२५४१

चक्षुदर्पणीं जग हें पहा । जगज्जीवनीं मुरुनी रहा ।

तूर्या कालिंदि तीर्थीं नाहा । पापपुण्यासी तिळांजुळीं वहा ॥१॥

डोळ्यांनों सत्य ही गुरूची खूण । आपुलें स्वरूप घ्या ओळखून ॥ध्रु०॥

तिन्हीं अवस्था सांडुनी मांगें । अर्ध चंद्राचा चांदण्यांत वागे ।

चांदणें ग्रासुनी त्या ठायीं जागे । गड उन्मनी झडकरी वेगें ॥२॥

एवढें ब्रह्मांडफळ ज्या देठी । तें आटलें देखण्याचें पोटीं ।

त्यासी पहातां पाठीं ना पोटीं । मीतूंपणांची पडली तुटी ॥३॥

चहूं शून्याचा निरसी जेणें । शून्य नाहीं तें शून्यपणें ।

शुन्यातीतचि स्वयंभ होणें । शून्य गाळूनि निःशून्यपणें ॥४॥

चार सहा दहा बारा सोळा । ह्मा तो आटल्या देखण्याच्या कळा ।

कळातीत स्वयंभ निराळा । एका जनार्दनीं सर्वांग डोळा ॥५॥

२५४२

एक पांच तीन नावांचे शेवटीं । अठरा हिंपुटीं जयासाठी ॥१॥

सात तेरा चौदा घोकितां श्रमले । पंचवीस शिणले परोपरी ॥२॥

तेहतिसां आटणी चाळिसां दाटणीं । एकुणपन्नसांची कहाणी काय तेथें ॥३॥

एकाजनार्दनीं एकपणें एक । बावन्नाचा तर्क न चालेचि ॥४॥

२५४३

कान्होबा नवल सांगतों गोष्टी । एक वृक्ष दृष्टी देखिला तयावरी सृष्टी ॥१॥

कोडें रे कोडें कान्होबा तुझें कोडें । जाणती जाणती अर्थ पाहतां उघडें ॥ध्रृ०॥

वृक्षाग्री नाहीं मूळ वर शेंडा नाहीं सरळ । बावन शाखा पल्लव पत्र पुष्प भरलें सकळ ॥२॥

एका जनार्दनींक वृक्ष सुढाळ । तयांवरी खेळे एक एकुलतें बाळ ॥३॥

२५४४

पंचभूतें नव्हतीं जईं । तैं वृक्ष देखिला भाई । अधोभागीं शेंडा मूळ पाहीं । वरी वेंधली तिसी पाय नाहीं ॥१॥

सांगें तूं आमुचें कोडें कान्होबा सांग तूं आमुचें कोडें । नाहीं तरी जाऊं नको पुढें ॥धृ०॥

नवलक्ष जया शाखा । पत्रपुष्पें तेचि रेखा । पंचभूतें कोण लेखा । ऐसा वृक्ष देखिला देखा ॥२॥

तयावरी एक सर्पीण । तिनें खादलें त्रिभुवन । शरण एका जनार्दन । हें योगियांचें लक्षण रे ॥३॥

२५४५

सगुण निर्गुण नोहे वृक्ष । पाहतां नित्रीं न भासे सादृश्य । देखतां देखत होतो अदृश्य ॥१॥

सांग रे कान्होबा हें कोंडे । तुझें तुजपाशीं केलें उघडें । आम्हां न कळे वाडेंकोडें ॥२॥

एक मुळीं वृक्ष देखिला । द्विशाखां तो शोभला । पाहतां पत्र पुष्पें न देखिला ॥३॥

ऐसें वृक्ष अपरंपार । एकाजनार्दनीं करा विचार । मग चुकेल वेरझार ॥४॥

२५४६

अलक्ष अगोचर म्हणती वृक्ष । तो दृष्टी न दिसे साक्ष । योगी म्हणती पाहिला लक्ष ॥१॥

कान्होबा तुझें कोडें । तुजपुढें केलें उघडें । सांगतां वेद जाहले वेडे रे ॥२॥

सहा अठरांची मिळणी । छत्तिसांचें घांतलें पाणी । तो वृक्ष देखिला नयनीं रे ॥३॥

पंचाण्णवची एक शाखा । एका जनार्दनीं वृक्ष देखा । अर्थ पाहतां मोक्ष रेखा रे ॥४॥

२५४७

अहं सोहं वृक्षा तो निघाला वोहं । याचा शेंडा नाहीं मा कोठें कोहं ॥१॥

कान्होबा उघद माझें कोडें । बोल बोलती साबडे । अर्थ करे कां रे निवाडे ॥२॥

वृक्ष जाहला मन पवन । वृक्ष तो सहजचि हवन । वृक्षें वेधलें चराचर गहन रे ॥३॥

वृक्षे भेदिलें आकाश । एका जनार्दनीं निरवकाश । वृक्षचि जाहला अलक्ष रे ