३१८

द्वारकेचा सोहळा । परणियत्नी भीमकबाळा ॥१॥

सोळा सहस्त्र युवती । अष्टनायका असती ॥२॥

पुर पौत्र अपार । भगवती तो विस्तार ॥३॥

करुनिया राधामीस । देव येती पंढरीस ॥४॥

रुक्मिनी रुसली । ती दिंडिर वनां आली ॥५॥

तया मागें मोक्षदानीं । येतां जाला दिंडीर वनीं ॥६॥

गाई गोपाळांचा मेळ । गोपाळपुरी तो ठिविला ॥७॥

आपण गोपवेष धरी । एका जनार्दनीं श्रीहरीं ॥८॥

३१९

जेथें वाजविला वेणु शुद्ध । म्हणोनि म्हणती वेणुनाद ॥१॥

सकळीक देव आले । ते भोंवती राहिले ॥२॥

जोडिलें जेथे समपद । तया म्हणती विष्णूपद ॥३॥

भोवंतालीं पदें उमटली । तेथे गोपाळ नाचती ॥४॥

जेथें उभे गाईचें भार । ते अद्यापि दिसत खुर ॥५॥

गोपाळांची पदें समग्र । ठाई शोभते सर्वत्र ॥६॥

एका जर्नादनीं हरी शोभले । कार कटावरी ठेऊनि भले ॥७॥

३२०

पूर्वापार परंपरा । संत सोयरा वानिती ॥१॥

सांगे कृष्ण उद्धावासी । सुखमिरासी पंढरी ॥२॥

स्वयें नांदे सहपरिवार । करीत गजर भक्तिचा ॥३॥

संत सनकादिक येती । भावें वंदिती श्रीचरण ॥४॥

एका जनार्दनीं वेधलें मन । नुठें बैसलें तें तेथुन ॥५॥

३२१

द्वारका समुद्रांत बुडविली । परी पंढरी रक्षिली अद्यापि ॥१॥

द्वारकेहुनि बहुत सुख । पंढ रीये अधिक एक आहे ॥२॥

भीमातीरीं दिंगबर । करुणाकर विठ्ठल ॥३॥

भक्तांसाठीं निरंतर । एका जनार्दनी कटीं धरिले कर ॥४॥

३२२

जो हा उद्धार प्रसवे ॐ कार । तें रुप सुंदर विटेवरी ॥१॥

ध्याता ध्यान ध्येय जेथें पैं खुटलें । तें प्रगटलें पंढरीयें ॥२॥

ज्ञेय ज्ञाता ज्ञान प्रेमाचें आथिलें । तें रुप सानुलें पंढरीये ॥३॥

एका जनार्दनीं रुपांचे रुपस । वैकुंठनिवास पंढरीये ॥४॥

३२३

जाश्वनीळ सदा ध्याये ध्यानीं मनीं । बैसोनी स्मशानीं निवांतपणें ॥१॥

तें हें उघडें रुप विठ्ठ्ल साचार । निगमांचे माहेर पंढरी हें ॥२॥

न बुडे कल्पांती आहे तें संचलें । म्हणोनि म्हणती भए भूवैकुंठ ॥३॥

एका जनार्दनी कल्पाचें निर्धारी । निर्विकल्प पंढरी उरतसे ॥४॥

३२४

रमा रमेश मस्तकी हर । पुढे तीर चंद्रभागा ॥१॥

मध्यभागीं पुंडलीक । सुख अलोलिक न वर्णवे ॥२॥

बहुता वैष्णवांचा मेळ । गदरोल नामाचा ॥३॥

वामभागीं रुक्मिनी राही । जनार्दन तेथें पाहीं ॥४॥

३२५

धन्य पृथ्वी दक्षिन भाग । जेथें उभा पांडुरंग ।मधे शोभे पुंडलीकक लिंग । सन्मुख चांग भीमरथी ॥१॥

काय वानुं तो महिमा । दृष्टी पाहतांचि भीमा । पैलथडी परमात्मा । शिवास जो अगम्य ॥२॥

दोन्ही कर धरुनि जघनीं । वाट पाहे चक्रपाणी । एका शरण जनार्दनीं । भक्तांसाठीं घाबरा ॥३॥

३२६

सारांचे सार गुह्मांचें निजगुह्मा । तें हें उभें आहे पंढरेये ॥१॥

चहुं वांचापरतें वेदां जें आरुतें । ते उभे आहे सरतें पंढरीये ॥२॥

शास्त्रांचें निज सार निगमां न कळे पार । तोचि हा परात्पर पंढरीये ॥३॥

एका जनार्दनी भरुनि उरला । तोचि हा देखिला पंढरीये ॥४॥

३२७

गाई गोपांसमवेत गोकुळिंहुन आला । पाहुनि भक्तिं भुलला वैष्णवाला ॥१॥

मुगुटमनी धन्य पंडलिक नेका । तयालागीं देखा उभा गे माय ॥२॥

युगें अठ्ठावीस जालीं परी न बैसे खालीं । मर्यादा धरली प्रेमाची गे माय ॥३॥

ऐसा व्यापक जगाचा जीवन । एका जनार्दनीं शरण गे माय ॥४॥

३२८

त्वंपद तत्पद असिपद यांवेगळा दिसे । खोल बुंथी घेऊनी विटेवरी उभा असे गे माय ॥१॥

वेडावला पुंडलिके उभा केला । तेथोनी कोठें न जाय गे माय ॥२॥

भक्तां अभयकर देतुसे अवलीळ । मेळवोनी मेळा वैष्णवांचा गे माय ॥३॥

पुंडलिकें मोहिला उभ उघाडचि केला । एका जनार्दनी ठसावला रुपेंविण गे माय ॥४॥

३२९

जयाकारणें श्रमलें भांडती । वेदादिकां न कळे मती । वोळला सगुण मूर्ती । पुंडलिकाकारणें ॥१॥

धन्य धन्य पावन देखे । पुण्यभूमि पावन सुरेख । तया गातां होतसे हर्ष । प्रेमानंदे डुल्लती ॥२॥

एका जनार्दनीं शरण । पाहतां पाहतां वेधलें मन । मोक्ष मुक्ति कर जोडून । उभे तिष्ठती सर्वद ॥३॥

३३०

उदंड भक्त भाग्यवंत देखिले । परी निधान दाविलें पुंडलिकें ॥१॥

धन्य धन्य केला जगाचा उद्धार । नाहीं लहानथोर निवडिले ॥२॥

एका जनार्दनीं दावियेला तारु । सुखाचा सागरु विठ्ठल देव ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel