८३१

सोपी नामावळी । वाचे वदावी सकळीं ॥१॥

उंच नीच वर्ण याती । रामनामें सर्वां मुक्ति ॥२॥

हा तो पुरणी अनुभव । तारियेलें जीव सर्व ॥३॥

येतों काकुळती । रामनाम धरा चित्तीं ॥४॥

एका जनार्दनीं राम । वदती दोषी निष्काम ॥५॥

८३२

मागा बहुतांचें मत । नामें तरले पतीत ।

हीच सोपी जगीं नीत । रामनाम अक्षरें ॥१॥

येणे तरलें पुढें तरती । ऐशी नामाची थोर ख्याती ।

नाम धरा दृढ चित्तीं । एका भावें आदरें ॥२॥

नाम श्रेष्ठांचे साधन । नामें तुटे भवबंधन ।

शरण एका जनार्दनीं । रामनाम वदतसे ॥३॥

८३३

सुखाची विश्रांति सुख समाधान । मनाचें उन्मन नाम गाता ॥१॥

तेंहें नाम सोपें रामकृष्ण हरी । प्रपंच बाहेरी उच्चारितां ॥२॥

अहं भाव द्वेष नुरे ती वासना । द्वैताची भावना दुरी ठाके ॥३॥

एका जनार्दनी नांम हे सोपारे । येणेंचि पैं सरे भवसिंधु ॥४॥

८३४

श्रीरामानें जगाचा उद्धार । करितां उच्चार दों अक्षरीं ॥१॥

पाहतां साधन आन नसे दुजें । रामनामें नासे महत्पाप ॥२॥

ब्रह्माहत्यारी वाल्हा नामेंचि तरला । रामायणीं मिरविला बडिवार ॥३॥

एका जनार्दनीं नामापरतें थोर । नसे बडिवार दुजियाचा ॥४॥

८३५

त्रिकाळ साधन न लगे अनुष्ठान । आसन वसन त्याग नको ॥१॥

सोपें सोपेंक जपा आधीं रामनाम । वैकुंठींचे धाम जपतां लाभें ॥२॥

एका जनार्दनीं नामाचा प्रताप । तरेल तें खेप चौर्‍यांशींची ॥३॥

८३६

उत्तम अधम येथें नाहीं काम । जपें तूं श्रीराम सर्वकाळ ॥१॥

मंत्रतप कांहीं योगाची धारणा । न लगे नामस्मरणा वांचुनियां ॥२॥

योग याग तप वाउगा बोभाट । अष्टांग नेटपाट न लगें कांहीं ॥३॥

एका जनार्दनीं गावें मुखी नाम । तेणें वारे काम क्रोध सर्व ॥४॥

८३७

दानधर्म कोणान घडे सर्वथा । राम नाम घेतं सर्व जोडें ॥१॥

कर्म धर्म कांहीं न होती सांग । रामनामें पांग फिटे त्याचा ॥२॥

वेदशास्त्रांव्युप्तत्ती पढतां श्रम पोटीं । रामनामें कोटी जप घडे ॥३॥

आचार विचार न कळे साचार । एका जनार्दनीं निर्धार राम जपा ॥४॥

८३८

ऐका नामाचें महिमान । नामें पातकी पावन ।

तरले ते अधम जन । कलयुगामाझारीं ॥१॥

धन्य धन्य राम पावन । सर्व साधनांचें साधन ।

मोक्ष नामचि पूर्ण । स्मरतांचि जोडे ॥२॥

न लगे आन विधि मुद्रा । न लगे तपांचा डोंगरां ।

कासया हिंडताती सैरा । नाम जपा सादर ॥३॥

भोळ्या भाविकां हें वर्म । दृढ जपावें हो नाम ।

एका जनार्दनीं धाम । पावे वैकुंठीचें ॥४॥

८३९

सुख बहु असे आम्हां । तुझा गातां नाममहिमा ।

तेणें अंगी होतसे प्रेमा । नामीं दृढता सदोदित ॥१॥

तें नाम सोपें जयराम । भवसिंधुतारक निष्काम ।

मुखें गातां उत्तमोत्तम । सुलभ आणि सोपारे ॥२॥

नाम नौका जगालागीं । नामें पावन होत कलियुगीं ।

एका जनार्दनीं मुराला अंगीं । पावन होय नाम घेता ॥३॥

८४०

जग रामनाम म्हणे । तया कां न येती विमानें ॥१॥

नवल स्मरणाची ठेव । नामीं नाही अनुभव ॥२॥

नष्ट गणिका राम म्हणे । तिसीं वैकुंठींचे पेणें ॥३॥

एका जनार्दनीं ध्यात । राम पाहे ध्याना आंत ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel