१२२१

यातीसी नाहीं कारण । नामस्मरण हरीचें ॥१॥

तेणें तराल भवपार । आणिक विचार न करा ॥२॥

मागां पहा अनुभव । तारिले जीव निर्जिव ॥३॥

स्त्रिया शूद्र नारी नर । नामें निर्धारा मुक्तिपद ॥४॥

एका जनार्दनीं नाम । जपा विश्रामदायक ॥५॥

१२२२

उंच नीच नाहीं नामाचियां पुढें जातीचें तें गाढें नाहीं काम ॥१॥

अनामिकाहुनी असोत चांडाळ । परी नामाचा उच्चार मुखीं वसो ॥२॥

यवनादि नीच असोत भलते । परी नाम सर्वदा तें मुखी वसो ॥३॥

एका जनार्दनीं नाम वसो मुखीं । तेणें तो तिहीं लोकीं सरता होय ॥४॥

१२२३

प्राणियां उद्धार नाम मुखीं गातां । येरा तें करितां वायां जाय ॥१॥

पालथी घागरी घालितां वाउगी । नामाविण जगीं शीण तैसा ॥२॥

अमृतसागरीं राहुनी कोरडा । नाम धडपुडा नेघें प्राणीं ॥३॥

नाम संजीवनी भरलीसे जनी वनीं । एका जनार्दनीं तारक जगा ॥४॥

१२२४

भवसिंधु तराया नाम हें नौका । उतार तें लोका सोपा केली ॥१॥

न घडे न घडे आणिक साधन । नाम पंचानन नाम पुरे ॥२॥

क्षणीक आयुष्य न घडे जप तपें । नाम गांता सोपें सर्व साधे ॥३॥

मंत्र तंत्र हवन नोहे विधियुक्त । तैं होत अपघात शरीराचा ॥४॥

एका जनार्दनीं तैसें नोहें नाम । तारक निजधाम प्राणिमात्रां ॥५॥

१२२५

नामीं धरा दृढ विश्वास । घाला कळिकाळावर फास । नाम हाचि निजध्यास । रात्रंदिवस स्मरण ॥१॥

सोपें वर्म कलिमाजीं । नामें तरती जन सहजीं । योगयाग तप साधनें जीं । तया प्राप्ती नामेंची ॥२॥

नाम साधनांचे सार । सोपा मंत्र हरि उच्चार । एका जनार्दनीं सार । निवडोनि काढिलें ॥३॥

१२२६

शम दम साधन । नामावांचुन न करीं जाण ॥१॥

नाम गावें नाम गावें । वेळोवेळां नाम गावें ॥२॥

नामावांचुनी साधन नाहीं । ऐसी वेदशास्तें देती ग्वाही ॥३॥

मज भरंवसा नामाचा । एका जनार्दनीं म्हणे वाचा ॥४॥

१२२७

एका नामावांचुन । अवघा शीण भ्रामक ॥१॥

कां रे हिंडसी सैरावैरा । तपाचिया गिरिकंदरा ॥२॥

बैससी घालुनि आसन । मना मुळीं वाउगें ध्यान ॥३॥

दाविसी तें अवघें सोंग । एका जनार्दनीं नाहीं रंग ॥४॥

१२२८

दंभ मान ही उपाधी । निरसेल आधिव्याधी । नामें जोडे सर्व सिद्धि । धन्य जगीं नाम तें ॥१॥

उच्चारितां घडघडा । माया तृष्णा पळती पुढा । ऐसा नामच पोवाडा । ब्रह्मादिकां अत्यर्क्य ॥२॥

आगमनिगमांचें ज्ञान । नामें साधे वैराग्य निधान । एका जनार्दनीं पावन । नाम जाण निर्धारें ॥३॥

१२२९

नाम मुखीं गातां विषयांची वार्ता । नोहेचि सर्वथा गातीयासी ॥१॥

नाम तें पावन नाम तें पावन । नामवांचूनि जाण श्रेष्ठ कोण ॥२॥

एका जनार्दनीं नाम तें पावन । त्रिभुवनीं मंडन नाम सत्य ॥३॥

१२३०

नामस्मरण अहो जना । तेणें तुटें भवबंधना । येचि देहि येचि काळीं । भजीजे रे नाम जाण ॥१॥

ध्रुव अजामेळ गणिका । नाममात्रें तारिले देखा । आणिकाही भक्त देखा । मोक्ष पावले नामें एका ॥२॥

जो जो कोणी प्रेमें भजतां । पाविजेल सायुज्यता । ऐशी भाक घे रे आतां । जप तप नाम स्मरतां ॥३॥

दीनबंधु दयासिंधु । जेणें केला परमानदु । दृष्ट जना करी भेदु । एका जनार्दनीं नित्यानंदु ॥४॥

१२३१

नामापाशीं तिष्ठे देव । नामापाशीं वसे भाव । नामापाशी मुक्ति गौरव । अहर्निशीं वसतसे ॥१॥

नामापाशी ऋद्धिसिद्ध । नामापाशीं ते समाधी । नामें तुटती उपाधी । जन्मोजन्मीच्या ॥२॥

नामापाशीं भुक्ति मुक्ति । नामापाशी ते विरक्ती । नामें पातकें नासती । बहु जन्माचीं ॥३॥

एका जनार्दनीं नाम । गातां निरसे भवभ्रम । साधन उत्तम । कलियुगामाझारीं ॥४॥

१२३२

असोनि दुराचारी । मुखा गाय नित्य हरी ॥१॥

तयाचें नमस्कारावे चरण । धन्य जगीं तो पावन ॥२॥

वाचे सदा गाय नाम । तोचि पावे निजधाम ॥३॥

एका शरण जनार्दनीं । तोचि पवित्र त्रिभुवनीं ॥४॥

१२३३

राजाला आळस संन्याशाला सायास । विधवेसी विलास विटंबना ॥१॥

व्याघ्रासी शांतता गाईसी उग्रता । वेश्येसी हरिकथा । विटंबना ॥२॥

दानेंविण पाणी । घ्राणेविन घाणी । नामेंविण वाणी विटंबना ॥३॥

एका जनार्दनीं भावभक्तीविणा । पुण्य केलें नाना विटंबना ॥४॥

१२३४

आपुलें कल्याण इच्छिलें जयासी । तेणें या नामासी विसंबूं नये ॥१॥

करील परिपुर्ण मनींचे हेत । ठेविलिया चित्त नामापाशी ॥२॥

भुक्ति आणि मुक्ति वोळगंती सिद्धि । होईल कीं वृद्धि आत्मनिष्ठा ॥३॥

एका जनार्दनीं जपतां हें नाम । पुरवील काम जो जो हेतु ॥४॥

१२३५

मुळीचे आहे संतवचन । नामस्मरणें तरती जन ॥१॥

तोचि आधार धरुनी पोटीं । बोलतों नेहटीं भाविकां ॥२॥

अवघ्या यातीसी उद्धार । न लगे श्रम करा नामोच्चार ॥३॥

एका जनार्दनीं पूर्वापार । नामाचा बडिवार बोलती ॥४॥

१२३६

आनंदें निर्भर नाम गावें वाचे । तेणें कळिकाळाचें भय नाहीं ॥१॥

नामाचें सामर्थ्य कळिकाळ वंदी माथां । मुक्ति सायुज्यता पाठी लागे ॥२॥

यज्ञ योग जप तप नामें सर्व सिद्धि । वायां तूं उपाधी गुंतूं नको ॥३॥

एका जनार्दनीं नाम भवांचें तारक । निश्चियेंसी देख गाये वाचे ॥४॥

१२३७

जयाचें देखतां चरण । तुटेल जन्म जरा मरण ॥१॥

तो हा चंद्रभागेच्या तीरी । कट धरुनिया करीं ॥२॥

नाम घेतां आवडी । तुटेल संसाराची बेडी ॥३॥

भाविकांसी पावे । मागें मागें त्यांच्या धांवे ॥४॥

म्हणे जनार्दनाचा एका । आवडीने नाम घोका ॥५॥

१२३८

प्रेमयुक्त नाम आदरें घेतां । तेथें नाहीं सुखदुःखवार्ता ॥१॥

नामीं धरुनी आवडी । उच्चारावें घडोघडी ॥२॥

योगयाग तपासाधान । नाम उच्चारितां संपुर्ण ॥३॥

ऐसा नामीं निजध्यास । एका जनार्दनीं त्याचा दास ॥४॥

१२३९

मुखीं नाम हातें टाळीं । साधन कलीं उत्तम हें ॥१॥

न घडे योगयाग तप । नाहीं संकल्प दुसरा ॥२॥

संतापायीं सदा मन । हृदयीं ध्यान मूर्तीचें ॥३॥

एका जनार्दनीं सेवा । हीचि देवा उत्तम ॥४॥

१२४०

काया वाचा आणि मन । जयाचें ध्यान संतचरणीं ॥१॥

तोचि पावन जाहला जगीं । दुजे अंगीं कांहीं नेणें ॥२॥

सदा वाचे गाय नाम । न करी काम आणीक तो ॥३॥

एका जनार्दनीं देव । नेदी तया दुजा ठाव ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel