५५१
चंद्र पौर्णिमेचा शोभते गगनीं । तैसा मोक्षदानी विटेवरी ॥१॥
बाळ सुर्य सम अंगकांती कळा । परब्रह्मा पुतळा विटेवरी ॥२॥
मृगनाभी टिळक मळवटीं शोभला । तो घननीळ सांवळा विटेवरी ॥३॥
एका जनार्दनीं ध्यानाचें ध्यान । तें समचरण विटेवरी ॥४॥
५५२
अंगीं चंदनाची उटी । माथां शोभे मयोरवेटी ॥१॥
शंख चक्र पद्म करीं ।उभा विटेवरी श्रीहरीं ॥२॥
भोवतें उभे सनकादिका । नारद तुंबरादि आणिक ॥३॥
ऐसा आनंद सोहळा । एका जनार्दनी पाहे डोळां ॥४॥
५५३
शोभती दोनी कटीं कर । रुप सांवळें सुंदर । केशराची उटी नागर । गळां माळ वैजयंती ॥१॥
वेधें वेधक हा कान्हा । पहा वेधतुसे मना । न बैसेचि ध्याना । योगियांच्या सर्वदा ॥२॥
उभारुनी दोन्हीं बाह्मा । भाविकांची वाट पाहे । शाहाणे न लभती पाय । तया स्थळी जाऊनी ॥३॥
ऐसा उदार मोक्षदानी । गोपी वेधक चक्रपाणी । शरण एका जनार्दनीं । नाठवे दुजे सर्वदा ॥४॥
५५४
सगुण निर्गुण मूर्ति उभी असे विटे । कोटी सुर्य दांटे प्रभा तेथें ॥१॥
सुंदर सगुण मूर्ति चतुर्भुज । पाहतां पूर्वज उद्धरती ॥२॥
त्रिभुवनीं गाजे ब्रीदाचा तोडर ॥ तोचि कटीं कर उभा विटे ॥३॥
एका जनार्दनीं नातुडे जो वेदां । उभा तो मर्यादा धरुनि पाठीं ॥४॥
५५५
कर कटावरी वैजयती माळा । तो हरीडोळां देखियेला ॥१॥
रुप सांवळे शोभें विटेवरी । तो हरी डोळेभरी देखियेला ॥२॥
एका जनार्दनीं पाहतां रुपडें ।त्रिभुवन थोकडें दिसतसे ॥३॥
५५६
आल्हाददायकश्रीमुख चांगलें । पाहतां मोहिले भक्त सर्व ॥१॥
गाई गोपाळ विधिल्या गोपिका । श्रीमुख सुंदर देखा सजिरें तें ॥२॥
आल्हाददायक तें मुखकमळ । वैजयंती माळ हृदयावरी ॥३॥
एका जर्नादनी पाहतां रुपडें । आनंदी आनंद जोडे आपेआप ॥४॥
५५७
चंद्रभागे तीरीं समपदीं उभा चैतन्याचा गाभा पाडुरंग ॥१॥
कांसे पीतांबर गळा तुळशीहार । पदक हृदयावर वैजयंती ॥२॥
एकाजनार्दनीं लावण्य साजिरें । रुप ते गोजिरें विटेवरी ॥३॥
५५८
उभा भीमातीईं कट धरुनी करीं । वैकुंठीचा हई मौनरुप ॥१॥
ठेविनिया विटेसम पद दोन्हीं । उभा चक्रपाणी मौनरुपें ॥२॥
वैजयंती माळ किरीट कुंडलें । निढळ शोभलें केशरानें ॥३॥
कांसे पीतांबर दिसे सोनसळा । पदक आणि माळा कौस्तुभ ते ॥४॥
चरणींचा तोडर एका जनार्दन । करीत स्तवन भक्तिभावें ॥५॥
५५९
चंद्रभागा तटीं उभा वाळुवंटीं । वैजंयतीं कंठीं शोभतसें ॥१॥
गोमटें साजिरें सुकुमार ठाण । धरिलें जघन करें दोन्हीं ॥२॥
राहीरखुमाई शोभती वामभागीं । शोभे उटी सर्वांगी चंदनाची ॥३॥
मोर पिच्छ शिरीं शोभती ते वरी । केशर कस्तुरी शोभे भाळी ॥४॥
शंख चक्र गदा पद्म ते शोभती । सावळी हे मुर्ति विटेवरी ॥५॥
शोभती भुषणें चरणीं वाळे वाकीं । जानु जंघा शेखीं शोभताती ॥६॥
एका जनार्दनी वर्णितां ध्यान । मनाचें उन्मन सुखें होय ॥७॥
५६०
भीमरथीचे तीरी । उभा विठ्ठल विटेवरी ॥१॥
रुप सावळें सुंदर । कुंडलें कानीं मकराकार ॥२॥
गळां शोभें वैजयंती । चंद्र सुर्य तेजें लपती ॥३॥
कौस्तुभ हृदयावरी । उटी केशर साजिरी ॥४॥
एका जनार्दनीं निढळ । बरवें देखिलें साजिरें ॥५॥