८२१

सकाम निष्काम वदे नामावळी । सर्व दोषां होळी नाम मंत्रें ॥१॥

सोपाचि मंत्र नाहीं अवघड । तें जपा उघड रामनाम ॥२॥

यातीहिन असो भलते नारीनर । वाचे जो उच्चारी रामनाम ॥३॥

एका जनार्दनीं एकपणें शरण । वाचे नारायण जप करा ॥४॥

८२२

सकळ साधनांचें फळ । रामनामचि केवळ ॥१॥

जप तप अनुष्ठान । अंतीं नामचि प्रमाण ॥२॥

नाना मंत्र यंत्रावळी । सोडवीना अंतकाळीं ॥३॥

महापातकी पतित । नामें तरलें असंख्यात ॥४॥

नाम सारांचें हें सार । एका जनार्दनी निर्धार ॥५॥

८२३

नाम तारक सांगडी । तेणे उतरुं पैलथडी ॥१॥

रामनाम जप सोपा । तेणें नेणों पुण्यपापा ॥२॥

सर्व साधनांचे सार । भवसिंधुसी उतार ॥३॥

ऐसा नामाचा प्रताप । एका जनार्दनी नित्य जप ॥४॥

८२४

आवडीनें नाम वदा कीं रें राम । नासे भवभ्रम क्षणमात्रें ॥१॥

सोपें हें साधन कलयुगा माझारी । नामें पैठा हरी धरें होय ॥२॥

नाम मुखी गातां कीर्तनीं नाचतां । तुटे भवव्यथा अनेक जन्म ॥३॥

एका जनार्दनीं सारांचे पैं सार । तुटे येरझार नाना योनी ॥४॥

८२५

सोपें वर्म अति सुगम । मुखे स्मरा रामनाम ॥१॥

ऐसा गजर नामाचा । कर्माकर्म लेश कैंचा ॥२॥

नामें पाप निर्दाळिलें । वेद शास्त्र हेंचि बोले ॥३॥

पुरणाचें हें संमत । नाम मुख्य मतितार्थ ॥४॥

एका जनार्दनीं नाम । तेणें निरसे कर्माकर्म ॥५॥

८२६

नामें तारिलें तारिले । महा पातकीं उद्धारिलें ॥१॥

ते हें सोपें रामनाम । जपतां निवारे क्रोध काम ॥२॥

नामें पावन जाले क्षिती । ऐसे पुराणे गर्जती ॥३॥

नाम सारांचे हें सार । एका जनार्दनीं निर्धार ॥४॥

८२७

अभक्त पातकी अपार । नामें पैल पार पावलें ॥१॥

ऐसं सोपें रामनाम । आणिकांसीतो विश्राम ॥२॥

नामें पावन होय त्रिजगती । वाचे जे वदतीं रामनाम ॥३॥

एका जनार्दनीं नाम । हरे श्रम बहुतांचा ॥४॥

८२८

तारावया जड मूढ । आहे उघड उपाव ॥१॥

सोपें रामनाम घेतां । नाहीं तत्त्वतां साधन ॥२॥

आणिकांसी साधन कष्ट । होती फलकट शेवटीं ॥३॥

तैसें नोहें नाम हें निकें । गोडी फिकें अमृत ॥४॥

एका जनार्दनीं सार । नामोच्चार सुलभ ॥५॥

८२९

नाम उत्तम चांगलें । मुक्त केलें पापियां ॥१॥

गातां मुखीं ज्याचीं कीर्ति । योगयाग घडती कोटी देखा ॥२॥

घडती सकळ तीर्थ प्रदक्षिणा । वाचे रामराणा स्मरताची ॥३॥

एका जनार्दनीं सोपें । सुलभ हरावया पापें ॥४॥

८३०

नाम पावन श्रीरामांचे । घेतां वाचे शुभची ॥१॥

नाहीं तेथें गोवांगुतीं । नामेंची चढ ती वैकुंठीं ॥२॥

भ्रमलियासी उद्धार । नाम सोपें जपतां सार ॥३॥

दोचि अक्षरांचे काम । वाचे म्हणा रामनाम ॥४॥

नाम आवडीनें घोका । म्हणे जनार्दनीं एका ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel