८५१

वाऊगाची सोस करितोसी तूं मना । चिंती तुं चरणां विठोबाच्या ॥१॥

अविनाश सुख देईल सर्वदा । वाचे वदा सदा रामनाम ॥२॥

तारिले पातकी पावन कलियुगी । नामनौका जगीं तारावया ॥३॥

भवसिंधु पार रामनाम सार । न करीं विचार दुजां कांहीं ॥४॥

एका जनार्दनीं घ्यावा अनुभव । प्रत्यक्ष पाहा देव विटेवरी ॥५॥

८५२

श्रीराम श्रीराम वाचे म्हणतां । तेणें सायुज्यता हातां लागे ॥१॥

श्रीराम श्रीराम ध्यान जयासी । तोची तपराशी पावन झाला ॥२॥

श्रीराम श्रीराम ज्याची वाणी । धन्य धन्य जनीं पावन तो ॥३॥

एका जनार्दनीं श्रीराम ध्यात । निरंतर चित्त रामनामीं ॥४॥

८५३

श्रीरम ऐसें वदतांचि साचें । पातक नासतें अनंत जन्माचें ॥१॥

श्रीराम ऐसें जो उच्चारी । तयाचा पापाची होतसे बोहरीं ॥२॥

श्रीराम ऐसें उच्चारी नाम । एका जनार्दनीं नासती क्रोध काम ॥३॥

८५४

गुतंली भ्रमर कमळणी कोशीं । आदरें आमोदासी सेवितसे ॥१॥

तैसें रामनामीं लागतां ध्यान । मन उन्मन होय जाण रामनामीं ॥२॥

रामनाम बळें कर्माकार्मीं चळे । जीवासी सोहळे रामनामें ॥३॥

एका जनर्दनीं राम परिपूर्ण । प्रपंच परमार्थ रामचि जाण ॥४॥

८५५

रामनामें नामरुपा निरास । कृष्णकर्म स्मरतां कर्माचा ग्रास ॥१॥

नामें जिव्हां गर्जत अहर्निशीं । भवभव तें बापुडें परदेशीं ॥२॥

रामनाम जपतां जीवीं । जीव पवे ब्रह्मापदवी ॥३॥

जीव म्हणतां तोचि परब्रह्मा । नामें निरसलें कर्माकर्म ॥४॥

रामनामाची जीं जीं अक्षरें । तीं तंव क्षराक्षरातींत सारें ॥५॥

एका जनार्दनीं चमत्कार । नाम तें चैतन्य निर्धार ॥६॥

८५६

महापुरी जैसें वहातें उदक । मध्य ती तारक नौका जैशी ॥१॥

तैसें प्राणियासी नाम हें तारक । भव सिंधु धाक नुरे नामें ॥२॥

तये नावेंसंगें ब्राह्मण तरती । केवीं ते बुडती अनामिक ॥३॥

नाना काष्ठ जात पडे हुताशनीं । जाती ते होऊनी एकरुप ॥४॥

तेथें निवेडना धुरें रुई कीं चंदन । तैसा भेदवर्ण नाहीं नामीं ॥५॥

पूर्वा न वोळखे तेंचि पैं मरण । एका जनार्दनीं स्मरण रामनाम ॥६॥

८५७

रामनामे जो धरी भाव । तया सुलभ उपाव । नामस्मरणीं जीव । सदोदित जयाचा ॥१॥

तेणें सधिलें साधन । आभ्यासिला हो पवन । अष्टांग योग साधून । लय लक्ष दिधलें ॥२॥

योगयाग कसवटी । अभ्यासिल्या चौसष्टी । हृदयीं चिदानंद राहाटी । रामनामें ॥३॥

ध्यान धारणा मंत्रतंत्र । अवघा श्रीराम पवित्र । एका जनार्दनीं सतत । जपे वक्त्रीं ॥४॥

८५८

आयुष्याच्या अंतीं । राम म्हणतां वक्त्रीं । ते नर सेविती मुक्ती । संदेह नाहीं ॥१॥

हात पाय सिद्ध आहे । तंव तूं तीर्था जाये । तीर्थाचें मूळ पाहे । राम जप ॥२॥

नको जप माळा कांहीं । उगाच बैसे एके ठायीं । हृदयीं दृढ ध्याई । राम नाम ॥३॥

ऐसे घेई पा उपदेश । नको करुं वाउगा सोस । तेणें होय नाना क्लेश । जन्म यातना ॥४॥

हेंचि तुज सोपे वर्म । येणें तुटे कर्माकर्म । एका जनार्दनीं श्रम । सर्व नासे ॥५॥

८५९

नामे प्रायाश्चित्तांच्या कोटी । पळताती बारा वाटी ॥१॥

ऐसें नाम समर्थ जपा । तेणें सोपा सुपंथ ॥२॥

रामानामें पतित पावन । रामनामें उद्धरती जन ॥३॥

एका जनार्दनीं वाचे । घोका साचे रामनाम ॥४॥

८६०

आदरें आवडी गाती जे नाम । तया न बाधी क्रोध काम ॥१॥

नाम आठव नाम अठवा । हृदयीं सांठवा रामनाम ॥२॥

संत समुदाय वंदावे आवंडीं । अंतरीची गोडी नित्य नवी ॥३॥

एक जनार्दनीं प्रेमाचा पुतळा । विठ्ठल देखिला डोळां धन्य झालों ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel