२३८१

आम्हां येणें न जाणें जिणें ना मरणें । करणें ना भोगणें पापपुण्य ॥१॥

जैसें असों तैसे आपोआप प्रकाशों । कवणा न दिसों ब्रह्मादिकां ॥२॥

नवल नवल सांगती सखोल । अनुभवीं हे बोल जाणताती ॥३॥

आम्हां कवण पदा जाणें ना कवण देवा भेटणें । आप आपणांमाजीं राहणें अखंडीत ॥४॥

सत्य कैलास वकुंठ हे आम्हां माजी होती जाती । या सकळां विश्रांती आमुच्या रुपीं ॥५॥

चंद्र सुर्य तारा हा पंचभौतिक पसारा । आम्हांमाजीं खरा होत जात ॥६॥

इतुकें दिधलें आम्हांक गुरुजनार्दनीं । एक जनार्दनीं । एका जनार्दनीं व्यापियेला ॥७॥

२३८२

सात्विकाभरणें रोमासी दाटणे । स्वेदाचे जीवन येऊं लागे ॥१॥

कांपे तो थरारी स्वरुप देखे नेत्री । अश्रु त्या भीतरीं वाहताती ॥२॥

आनंद होय पोटीं स्तब्ध जाती कंठीं । मौन वाक्पृटीं धरुनी राहे ॥३॥

टाकी श्वासोच्छवास अश्रुभाव देखा । जिरवुनी एका स्वरुप होय ॥४॥

एका जनार्दनीं ऐसेम अष्टभाव । उप्तन्न होतां देव कृपा करी ॥५॥

२३८३

बोधभानु तया नाहीं माध्यान्ह सायंप्रातर नाहीं तेथें कैंचा अस्तमान ॥१॥

कर्माचि खुंटलें करणेंचि हारपलें । अस्तमान गेलें अस्तमाना ॥२॥

जिकडे पाहे तिकडे उदयोचि दिसे । पूर्वपश्चिम तेथें कैंचा भासे ॥३॥

एका जनार्दनीं नित्य प्रकाशा । कर्माकर्म जालें दिवसा चंद्र जैसा ॥४॥

२३८४

श्रवणीं ऐकोनी पाहावया येणें । तंव डोळेचि जाले देखणें ॥१॥

आतां पहावें तें काये । जे पाहें तें आपणचि आहे ॥२॥

जें जें देखों जाये दिठी । तें देखणें होउनी नुठी ॥३॥

एका जनार्दनीं पाहे लीला । पाहतां पाहणें अवलीळा ॥४॥

२३८५

रतीच्या अंती जें होय सुख । सर्वांगीं तें सर्वदा देख ॥१॥

इंद्रियाविण आहे गोडी । तेथींचा स्वादु कवण काढी ॥२॥

आधींच करणी कैसी यक्षिनी । गोडपणें कैसी देत आहे धणी ॥३॥

एका जनार्दनीं लागला छंदु । एकपणेंविण घेतला स्वादु ॥४॥

२३८६

पाहतां पाहतां कैसें पालटलें मन । देखणेचि दाविलेंक चोरुनी गगन ॥१॥

आनंदें जनार्दना लागलों मी पायां । गेली माझी माया नाहींपणे ॥२॥

देखणेंचि केवळ दिसताहे सकळक । सुखाचे निष्फळ वोतिलें जग ॥३॥

एक जनार्दनीं निमाला एकपणें । मोहाचें सांडणें माया घेऊनी ॥४॥

२३८७

ताट भोक्ता आणि भोजन । जो अवघाचि झाला आपण ॥१॥

भली केली आरोगण । सिद्ध स्वादुचि झाला आपण ॥२॥

कैसी गोडी ग्रासोग्रासीं । चवी लागली परम पुरुषीं ॥३॥

रस सेवितां स्वमुखें । तेणें जगदुदर पोखे ॥४॥

संतृप्त झाली तृप्ती। क्षुधेतृषेची झाली शांती ॥५॥

एका जनार्दनीं तृप्त झाला । शेखीं संसारा आंचवला ॥६॥

२३८८

मारग ते बहु बहुत प्रकार । प्रणव विचार जयापरी ॥१॥

आदि अंतु नाहीं मार्गाची ग्वाही । साधनें लवलाहीं वायां पंथें ॥२॥

जया जी भावना तोचि मार्ग नीट । परी समाधान चित्त नाहें तेथें ॥३॥

एका जनार्दनीं संतमार्ग खरा । येर तो पसारा हाव भरी ॥४॥

२३८९

शय्याशयन आणि शेजार । तें अवघेंचि जालें शरीर ॥१॥

कैसें नीज घेतसे निजे । नीज देखोनी समाधी लाजे ॥२॥

जागृती जागे निजे । स्वप्न सुषुप्तीचे निजगुंजें ॥३॥

एका जनार्दनीं निजला । तो नीजचि होउनी ठेला ॥४॥

२३९०

सन्मुख देखोनियां भेटी धांवा । तंव दशादिशा उचलल्या खेंवा ॥१॥

आतां नवल भेटी देव । पुढें आलिंगितां सर्वांगी खेंव ॥२॥

आलिंगनीं गगन लोपे । खेंव द्तां गगन हारपे ॥३॥

एका जनार्दनीं भेटी भावो । जिण्या मरण्या नुरेचि ठावो ॥४॥

२३९१

तळीं हारपली धरा । वरी ठावो नाहीं अंबरा ॥१॥

ऐसा सहजीसहज निजे । एकाएकपणेंविन शेजे ॥२॥

डावे उजवे कानीं । निजे नीज कोंदलें नयनीं ॥३॥

दिवसनिशीं हारपलीं दोन्हीं । एका निजिजे जनार्दनीं ॥४॥

२३९२

पाहुं जातां नारायणा । पाहतां मुकिजे आपणा ॥१॥

ऐसा भेटीचा नवलाव । पाहतां नुरे भक्तदेव ॥२॥

पाहतां नाठवेचि दुजें । तेंचि होइजे सहजें ॥३॥

एका जनार्दनीं भेटी । जन्ममरण होय तुटी ॥४॥

२३९३

मुनीजन साधिती साधनीं । तो हरी कोंदला नयनीं ॥१॥

नवल हो नवल वाटलें । निरखितां निरखितां मनहीं आटले ॥२॥

स्थूल देहीं देहधर्मा । गोष्टी केली हो परब्रह्मां ॥३॥

व्यापला तो एका जनार्दनीं । पाहतां दिसे जनीं वनीं ॥४॥

२३९४

उघडा देव दिंगबर भक्त । दोहींचा सांगात एक जाहला ॥१॥

देव नागवा भक्त नागवा । कोणाची केशवा लाज धरुं ॥२॥

देव निलाजरा भक्त बाजारी । देहामाझारी उरीं नाहीं ॥३॥

उघडें नागवें जाहलें एक । एका जनार्दनीम देखणें देख ॥४॥

२३९५

भूमी शोधोनी साधिलें काज । गुरुवचन बीज पेरियलें ॥१॥

कैसें पिक पिकलें प्रेमाचें । सांठवितां गगन टाचें ॥२॥

सहाचारी शिणले मापारी । कळला नव्हे अद्याप वरी ॥३॥

एकजनार्दनीं निजभाव । देहीं पिकला अवघा देव ॥४॥

२३९६

मी मी म्हणतां अवघें मी जालों । तूंपणाचा बोला लाजूनियां ठेलों ॥१॥

मी ना कोणाचा ना माझें कोणी । एकुविण एकु सहज निर्वाणीं ॥२॥

माझें मीपण मजमाजीं निमालें । एकोनेक सकळ सहजीं सहज जालें ॥३॥

एकाजनार्दनीं गणीत नवानी येकु । परापरते सारुनी उगला सिध्दांतु ॥४॥

२३९७

मी मी म्हणतां माझें मीच मी नेणें । चुकली रविकिरणें सुर्या धुंडिती ॥१॥

मजलागीं मी तो म्यां भेटावें तें कैंसें । दीपप्रभा पुसे दीपकासी ॥२॥

सबाह्म अभ्यंतरीं गगन सावकाश । तैसें घटावकाश महदाकाशी ॥३॥

एका जनार्दनीं एकत्वें जन वन । जन आम्हां दिसे जनार्दन ॥४॥

२३९८

भावों देव कीं देवीं भाव । दोहींचा उगव करुनी दावा ॥१॥

भावा थोर कीं देव थोर । दोहींचा निर्धार करुनी दावा ॥२॥

जंव जंव भाव तंव तंव देव । भाव नाहीं तेथें देवाचि वाव ॥३॥

एका जनार्दनीं भावेंचि देव । लटिके म्हणाल तरी हृदयीं साक्ष पहा हो ॥४॥

२३९९

पहालें रे मना पहालें रे । बुद्धिबोधें इंद्रियां सम जालें रें ॥१॥

नयनीं पहातां न दिसे बिंब । अवघा प्रकाश स्वयंभ ॥२॥

एका जनार्दनीं पहाट । जनीं वनीं अवनीं लखलखाट ॥३॥

२४००

कवण देव कवण भक्त । एक दिसे दोहीं आंत ॥१॥

भक्त ध्यानीं जंव बैसला । पूज्य पुजक स्वयें जाहला ॥२॥

ध्यानीं हारपलें मन । सरलें ध्यातां ध्येय ध्यान ॥३॥

एका जनार्दनीं भाव । देव म्हणण्या नुरे ठाव ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to श्रीसंतएकनाथ गाथा - भाग दुसरा