७८

एके दिनीं प्रातः काळीं । कृष्णें घेतलीसे आळी । देखोनियां उदय मेळीं । सुर्यबिंब ॥१॥

देई देई मज तें आई । रडत बैसला हो बाई । काय सांगो हो सई । या बाळातें ॥२॥

मांडिलें विंदान । न कळे कोना महिमान । रडतां राहिना पुर्ण । तों देखे राधिका ॥३॥

राधा म्हणे कृष्णांसी । का रे चोरा रडतोसी । येरु म्हणे गोळा दे मजसी । मग मी न रडे ॥४॥

उचलोनी काखेसी घेतला । तंव तो रडतां राहिला । यशोदा म्हणे राधिकेला । नेई घरा कृष्णतें ॥५॥

घेऊनियां झडकरीं । घरी आली सत्वरीं । सुमनांचे सेजेवरी । पहुडविलें कृष्णा ॥६॥

घरी देखोनी एकांत । चुबन देउनि बोले माते । अससी धाकुटी बहुत । नचले कांहीं ॥७॥

तंव बोले वनमाळी । थोर होतो हेचि वेळी । डोळें झांकीं तूं वेल्हांळीं दावी विंदान ॥८॥

नेत्र झाकितां तें क्षणीं । जाहला निमासुर तरुणी । षोडश वर्षी मोक्षदानी । देखे राधिका ॥९॥

धांउनी घातालीसे मिठी । हरुष न समाये पोटीं । शयन सुखें गोष्टीं । करी कृष्णांसी ॥१०॥

असतां सुखें एकांतासी । भ्रतार आला ते समयासी । उभा राहुनि द्वारासी । हांक मारी ॥११॥

ऐकतां भ्रतारांचें वचन । घाबरलें राधिकेचें मन । धरी कृष्नाचे चरण । सान होई ॥१२॥

कृष्ण बोले हास्यमुखे । मंत्र विसरलों या सुखें । आतां होणार तें सुखें । होवो यावरी ॥१३॥

भक्तांचे मानसींचा चोर । पाहूनियां तो विचार । पुर्ववत साचार होऊनि रडे ॥१४॥

दहीं भात कालवुनी । ठेविला पुढें आणुनी । बोले आनयासी प्रती वचनीं । क्षणभरी बैसा ॥१५॥

जेवितसे कृष्णनाथ । क्षणभरी बैसा स्वस्थ । ऐकतांचि ऐशीअ मात । निवांत बैसे ॥१६॥

मग द्वार उघडिविलें । राया कृष्णातें देखिलें । मन तें मोहिलें । अनायांचें ॥१७॥

आनया बोले राधिकेसी । गृहीं नगमें तुजसी । क्षणभरी कृष्णासी । आणीत जाई ॥१८॥

तुमची आज्ञा प्रणाम । म्हणोनि वंदिले चरण । एका जनार्दनी समाधान । पावले दोघे ॥१९॥

७९

एके दिवशी शारंगपाणी । खेळत असतां राजभुवनीं । तेव्हा देखिली नयनीं । गौळणी ते राधिका ॥१॥

मीस करुनी पाणीयाचें । राधा आली तेथें साचें । मुख पहावया कृष्णाचे । आवड मोठी ॥२॥

देव उचलोनि घेतला । चुंबन देउनि आलंगिला । सुख संतोष जाहला । राधेलागीं ॥३॥

यशोदा म्हणे राधिकेसी । क्षणभरी नेई गे कृष्णासी । कडे घेउनी वेगेंशीं आणिला घरा ॥४॥

हृदयमंचकीं बैसविला । एकांत समय देखिला । हळूच म्हणे कृष्णाला । लहान असशी ॥५॥

कृष्णा म्हणे राधिकेसी । मंत्र आहे मजपाशी । थोर होतो निश्चयेंसी । पाहें पा आतां ॥६॥

वैकुंठाचा मन मोहन । सर्व जगांचे जीवन । एका जनार्दनीं विंदान । लाघव दावीं ॥७॥

८०

हर्षा नमाये अंबरीं । येऊनियां झडकरी । द्वारा उघडी निर्भरी । आनंदमय ॥१॥

वृद्धा येऊनियां पाहें । उचलोनि लवलाहे । मुख चुंबिलें तें पाहें । कृष्णाचे देखा ॥२॥

मोहिलें वृद्धेचें मन । नाठवे आपपर जाण । लाघवी तो नारायण । करुनियां आकर्ता ॥३॥

दोहीं करें उचलिला । राधिकेजवळीं तो दिला । म्हणे राधेसी ते वेळां । यांसी नित्य आणी ॥४॥

तुज न गमे एकटी । आणीत जाई जगजेठी । एका जनार्दनाचे भेटी । रे कांहीं विकल्प ॥५॥

८१

निमासुर वदन । शंखचक्राकित भूषण । शोभवते राजीवनयन । राधेजवळी ॥१॥

नवल मांडिलें विंदान । वेदां न कळे महिमान । वेडावली दरुशने । न कळे तयां ॥२॥

रत्‍नजडित पर्यंकीं । पहुडले हर्ष सुखीं । नवल जाहलें तें ऐकीं । सासू आली घरां ॥३॥

वृद्धा म्हणे राधेशीं । दार उघड वेगेंशी । गुह्मा गोष्टी बोलसी । कवणाशीं आंत ॥४॥

राधा म्हणे मामिसे । गृहामध्यें कृष्ण असे । मज गमावया सरिसें । आणिला घरीं ॥५॥

क्षणभरी स्थिर रहा । भरले पायें आत न या । भोजन जाहलीया । उघडितें द्वार ॥६॥

म्हणे कृष्णा आतां कैसें । दारीं वृद्धा बैसलीसे । लज्जा जात अनायासें उभयतांची ॥७॥

कृष्ण म्हणे राधेसी । मंत्र नाठवे मजसी । काय उपाय गोष्टिसी । सांगे तूं मज ॥८॥

नेणो कैशी पडली भुली । मंत्र चळला या वेळीं ऐकोनि राधा घाबरली । दीनवदन ॥९॥

करुणा वचनें बोले राधा । विनोद नोहे हा गोविंदा । माझी होईल आपदा । जगमाजीं ॥१०॥

भक्तवत्सल मनमोहन । शरण एका जनार्दन । ऐकोनि राधेचें वचन । सान जाहला ॥११॥

८२

थुरकात थुरकत चालतु । राधिकेचे गळां मिठी घालितु ।

तयेसी चुंबन आवडी देतु । पाहतां यशोदेसी मग रडतु ॥१॥

देई देई म्हणे चेंडूवातें । म्हणोनि आसडी निरीतें ।

यशोदा म्हाणे राधे परते । कां गे रडविसी कृष्णा ॥२॥

राधिका म्हणे ऐका मामिसें । याचा चेंडु मजपाशी नसे ।

हा क्रियानष्ट बोले भलतैसें । चेंडू मजपाशी नाही आणि तुमची असे ॥३॥

कृष्ण म्हणे झाडुनी चीर दावी । राधा झाडिता चेंडू पडिला लवलाहीं ।

म्हणे पाहे वो माझे आई । चेंडू घेउनी आण वाहेती पाहीं ॥४॥

यशोदेनें उचलोनि घेतिला कडेवरी । चेंडू झेलितसे सव्य अपसव्य करीं ।

एका जनार्दनीं भाव न कळे निर्धारीं । लाजोनी ती राधा आली आपुले घरीं ॥५॥

८३

मथुरेसी गोरस विकूं जातां नितंबिनी । तयामाजीं देखिली राधिका गौळणी । जवळी जाऊनियां धरिली तिची वेणी ॥१॥

सोडी सोडी कान्हा शारंगपाणी । माझीया संसारा घातलें पाणी । नांव रुप माझें बुडविलें जनीं ॥२॥

राधा म्हणे येथोनियां बहु चावट होसी । घरीं चोरी करुनियां वाटे आडविसी । ओढोनिया नेते आतां तुज मातेपाशीं ॥३॥

धरिलीं पदरीं राधा न सोडिच निरी । दान दे आमुचे म्हणे मुरारी । भोवंताली हांसती व्रज सुंदरी ॥४॥

भक्तीचियां पोटीं राधा समरस जाली । कृष्णरुप पाहूनियां देहभावा विसरली । एका जनार्दनीं राधा शेजे पहुडली ॥५॥

८४

फणस जंबीर कर्दळी दाटा । हातीं घेऊनि नांरगी फाटा ॥१॥

वारियाने कुंडलें हाले । डोळे मोडित राधा चाले ॥२॥

राधा पाहून भुललें हरी । बैल दुभें नंदाघरी ॥३॥

हरी पाहूनि भुलली चित्ता । राहा घुसळी पडेरा रिता ॥४॥

मन मिनलेंसें मना । एका भुलला जनार्दना ॥५॥

८५

आल्या पांच गौळणी पांच रंगाचे शृंगार करुनी ॥धृं॥

पहिली गौळण रंग सफेत । जशी चंद्राची ज्योत । गगनी चांदणी लखलखीत ।

एका चिती मात । मंथन करीत होती दारीत । धरुन कृष्णांचा हात । ऐशा आल्या पांच गौळणी ॥१॥

दुसरी गौळण भाळीभोळी । रंग हळदीहुनि पिवळी । पिवळा पितांबर नेसुन आली ।

अंगीं बुट्टे दार चोळी । एक लहान तनु उमर कवळी । जशी चांफ्यांची कळी । ऐशा आल्या पांच गौलणी ॥२॥

तिसरी गौळण रंग काळा । नेसुन चंद्रकाळा । काळे काजल लेऊन डोळां ।

रंग तिचासांवळा । काळीं गरसोळी लेऊन गळां । आली राजस बाळा । ऐशा आल्या पांच गौळनी ॥३॥

चवथी गौळण रंग लाल । लाल लालही लाल । कपाळी कुंकुम चिरी लाल ।

भांगी भरुन गुलाल । मुखी विडा रंग लाल । जैसे डांळिबीचे फुल । ऐशा आल्या पांच गौळणी ॥४॥

पांचवीं गौळण हिरवा रंग । अवघ्या झाल्या दंग । हिरव्या कांकणांचा पहा रंग ।

जसें आरशींत जडलें भिंग । फुगडी खेळतां कृष्णसंग । एकनाथ अभंग । ऐशा आला पांच गौळणी ॥५॥

८६

देखे देखे ग जशोदा मायछे । तोरे छोरींयानें मुजें गारी देवछे ॥१॥

जमूनाके पानीयां मैं ज्यावछे । बीच मीलके घागरीया फोडछे ॥२॥

मैंने ज्याके हात पकरछे । देखे आपही रोवछे मायना ॥३॥

एका जनार्दन गुन गावछे । फेर जन्म नहीं आवछे मायना ॥४॥

८७

देवरे देवरे मोरी घागरीया लालसे । मैं बोलुंगी जशोदा मायछें ॥१॥

हाम रहीन दसे नामछे । तारी भीद नहीं मारो कामछे ॥२॥

आकर पकरीयो मोरे आंगछे । मैं लाजे न आइगे मा अवछो ॥३॥

एका जनार्दनी तोरे पुत्रनें हामछे । फजितीन मानली आइछे ॥४॥

८८

मैं ज्यावगी छोरकर तोरे गांवाछे । तूं खोरी मतकर मोरे लालछे ॥१॥

मोरे घर तूं आकर लालछे । माखन चुरावत आपणे हातछे ॥२॥

मैं कहँगी तोरे मातछे । किसननें चोरी करी मोरी घरछे ॥ ३॥

कहे एका जनार्दनी लालछे । चरण पकरु मो तुमछे ॥४॥

८९

माई मोरे घर आयो शामछे । गावढी छोरी मारे मनछे ॥१॥

दधीं दूध माखन चुरावें हमछे । छोकारीया खिलावन देवछे ॥२॥

मारी सुसोवन लगीछे । बालन उनके पकड लीनछे ॥३॥

एका जनार्दन थारो छोडछे । वेड लगाये माई हामछे ॥४॥

९०

हामे आपले सोवते घरछे । रात आयो थारोशामछे ॥१॥

मारी वेणी पकड करी हतछे । दाढी बांधी गाठछे ॥२॥

मोरी घागरीया फोर करछे । भागन गया गाप घरछें ॥३॥

एका जनार्दनीं तोरे शामनेछे । मोरो संसारको नासछे ॥४॥

९१

दे दे दे मोरी कन्हया साडीछे । तुम भलो नंदजी नंदन लालसे ॥१॥

मैतो आई मथुरा हाटछे । बिगरी तु क्या धरे घाटछे कन्हया ॥२॥

ज्याकर बोलुंगी जशोदा नंदछे । तरी खोड तांडुगी हातछे कन्हया ॥३॥

एक जनार्दन बिनती करतछे । दोनो हात जोडकरछे कन्हया ॥४॥

९२

मैं दधी बेचन मथुरा । तुम केवं थारे नंदजीको छोरा ॥१॥

भक्ति का आचला पकडा हरी । मत खेचो मोरी फारी चुनरीं ॥२॥

अहंकारको मोरा गरगा फोरा । व्हाको गोरस सबही गिरा ॥३॥

द्वैतनकी मोरी आंगेया फारी । क्या कहुं मैं नंगी नार उधारी ॥४॥

एका जनार्दनी ज्यासो भेटा । लागत पगसे कबु नहीं छुटा ॥५॥

९३

मारी गावढी चुकलीसे भाई । देखन देखन त्रिभुवनसे आई । उन शोधन लागछे भाई । अब कैसी गत करुछे आई ॥१॥

मथुरा लमानीना मारो नामछे । गावढी देखत आई गांवछे । दृष्टी देखन नहीं मानछे । कैसें भुलाय कन्हयानछे ॥२॥

भूली भूली जाई मानछे । कहीं मिलन मोरे ध्यानछे । एका जनार्दन से पगछे । अखंड चित्त जडो गावढीछे ॥३॥

९४

भूली भटकी आई कान्हा तोरे गांवछे । मारो नंदनंदन चित्त जडे तोरे पावछे लालना ॥१॥

चली आई परपंच हाटसे । तुं केव धरियों मेरे वाटछे ॥२॥

आब तूं नंदनंदन लालछे । मैं गारी देऊं तुजसे लालना ॥३॥

एका जनार्दन नाम तोरे गावछे । पीरीत वसे तारे चरणछे लालना ॥४॥

९५

हो भलो तुम नंदन लालछे । मुजे गांवढी बतावछे ॥१॥

आगल पिछिल ध्यानमें आवछे । मंगल नाम तोरा मे गावछे ॥२॥

तरो सुंदर रुप मोरे मनछे । प्रीत लगी कान्हा हमछे ॥३॥

एक जनार्दनीं तोरे नामछे । गावत ध्यावत हृदयमेछे ॥४॥

९६

याहांकी बात नहीं मेरी आवछे । तोरे चरण कमल मैं द्यावछे ॥१॥

सुंदरतुन नंदनंदन लालछे । गळां शोभे वैजंयती मालछे ॥२॥

पीत पीतांबर घोंगरीयाछे । गोपाल नाचती तोरे सातछे ॥३॥

एका जनार्दनी रखत गावढीछे । चित्त जडे मोरे पावडीछे ॥४॥

९७

गोकुळीं गोमाई गवळणी । तिच्या सुना चवघी जणीं । यमुने गेल्या एके दिनीं । त्यांनी कृष्ण पहिला ॥१॥

कृष्णा पाहतां मधुसूदन । मोहिलें चवघीचें मन । कृष्ण कृष्ण लागलें ध्यान । देहभान विसरल्या ॥२॥

सर्वें एके होती शेजारीण । आली सदनासी धांवुन । गोमाईसी वर्तमान । अवघे विदित केलें ॥३॥

राखी लपवी आपुल्या सुना । सुनेचें नख दृष्टी पडुं देइना । जर कां येशील माझे सदना नासिका चुना तीन बोटें ॥४॥
कृष्ण काय म्हणे तिसीं । येणें जाणें नाहीं आम्हांसी । जें कां वदली रमनेसे । तिची प्राप्ती तुजलागीं ॥५॥

देव ब्राह्मणीचा वेष । धरिता जाला जगन्निवासा । हा रस ऐकतां सायास । मुढ जन उद्धरती ॥६॥

पांढर्‍या पातलाची कासोटी । जीर्ण चीर वेष्टिलें कंठीं । हाता घेउनी धाकुटी । काठी धरुनी चालिली ॥७॥

