६६१

पुरवावया मनोरथ । उभा अनाथनाथ विठ्ठल ॥१॥

भोळेभाळे येती शरण । चुकवी त्यांचें जन्ममरण ॥२॥

एका जनार्दनीं भाव । अपुनिया भाका कींव ॥३॥

६६२

जुनाट जुगादीचें नाणें । बहु काळांचे ठेवणें ।

पुंडलिकांचे पायाळपणें । उभें ठेलें विटेवरी ॥१॥

युगें जाहलीं अठ्ठवीस । वास भीवरेतीरास ।

भक्तांची धरु आस । विटे उभा राहिला ॥२॥

एका जनार्दनीं भाव । तया भेटतसे देव ।

अभागीये भेव । सदा वसे अंतरीं ॥३॥

६६३

आणिकांचें मत नका पडुं तेथ । भजा पंढरीनाथ एकभावें ॥१॥

काय होणार तें होईल देहांचें । नाशिवंत साचें काय हातीं ॥२॥

मृतिकेचा गोला गोळाचि मृत्तिका । वाउगाचि देखा शीण वाहे ॥३॥

घट मठ जेवीं आकाश निराळें । एका जनार्दनीं खेळें अकळची ॥४॥

६६४

माझा वडिलांचे दैवत । कृपाळु हा पंढरीनाथ ॥१॥

पंढरीसी जाऊं चला । भेटुं रखुमाईविठ्ठला ॥२॥

पुडलिकें बरवें केलें । कैसें भक्तीनें गोविलें ॥३॥

एका जनार्दनीं नीट । पायी जडलीसे वीट ॥४॥

६६५

ॐ कार स्वरुप सदगुरु असंग । अक्षय अभंग पांडुरंग ॥१॥

नसे ज्याचा ठायीं द्वैतद्वैत भाव । ब्रह्मा स्वयमेव पाडूरंग ॥२॥

मस्तक हें माझे तयांचे चरणी । असे जनीं वनीं पांडुरंग ॥३॥

सदसदभाव हे नसती ज्यांचे ठायीं । नित्य तो मी गाई पाडुंरंग ॥४॥

गुरुराज माझा दीनांचा दयाळ । तो डीमायाजाळ पांडुरंग ॥५॥

रवी शशी दीप्ती जेणें प्रकाशती । तो ही तेजमुर्ती पांडुरंग ॥६॥

वेद जयालागीं नित्य वाखाणिती । तो हा वेदमुर्ती पाडुरंग ॥७॥

श्रीमान हा माझा सदगुरु समर्थ । देई मोक्ष स्वार्थ पांडुरंग ॥८॥

पांचा भुतांची जो करितो झाडणी । तो हा ज्ञानखाणी पांडुरंग ॥९॥

डुरकणी देई मोह पंचानन । करी त्या हनन पांडुरंग ॥१०॥

रंगे चित्त माझे तयाच्या स्वरुपीं । असे आप आपीं पाडुरंग ॥११॥

गर्व अभिमान सोडावा समूळ । भेटे तो दयाळ पाडुरंग ॥१२॥

महामाया एके क्षणांत निरसी । सुखाची पै राशी पाडुरंग ॥१३॥

हाव ही धरी जो सदगुरुपायाची । इच्छा पुरवी त्याची पांडुरंग ॥१४॥

राजा त्रैलोक्याचा गुरुराजस्वामी । वसे अंतर्यामी पाडुरंग ॥१५॥

जायां पुत्र धन तयासी अपील । सर्वस्वे रक्षील पांडुरंग ॥१६॥

यमाची जाचणी तयासी चुकली । गुरुमुर्ति भेटली पाडुरंग ॥१७॥

प्रभा हे जयाची पसरली जनीं । चिदरुपणाची खाणी पाडुरंग ॥१८॥

भुतळीं; या नसे दुजा कोनी ऐसा । भक्तांचा कोंवसा पाडुरंग ॥१९॥

नेई भक्तांसे जो आपुल्या समीप । तो हा मायाबाप पांडुरंग ॥२०॥

इति कर्वव्याता हीच दासालागीं । सेवावा हा जगीं पाडुरंग ॥२१॥

तीकडी सांखळी त्रिगुनाची तोडी । भवातूनि काढी पाडुरंग ॥२२॥

उपमा तयासी काय देऊम आतां । सकाळार्थ दाता पाडुरंग ॥२३॥

परोपकारालागीं अवतार केला । आनंदाचा झेल पांडुरंग ॥२४॥

नाम हें तयाचें जन्ममरण वारी । भक्तां सहाकरी पाडुरंग ॥२५॥

मन हें जडलें तयाचियां पदीं । उतरी भवनदी पाडुरंग ॥२६॥

कायवाचामनें स्वरुपी रहावें । नाम आठवावें पाडुरंग ॥२७॥

यम नियम साधीं साधन अष्टांग । होईल सर्वांग पाडुरंग ॥२८॥

एका जनार्दनीं देह हारपला । होऊनि राहिला पाडुंरंग ॥२९॥

६६६

अगाध भगवंतांची नामें । अगाध त्यांची जन्मकर्में ॥१॥

शिणले ते वाखाणितां । शेषा न कळें तत्त्वतां ॥२॥

रमा जाणों गेली । ती सुखें मौनावली ॥३॥

वेडावलीं दरुशनें । भांबावलीं तीं पुराणें ॥४॥

ऐसा उदार श्रीहरीं । शोभतसे भीमातीरीं ॥५॥

शरण एका जनार्दनीं । मीनला एकपणें जाऊन ॥६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel