५०१

परात्पर परिपुर्ण सच्चिदानंदघन ।

सर्वां अधिष्ठान दैवतांचें गे माय ॥१॥

तें लाधलें लाधलें पुंडलिकाचे प्रीती ।

येत पंढरीप्रती अनायासें गे माया ॥२॥

जगडंबर पसारा लपवोनि सारा गे माय ।

धरियेला थारा पुंडलिकाचेनि प्रेमें गे माय ॥३॥

ओहंअ मां न कळे कांहीं सोहं देती ग्वाहीं गे माय ।

कोहमाची तुटली बुंथी एका जनार्दनीं प्रीति गे माय ॥४॥

५०२

वर्णितां वेदमती कुंठित पैं जाली । पुराणें भागलीं विवादतां ॥१॥

सोपारा सुगम पुंडलिकापाठीं । उभा जगजेठी विटेवरी ॥२॥

लक्ष्मी ते स्वयें रुक्मिणी शोभत । विंझणें वारीत सत्यभामा ॥३॥

सांडुनी रत्‍नकिळा गळां तुळसीमाळा । चंदनाचा टिळा केशरयुक्त ॥४॥

गोपाळ गजरें आनंदें नाचती । मध्यें विठ्ठलमूर्ति प्रेमें रंगें ॥५॥

मनाचें मोहन योगाचें निजधन । एका जनार्दनीं चरण विटेवरी ॥६॥

५०३

ज्याचे पुराणीं पोवाडे । तो हा उभा वाडेंकोंडें ॥१॥

कटीं कर ठेवुन गाढा । पाहे दिगंबर उघडा ॥२॥

धरुनी पुंडलिकाची आस । युगें जाहलीं अठ्ठावीस ॥३॥

तो हा देव शिरोमणी । एका शरण जनार्दनीं ॥४॥

५०४

स्थूळ ना सुक्ष्म कारण ना महाकारण । यापरता वेगळाचि जाण आहे गे जाय ॥१॥

पुंडलिकाचें प्रेमें मौनस्थ उभा । कोणा न बोले उगला उभा ठेला गे माय ॥२॥

निंद्य वंद्य जगीं यावेंभेटीलागीं । दरुशनें उद्धार वेगीं तया गे माय ॥३॥

ऐसा लाघवी खेळ खेळोनी निराळा । एका जनार्दनीं डोळा देखिला गे माय ॥४॥

५०५

पंचविसावा श्रीविठ्ठलु । चौविसांवेगळा तयाचा खेळू गे माय ॥१॥

तो पुंडलीका कारणें येथवरी आला । उभा उगा ठेला विटेवरी गे माय ॥२॥

जनीं जनार्दन करावय उद्धरण । एका जनार्दनी समचरण साजिरें गे माय ॥३॥

५०६

सुंदरु बाळपणाची बुंथी घेऊनी श्रीपती । सनकादिकां गाती तेथें कुंठित गे माय ॥१॥

ब्रह्मा वेडावलें ते वेंडावलें । पुंडलिकाधीन झालें गे माय ॥२॥

इंद्र चंद्र गुरु उपरमोनी जया सुखा । तो वाळूवंटीं देखा संतासवें गे माय ॥३॥

ऐसा नटधारी मनु सर्वांचे हरी । एका जनार्दनाचे करीं उच्छिष्ट खाय ॥४॥

५०७

अभक्त सभक्त दोघांसी सारखा दिसे । लवनीं जैसें नदिसे दुजेपण गे माय ॥१॥

ऐसा परात्पर सोइरा पुंडलिकाचे पाठीं । मौन्य वाक्पुटीं धरुनी गे माय ॥२॥

पुण्य पाप सर्व देखतसे दृष्टी । चालवी सर्व सृष्टी गे माय ॥३॥

ऐसा वेषधारी उभा भीवरेतीरीं । एका जनार्दनीं अंतरी दृढ ठसावें गे माय ॥४॥

५०८

ओहं सोहं यापरतें प्रमाण । जघन सघन विटेवरीं ॥१॥

भीवरासंगम पुडंलीक दृष्टी । सम कर कटीं उभा हरी ॥२॥

वेदांचे जन्मस्थान विश्रांति पैं मूर्ति । त्रैलोक्य कीर्ति विजयध्वज ॥३॥

एका जनार्दनीं पुराणासी वाड । पुरवितसे कोड भाविकांचें ॥४॥

५०९

विठ्ठल सांवळा पंढरीये उभा । धन्य त्यांची शोभा सोभतसे ॥१॥

पुंडलिका मागें कर ठेवुनी कटीं । समपाय विटीं देखियेला ॥२॥

राहीं रखुमाई शोभती त्या बाहीं । बैष्णव दोही बाहीं गरुडपारीं ॥३॥

एका जनार्दनीं पाहुनियां । ध्यान मनाचें उन्मन होत असें ॥४॥

५१०

अणुरेनुपासोनी सब्राह्म भरला । भरुनी उरला संतापुढें ॥१॥

उघडाची दिसे सर्वा ठायीं वसे । मागणेंचि नसे दुजें कांहीं ॥२॥

कर ठेऊनि कटीं तिष्ठत रहाणें । वाट तें पाहनें मागेल कांहीं ॥३॥

चंद्रभागा तीर पुंडलिकासमोर । एका जनार्दनीं हरिहर उभे राहाताती ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel