१९०१

येउनी नरदेहा गमविलें आयुष्य । नाहीं हृषीकेश स्मरला मनीं ॥१॥

मुखें नाहीं केलें देवाचें स्मरण । ऐसा अधम जन जाहलों देवा ॥२॥

नाहीं तें ऐकलें कीर्तन संतांचे । कर्ण बधिर साचें जाहलें देवा ॥३॥

करें नाही केला दानधर्म कांहीं । ऐसा अपराधी पाहीं जाहलों देवा ॥४॥

चरणन चालती तीर्थयात्रेप्रती । ऐसा आत्मघाती जाहलों देवा ॥५॥

एका जनार्दनीं संसारांचा छंद । नाहीं तो गोविंद आठविला ॥६॥

१९०२

कासया निर्मिला अपवित्र संसार । न घडे विचार योग्यायोग्य ॥१॥

दिननिशीं मना द्रव्याची वासना । परी नारायणा स्मरण नाहीं ॥२॥

ऐसी मी भुललों प्रपंच लिगाडीं । एक जनार्दनीं उडी घाली देवा ॥३॥

१९०३

कासया संसार लाविला छंद । तेणें हा गोविद अंतरला ॥१॥

न कळे दिवस जातो तेंकळेना । संसार फिरतसों ॥२॥

एका जनार्दनीं भाकितो करुणा । माझिया वचना चित्त द्यावें ॥३॥

१९०४

आशामनीषातृष्णा बांधिती दावणीं । सोडवी चक्रपाणीं संतसंगें ॥१॥

कामक्रोधालोभ याचा पसर । पाडिती विसर तुझा देवा ॥२॥

मोह ममता भ्रांति ढकलिती कूपीं । दावीं पैं सोपी वाट आम्हां ॥३॥

जनार्दनाचा एका विनवी सर्वांतें । भजा एकचित्तें विठोबासे ॥४॥

१९०५

आशा पाश देवा नको या संसारी । नका चौर्‍यायंशीं फेरी वेरझार ॥१॥

सोडवी देवा कुंसगा टाकुन । मन तें उन्मन तुझे चरणीं ॥२॥

एका जानर्दनीं मनोगत सिद्धि । कैं कृपानिधी पुरवाल ॥३॥

१९०६

जन्म जरा मरण व्याधी । ही तो उपाधी लागलीसे ॥१॥

लिगाड तेंमुळीं वायां । जैसी छाया अभ्रीची ॥२॥

विषयकर्दमाचें मेळीं । विठ्ठल वनमाळीं येवो आतां ॥३॥

एका जनार्दनीं ध्यास । अवघीं आस पायां पैं ॥४॥

१९०७

संचित माझे वोखटें देवा । तुम्हीं केशवा काय करा ॥१॥

पहा वासुकी शिवकंठीं । क्षुधा पोटी वायूची ॥२॥

एका जनार्दनीं शरण । कर्माची गहन पैं माझें ॥३॥

१९०८

धांव रे धांव आतां । दीनवत्सला रामा । संसारसंग गोष्टी । मी गुंतलों कामा ॥१॥

तारुण्य अभिमानें । अंगा भरला ताठा । विषयसंपतीचा । मज फुटला फाटा ॥२॥

विषय भोगितांना । देह पोसलें माझें । स्वाहित आठवेना । ध्यान चुकलों मी तुझें ॥३॥

विषया मिकलिलों । तुज शरण मी आलों । एका जनार्दनीं पायीं । लीन मी जाहलों ॥४॥

१९०९

धांव नारायण । माझ्या दुःखाच्या निरसना ॥१॥

संसारें मी कष्टलों । तुजलागीं शरण आलों ॥२॥

कोण सोडवील आतां । तुजविन जी अनंता ॥३॥

तूचि मायबापा । निवारिसी सर्व तापा ॥४॥

एका जनार्दनीं पाय । धरुनियां चित्तीं राहे ॥५॥

१९१०

धांवे धांवे श्रीहरी । निवारीं संसार बोहरीं ॥१॥

आडलियाचा विसांवा । धांवे पावे तुं केशवा ॥२॥

तूं दीनदयाळ हरी । आपुले आम्हां जतन करी ॥३॥

अंकित भक्तांचा । ऐसी बोले वेदवाचा ॥४॥

एकाएकीं जनार्दनीं । आठ सहस्त्र बोले वाणी ॥५॥

१९११

तुजविण आम्हां कोण आहें देवा । धांव यादवराया मायबापा ॥१॥

