२१३

हमामा भाई हुंबरी । खेळों भाई हमामा हुंबरी ॥१॥

राम रावण हमामा घालितीं । हनुमान बेळें खेळीया निज ज्योंती ॥२॥

अर्जुन भीष्म हमामा खेळती । कृष्णे सुदर्शन धरिलें हातीं ॥३॥

एका जनार्दनीं हमामा जाहला ।अवघा खेळ ग्रासोनि ठेला ॥४॥

२१४

हमामा हुंबरी घालुं नका एक भावें । जेथे वसे कान्होबा तें घर आम्हां ठावें ॥१॥

हमामा घालुं आवडीं । कान्होंबा तुं आमुचा गडी ॥२॥

हमामा घालुं सोई । आमुचा कान्होबा भाई ॥३॥

हमामा घालुं रानीं । एका जनार्दनाचे चरणीं ॥४॥

२१५

हमामा भाई हुंबली । गोपाळ वासुरें कान्होबा जाला ना ब्रह्मामाया बोंबली रे ॥१॥

हमामा भाई बार कोंडे । वासुरें लेकुंरें कान्होबा जाला ठकविलें ब्राह्मण चहुं तोडें ॥२॥

हमामा भाई बारकोंडा । कंआचा केशीया कान्होबा मरिला हांसता आला होऊनियां घोडा रे ॥३॥

हमामा भाई खोल पाणी । यमुनेमाझारी कान्होबा पोहतां कुटिला काळिया फणी रे ॥४॥

हमामा भाई तोंड वासी । शिंक्याचें लोटकें कान्होबा भेदिलें लागली धार गोड कशी रे ॥५॥

हमामा भाई तोंड वासी ॥ औटचि मात्रा कान्होबा भेदिली लागली गोड कैसी रे ॥६॥

हमामा भाई चाट बोटे । चोरीचें दुध गोड मोठें ॥७॥

हमामा भाई गटगोळे । स्वर्गीच्या देवां लाळ गळे ॥८॥

हमामा भाई गट गोळी । जेविती खेळीमेळीं ॥९॥

हमाम भाई मिठी मिठी । आजचें भोजन गोड सुटी ॥१०॥

एका जनार्दनीं तृप्त झाला । ब्रह्मादेव लाळ घोटी ॥११॥

२१६

न लगो विषय गोपांच्या पाठीं । न संडु स्वत्मा घोंगडें काठी । विषयभोगें होईल तुटी । कृष्ण जगजेठी अंतरे ॥१॥

म्हणवोनि हुंबली बोधाची । कृष्णेची आमुची ॥धृ॥

न टाकूं प्रेम शिदोरी कुरुधनें । नेघों सायुज्य पळसपानें । विषय ताटीचें मिष्टान्न । तेणें जनार्दन न भेटें ॥२॥

ब्रह्मा सेवुं करुनी ठोमा । एका जनार्दनीं गोविलें कामा । अष्ट भोग भुलवी रमा । तोही आम्हां श्रीकृष्ण ॥३॥

२१७

राम रावण हुंबली खेळती । खेळीया हनुमान तीरे ॥१॥

खेळ माडिला खेळ मांडिला कान्होबाचे बळें खेळ मांडिला ॥धृ॥

राम कृष्णा हुंबली खेळती । खेळ्या अर्जुन झाला रे ॥२॥

अठरा अक्षौहिणी कौरव मारिले । शिशुपाळसह वक्रदंत वधिले रे ॥३॥

एका जनार्दनीं खेळतां खेळतां हुंबली आनंद बहु जाला ॥४॥

खेळ खेळतां अवघे निमाले मीतुपणा ठाव नाहीं उरला ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel