५६१

व्यापक तो हरी पंढरीये राहिला । वेदंदिकां अबोला जयाचा तो ।१॥

सांवळें नागर कटीं ठेउनी कर । वैजयंती हार तुळशी गळां ॥२॥

एका जनार्दनीं विश्वव्यापक । उभाचि सम्यक विटेवरी ॥३॥

५६२

व्यापुनी जगीं तोचि उरला । तो विटेवरी देखिला गे माय ॥१॥

चतुर्भुज पीतंबरधारी । गलां शोभे वरी वैजयंती गे माय ॥२॥

हातीं शोभें शंख चक्र पद्म गदा । रूळे चरणींसदा तोडर गे माय ॥३॥

एका जनार्दनी मदनाचा पुतळा । देखियेला डोळा विठ्ठलरावो ॥४॥

५६३

शिणले ते वेद श्रुती पैं भांडती पुराणांची मती कुंठीत जाहली ॥१॥

तो हा पांडुरंग उभा विटेवरी । पाउले साजिरी समचि दोन्ही ॥२॥

कर कटावरीं तुळशीच्या माळा ।निढळीं शोभला मुकुट तो ॥३॥

एका जनार्दनीं गोजिरें तें ठाण । शोभलें जघन करयुगुली ॥४॥

५६४

ज्याकारनें योगें रिघती कपाटीं । तो उभा असे ताटीं चंद्रभागे ॥१॥

सांवए रुपडें गोजिरे गोमटें । धरिले दोन्ही विटे समचरण ॥२॥

वैजयंती माळा तुळशीहार मिरवला । निढळीं शोभला चंदन वो माय ॥३॥

एका जनार्दनीं मौन्य धरुनी उभा । चैतान्याचा गाभा पाडुरंग ॥४॥

५६५

सकळ देवांचा नियंता । माझी विठ्ठल माता पिता ॥१॥

तो हा उभा विटेवरी । कटे धरुनियां करीं ॥२॥

मिरवें वैजयंती माळा । केशर कस्तुरीचा टिळा ॥३॥

मकराकार कुंडलें । करीं शंख चक्र शोभलें ॥४॥

एका शरण जनार्दनीं । विठ्ठल पाहे ध्यानीं मनीं ॥५॥

५६६

गगनामाजीं जैसे शोभे तारांगण । तैसा विटेवरी शोभे समचरण ॥१॥

देखताचि मना समाधान होय । आनंदी आनद होय ध्याती जया ॥२॥

चतुर्भुज शंख चक्र ते शोभती । गळां वैजयंती मिरवे शोभा ॥३॥

कांसे पीतांबर मेखळा झळाळ । एका जनार्दनीं भाळ पायावरी ।४॥

५६७

मिळोनि बारा सोळा घोकणी घोकिती । तो ही श्रीपती पंढरीये ॥१॥

रुप ते सांवळें सुंदर सोभलें । गळां मिरवलें तुळशीहार ॥२॥

मुगुट कुंडलें वैजयंती माळ । कौस्तुभ झळाळ हृदयावरीं ॥३॥

शंख चक्र करीं दोन्हीं ते मिरवले । सुंदर शोभले वाळरुप ॥४॥

एका जनार्दनीं हृदयीं श्रीवत्सलांछन । वागवी भूषण भक्तांसाठी ॥५॥

५६८

श्रीक्षेत्र पंढरी शोभे भीमातीरीं । विठ्ठल विटेवरी उभा असे ॥१॥

सांवळें रुपडें कटीं ठेउनि कर । भक्त जयजयकार करिताती ॥२॥

एका जनार्दनीं गोजिरें तें ठाण । शोभती जघन कटीं कर ॥३॥

५६९

सकळ सुखाचे जें सुख । तेंचि सोलीव श्रीमुख ॥१॥

विठ्ठल विठठलीं शोभा । मिरवितसे स्वयंभा ॥२॥

मीतूंपणाचा शेवट तोचि मस्तकी मुगुट ॥३॥

अधिष्ठान जें निर्मळ । तेंचि लल्लट सोज्वळ ॥४॥

श्रुति विवेक ये विवेका । तेंचि श्रवण ऐका ॥५॥

जिव शिवएक ठसा । कुंडलें सर्वांग डोळसा ॥६॥

जें कां आदित्यां तेज तेजाळें । तेंचि तया अंगीं झाले डोळे ॥७॥

चितशक्तीचें जाणनेंपणा । तेंचि नयनींचे अंजन ॥८॥

शोभा शोभवी जें बिक । तेंचि मुखीचे नासिक ॥९॥

वदन म्हणिजे सुखसागर । तळपती हिरिया ऐसें अधर ॥१०॥

सच्चित्पर्दाची जे माळा । माळागुणें पडली गळां ॥११॥

कर्म कर्तव्य जें फळें । तेचि कर कटीं सरळ ॥१२॥

कोहं कोहं मुस अटी । तेचि आटीव बहुवटीं ॥१३॥

कवणें व्यक्ती नये रुपा । हृदयीं पदक पहा पा ॥१४॥

नाभीका पुर्णानंदी । तेचि नाभी तया दोंदी ॥१५॥

निःशेष सारुनी अंबर । तो कासे पीतांबर ॥१६॥

महासिद्धी ज्या वाजंटा । त्याची मेखळे जडल्या घंटा ॥१७॥

गती चालविती गती । तेचि समचरण शोभती ॥१८॥

अहं सांडोनि अहंकार । तोचि चरणीम तोडर ॥१९॥

अर्थाअर्थी जडली निकी । ते शोभती वाळे वाकी ॥२०॥

शंख चक्र पद्म गदा । चरी पुरुषार्थ आयुधा ॥२१॥

शून्यशून्य पायातळीं । तेचि विट हे शोभली ॥२२॥

दृश्य सारोनियां शोभा । समचरणीं विठ्ठल उभा ॥२३॥

चरणातळीं ऊर्ध्व रेखा । जाला जनार्दन एका ॥२४॥

५७०

अनतांचे अनंत गुण । अपार पार हें लक्षण । तो समचरण ठेवुन । विटे उभा राहिला ॥१॥

करीं दास्यत्व काळ । भक्तजनां प्रतिपाळ । उदार आणि स्नेहाळ । तो उभा भीवरे ॥२॥

धीर सर्वस्वे बळसागर । निद्रा करी शेषावर । लक्ष्मी समोर । तिष्ठत सर्वदा ॥३॥

खेळे कौतुकें खेळ । तोडी भक्तांचे मायाजाळ । एका जनार्दनीं कृपाळ । स्वामीं माझा विठ्ठल ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel