४३१

तुमचें देणें तुमचें देणें । नको वैकुंठ हें पेणें ॥१॥

नानामतें मतांतर । अंतर गोवुं नये तेथ ॥२॥

पेणें ठेवा पंढरीसी । आहर्निशीं नाम गाऊं ॥३॥

भाळे भोळे यती संत । बोलूं मात तयांसी ॥४॥

चरणरजवंदीन सांचे । एका जनर्दनीं म्हणे त्यांचें ॥५॥

४३२

माझें माहेर पंढरी । विठ्ठल उभा विटेवरी ॥१॥

संत मिळाले अपार । करिताती जयजयकार ॥२॥

टाळघोष पताका । नाचताती वैष्णव देखा ॥३॥

विठ्ठल नामें गर्जती । प्रेमभरीत नाचती ॥४॥

एका जनर्दनीं शरण । विठ्ठलनामें लाधें पूर्ण ॥५॥

४३३

पाहतां विश्राम सुखवस्ती धाम । पंढरी पुण्यग्राम भुमीवरी ॥१॥

जावया उद्वेग धरिला माझा मने । उदंड शाहाणें तये ठायीं ॥२॥

एका जनार्दनीं मानिला विश्वास । नाहीं दुजीं आस पायांवीण ॥३॥

४३४

माझे माहेर पंढरी । आहे भीवरेचे तीरीं ॥१॥

बाप आणि आई । माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥

पुंडलिक बंधु आहे । त्यांची ख्याती सांगु काय ॥३॥

माझी बहिण चंद्रभगा । करितसे पापभंगा ॥४॥

एका जनर्दनी शरण । करी माहेरीची आठवण ॥५॥

४३५

येणें पुरतें सर्व काज । विश्वास हा जाहला मज । सांपडलें तें निज । बहुकाळांचे ठेवणे ॥१॥

केला पुंडलिकें उपकार । दाविला सोपामार्ग निर्धार जडजीवां उद्धार । नाममत्रें एकाची ॥२॥

तुटलीं बंधने । मागा पाहा अनुभणे एका जानार्दनीं म्हणे । धन्य वास पंढरीसे ॥३॥

४३६

जगीं धन्य एक नाम । गातां उत्तम सर्व नेम ॥१॥

धन्य धन्य पंढरपुर । नांदे भीमातीर विठ्ठल ॥२॥

धन्य धन्य वेणुनाद । वसे गोविंद ते स्थानीं ॥३॥

धन्य धन्य गोपाळपुर । करिती गोपाळ गजरेकं काला ॥४॥

एका जनार्दनीं पाद्माळें । अखंड सोहळें तये गांवीं ॥५॥

४३७

मूर्ति अनुपम्य विटेवरी साजिरी । पाउलें गोजिरें कोविळीं तीं ॥१॥

तेथें माझें मन वेडावलें भारी । परत माघारी परतेना ॥२॥

वेधलासेंअ जीव सुखा नाहीं पार । माहेर माहेर पंढरी देखा ॥३॥

एका जनार्दनीं सुखाची वसती । भाविकां विश्रांती पंढरीरावा ॥४॥

४३८

आशा धरुनि आलों येथवरी । पाहतां पंढरी पाव्न झालों ॥१॥

आलिया जन्माचें सुफळ झालें काज । दृष्टी गरुडध्वज पाहतांचि ॥२॥

एका जनार्दनीं पावलो विश्रांति । पाहतां विठठलमूर्ती भीमातटीं ॥३॥

४३९

या पंढरीचे सुख पाहतां डोळां । उभा तो जिव्हाळा योगीयांचा ॥१॥

म्हणोनियां मन वेधलें चरणीं । आणिक त्यागुनी बुडी दिली ॥२॥

जनार्दनाचा एका धांवे लोटांगणीं । करी वोवाळणी शरीराची ॥३॥

४४०

ऐसे संतभार ऐसें भीमातीर । ऐसा जयजयकार सांगा कोठें ॥१॥

समुद्रवलयांकित तीर्थे असतीं पावन । परी ऐसें महिमान नाहीं कोठें ॥२॥

ऐसा नामघोष आनंद सोहळा । न देखे आणिके स्थळां माझे नेत्रीं ॥३॥

एका जनार्दनीं पंढरीवांचुनीं । आनंद माझें मनीं नाहीं कोठें ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel