१४३१

हेंचि कलीमाजीं साधन । आवडी कीर्तन हरीचें ॥१॥

न घडे योगयागतप । होय अनुताप कीर्तनीं ॥२॥

भावभक्ति लागे हातीं । प्रेम धरिती कीर्तनीं ॥३॥

आवडी धरा हरिकीर्तनीं । एका शरण जनार्दनीं ॥४॥

१४३२

नरदेहा येउनी करावें कीर्तन । वाचे नामस्मरण विठ्ठलाचें ॥१॥

आणिक सायास न करी आळस । सर्वकळ सोस हाचि वाहे ॥२॥

घटिका आणि पळ न वेंची वायां । नामस्मरणीं काया झिणवावी ॥३॥

प्रपंच परमार्थ करी का रें सारखा । संसार पारखा करुनी सांडी ॥४॥

माईक हें धन इष्टमित्र सखे । अंतकाळीं पारखे अवघे चोर ॥५॥

एका जनार्दनीं न धरी भरंवसा । कोण यमपाशा चुकवील ॥६॥

१४३३

देह लावी हरिकीर्तनीं । येर कारणीं पडुं नको ॥१॥

सोडी संसाराचा छंद । कीर्तनीं गोविंद आठवा ॥२॥

होई दास संतचरंणीं । पायवणी वंदी तूं ॥३॥

काया लावी देवाकडे । येर सांकडें वारिल ॥४॥

अनुमोदन सर्वाठायीं । मन देई हरिचरणीं ॥५॥

म्हणे जनार्दनाचा एका । काया वाचा भाविका सांगत ॥६॥

१४३४

नरदेह उत्तम चांग । धरा लाग कीर्तनीं ॥१॥

वायां जाऊं नेदी घडी । करा जोडी कीर्तन ॥२॥

क्षणभंगुर हा देहो । करा लाहो कीर्तनीं ॥३॥

संसार अवघा नासे । खरें दिसे कीर्तन ॥४॥

म्हणे जनार्दनीं एका । उपाय निका कीर्तन ॥५॥

१४३५

शुद्ध ज्याचें मन । तया आवडे कीर्तन ॥१॥

येर ते पामर पातकी । दैन्यवाणें तिहीं लोकीं ॥२॥

नावडे हरीचें कीर्तन । तेथें वसे नाना विघ्र ॥३॥

एका शरण जनार्दनीं । करा कीर्तन अनुदिनीं ॥४॥

१४३६

भुललें ते प्राणी विसरले कीर्तना । अंतीं त्या पतना वारी कोण ॥१॥

जयांसी नावडे हरींचें किर्तन । ते जाणावे पाषाण कलीमाजीं ॥२॥

मागें सांगितलें संतीं अनुभवुनी । तयावया जनीं किर्तन नौका ॥३॥

एका जनार्दनीं सारांचें हें सार । कीर्तने भवपार मॄत्युलोकीं ॥४॥

१४३७

करुनी हरिकीर्तन । तेथें सेविती जे अन्न ॥१॥

ऐसे अभागी खळ । परम चांडाळ कलीयुगीं ॥२॥

हरिकथा माउली । विकिताती अर्थभुली ॥३॥

पंच महापातक । तया घडे दोष देख ॥४॥

एका जनार्दनीं । करा कीर्तन अनुदिनीं ॥५॥

१४३८

करुनी कीर्तन मागती जे द्रव्य । तें जाणावें वैधव्य विधवेचें ॥१॥

सर्व अलंकार शरीर शोभलें । वायांपरी गेलें कुंकुहीन ॥२॥

मावनानें भावें करावें कीर्तन । आनंदे वर्तन वैष्णवांपुढें ॥३॥

एका जनार्दनीं कामनीक कीर्तन । करितां पतन जन्मोजन्मीं ॥४॥

१४३९

वाउगा पसारा नेणें तो पामर । कीर्तनीं निर्धार ठेवीचिना ॥१॥

सोपें हें वर्म कीर्तन हरीचें । उच्चारी रे वाचे रामनाम ॥२॥

एका जनार्दनीं कीर्तन आदरें । सर्वभावें निर्धारें श्रवण करी ॥३॥

१४४०

जो जो काळ वेंचिता कीर्तनीं । तों तों सार्थक जनेकें होतसे ॥१॥

साधन जागा साधन जागा । पुढें दगा चुकवी ॥२॥

करी कीर्तनीं तूं वेग । तेणें संग तुटेल ॥३॥

म्हणे जनार्दनाचा एका । उपाय सोपा कलीमाजीं ॥४॥

१४४१

सप्रेम नाचोनि वाजवा टाळी । गर्जा हरिकथा नामावळी ॥१॥

ऐशी कथेची आवडी । दोष गेले देशोधडी ॥२॥

सेवितां कथामृतसार । दीनवदनें दिसे संसार ॥३॥

एका जनार्दनीं प्रेम । स्वयें सांगें पुरुषोत्तम ॥४॥

१४४२

दीन म्हणोनी नाच रे कीर्तनीं । तेणें चक्रपाणी करी कृपा ॥१॥

अनाथाचा नाथ पतीतपावन । म्हणोनी कीर्तन तया गोडी ॥२॥

एका जनार्दनीं गोडाचें तें गोड । कीर्तन सुरवाड तिहीं लोकीं ॥३॥

१४४३

अपाय उपाय न टाकी कीर्तन । सदा सर्वकाळ ध्यान रामकृष्ण ॥१॥

तयाचिये घरीं वसे नारायण । लक्ष्मी सह आपण कार्य करी ॥२॥

एका जनार्दनीं कीर्तनासाठीं । देव धांवें पाठीं त्या मागें ॥३॥

१४४४

नसे वैकुंठी हरी । नाचे कीर्तनीं परोपरी । भक्तांबरोबरी । पाठी धांवे तयाच्या ॥१॥

म्हणोनी करावें कीर्तन । तेणें तुष्टें नारायण । मनोरथ करी पुर्ण । इच्छिलें ते सर्वदा ॥२॥

आणा अनुभव मनीं । करा कीर्तन अनुदिनीं । एका जनार्दनीं । उभा असे कीर्तनीं ॥३॥

१४४५

साधन नको आणिक कांहीं । करी लवलाही कीर्तन ॥१॥

मोक्ष मुक्ती ठाके पुढें । येर अवघें तें बापुडें ॥२॥

भक्ति साधे नवरत्न । कीर्तनें होती ते पावन ॥३॥

एका जनार्दनीं कीर्तन । ओहं सोहं कोहं जाती पळुन ॥४॥

१४४६

समाधीचें स्थान हरिकीर्तन । येर अवघा वांयां शीण ।

कासया गुदाग्रीं अंगुष्ठ लाऊन । खटाटोप पसारा ॥१॥

राम कृष्णा हरि वासुदेवा । हाचि छंद असो जीवा ॥धृ॥

आसन ध्यान मुद्रा लक्षण । कर्मकांड क्रिया धर्म जाण ।

वाउगें कासया भस्मलेपन । कीर्तन अंतरीं नसेची ॥२॥

माळा मुद्रा शृंगार भारी । भाळे भोळे भोदीं निरंतरीं ।

ऐशी कीर्तनमर्यादा नाहीं निर्धारीं । निरपेक्ष हरिकीर्तन ॥३॥

श्रोता वक्ता होउनी सावधान । परनिंदा परपीडा टाकून ।

कीर्तन करावें श्रवण । रामकृष्ण नामें उच्चार ॥४॥

ऐसं ऐकतां कीर्तन । समाधीसी तेथें समाधान ।

अष्टांगादि कर जोडोनि । उभें सर्वदा राहाती ॥५॥

कीर्तनें होय सर्व सिद्धी । तुटती भवपाश आधिव्याधी ।

एका जनार्दनीं नाहीं उपाधी । कीर्तनी श्रवण केलिया ॥६॥

१४४७

जें पदींनिरुपण तेंचि हृदयीं ध्यान । तेथें सहजीं स्थिर राहे मन ।

कीर्तनासी तोषोनि कळिकाळ तुष्टला । समाधीसी समाधान रे ॥१॥

कीर्तनें सिद्धि कीर्तनें सिद्धि । कीर्तनें समाधान बुद्धी ।

कीर्तनीं विनटले नारद प्रल्हाद । द्वंद्वामाजीं समाधी रे ॥२॥

कीर्त्नीं सद्भाव अखंड अहर्निशीं । पाप नरिघे त्याच्या देशीं ।

निजनामे निष्पाप अंतर देखोनीं देव तिष्ठे तयापशीं रे ॥३॥

हरिनम कीर्तनें अभिमान सरे । आणिक श्रेष्ठ आहे काज ।

सद्भावें कीर्तनीं गातां पैं नाचतां । लोकेषणा सांडीं लाज रे ॥४॥

कलीमाजी कीर्तन श्रेष्ठ पैं साधन । साच अन मानी ज्यांचें मन ।

नामासी विन्मुख जन्म त्यसी दुःख । त्या केविं होय समाधान रे ॥५॥

कीर्तानाचेनि पंथें लाजविलीं तीर्थें । जप तपासे केले मुक्त ।

हरिनामे लोधला देवाधि देवो । वैकुंठचि केलें तेथें रे ॥६॥

व्रतां तपां तीर्थों न भेटे जो पाहतां । तो कीर्तनीं सांपडे देवो ।

तनु मन प्राणें कीर्तनीं विनटले । भावा विकला वासुदेवो रे ॥७॥

एका जनार्दनीं कीर्तन भावें । श्रोता वक्ता ऐसें लाहावें ।

गर्जत नामें निशाण लागुनि । सकळिकां वैकुंठासी जावें रे ॥८॥

१४४८

सदैव आवडे ज्यां कीर्तन । धन्य पावन जगीं ते ॥१॥

ब्रह्माचारी गृहस्थाश्रमीं । करिती कीर्तन निजधामीं ॥२॥

शुद्र अथवा अति निंद्य । कीर्तनीं वंद्य सर्वथा ॥३॥

यवन मांतगादि जन । कीर्तनीं पावन कलियुगीं ॥४॥

एका शरण जीवेंभावें । सदा कीर्तन करावें ॥५॥

१४४९

दुजेंपणें पाहे तरी देवाचे चरण । आणि तें कीर्तन वैष्णवांचें ॥१॥

कीर्तनीं नाचती हरिदास प्रेमें । दुजेपणा नेमें हारुनी जाय ॥२॥

एका जनार्दनीं दुजेपणा टाकुणी । वासुदेवचरणीं लीन होई ॥३॥

१४५०

कायावाचामनें निग्रह करीं । कीर्तन सर्व भावे ऐकें निर्धारीं । अष्टांग साधन न करी । सुखें करी कीर्तन ॥१॥

देव तुष्टेल तुष्टेल । सर्वभाव तुझा पुरवेल ॥ध्रु॥

शांती क्षमा दया उन्मनी । आशा मनीषा तृष्णा दवडोनी । काम क्रोध मद लोभ बंदीखानी । घालीं नेउनी निर्धारें ॥२॥

सर्वांभुतीं समदृष्टी । पाहे सर्व एकमय सृष्टी । तरी ऐक्य कीर्तनगोठीं । परमानंदें आल्हाद ॥३॥

धरी संतांचा सांगात । कीर्तनीं करीं शुद्ध चित्त । एका जनार्दनीं वचनार्थ । राम हरि गोविंदा ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel