३४१

अनुपम्य उपासना । अनुपम्य चरणी संताचिये ॥१॥

अनुपम्य भक्ति गोड । अनुपम्य लिगाड तुटत ॥२॥

अनुपम्य पंढरीचा वास । अनुपम्य दैवास दैव त्यांचे ॥३॥

अनुपम्य नाचती वैष्णव । अनुपम्य गौरव तयांचे ॥४॥

अनुपम्य एका जनार्दनीं । अनुपम्य चरणीं संताचिये ॥५॥

३४२

अनुपम्य उदार नाम । अनुपम्य सकाम संत तें ॥१॥

अनुपम्य पंढरीसी जाती । अनुपम्य नाचती वाळुवंटी ॥२॥

अनुपम्य टाळ घोळ अनुपम्य रसाळ वाद्यें वाजती ॥३॥

अनुपम्य संतमेळ । अनुपम्य प्रेमळ नाम घेती ॥४॥

अनुपम्य एका जनार्दनी । अनुपम्य आयणी चुकले ॥५॥

३४३

अनुपम्य पुराणं सांगर्ती सर्वथा । अनुपम्य तत्त्वतां पंढरीये ॥१॥

अनुपम्य योग अनुपम्य याग । अनुपम्य अनुराग पंढरीये ॥२॥

अनुपम्य ध्यान । अनुपम्य धारणा । अनुपम्य पंढरीराणा विटेवरी ॥३॥

अनुपम्य क्षेत्र तीर्थ तें पवित्र । अनुपम्य गोत्र उद्धरती ॥४॥

अनुपम्य शरण एका जनार्दनी । अनुपम्य भुवनीं नांदतसे ॥५॥

३४४

उपदेश अनुपम्य खुण । विटे समचरण शोभले ॥१॥

अनुपम्य सदैव भाग्य ज्यांचें । अनुपम्य वाचे नाम गाती ॥२॥

अनुपम्य जातीं पंढरीये । अनुपम्य वस्ती होय पंढरीये ॥३॥

अनुपम्य ते भाग्याचे । विठ्ठल वाचे आळविती ॥४॥

अनुपम्य एका जनार्दनीं । अनुपम्य वदनी गाती नाम ॥५॥

३४५

अनुपम्य ज्ञान अनुपम्य मतें । अनुपम्य सरतें पंढरीयें ॥१॥

अनुपम्य वेद अनुपम्य शास्त्र । अनुपम्य पवित्र पंढरीये ॥२॥

अनुपम्य भक्ति अनुपम्य मुक्ति । अनुपम्य वेदोक्ती पंढरीये ॥३॥

अनुपम्य कळा अनुपम्य सोहळा । अनुपम्य जिव्हाळा पंढरीये ॥४॥

अनुपम्य दया अनुपम्य शांती । अनुपम्य विरक्ति एका जनार्दनीं ॥५॥

३४६

आनुपम्य भाग्य नांदतें पंढरी । विठ्ठल निर्धारीं उभ जेथें ॥१॥

अनुपम्य वाहे पुढें चंद्रभागा । दोषा जातीं भंगा नाम घेतां ॥२॥

अनुपम्य मध्यें पुंडलीके मुनी । अनुपम्य चरणीं मिठी त्याच्या ॥३॥

संत शोभती दोही बाहीं । अनुपम्य देहीं सुख वाटे ॥४॥

अनुपम्य एका जनार्दनीं ठाव । अनुपम्य पंढरीराव विटेवरी ॥५॥

३४७

अनुपम्य घनदाट । करिती बोभाट अनुपम्य ॥१॥

पंढरीसी जाती अनुपम्य । धन्य जन्म अनुपम्य त्यांचा ॥२॥

अनुपम्य त्यांच्या पुण्या नाहीं पार । अनुपम्य निर्धार सुख त्यांसी ॥३॥

अनुपम्य दशा आली त्यांच्या दैवा । अनुपम्या देवा चुकले ते ॥४॥

अनुपम्य शरण एका जनार्दनीं । पंढरीं सांडोनि नेम नाहीं ॥५॥

३४८

पंचक्रोशीचें आंत । पावन तीर्थ हें समस्त ॥१॥

धन्य पंढरीचा महिमा । नाहीं द्यावया उपमा ॥२॥

तीर्थ क्षेत्र देव । ऐसा नाहीं कोठें ठव ॥३॥

नगर प्रदक्षिणा । शरण एका जनार्दना ॥४॥

३४९

इच्छिताती देव पंढरीचा वास । न मिळे सौरस तयां कांहीं ॥१॥

ऐसें श्रेष्ठ क्षेत्र उत्तमा उत्तम । याहुनी सुगम आहे कोठें ॥२॥

जनार्दनाचा एक म्हणतसे भावें । तीर्थ ते वंदावें पंढरी सदा ॥३॥

३५०

प्रयागादि क्षेत्रें आहेत कल्पकोडी । तया आहे खोडी एक एक ॥१॥

मुंडन ती काया निराहार राहणें । येथेम न मुंडणें काया कांहीं ॥२॥

म्हणोनी सर्व तीर्थामाजी उत्तम ठाव । एका जनार्दनीं जीव ठसावला ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel