२४६१

सूर्य अंधारांतें नासी । परी तो सन्मुख नये त्यासी ॥१॥

माझें जिणें देखणेपण । तेंचि मायेचें लक्षण ॥२॥

देहीं देहअभिमान । जीवीं मायेचें तें ध्यान ॥३॥

एका जनार्दनीं माया । देहाधीन देवाराया ॥४॥

२४६२

नित्य नूतन दीपज्वाळा । होती जाती देखती डोळा ॥१॥

जागृति आणि देखती स्वप्न । दोहींसी देखतां भिन्न भिन्न ॥२॥

भिन्नपणें नका पाहुं । एका जनार्दनीं पाहूं ॥३॥

२४६३

काचरट पाहतां कडु तें शेंद । परिपाकीं पाहतां गोडचि शुद्ध ॥१॥

कडु तेंचि गोड कडू तेंचि गोड । समरस सोयारिक ॥२॥

साखरेचें वृंदावन केलें । चाखो नेणें तें नाडोनि गेलें ॥३॥

एका जनार्दनीं प्रपंचु एकु । नश्वर म्हणतां नाडला लोकु ॥४॥

२४६४

जनार्दनं मज केला उपकार । पाडिला विसर प्रपंचाचा ॥१॥

प्रपंच पारखा जाहला दुराचारी । केलीसे बोहरी कामक्रोधां ॥२॥

आशा तृष्णा यांचे तोडियलें जाळें । कामनेचें काळें केलें तोंड ॥३॥

एका जनार्दनीं तोडियेलें लिगाड । परमार्थ गोड दाखविला ॥४॥

२४६५

जनार्दनें केलें अभिनव देखा । तोडियेलें शांखा अद्वैताची ॥१॥

केला उपकार केला उपकार । मोडियेलें घर प्रपंचाचें ॥२॥

एका जनार्दनीं एकपणें देव । दाविला नवलाव अभेदाचा ॥३॥

२४६६

कामक्रोध वैरीयांचे तोडियेले फांसे । जनार्दनें सरसें केलें मज ॥१॥

देहाची वासना खंडुन टाकिली । भ्रांतीची उडाली मूळ दोरी ॥२॥

कल्पनेचा कंद समूळ उपडिला । हृदयीं दाविला आरसा मज ॥३॥

एक जनार्दनीं सहज आटलें । स्वदेहीं भेटलें गुरुकृपें ॥४॥

२४६७

भुक्ति आणि मुक्ति फुकाचें ठेवणें । श्रीगुरु जनार्दनें तुच्छ केलें ॥१॥

येर ब्रह्माज्ञाना काय तेथें पाड । मोक्षाचे काबाड वारियेलें ॥२॥

साधन अष्टांग यज्ञ तप दान । तीर्था तीर्थाटन शीण वायां ॥३॥

एका जनार्दनीं दाविला आरिसा । शुद्धी त्या सरसा सहज झालो ॥४॥

२४६८

देहाचें देऊळ देवळींच देव । जनार्दन स्वयमेव उभा असे ॥१॥

पुजन तें पुज्य पूजकु आपण । स्वयें जनार्दन मागेंपुढें ॥२॥

ध्यान तें ध्येय धारणा स्वयमेव । जनार्दनीं ठाव रेखियेला ॥३॥

एका जनार्दनीं समाधी समाधान । पडिलें मौन देहीं देहा ॥४॥

२४६९

आतां यजन कैशापरी । संसारा नोहे उरी ॥१॥

सदगुरुवचन मंत्र अरणी । तेथोनि प्रगटला निर्धुम अग्नी ॥२॥

सकळीं सकळांच्या मुखें । अर्पितसे यज्ञ पुरुषें ॥३॥

एका जनार्दनीं यज्ञे अर्पी । अर्पीं त्यामाजीं समर्पी ॥४॥

२४७०

शांतीचेनि मंत्रें मंत्रुनी विभुती । लाविली देहाप्रती सर्व अंगा ॥१॥

तेणें तळमळ हारपले व्यथा । गेली सर्व चिंता पुढिलाची ॥२॥

लिगाडाची मोट बांधोनि टाकिली । वासना भाजली क्रोध अग्नी ॥३॥

एका जनार्दनीं शांत जाहला देव । कामनीक देव प्रगटला ॥४॥

२४७१

अहं सोहं कोहं सर्व आटलें । दृश्य द्रष्ट्रत्व सर्व फिटलें ॥१॥

ऐसी कृपेची साउली । माझी जनार्दन माउली ॥२॥

द्वैत अद्वैताचें जाळें । उगविलें कृपाबळें ॥३॥

अवघें एकरुप जाहलें । दुजेपणाचे ठाव पुसिले ॥४॥

शरण एका जनार्दनीं । एकपणें भरला अवनीं ॥५॥

२४७२

पहा कैसी नवलाची ठेव । स्वयमेव देही देखिला देव ॥१॥

नाहीं जप तप अनुष्ठान । नाहीं केलें इंद्रियाचें दमन ॥२॥

नाहीं दान धर्म व्रत तप । अवघा देहीं जालो निष्पाप ॥३॥

पापपुण्याची नाहीं आटणी । चौदेहासहित शरण एका जनार्दनीं ॥४॥

२४७३

त्रिभुवनींचा दीप प्रकाशु देखिला । हृदयस्थ पाहिला जनार्दनं ॥१॥

दीपाची ती वाती वातीचा प्रकाश । कळिकामय दीप देहीं दिसे ॥२॥

चिन्मय प्रकाश स्वयं आत्मज्योती । एक जनार्दनीं भ्रांति निरसली ॥३॥

२४७४

उदारपणें उदार सर्वज्ञ । श्रीजनार्दन उभा असे ॥१॥

तयाचे चरणीं घातली मिठी । जाहली उठाउठी भेटी मज ॥२॥

अज्ञान हारविलें ज्ञान प्रगटलें । हृदयीं बिंबलें पूर्ण ब्रह्मा ॥३॥

एका जनार्दनीं नित्यता समाधी । वाउग्या उपाधी तोडियेल्या ॥४॥

२४७५

सोलींव ब्रह्माज्ञान सांगत जे गोष्टी । तें उघड नाचे दृष्टी संतासंगें ॥१॥

गळां तुळशीहार मुद्रांचें श्रृंगार । नामाचा गजर टाळ घोळ ॥२॥

दिंडी गरुड टक्के मकरंद वैभव । हारुषें नाचे देव तया सुखी ॥३॥

एका जनार्दनीं सुखाची मादुस । जनार्दनें समरस केलें मज ॥४॥

२४७६

माझें मीपण देहीच मुरालें । प्रत्यक्ष देखिलें परब्रह्मा ॥१॥

परब्रह्मा सुखाचा सोहळा । पाहिलासे डोळां भरूनियां ॥२॥

ब्रह्माज्ञानाची तें उघडली पेटी । जाहलों असे पोटीं शीतल जाणा ॥३॥

एका जनार्दनीं ज्ञानाचें तें ज्ञान । उघड समाधान जाहलें जीवा ॥४॥

२४७७

दीपांचें तें तेज कळिकें ग्रासिले । उदय अस्त ठेले प्रभेविण ॥१॥

लोपलीसे प्रभा तेजाचे तेजस । जाहली समरस दीपज्योती ॥२॥

फुंकिल्यावांचुनीं तेज तें निघालें । त्रिभुवनीं प्रकाशिलें नवल देख ॥३॥

एका जनार्दनीं ज्योतीचा प्रकाश । जाहला समरस देहीं देव ॥४॥

२४७८

जेथें परापश्यन्तीची मावळली भाष । तो स्वयंप्रकाश दावी गुरु ॥१॥

तेणें माझें मना जाहलें समाधान । निरसला शीण जन्मोजन्मी ॥२॥

उपाधी तुटली शांति हे भेटली । सर्व तेथें आटली तळमळ ॥३॥

एका जनार्दनीं प्रेमाचें तें प्रेम । दाविलें सप्रेम हृदयांत ॥४॥

२४७९

उदार विश्वाचा दीपकु तेजाचा । प्रकाशु कृपेचा दावियेला ॥१॥

हारपले विश्व विश्वभरपणे । दाविलें जनार्दनें स्वयमेव ॥२॥

अकार उकार मकार शेवट । घेतिलासे घोट परब्रह्मीं ॥३॥

एका जनार्दनीं विदेह दाविला । सभराभरीं दाटला हृदयामाजीं ॥४॥

२४८०

देहाची आशा टाकिली परती । केलीसे आरती प्रपंचाची ॥१॥

स्थूल सुक्ष्म यांची रचूनियां होळीं । दावाग्नि पाजळीं भक्तिमंत्रें ॥२॥

एका जनार्दनीं देहासी मरण । विदेहीं तो जाण जनार्दन ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to श्रीसंतएकनाथ गाथा - भाग दुसरा