पडिलोंसे डोहीं प्रपंच आवर्ती । कोण करी शांति तुजविण ॥२॥

जन्ममरणाचा पडिलासे फेरा । सोडवी दातारा मायबापा ॥३॥

एका जनार्दनीं धांवे लवलाहीं । येवोनियां हृदयीं ठाव देई ॥४॥

१९१२

सांडिला प्रपंच जाहलोंसे उदास । सर्वभावें कास धरिली तुमची ॥१॥

आतां माझे हित करीं गा देवराया । नाही तरी वाया सहज गेलों ॥२॥

लौकिकांची चाड नाहीं मज शंका । तुम्हावांचुनी एका पाडुरंगा ॥३॥

एका जनार्दनीं पायाची आवडी । सर्व माझी जोडी नाम तुझें ॥४॥

१९१३

ब्रीदावळी करे आपुली जतन । आलों मी शरण जनार्दन ॥१॥

राखीं माझी लाज पतित पतित । तुझा मुद्रांकित रंक एक ।२॥

काम क्रोध लोब दंभ अहंकार । हे हेहीं अनिवार सोसवेना ॥३॥

आशा मनीषा माया सखीया सांगातिणी । करिती गौसणी सदा जीवा ॥४॥

चित्त वित्त आशा लागलीसे पाठीं । इहीं जीवे साठी केली मज ॥५॥

जनार्दना शरण अनन्य पैं एका । काये वाचे देखा चरणीम विनटला ॥६॥

१९१४

तुमच्या चरणांपरतें । शरण न जाण आणिकातें ॥१॥

ऐसे चरण पावन । उद्धरिले असंख्य जन ॥२॥

चरणरजांचें ध्यान । शंकरक करितो आपण ॥३॥

एका जानर्दनीं शरण । धरिलें चरण न सोडी जाण ॥४॥

१९१५

अहो करुणाकरा पतितपावना । आमुच्या वचना चित्त द्यावें ॥१॥

दिन मी हीन रंकाहुनी रंक । म्हणोनियां देह शरण तुम्हां ॥२॥

आमुचें सांकडें वारुनिया देवा । द्यावी तुम्ही सेवा एका चित्तें ॥३॥

एका जनार्दनीं संकल्प हा दृढ । आतां नाहीं गुढ तुम्हापुढें ॥४॥

१९९६

कीर्ति तुमची तिहीं लोकीं । तारिलें पातकी अपार ॥१॥

जाहला विश्वास आधीं मना । धरिलें चरणां दृढ मग ॥२॥

एका जनार्दनीं लडिवाळ । करा सांभाळ आतां माझा ॥३॥

१९९७

कृपाळु माधव तुं मुरारी । अच्युता अनंता श्रीहरी ॥१॥

तुम्हीं तारिलें अहिल्येसी । उद्धरिलें अजामेळासी ॥२॥

महा दोषांची दोषश्रेणीं । ती तारिली कुंटिणी ॥३॥

रामनाम जपे अनुदिनीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥

१९१८

त्रिभुवनीं तुमची थोरी । पतितपावन म्हणती हरि ॥१॥

तें हें तारक सत्यनाम । शंकराचा तूं विश्राम ॥२॥

ब्रीद गाजे पतिताचें । तिहीं लोकी तुमचें साचें ॥३॥

शरण एका जनार्दनीं । आम्हीं पतित तूं पावन ॥४॥

१९९१

उपमन्यु प्रल्हादु तारिलें आळीकें । मी तुझें लाडकें सानपणें ॥१॥

नेणतीयांसी धांवसी तुं त्वरा । शाहणे वेरझारा मरताती ॥२॥

एका जनार्दनीं शरण एकपनीं । नेणतां जाणतांचरणीं तुझे देवा ॥३॥

१९२०

पोटींचे बाळ अवगुणी वोखटें । परी मायबाप स्नेहो मोठें ॥१॥

तयापारी उदरा आलों जी स्वामी । अवगुणांच्यापरी नुपेक्षा तुम्हीं ॥२॥

गुण नाहीं तेथे कर्म कैंचे धड । परी मायाबाप वाटतसे कोड ॥३॥

एका जनार्दनीं उद्भव साचें । म्हणोनि हरिदासा कौतुक त्यांचे ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel