२६६

उद्धवासे एकांतीं बोले गुज सांवळा । गोकुळासी जाऊनी बोधीं सुंदरीं गोपीबाळा ।

रथीं बैसोनी निघाला वेगीं पावला गोकुळां । तो उद्धव देखोनी दृष्टी गोपींन वेढींला ॥१॥

उद्धवा जाय मथुरेला । आणी लौकरे हरीला ॥धृ॥

मुखसुंदर शोभे कपाळीं टिळक रेखिला । नवरत्नजडित मुद्रिका हार कंठी घातिला ।

झळकती कुंडलें कानीं शिरीं मुगुट शोभला । मुरली धरुनी अधरीं नाचे यमुना तीरीं देखिला ॥२॥

मथुरेसी राहिला हरी विसरोनी आम्हांसी । कुब्जेनें मोहिला भाळल्या तिच्या रुपासी ।

डोळे पिचके खुरडच जे चाले काय वानुं मुखासी । शुद्ध भाव देखोनी तिच्या अनुसरला तियेसा ॥३॥

रासमंडली नाचे मुरारी कधीं भेटेल न कळे । वेणु वाजवी सुस्वर सोज्वळ पदकमळें ।

धणी न पुरे तया पाहातां मन आमुचें वेधिलें ॥४॥

हा अक्रुर कोठोन आला हरी गेला घेउनी । तोवियोग जाळी न जाय जीव आमुचा अझुनी ।

घरदार सोडोनी जावें गोकुळ हें सांडोनी । उद्धवा कधीं भेटविसी हरीला आणुनी ॥५॥

घडी घडी घरां येतो चोरिती श्रीहरी । तो झडकरी दाखवीं उद्धवा लौकरी ।

धन्य प्रेम तयांचें सदगदित अंतरीं । एका जनार्दनीं हरिरुपीं । वेधल्या नारी ॥६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel