७६१

नामेंचि क्षितीं उद्धरले । मुक्त जाहले पातकी ॥१॥

अजामेळ गणिका नारी । मुक्त निर्धारी नामेंचि ॥२॥

वाटपाडा वाल्मीक । नामें तरला निश्चयो देख ॥३॥

राम स्मरा दिननिशीं । ऋद्धि सिद्धि होती दासी ॥४॥

नाम तारक त्रिभुवनीं । शरण एका जनार्दनीं ॥५॥

७६२

अनुभवें नाम गाताती गणिका । मोक्षपद देखा प्राप्त जालें ॥१॥

उलट्या अक्षरी वाल्हा तो तरला । उद्धार तो केला चोखियाचा ॥२॥

यातीसी संबंध नाही नामस्मरणीं । जपोत पैं कोणी आदरें नाम ॥३॥

जनार्दनीं एका सांगतसे खूण । श्रीरामनाम पुर्ण सोडूं नये ॥४॥

७६३

रामनामाची धन्य ख्याती । पापी तरले पुढें तरती ॥१॥

तरला कोळी अजामेळ । गणिका आणि ते सकळ ॥२॥

नामें पावन स्त्रियादी याती । नामें सर्वा एकचि मुक्ति ॥३॥

एका जनार्दनीं शरण । नामें तिहीं लोकी पावन ॥४॥

७६४

नामाच्या उच्चारें प्रल्हाद तारिला । अजामेळ गणिकेचा उद्धार केला ॥१॥

तें नाम सोपें श्रीरामाचें । निरंतर वाचे जप करी ॥२॥

करी सर्व भावें रामनाम बोभाट । कळिकाळाचे थाट पुढें पळती ॥३॥

पळतील पातकें नाम उच्चारितां । एका जनार्दनीं म्हणतां रामनाम ॥४॥

७६५

हृदयीं सदा नाम जपे राम । तया बाधी ना क्रोध काम ॥१॥

हें तो आलें अनुभवां । जीवां सर्वा कलियुगीं ॥२॥

अजामेळादि पापराशि । नामें नेलें वैकुंठासी ॥३॥

गणिका तारिलीसे देखा । म्हणे जनार्दनीं एका ॥४॥

७६६

रामनामाच्या प्रतापें । जळती असंख्यात पापें ॥१॥

महा दोषांची दोष खाणी । नामें तारिली कुंटनी ॥२॥

नामें तरला अजामेळ । नष्ट गणिका अमंगळ ॥३॥

एका जनार्दनीं नाम । मंगल मंगल तें विश्राम ॥४॥

७६७

नामें धुवा अढळपद । नामें गणिका मोक्षपद ।

नामें अजामेळ शुद्ध । नामें वाल्हा उद्धरला ॥१॥

धन्य धन्य नाम बळी । महादोषां होय होळी ।

सोपें जपतां नामावळी । रामकृष्ण गोपाळ ॥२॥

नामें भुक्ती आणि मुक्ति । नामें एकचि सर्वा गती ।

एका जनार्दनीं शांती । नामें होय सकळां ॥३॥

७६८

सहा शास्त्र चारी वेद । नामापासोनी प्रसिद्ध ॥१॥

तें नाम गाऊं सदा । रामकृष्ण हरि गोविंदा ॥२॥

कर्म धर्म पडतां न्यून । तें सांग हरिचिंतनें ॥३॥

योग याग तप तीर्थ । नामेंविण अवघें व्यर्थ ॥४॥

गणिका मोक्ष पदा नेली । रामनामें उद्धरली ॥५॥

तारिलें जड जीव । एका जनार्दनीं दृढ भाव ॥६॥

७६९

नारद ब्रह्माचारी । रामनामें नाचे निर्धारी ॥१॥

ब्रह्मावीणा घेऊनी खांदीं । रामनाम मुखीं समाधिस्थ ॥२॥

एका जनार्दनीं नाम । श्रीरामें पाविजें निजधाम ॥३॥

७७०

नारदादी वैष्णवजन । नामेंजि पावले समाधान ।

नामें जगासी मंडन । नाम पावन सर्वांसी ॥१॥

लाहो करा राम नाम । वावुगा सांडा भवभ्रम ।

अवघा कुळधर्म । नामें जाण साधतो ॥२॥

नाम जपा दिननिशीं । आळस नका करुं मानसीं ।

एका जनार्दनीं सायासीं । नका पडूं दुजिया ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel