेटला बाजारांत ॥ म्हणे काय निमित्त आलेती ॥७८॥
तुमचा गुमास्ता पुरातन ॥ आज प्रातःकाळीं आला त्वरेंकरून ॥ व्याजसुद्धां द्रव्य देऊन ॥ रोखा घेऊनि गेला कीं ॥७९॥
विसोबा चित्तीं जाहला विस्मित ॥ म्हणे मजला तों हें नाहीं श्रुत ॥ परी रोखा आजि पुस्तकांत ॥ अकस्मात देखिला ॥८०॥
द्रव्य तंव नाहीं द्यावयासी ॥ आणि खतही आलें आम्हांपासीं ॥ म्हणोनि लवलाहे तुम्हांपासीं ॥ सांगावयासी पातलों ॥८१॥
ऐसें बोलतां प्रेमळ भक्त ॥ सावकार म्हणे असत्य मात ॥ ऋण वारिलें ज्यांदेखत ॥ ते बोलावूनि त्वरित आणिले ॥८२॥
तेही तैसीच सांगती गोष्टी ॥ आश्चर्य वाटलें याचें पोटीं ॥ मग परतोनियां उठाउठीं ॥ पंढरीक्षेत्रासी पातला ॥८३॥
आपुला गुमास्ता बोलावून ॥ वर्तमान पुसिलें त्यालागून ॥ कैसें तुवां आमुचें वारिलें ऋण ॥ यथार्थ सांगणें मजपासीं ॥८४॥
तो म्हणे पांडुरंगाची शपथ ॥ मज अणुमात्र नाहीं श्रुत ॥ ऐसी ऐकतांचि मात ॥ नेत्रीं अश्रुपात वाहाती ॥८५॥
म्हणे कृपासागरा जगजेठी ॥ मजसाठीं तूं जाहलास कष्टी ॥ देवाचे चरणीं घातली मिठी ॥ सद्गद पोटीं होऊनियां ॥८६॥
विसोबासी म्हणे रुक्मिणीकांत ॥ सकळ क्षेत्रीं प्रकटली मात ॥ नरनारी आश्चर्य करीत ॥ देखतां प्रचीत दृष्टीसी ॥८७॥
संकटीं पडतां भक्त प्रेमळ ॥ त्यासी तत्काळ पावे घननीळ ॥ न विचारितां काळवेळ ॥ दीनदयाळ कृपाळू ॥८८॥
मागें कृतीं त्रेतीं द्वापारांत ॥ देवाचे अवतार साक्षात होत ॥ भक्तांसी रक्षी भगवंत ॥ हें नवल कोणतें म्हणतसां ॥८९॥
आणि कलियुगीं प्रत्यक्ष पाषाणमूर्ती ॥ बौद्धरूपें असतां श्रीपती ॥ जनांसी दाखवूनि नानाप्रचीती ॥ वाढविली कीर्ति संतांची ॥९०॥
परी तिहीं युगांपरीस कलियुग अधिक ॥ ऐसें भागवतीं बोलिले शुक ॥ येथें औट घटिकांत वैकुंठनायक ॥ भेटतसे देख निजभक्तां ॥९१॥
परी एकचि आहे अडथळा ॥ भक्त पाहिजे भाविक भोळा ॥ जो विकल्पजाळीं नाहीं पडला ॥ तयासी पावतो भगवंत ॥९२॥
होय न होय म्हणूनि अंतरीं ॥ दुश्चितपणें जो सेवा करी ॥ तरी तो आपुल्या हितासी होऊनि वैरी ॥ अंतरला दूरी हरिचरणां ॥९३॥
मानसीं इच्छी रुक्मिणीकांत ॥ कीं संकटीं पडावे माझे भक्त ॥ मग मी उडी घालूनि त्वरित ॥ अद्भुत कीर्त वाढवीन ॥९४॥
जैसा तारू बैसोनि सरितेकांठीं ॥ म्हणे बुडता पडावा माझे दृष्टी ॥ मग मी उडी घालूनि उठाउठीं ॥ काढीन संकटीं तयासी ॥९५॥
कीं दानशीळ घालीन अन्नसत्र ॥ रात्रंदिवस हेंचि इच्छित ॥ म्हणे मजपासीं आलिया क्षुधित ॥ करीन तृप्त त्यालागीं ॥९६॥
नातरी सद्वैद्याचे वाटे चित्ता ॥ कांहीं राजयासी व्हावी व्यथा ॥ मग औषध देऊनि निजस्वार्था ॥ रोग सर्वथा दवडिन ॥९७॥
कीं सज्ञान वक्त्याचें मनीं ॥ संशय घेऊनि पुसावें कोणीं ॥ मग नानापरींच्या दृष्टांतवचनीं ॥ आशंका फेडूनि टाकीन ॥९८॥
तेवीं सघनीं ठेवूनि दोनी कर ॥ मानसीं इच्छी रुक्मिणीवर ॥ कीं भक्तांनीं घालोनि मजवरी भार ॥ अघटित विचार करावा ॥९९॥ मग पावून मी तयांप्रती ॥ जगीं अद्भुत वाढवीन कीर्ती ॥ हें सर्वथा चिंतीत श्रीपती ॥ परी कोणी न करिती अधीर ॥१००॥
ज्यांनीं सोडोनि आशापाश ॥ सांडिली नाशवंत देहाची आस ॥ त्या निजभक्तांच्या कथा सुरस ॥ ऐकिल्या सावकाश सज्जनीं ॥१॥
आतां ग्रंथारंभ जाहला जेथून ॥ त्याचें पुढती करावें मनन ॥ आधीं गणेशसरस्वती वंदून ॥ सद्गुरुचरण आठविले ॥२॥
कलियुगीं दोष जाहले बहुत ॥ हें क्षीरसागरीं जाहलें श्रुत ॥ मग भक्तांसी सांगे लक्ष्मीकांत ॥ अवतार घ्यावे मृत्युलोकीं ॥३॥
नाममहिमा प्रकट करून ॥ भजनीं लावावे सकळ जन ॥ हें प्रथमाध्यायीं निरूपण ॥ केलें श्रवण सकळिकीं ॥४॥
तस्करीं छळिलें जयदेवाकारण ॥ पद्मावतीचे गेले प्रान ॥ प्रेत उठविलें जगज्जीवनें ॥ हें निरूपण दुसर्यांत ॥५॥
पाषाणनंदी जेविला अन्न ॥ प्रेत उठविलें आशीर्वादेंकरून ॥ तुळसीदासासेसे रघुनंदन ॥ तृतीयाध्यायी भेटले ॥६॥
शिंपल्यांत सांपडला नामाभक्त ॥ दामशेटी आनंदला बहुत ॥ गोणाईसी संवादले पंढरीनाथ ॥ हें चौथ्यांत निरूपण ॥७॥
अयोनिसंभव भक्त कबीर ॥ मोमिनागृहीं वाढला थोर ॥ शेला विणोनि शारंगधर ॥ केला सत्वधीर निजकृपें ॥८॥
संतांसाठीं केली चोरी ॥ कमाल वधिला आपुले करीं ॥ नृपवरें घातला सुळावरी ॥ साधूंनीं झडकरी उठविला ॥९॥
अंगणीं मिळाला वैष्णवमेळा ॥ तेव्हां कबीरासी अयोध्यानाथ पावला ॥ अगणित कबीर आपण जाहला ॥ सप्तमाध्याय संपला येथून ॥११०॥
निवृत्ति सोपान ज्ञानेश्वर ॥ यतीचें पोटीं जाहले अवतार ॥ त्यांसी वाळीत घालिती द्विजवर ॥ हे कथा सुंदर आठव्यांत ॥११॥
नवमाध्यायीं प्रसिद्ध ॥ रेडियामुखीं बोलविले वेद ॥ पितर जेवविले मंत्रशब्दें ॥ हे लीला अगाध दाखविली ॥१२॥
ज्ञानदेवें पंढरीहूनी ॥ नामयासी नेलें तीर्थाटनीं ॥ हस्तनापुरीं हरिकीर्तनीं ॥ गाई उठविली दशमांत ॥१३॥
कबीरकांता सत्त्वशीळ मोठी ॥ वाणियासी अनुताप जाहला पोटीं ॥ नामदेव आले त्याचिये भेटी ॥ एकादशांत गोष्टी हे जाहली ॥१४॥
मारवाडांत तृषेनें पीडिलें ॥ तैं कूपांतील उदक वर आलें ॥ नागनाथीं देवालय फिरविलें ॥ हें द्वादशांत जाहलें निरूपण ॥१५॥
त्रयोदश अध्यायीं माधवद्यांत ॥ नामयासवें जेविले पंढरीनाथ ॥ म्हणोनि द्विजांनीं वाळीत ॥ घातलें नकळत देवासी ॥१६॥
निजभक्त बहू आवडाती मज ॥ हें रुक्मिणीसी सांगती अधोक्षज ॥ सत्यभामेनें नारदासी गुज ॥ चतुर्दशाध्यायीं पूसिलें ॥१७॥
धरूनि चतुर्भुजरूप सगुण ॥ द्विजांसी साक्षात दिधलें दर्शन ॥ ज्ञानदेवासी निरविलें जाण ॥ हेंचि निरूपण पंचदशाध्यायीं ॥१८॥
देव सांवत्याचे भेटीसी गेला ॥ उदर चिरूनि लपविलें त्याला ॥ हें कौतुक दाखवूनि नामयाला ॥ कूर्मदासा भेटला षोडाशाध्यायीं ॥१९॥
गोर्या कुंभारानें तुडविलें बाळकासी ॥ कीर्तनांत पावले हृषीकेशी ॥ थोटे हात फुटले त्यासी ॥ बाळक जननीसी दीधलें ॥१२०॥
मांजरीचीं पिली घातलीं आव्यांत ॥ तयांसी रक्षी पंढरीनाथ ॥ राका कुंभरासी वैराग्य अद्भुत ॥ चरित्रें सत्राव्यांत हीं जाहलीं ॥२१॥
अठरावे अध्यायीं कथा अद्भुत ॥ तयांसी रक्षी पंढरीनाथ ॥ राका कुंभारासी वैराग्य अद्भुत ॥ चरित्रें दिधला त्यालागीं ॥२२॥
आणि हात लावितांचि नामयास ॥ वाळूचे जाहले परीस ॥ हें कौतुक परिसा भागवतास ॥ दावूनि अनुग्रह दीधला ॥२३॥
एकुणिसाव्यांत कथा ऐसी ॥ हवालदारें छळिलें जगमित्रासी ॥ मग व्याघ्ररूपें येऊनि हृषीकेशी ॥ कौतुक जनांसी दाखविती ॥२४॥
जोग्यासी अनुताप जाहला थोर ॥ वृषभ लावूनि दंडविलें शरीर ॥ तयासी भेटला शारंगधर ॥ अभयवर दीधला ॥२५॥
द्वैतभेद शंकर हरी ॥ ऐसें मानी सोनार नरहरी ॥ त्यासी एकरूपें भेटला मुरारी ॥ विसाव्यांत परी हे जाहली ॥२६॥
एकविसाव्यांत कथा अद्भुत ॥ जनीसवें दळी पंढरीनाथ ॥ तिचे अभंग स्वकरें लिहीत ॥ देखोनि संत हांसले ॥२७॥
शंकरें पार्वतीसी उपदेश केला ॥ तो मत्स्याचें पोटीं मत्स्येंद्र जाहला ॥ विभूतीचा गोरक्ष भला ॥ उकरड्यांत जन्मला निजलीलें ॥२८॥
चांगदेवें व्याघ्राचें वहन केलें ॥ मग ज्ञानदेवें भिंतीस चालविलें ॥ विश्रांतिवटाखालीं भेटले ॥ बाविसाव्यांत चरित्र हें ॥२९॥
तेविसाव्यांत चोखामेळा आख्यान ॥ आणि जीवातत्वा दोघे ब्राह्मण ॥ कबीराचे शिष्य जाहले म्हणून ॥ स्वयातीनें वाळिले ॥१३०॥
चोविसाव्यांत पद्मनाभाची कथा ॥ व्याधि निरसली श्रीराम म्हणतां ॥ कबीरानें वाणियासी विकिली कांता ॥ ऐसी वार्ता निरूपिली ॥३१॥
चर्मांत शालग्राम घातला किमर्थ ॥ ब्राह्मणें छळिला रोहिदास भक्त ॥ मग उदरीं दाखविलें यज्ञोपवीत ॥ पंचविसाव्यांत चरित्र हें ॥३२॥
सव्विसाव्यांत पिपाजीन ॥ अनुतापें राज्य दिधलें टाकून ॥ द्वारकेहूनि येतां रामकृष्ण ॥ उपदेश व्याघ्रासी दिधला ॥३३॥
नरसीमेहेत्याचें चरित्र थोर ॥ तिसांपावेतों अध्याय चार ॥ तयासी भेटोनि श्रीशंकर ॥ रासमंडळ दाखविलें ॥३४॥
त्याच्या पुत्राचें करूनि लग्न ॥ हुंडी भरी जगज्जीवन ॥ कन्येचें होतां ओंटभरण ॥ वस्त्रें भूषणें पुरविलीं ॥३५॥
रामदासाची भक्ति देखोनी ॥ डाकुराशी आले चक्रपाणी ॥ एकतिसाव्यांत चरित्र सज्जनीं ॥ हेंचि वर्तलें जाणिजे ॥३६॥
बत्तिसाव्यांत मथुरेची मूर्ती ॥ हरिद्वारीं आली चालोनि रातीं ॥ तेतिसाव्यांत सुरदासाप्रती ॥ मथुरेसी श्रीपति भेटले ॥३७॥
चवतिसाव्यांत कथा सुंदर ॥ सेना न्हावी जाहला रुक्मिणीवर ॥ डोयी करूनि शारंगधर ॥ भुलविला नृपवर निज लीलें ॥३८॥
पस्तिसाव्यांत कथा अद्भुत ॥ नृपवरें तोडविला आपुला हस्त ॥ मग प्रसन्न होऊनि जगन्नाथ ॥ केला पूर्ववत तैसाचि ॥३९॥
कर्माबाईची देखोनि भक्ति ॥ तिजसवें जेविली पाषाणमूर्ति ॥ स्वप्न होतांच पुजार्यांप्रति ॥ आश्चर्य चित्तीं वाटलें ॥१४०॥
छत्तिसाव्यांत कथा दोन ॥ सुरदासभक्त मदनमोहन ॥ जनजसवंता उदकीं बुडवितां जाण ॥ श्रीरघुनंदनें उचलिला ॥४१॥
सदतिसाव्यांत कथा सुंदर ॥ प्रेमळ भक्त रसिक मुरार ॥ त्याणें वारणासी उपदेश करूनि सत्वर ॥ भुलविला नृपवर क्षणमात्रें ॥४२॥
मिराबाई प्रेमळ भक्त ॥ तीस विषाचें जाहलें अमृत ॥ अडतिसाव्यांत हें चरित्र ॥ कथिलें असे भाविक हो ॥४३॥
कानोपात्रेस भेटले पंढरीनाथ ॥ हे कथा एकोणचाळिसाव्यांत ॥ चाळिसाव्यांत दामाजीपंत भक्त ॥ रुक्मिणीकांतें रक्षिला ॥४४॥
एकेचाळिसाव्यांत मृत्युंजयाची ख्याती ॥ लिंगें ओकविलीं श्वानांहातीं ॥ बेचाळिसाव्यांत अश्व धरूनि हातीं ॥ भानुदासासी श्रीपती भेटले ॥४५॥
विद्यानगरासी देव गेले ॥ मग पंढरीलागीं भानुदास घेऊनि आले ॥ शूळासी अकस्मात पल्लव फुटले ॥ हें चरित्र परिसिलें सज्जनीं ॥४६॥
चव्वेचाळिसाव्यांत बहिरंभटाप्रती ॥ नागनाथें जन्म दिधला मागुती ॥ करूनि त्याची संशयनिवृत्ती ॥ आत्मज्ञानप्राप्ति पैं केली ॥४७॥
पंचेचाळिसाव्यांत एकनाथआख्यान ॥ जनार्दनासी गेले शरण ॥ त्यांस श्रीदत्तदर्शन ॥ करूनि प्रसाद दिधला ॥४८॥
शेचाळिसाव्यांत ब्राह्मणवेष ॥ सेवा केली द्वारकाधीशें ॥ मग लोटलिया द्वादश वर्षें ॥ एकनाथासी श्रुत जाहलें ॥४९॥
साक्षात अवतार मारुतीचा जाण ॥ रामदास पळाले पडद्याआडून ॥ मग पंढरीसी रुक्मिणीरमण ॥ रामरूप धरून भेटले ॥१५०॥
चाळिसाव्यांत कथा ऐसी ॥ वैराग्य जाहलें तुकयासी ॥ कीर्तनांत येऊनि हृषीकेशी ॥ परचक्रासी निवारिलें ॥५१॥
एकुणपन्नासाव्यांत ऐशा रीतीं ॥ उपदेश केला कांतेप्रती ॥ गृह लुटविलें विप्रांहातीं ॥ उदारवृत्ति धरियेली ॥५२॥
पन्नासाव्यांत कथा सुरस ॥ तुकयाचे पाठीवर मारिला ऊंस ॥ मग पत्र लिहोनि करुणारस ॥ पंढरीस पाठविलें ॥५३॥
निंबराजाच्या खांद्यावरी ॥ कीर्तनांत उभे राहिले हरी ॥ एकावन्नाव्यांत ऐशियापरी ॥ कथा चतुरीं जाणीजे ॥५४॥
हिलाल लागूनि मंडप जळत ॥ शेखमहंमदासी जाहलें श्रुत ॥ कोरड्याचि वह्या उदकांत ॥ बावन्नाव्यांत निघाल्या ॥५५॥
बोधल्यानें लुटविलें शेत ॥ सारा देत पंढरीनाथ ॥ थोंट्या ताटांसी कणसें बहुत ॥ त्रेपन्नाव्यांत आणिलीं कीं ॥५६॥
कीर्तनांत उठविलें प्रेत ॥ हांसी कुणबीण केली गुप्त ॥ अंत्यजासी केलें फजीत ॥ चौपन्नाव्यांत कथा हे ॥५७॥
पंचावन्नाव्यांत चरित्रें चार ॥ श्रोतीं ऐकिलीं असतील सादर ॥ गणेशनाथें तरुवर ॥ उपदेशिला निजकृपें ॥५८॥
आणि केशवस्वामीच्या कीर्तनांत ॥ बचनाग खातां वांचले भक्त ॥ गोमाईसी उतरूनि पंढरीनाथें ॥ पानगे प्रीतीनें खादले ॥५९॥
लतिबशाहाचा भाव देखिला ॥ चित्रानें तत्काळ विडा घेतला ॥ यवनराजा चरणीं लागला ॥ मग मंदिरासी गेला सत्वर ॥१६०॥
छपन्नाव्यांत कथा अपूर्व ॥ संतोबा पवाराचा देखोनि भाव ॥ कूर्म होऊनि देवाधिदेव ॥ यात्रा सर्व उतरिली ॥६१॥
निळोबाचें लग्नीं साहित्य केलें ॥ बेदरीं मारुतीनें मशिदीस पाडिलें ॥ उद्धवचिद्धनासी साहित्य केलें ॥ छप्पन्नाव्यांत वर्तलें चरित्र हें ॥६२॥
विसोबा सराफ भाविक पूर्ण ॥ त्याचें सत्तावन्नाव्यांत वारिलें ऋण ॥ हें तों प्रस्तु अनुसंधान ॥ केलें श्रवण सकळिकीं ॥६३॥
हे छप्पन्नदेशींचे राजहंस ॥ भक्तकथा घेऊनि मुक्ताघोंस ॥ सत्तावन्नावा सरोवर मानस ॥ एथें क्रीडावयास एकवटले ॥६४॥
प्रपंच आणि परमार्थ दोनी ॥ एकवटलें होतें पयपाणी ॥ मग विवेकचंचूसी खोवूनी ॥ क्षीरचि निवडूनि घेतलें ॥६५॥
हीं छप्पन्न रत्नें अमूल्य चोखट ॥ सत्तवन्नावा सुवर्णगट ॥ कोंदणीं बैसवूनि एकवट ॥ वैकुंठपीठ पूजिला ॥६६॥
निष्काम भक्त आणि प्रेमळ ॥ ह्या तुळसीमंजिर्या कोमळ ॥ यांची गुंफोनिया माळ ॥ दीनदयाळ पूजिला ॥६७॥
कीं छप्पन देशींचे पाषाण निर्मळ ॥ सत्तावन्नावा उत्तम स्थळ ॥ तेथें रचोनि यांचें देऊळ ॥ आंत घननीळ बैसविला ॥६८॥
आणिक संत वैष्णव महंत ॥ भक्त प्रकट जाहले बहुत ॥ ते मोकळीं सुमनें घेऊनि निश्चित ॥ पुष्पांजळी अर्पावी ॥६९॥
भर्तृहरी जालंधर ॥ सदानंद शंकराचार्य ॥ गोपीचंद राजा उदार ॥ नरसिंहनागर विवेकी ॥१७०॥
हिरासिंग वाणी गुर्जर ॥ मलुकदास गंगकवीश्वर ॥ चर्पटी चौरंगी भक्त थोर ॥ शारंगधर वश केला ॥७१॥
धनाजाट बाजीदखान ॥ बाबा आणि नानकसदन ॥ नरसिंहभारती नारायण ॥ अच्युताश्रम विवेकी ॥७२॥
हळसी अवघड मुधया भक्त ॥ मुकुंदराज जगविख्यात ॥ जेणें विवेकसुंधु अध्यात्मग्रंथ ॥ निजबुद्धीनें रचियेला ॥७३॥
कृष्णंभट याज्ञवल्की ॥ कृष्णदास मुद्गल विवेकी कान्हया हरिदास नामापाठकी ॥ हे प्रसिद्ध लोकीं निजभक्त ॥७४॥
लोलिंबराज चांद बोधला ॥ शेख फरीद प्रसिद्ध भला ॥ शेख हुसेन सत्त्वागळा ॥ हे भक्ता देवाला आवडती ॥७५॥
नरहरि जयराम मालोपंत ॥ नरसिंहसरस्वती प्रेमळ भक्त ॥ महामुद्गलभट जगविख्यात ॥ जानकीकांत वश केला ॥७६॥
एकलिंग मैराळ सिद्ध ॥ सुमति कमळाकर प्रसिद्ध ॥ रेणुकानंदन आनंदकंद ॥ लीला अगाध जयाची ॥७७॥
श्रीपती आणि दासोपंत ॥ माधवदास जगविख्यात ॥ प्रर्हाद बडवे बापूजीपंत ॥ हे देवासी बहुत आवडते ॥७८॥
गोसावीनंदन स्वामी वामन ॥ गिरीबाई चिन्मयनंदन ॥ बस्वलिंगाचें ऐकूनि कीर्तन ॥ जगज्जीवन संतोषे ॥७९॥
अंतोबा आणि भगवंतभट ॥ विठ्ठलपुरंदर एकनिष्ठ ॥ मैनावतीची एखोनि निकट ॥ वैकुंठपीठ संतोषले ॥१८०॥
लालुनखोजी परमानंद ॥ दादुपिंजारी पूर्वानंद ॥ बहिणाबाईचा प्रेमछंद ॥ नाचे गोविंद कीर्तनीं ॥८१॥
हरिविजय रामविजयसार ॥ पांडवप्रताप ग्रंथ थोर ॥ तो श्रीधरस्वामी नाझरेकर ॥ पंढरपुरनिवासी ॥८२॥
शिवराम गोसावी पैठणकर ॥ नारायणनिंब याचा कुमर ॥ त्याचा ऐकोनि कीर्तनगजर ॥ रुक्मिणीवर संतोषे ॥८३॥
तुकयाचा बंधु कान्हया जाण ॥ धाकुटा कुमर नारायण ॥ जेणें कांतेचा त्याग करून ॥ केलें गमन द्वारकेसी ॥८४॥
बोधल्याचा नातू भगवंतबाबा ॥ तैसाचि पैठणकर नरोबाबावा ॥ ज्याचा कीर्तनीं अखंड हेवा ॥ गाइलें देवा निजप्रेमें ॥८५॥
आनंदतनय प्रसिद्ध जनीं ॥ रघुपतिशेष पूर्णज्ञानी ॥ जयाचें कीर्तन ऐकोनि कानीं ॥ झाले ज्ञानी अतिमूढ ॥८६॥
शेंदुरवादियांत साचार ॥ मध्वमुनीश्वर भक्त थोर ॥ जो पद्यरचनीं अति चतुर ॥ शारंगधर वश केला ॥८७॥
शंकरजीबावा शिउरकर ॥ ज्याचा कीर्तनगजर थोर ॥ सिद्धांतज्ञानी अति उदार ॥ पाखंडियांवर पंचानन ॥८८॥
अमृतराय भक्त प्रेमळ ॥ ज्याचें कवित्व अति रसाळ ॥ श्रवणीं ऐकती निंदक खळ ॥ द्रवती तत्काळ निजप्रेमें ॥८९॥
ऐसे संत प्रेमळ जनीं ॥ जे ईश्वरकृपेचे वरदानी ॥ तयांचिया निजचरणीं ॥ नमन माझें साष्टांग ॥१९०॥
मोरेश्वरबावा तांबवेकर ॥ जो भागवाधर्मीं अति तत्पर ॥ त्याचे चरणीं वारंवार ॥ नमन माझें साष्टांग ॥९१॥
जे एकनिष्ठा धरूनि अंतरीं ॥ झाले पंढरीचे वारकरी ॥ त्यां प्रेमळ भक्तांचे चरणांवरी ॥ नमन माझें साष्टांग ॥९२॥
धरूनि सप्रेम उल्हास ॥ ज्यांणीं पंढरीस केला वास ॥ त्या क्षेत्रवासियां निजभक्तांस ॥ नमन माझें साष्टांग ॥९३॥
आणिकही पुढें वैष्णवभक्त ॥ गुप्त प्रगट होणार बहुत ॥ त्यांचे चरणीं भावार्थ माझा प्रणिपात साष्टांग ॥९४॥
असंख्ह्य ईश्वराच्या विभूती ॥ गणती घेतां न पुरे मती ॥ जेवीं पर्जन्याच्या धारा पडतां क्षितीं ॥ त्या न मोजवती सर्वथा ॥९५॥
पृथ्वीवर अंकुर उठले देख ॥ त्यांचा सर्वथा नव्हेचि लेख ॥ कीं सागरींच्या लहरी अनेक ॥ धरावा लेख कोठवरी ॥९६॥
जो लीलानाटकीं रुक्मिणीकांत ॥ आपणचि जाहला देव भक्त ॥ तयासीच पाहतां सकळ संत ॥ आले दृष्टी अनायासें ॥९७॥
घेतां सागराचें दर्शन ॥ सकळ सरितांचें देखिलें जीवन ॥ कां भास्करासी करितां नमन ॥ सकळ किरण देखिले ॥९८॥
अश्वत्थासी प्रदक्षिणा करितां देखा ॥ तरी त्यांतच आल्या सकळ शाखा ॥ तेवीं निजभक्त वैकुंठनायका ॥ द्वैत सर्वथा नसे कीं ॥९९॥
गोडी आणि साखर जैसी ॥ निवडितां नये चतुरासी ॥ तेवीं निजभक्त आणि भीमातीरवासी ॥ एकचि मानसीं जाणिजे ॥२००॥
या दोहींचे कृपेंकरून ॥ भक्तविजय जाहला निर्माण ॥ श्रोतयांचें मनोरथ पूर्ण ॥ श्रवणमात्रें होतील कीं ॥१॥
जें भक्तचरित्रें अखंड गात ॥ तयासी ज्ञान होईल अद्भुत ॥ कृपा करूनि पंढरीनाथ ॥ भेटेल निश्चित त्यालागीं ॥२॥
ग्रंथसंग्रह करितां घरीं ॥ तरी विघ्नें न येतीं त्याचें मंदिरीं ॥ भोंवतें सुदर्शन घिरटी करी ॥ निश्चय अंतरीं असों द्या ॥३॥
या ग्रंथामाजी हेंचि कथन ॥ कीं भक्तांसी पावला जगज्जीवन ॥ म्हणोनि श्रोतयांवक्तयाकारण ॥ रुक्मिणीरमण रक्षिता ॥४॥
कलियुगींचीं चरित्रें ऐकोनी ॥ सामान्य न म्हणावीं विचक्षणीं ॥ कृतत्रेतद्वापारालागुनी ॥ थोरथोर मुनी गातील ॥५॥
कलीचा प्रारंभ होतांचि त्वरित ॥ सुरवर आनंदले बहुत ॥ कीं औटघटिका करितां एकाग्र चित्त ॥ वैकुंठनाथ भेटेल कीं ॥६॥
तंव नारदमुनीनें कौतुक केलें ॥ जिव्हा शिश्न हातीं धरिलें ॥ सकळ देवांसी आश्चर्य वाटलें ॥ मग पुसते जाहले तयासी ॥७॥
यावरी बोले ब्रह्मसुत ॥ हे दोन्ही नावरती कलियुगांत ॥ सुरवरीं ऐकतां हे मात ॥ चिंताक्रांत झाले मानसीं ॥८॥
मग नारद सांगे तयांप्रती ॥ कलियुगीं वैष्णव भक्त जे होती ॥ त्यांचीं चरित्रें जे ऐकती ॥ त्यांसी वैकुंठपती भेटेल ॥९॥
ऐसें बोलतां ब्रह्मनंदन ॥ विबुध आनंदले संपूर्ण ॥ म्हणती हें स्वल्प साधन ॥ आम्हांकारण मानलें ॥२१०॥
म्हणोनि महर्षि आणि इंद्रादिकांसी ॥ भक्तचरित्रें पावन तयांसी ॥ विचक्षणीं वचनें ऐकूनि ऐसीं ॥ विकल्प मानसीं न धरावा ॥११॥
जैसी आज्ञा केली रुक्मिणीवरें ॥ तितुकींचि ग्रंथीं लिहिलीं अक्षरें ॥ वाजविणार फुंकितो वारें ॥ तैसींचि वाजंत्र वाजती ॥१२॥
क्षेत्रांत बीज पेरिलें जाण ॥ अंकुर येणें जीवनाधीन ॥ कीं जळमंडपियाचें नाचणें जाण ॥ कळसूत्राधीन असे कीं ॥१३॥
तेवीं भक्तविजयग्रंथीं ॥ बुद्धीचा दाता श्रीरुक्मिणीपती ॥ तेणें उजळोनियां माझी मती ॥ ग्रंथ निजयुक्तीं लिहविला ॥१४॥
शके सोळाशें चवर्यायशीं ॥ चित्रभानुनाम संवत्सरासी ॥ वैशाखवद्यद्वादशीसी ॥ ग्रंथ सिद्धीसी पावविला ॥१५॥
प्रवरेपासूनि दक्षिणेस ॥ ताहाराबाद गांव पांच कोस ॥ भक्तविजय अति सुरस ॥ झाले असे ते ठायीं ॥१६॥
शेवटील विनवणी आतां ॥ माझी ऐकें गा पंढरीनाथा ॥ तूंचि श्रोता आणि वक्ता ॥ ग्रंथरक्षिता निजकृपें ॥१७॥
तूं अखिल अविनाश जगद्गुरु ॥ मायातीत सर्वेश्वरु ॥ निराधारियांसी आधारु ॥ करिसी भवपारु दासांसी ॥१८॥
भक्तांनीं जैसी घेतली आळ ॥ ती तूं पुरविसी तत्काळ ॥ त्यांचें प्रेम देखोनि निर्मळ ॥ हृदयकमळीं वसविले ॥१९॥
कोणासी दिधलें आत्मज्ञान ॥ कोणीं मागितलें सायुज्यसदन ॥ माझें हेंचि इच्छीतसें मन ॥ जे गुण वर्णीन हरीचे ॥२२०॥
कोणी बैसले वज्रासनीं ॥ कोणी बैसले वैकुंठभुवनीं ॥ मी निजदासांचे कीर्तनीं ॥ झालों रत सप्रेम ॥२१॥
अवीट आवडी धरूनि चित्तीं ॥ तुझिया दासांची वर्णिली स्तुती ॥ हेंचि उचित महीपती ॥ मागे निजप्रीती निरंतर ॥२२॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ सप्तपंचाशत्तमाध्याय रसाळ हा ॥२२३॥
श्रीरुक्मिणीपांडुरंगार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ इति भक्तविजयग्रंथः समाप्तः ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.