६६७

अकार उकार मकार नामचि ठेविलें । शिवतेंहि केलें निराकार ॥१॥

जीव शिव दोन्हीं विराले ज्यामाजीं । ते नाम सहजीं विठ्ठल होय ॥२॥

नामावीया नाहीं आणिकांसी ठाव । दुजा नाहीं भाव जीवां सर्वां ॥३॥

एका जनार्दनीं नाम घनदाट । भुवैकुंठ पेठ पंढरी देखा ॥४॥

६६८

अविनाश नाम स्वयंभ संचलें । तें उभें चांगले विटेवर ॥१॥

वर्णितां वेदांसी न कळेचि पार । तें उभे साचार विटेवरी ॥२॥

मौन्यरुप श्रुती राहिल्या तटस्थ । तो आहे मूर्तिमंत विटेवरी ॥३॥

एका जनार्दनीं नाम अविनाश । गातां जातीं दोष जन्मांतरींचे ॥४॥

६६९

जयालागीं करिती योगी सायास । तो हरी पंढरीस उभा असे ॥१॥

न लगे साधन मांडणें तत्त्वता । नाम गातीं गातां सोपा सर्वां ॥२॥

नर अथवा नारी न म्हणे दुराचारी । दर्शनें उद्धरे जडजीवां ॥३॥

पुंडलिका भाक देऊनि सावकाश । पुरवितो सौरस अद्यापिवरी ॥४॥

एका जनार्दनीं चैतन्याचा गाभा । विटेवरी उभा भक्तासाठीं ॥५॥

६७०

तुमचें नाम आठवितां । धणी न पुरे पंढरीनाथा ॥१॥

सुख अनुपम्य कल्प कोडी । युगा ऐसा एक घडी ॥२॥

निजध्यास जडतां नामीं । सुखें सुख दुणावें प्रेमीं ॥३॥

एका जनार्दनीं नाम । शेष्ठा धामांचे हें धाम ॥४॥

६७१

अंकितपणें राहिला उभा । विठ्ठल चैत्यन्याच गाभा ।

उजळली दिव्य प्रभा । अंगकांति साजिरी ॥१॥

पीतांबर माळ कंठीं । केशर कस्तुरीची उटी ।

मुगुटा तळवटीं । मयुरपिच्छें शोभती ॥२॥

सनकादिकांचें जेंध्यान । उभें विटे समचरण ।

भक्तांचें ठेवणें । जाप्य गौरीशिवाचे ॥३॥

तो देवाधिदेव विठ्ठल । वाचे वद्तां न लगे मोल ।

एका जनार्दनीं बोल । फुकाचें तें वेचितां ॥४॥

३७२

श्रीविठ्ठलांचें नाम मंगल । अमंगल उद्धारलें ॥१॥

ऐस याचा थोर महिमा । शिव उमा जाणती ॥२॥

एका जनार्दनीं नाम बह्मा । सोपें वर्म जपतां ॥३॥

३७३

सर्वकाळ ज्यांचा नेम । वाचें श्रीविठ्ठलांचें नाम ।

दुजा नाहीं काहीं श्रम । विठ्ठल विठ्ठल वदती ॥१॥

धन्य पुण्य तया साचें । नामस्मरण नित्य वाचे ।

त्रीअक्षरीं नाम वाचें । धन्य त्यांचे पुण्य तें ॥२॥

ऐसा साधे जया नेम । तया सोय राखे आत्माराम ।

एका जनार्दनीं परम । प्रिय तो देवाचा ॥३॥

६७४

त्राहित त्राहित त्राहित । विठ्ठल देव तो त्राहित ॥१॥

वेदवचनें निर्धार । नाम तारक हें सार ॥२॥

तारका तारका श्रेष्ठ । पुराणीं हा बोभाट ॥३॥

म्हणे जनार्दनाचा एका । नाम तारका हें देखा ॥४॥

६७५

नामामृत गोडी वैष्णव जाणती । येर चरफडती काग जैसें ॥१॥

प्राकृत हे जन भुललें विषया । नामाविण वांया जाती देखा ॥२॥

नामें साधे मुक्ति नामें साधे भुक्ति । नामेंचि विरक्ति होत आहे ॥३॥

नाम तेंचि जालें वर्णरुपातीत । अनाम सतत उभे असे ॥४॥

एका जनार्दनीं पूर्ण नामबोध । विठ्ठलनामीं छंद सदा असो ॥५॥

३७६

दीनाचिया काजा । धांवे वैकुंठिचा राजा ॥१॥

तो हा हरी विटेवरी । समकर धरुनी करीं ॥२॥

भक्तां पुंडलिकां पाहें । उभारुनी दृढ बाहे ॥३॥

एका जनार्दनीं शरण । विठ्ठलनाम पतीतपावन ॥४॥

६७७

उभा चंद्रभागे तीरीं । कट धरुनियां करीं ॥१॥

रुप सावळें सुंदर । कानीं कुंडलें मकराकर ॥२॥

तुळसेमाळा शोभे कंठीं । अंगी चंदनाची उटी ॥३॥

भक्त आनंदें गर्जती । विठ्ठल विठठल उच्चरिती ॥४॥

एका जनार्दनी ध्यान । शोभे सगुण निर्गुण ॥५॥

६७८

कस्तुरीची उटी टिळक लल्लाटीं । सांवळां जगजेठी उभा विटे ॥१॥

नाम हें चांगलें रुप हें चांगलें । दरुशन चांगलें विठोबाचें ॥२॥

आला पंढरीसी पुंडलिकाचें भक्ति । दरुशनें मुक्तिं पातकीयांसी ॥३॥

एका जनार्दनी आनंदाचा कंद । उभा तों गोविंद विटेवरी ॥४॥

३७९

गोमटीं गोजिरी पाउलें साजिरीं । कटी मिरविली करें दोन्हीं ॥१॥

वामभागी शोभे भीमकतनया । राही सत्यभामा या जीवलगा ॥२॥

गरुड हनुमंत जोडलें ते करी । उभे महाद्वारी भक्तजन ॥३॥

एका जनार्दनीं आनंदे भक्तांचा । जयजयकार साचा विठ्ठलनामें ॥४॥

६८०

उभा विटेवरी कट धरुनियां करीं । पीतांबर साजिरी बुंथी शोभे ॥१॥

विठोबा विठोबा नामाचा हा छंद । मन तें उद्धबोध जडी पायीं ॥२॥

त्री अक्षर नाम जप हा परम । तो मंगळधाम विठ्ठल माझा ॥३॥

एका जनार्दनीं विठ्ठल कानडा । देखिला उघडा विटेवरी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel