३३१

पुंडलिकापुढें सर्वेश्वर । उभा कटीं ठेउनी कर ॥१॥

ऐसा पुंडलिकापुढें हरी । तो पुजावा षोडशोपचारी ॥२॥

संभोवता वेढा संतांचा । आनंद होतो हरिदासांचा ॥३॥

एका जनार्दनीं देव । उभा विटेवरी स्वयमेव ॥४॥

३३२

पंढरीचें सुख पुंडलीक जाणें । येर सोय नेणें तेथील पैं ॥१॥

उत्तम हें स्थळ तीर्थ चंद्रभागा । स्नानें पावन जगा करितसे ॥२॥

मध्यभागीं शोभे पुंडलीक मुनीं । पैल ते जघनी कटीं कर ॥३॥

एका जनार्दनी विठ्ठल बाळरुप दरुशनें ताप हरे जगा ॥४॥

३३३

पूर्वापार श्रीविठ्ठलमूर्ति । ऐसे वेद पै गर्जती ॥१॥

भक्त पुंडलीका निकट । वसतें केलें वाळुवंट ॥२॥

गाई गोपाळांचा मेळ । आनंदे क्रीडे तो गोपाळ ॥३॥

ऐसा स्थिरावला हरी का जनार्दनी निर्धारीं ॥४॥

३३४

वैकुंठीचे वैभव पंढरीसी आलें । भक्तें सांठविलें पुंडलिकें ॥१॥

बहुतांसी लाभ देतां घेतांजाहला । विसावा वोळला पाडुरंग ॥२॥

योग याग साधने करिती जयालागीं । तो उभाचि भक्तालागीं तिष्ठतसे ॥३॥

हीन दीन पापी होतुका भलते याती । पाहतां विठ्ठलमूर्ती मुक्त होती ॥४॥

एका जनार्दनीं सुखाचे माहेर । बरवें भीमातीर उत्तम तें ॥५॥

३३५

तीन अक्षरी जप पंढरी म्हणे वाचा । कोआटी या जन्मांचा शीण जाय ॥१॥

युगायुगीं महात्म्य व्यासें कथियेलें । कलियुगें केलें सोपें पुंडलिकें ॥२॥

महा पापराशी त्यांची होय होळी । विठ्ठलनामें टाळी वाजवितां ॥३॥

एका जनार्दनीं घेतां पैं दर्शन । जद जीवा उद्धरण कलियुगीं ॥४॥

३३६

अनुपम्य सप्तपुर्‍याअ त्या असती । अनुपम्य त्या वरती पंढरीये ॥१॥

अनुपम्य तीर्थ सागरादि असती । अनुपम्य सरती पंढरीये ॥२॥

अनुपम्य देव उदंडे असती । अनुपम्य विठलमूर्ति पंढरीये ॥३॥

अनुपम्य संत वैष्णवांचा मेळ । अनुपम्य गदारोळ पंढरीये ॥४॥

अनुपम्य शरण एका जनार्दनी । अनुपम्य चिंतनीं डुल्लतसे ॥५॥

३३७

अनुपम्य क्षेत्र अनुपम्य देव । नसे तोचि ठाव पंढरीये ॥१॥

अनुपम्य वाहे पुढें चंद्रभागा । अनुपम्य भंगा दोष जाती ॥२॥

अनुपम्य होय पुंडलिक भेटी । अनुपम्य कोटी सुखलाभ ॥३॥

अनुपम्य संत नामाचा गजर । अनुपम्य उद्धार जडजीवां ॥४॥

अनुपम्य शोभा विठ्ठलचरणीं । एक जनार्दनीं गात गीतीं ॥५॥

३३८

अनुपम्य वाचे वदतां पंढरी । होतसे बोहरे महात्पापा ॥१॥

अनुपम्य ज्याचा विठ्ठली जो भाव । अनुपम्य देव तिष्ठे घरीं ॥२॥

अनुपम्य सदा कीर्तनाची जोडी । अनुपम्य गोडी मनीं ज्यांच्या ॥३॥

अनुपम्य संग संतांचा विसांवा । अनुपम्य भावा पालट नाहीं ॥४॥

अनुपम्य शरण एका जनार्दनीं । कायावाचामनीं छंद यासी ॥५॥

३३९

अनुपम्य वास पंढरीस ज्याचा । धन्य तो दैवाचा अनुपम्य ॥१॥

अनुपम्य घडे चंद्रभागे स्नान । अनुपम्य दान नाम वाचे ॥२॥

अनुपम्य घडे क्षेत्र प्रदक्षिणा । अनुपम्य जाणा नारीनर ॥३॥

अनुपम्य सोहळा नित्य दिवाळी । अनुपम्य वोवाळी विठोबासी ॥४॥

अनुपम्य शरण एका जनार्दनीं । अनुपम्य ध्यानीं एक नाम ॥५॥

३४०

अनुपम्य नारीनर ते दैवाचे । अनुपम्य त्यांचे पुण्य देखा ॥१॥

अनुपम्य वास जयांसी पंढरी । प्रत्यक्ष वैकुंठपुरी अनुपम्य ॥२॥

अनुपम्य पहाती विठलरायातें । दरुशनें पावती मुक्तीने अनुपम्य ॥३॥

अनुपम्य भक्त नंदिती दैवाचे । अनुपम्य त्यांचे सुख देखा ॥४॥

अनुपम्य एका जनार्दनीं चरणीं । अनुपम्य विनवणी करितसे ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel