१९३

भ्रम धरुनियां वायां कासया खेळसी भोवरां । यम मारी कुच्चा फिरशील चौर्‍याशीं घरां ॥१॥

पुढे शुद्धी करीं वाचें स्मरे हरी । वायां भ्रमें फिरशी गरगरां पडसी मायाफेरी ॥२॥

एका वारी एक मारिताती घाय । दया नाही येत कोणाखाली न ठेविती पाय ॥३॥

एका शरण जनार्दनीं तरीच चुके फेरा । नाहींतरी फिरशी गरगरां ॥४॥

मेळवीं संवगंडे खेळतसे बिन्दी । शोभतसे मांदी गोपाळांची ॥१॥

सांवळा सुंदरा वैजयंती हार । चिन्मय परिकर पीतांबर ॥२॥

मुगुट कुंडलें चंदनाचा टिळा । झळके हृदयस्थळां कौस्तुभमणी ॥३॥

एका जनार्दनीं वेधलेसे मन । नाहीं भेद भिन्न गौळनींसी ॥४॥

१९४

खेळें भोवरां गेबाई भोंवरां । राधिकेचा नवरा ॥धृ॥

माझ्या भोंवर्‍यांची अरी । सप्त पाताळें त्यावरी । फिरे गरगरां । राधिकेचा नवरा ॥ खेळे॥१॥

भोवरां बनला र्निगुणीं । त्यावर चंद्र सुर्य दोनी । जाळीं शंकर गवरा । राधिकेचा नवरा ॥ खेळे०॥२॥

एका जनार्दनीं खेळिया । भोवरां खेळुन पाहे चेलिया । नाद देतो हरिहरा । राधिअकेचा नवरा ॥ खेळे॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel