१७
व्रजात कोणे एक वेळेशी । आले गर्गाचार्य ऋषी । त्यासी दाखवितां कृष्नासी । चिन्हें बोलतां झाला ॥१॥
यशोदेबाई ऐक पुत्राची । लक्षणे ॥धृ ॥
मध्ये मुख्य यशोदा बाळा । सन्मुख रोहिणी वेल्हाळा । भोवंता गोपिकांचा पाळा । त्या गोपाळा दाखविती ॥२॥
करील दह्मा दुधाची चोरी । भोगिल गौळियांच्या पोरी । सकळ सिंदळांत चौधरी । निवडेल निलाजरा ॥३॥
चोरुनी नेईल त्यांची लुगडीं । त्यांचे संगे घेईल फुगडी । मेळवुनी गोवळ गडी । सुगडी फोडी शिंकींची ॥४॥
पांडव राजियाचे वेळीं । काढील उष्टया पात्रावळी । ढोरें तुमच्या घरची वेळीं । निवडेल निलाजरा ॥५॥
यावरी कलवंडतील झाडें । लत्ता खळाळ हाणील घोडे । महा हत्ती धरील सोंडे । परी ती विघ्रे मावळतीं ॥६॥
यावरी गाडा एक पडावा । अथवा डोहामाजीं बुडावा । वावटुळीनें उडुनी जावा । सांपडावा वैरियाला ॥७॥
कारण सच्चिदानंदाचें । बीज नोहे हें नंदाचें । जन्मांतर गोविंदाचें । नव्हें कथिल्य मथिल्यांचे ॥८॥
हृदयीं श्रीवत्सलांछन । ब्राह्मणलत्तेचें भूषण । हा होईल ब्राह्मणा जन । एका जनार्दनीं घरींचा ॥९॥