वार्‍यासारखी चाचरी जाये । तोल सांभाळुनी उभी राहे । अवसान धरुनिया पाहें । गोमाइनें देखिली ॥८॥

गोमाई म्हणे अहो ब्राह्मणि । कोठें जातेस आसीस कोठुनी । आशापाश नाहीं कोणी । माझी मीच ऐकली ॥९॥

करुनी आले वाराणाशी । पुढें जाणें रामेश्वरासी । आणिक जाणे बहु तीर्थासे । ऐसी गोमाईसी बोलली ॥१०॥

येवढ्या नगरामध्ये कोणी । दयाळु नाहीं तुजावांचुनी । जागा देई वृंदावनीं । रातचे रात करमीन ॥११॥

अस्ता गेला वासरमणी । सुखें राहें वृदावनी । आज्ञा केली इंद्रालागुनी । सत्वर मेघा पाठवी ॥१२॥

वीज लावली मेघमंडळी । ढग निवाला तेच काळीं । मेघानें सोडिल्या फळीं । जनलोकक पाहतसे ॥१३॥

मेघानें सोडिल्या धारा । थंड गार सुटला वारा । शामाई कांपतसे थरथरां ॥ गोमाइने देखिली ॥१४॥

गोमाई म्हणे अहो साजणी । आंत येई वो ब्राह्मणी । मरुनी जाशील वृंदावनीं । प्रायश्चित्त मजवरी येईल ॥१५॥

मरूनि जाईल वृंदावनीं । परी मी येईना कोणाचे सदनीं । देव राखीव मजलागुनी । ऐशी शामाई बोलली ॥१६॥

इतुका मेघ वर्षला थोर । भिजलें नाहीं तुझे वस्त्र । शामाई म्हणे आम्हांवर । इश्वराची बहु कृपा ॥१७॥

तुम्ही शुद्ध गे ब्राह्मणी । देव तुम्हीं केला ऋणी । आम्ही नरदेहासी येऊनी । प्रपंचसदनीं बुडालों ॥१८॥

दारावाटे बोलावुन । नेत्रीं पाहे अवलोकुन । चक्रपाणी ओळखुन ।चरणीं ठाव मज देई ॥१९॥

आतां उठावेना करुं काई । हाती धरुनि उठवी गोमाई । कवाड उघडोनि लावलाही । बळे सदना लोटलीं ॥२०॥

बळें सदनीं लोटलें मला । मजवर बलात्कार केला । मी सांगेन नंदजीला । म्हणोनी गलबला करितसे ॥२१॥

सदनी जातां तत्क्षाणी । चवघी उद्धरल्या कामिनी । दारापाशी येऊनी । हाकां मारी गोमाई ॥२२॥

गोमाई येऊनी लागे चरणां । पुनीत केल्या आमुच्या सुना । नासिका लावियेला चुना । पाहुन पळे गोविंद ॥२३॥

गोमाई उद्धरली कथा । आपण होऊनि श्रोता वक्ता । एका जनार्दनी दाता । सत्य वार्ता ही माझी ॥२४॥

९८

दही दुध चोरुनी दे सर्वांना । ऐसें मज सांगताती । आई मज मारुं नको । नाहीं नाहीं म्या पाहिली माती ॥१॥

तें न ऐकिलें म्हणोनि मजवर । रुसले सांगाती । बळीरामही जो भेटला । तोही माझा पक्षपाती ॥२॥

एका जनार्दनीं पूर्ण कृपेनें । आम्हीं भजूं दीनराती ॥३॥

९९

बाळ रांगणें रांगतु । दुडदुडां पुढें पळतु ।धरितां तो न कळें मातु । वेदशास्त्रीं जया ॥१॥

तो बाळरुपें नंदाघरीं । खेळ खेळे नानापरी । न कळे लाघव निर्धारी । इंद्रादिकां गे माय ॥२॥

लोणी चोरावया घरोघरीं जाय । दहीं दूध तूप लोणी आपण खाय ।

त्यांचे सुनेचे मुखा हात पुशी वो माय । ऐसे करुनियां पळोनी जाय ॥३॥

वासुरें सोडी घरीं जाऊन । मुलांसि उठवी चिमटुन ।

माथणी रांजणा करी चुर्ण । ऐसे विंदान करुनी पळे ॥४॥

शेजे असता उभयतं । जाय सोवळ्यातुन तत्त्वतां ।

दाढी वेणी बांधी सर्वथा । जाय परता पळोनी ॥५॥

ऐशा खोडी करी नानापरी । नटनाटक वैकुंठ जिव्हारी ।

एक जनार्दनीं नवल परी आगमां निगमां न कळे परोपरी ॥६॥

१००

दिसे सगुण परि निर्गुण । आगमां निगमां न कळे महिमान ।

परा पश्यंती खुटलीया जाण । त्यांचे न कळे शिवाजी महिमान ॥१॥

पहा हो सांवळा नंदाघरीं । नवनीताची करीतसे चोरी ।

गौळणी गार्‍हाणी सांगती नानापरी ॥ त्यांचे महिमान न कळे श्रमले सहाचारी ॥२॥

कोणी म्हणती यासी शिक लावूं । कोणी म्हणती आला बाऊ ।

दाखवी लाघव नवलाऊ । अगम्य खेळ ज्याचा कवणा न कळे कांहीं ॥३॥

चोरी करितां बांधितीं उखळी दावें । येतो काकुळती माते मज सोडावं ।

एका जनार्दनी दावीं सोंग बरवें । ज्यांची कीर्ति ऐकतां अघ नासे सर्वे ॥४॥

१०१

आवरीं आवरीं आपुला हरी ।दुर्बळ्यांची केली चोरी । घरा जावयाची उरी । कृष्णें ठेविली नाहीं ॥१॥

गौळणी उतावेळी । आली यशोदेजवळी ।अवरीं आपुला वनमाळी । प्रळय आम्हां दिधला ॥२॥

कवाड भ्रांतीचें उघडिलें कुलुप मायेचे मोडिलें । शिंके अविद्येचें तोडिलें । बाई तुझिया कृष्णें ॥३॥

होती क्रोधांची अर्गळा । हळूचि काढिलोसे बळां । होती अज्ञानाची खिळा । तीहि निर्मूळ केली ॥४॥

डेरा फोडिला दंभाचा ।त्रिगुण तिवईस ठाव कैसा । प्रंपंच सडा हा ताकाचा । केला तुझिया कृष्णें ॥५॥

अहंकार होता ठोंबा । उपडिला धुसळखांबा । तोहि टाकिला स्वयंभा । बाई तुझिया कृष्णें ॥६॥

संचित हें शिळें लोणी । याचि केली धूळीधाणीं । संकल्प विकल्प दुधाणीं । तीहीं फोडिली कृष्णें ॥७॥

प्रारब्ध हें शिळें दहीं । माझें खादलें गे बाई । क्रियमाण दुध साई । तींही मुखीं वोतिली ॥८॥

द्वेष रांजण सगळे । स्पर्शे होती हात काळे । होतें कामाचें तें पाळें । तेंहि फोडिलें कृष्णें ॥९॥

सुचित दुश्चित घृत घागरी । लोभें भरल्या अहोत्या घरीं । त्याही टाकिलय बाहेरी । तुझिया कृष्णें ॥१०॥

कल्पनेची उतरंडी । याची केली फोडाफॊडी । होती आयुष्याची दुरडी । तेंही मोडिली कृष्णें ॥११॥

पोर रे अचपळ आमुची । संगती धरली या कृष्णाची । मिळणी मिळाली तयांची । संसाराची शुद्धी नाहीं ॥१२॥

ऐशी वार्ता श्रवनीं पडे । मग मी धांवोनि आलें पुढे । होतें द्वैताचें लुगडें । तेंही फिटोनि गेलें ॥१३॥

आपाअपणा विसरणें । कृष्णस्वरुपीं मिळालें । एका जनार्दनीं केलें । बाई नवल चोज ॥१४॥

१०२

ब्रह्मादिक वेडे जयासाठीं होती । तो गोकुळी श्रीपती लोणी चोरी ॥१॥

कवाड ते जैसें आहे तैशापरी । येतो जातो हरी न कळेचे ॥२॥

पाळती पाहतां ब्रह्मांड सकळ । तयाचा प्रतिकाळ करीतसे ॥३॥

एका जनार्दनीं चोरीचें तेंमीस । हरित सारांश नवनीत ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel