५२१

विटेवरी दिसे स्वानंदाचा गाभा । श्रीमुखाची शोभा काय वानुं ॥१॥

कटीं पिंतांबर तुळशीचे हार । उभा सर्वेश्वर भक्तिकाजा ॥२॥

लावण्य रुपडें पाहें पुडंअलीक । आणीक सम्यक नये दुजा ॥३॥

पाहतां पाहतां विश्रांती पै जाली । एका जनार्दनीं माउली संताची ते ॥४॥

५२२

रुप गोजिरें तें सान । विटेवरी समचरण ॥१॥

कांसे कसिला पीतंबर । रुळे वैजयंती हार ॥२॥

सम कर ठेवुनी कटीं । पाहे पुंडलिका दृष्टी ॥३॥

एका जनार्दनी रुपडें । पाहतां मन झालें वेडें ॥४॥

५२३

सर्वाघटीं बिंबला व्यापुनी राहिला । पुडलिकें उभा केला विटेवरी ॥१॥

सांवळा चतुर्भुज कांसे पीतांबर । वैजयंती माळ शोभे कंठीं ॥२॥

कटावरी कर पाउलें साजिरीं । उभा तो श्रीहरीं विटेवरी ॥३॥

एका जनार्दनीं बिंबे तो बिंबला । बिंब बिंबोनी ठेला देहामाजीं ॥४॥

५२४

परा पश्यांती मध्यमा । जो न कळे आगम निगमां ।

पुंडलिकालागीं धामा । पंढरीये आला तो ॥१॥

नीरेभीवरेचे तटीं । कास घालुनी गोमटी ।

वैजयंती शोभे कंठीं । श्रीवत्सलांछन ॥२॥

शंख चक्र मिरवे करीं । उटी चंदनाची साजिरी ।

खोप मिरवे शिरीं । मयूरपिच्छें शोभती ॥३॥

शोभे कस्तुरीचा टिळा । राजस सुंदर सांवळा ।

एका जनार्दनी डोळा । वेधिलें मन ॥४॥

५२५

विठठल पुडलिकासाठीं । उभा राहिला वाळुवंटीं । कर ठेवुनियां कटीं । भक्तासाठीं अद्याप ॥१॥

न कळे तयांचे महिमान । वेदां पडलेसें मौन । शास्त्रांचे भांडण । परस्परें खुटले ॥२॥

नेणवे तो सोळा बारां । आणीक साहा तें अठरा । पंचविसासी पुरा । न कळे बारा छत्तिसां ॥३॥

ऐसां त्रिवाचा वेगळा । परमानंदाचा तो पुतळा । एका जनार्दनीं डोळां । देखिला देव ॥४॥

५२६

सगुण रूपडें अद्वैत बुंथी । घेऊनि पंढरपुरी उभा विटे ॥१॥

डोळियांची धणी पहातां न पुरे । मनचि चांचरे पाहतां पाहतां ॥२॥

रुप आकारलें पुंडलिकाचे भेटी । उभे असे तटी भीवरेच्या ॥३॥

एका जनार्दनीं उपाधी निराळा । उभा तो सांवळा विटेवरी ॥४॥

५२७

आदि मध्य अंत न कळे कोणासी । तो हृषीकेशी पंढरीये ॥१॥

जया वेवादती साही दरुशनें । न कळे म्हणोन स्तब्ध जाहलीं ॥२॥

वेडावल्या श्रुति नेती पैं म्हणती । तो पुंडलिकाचे प्रीति विटे उभा ॥३॥

एका जनार्दनीं आनंदाचा कंद । उभा सच्चिदानंद भीमातीरीं ॥४॥

५२८

पायाळसी अंजन असावें डोळां । मग धनाचा कोहळा हातां लागे ॥१॥

तैसें पायाळपणें पुडलीक धन्य । दाविलें निधान पंढरीसी ॥२॥

एका जनार्दनीं चहुं वाचांवेगळा। परापश्यंतीसी कळा न कळेची ॥३॥

५२९

ऐसें कीर्तीचें पोवाडे । जाहले ब्रह्मादिक वेडे ।

श्रुतीशास्त्रां कुवाडे । न कळे कांहीं ॥१॥

तो परात्पर श्रीहरी । पुंडलिकांचे उभा द्वरीं ।

युगें अठ्ठाविसे जाहलीं परीं ॥ न बैसे तरी खालुता ॥२॥

धरुनी भक्तीची मर्यादा । आहे पाठीपागें सदा ।

एका जनार्दनीं छंदा । विटेवरी उभाची ॥३॥

५३०

अगाध चरणाचें महिमान वानितां वेदां पडिलें मौन्य ॥१॥

पुराणें वर्णितां भागलीं सहाशास्त्रें वेडावलीं ॥२॥

तें पुडलिकांचे लोभें एका जनार्दनीं विटे उभें ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel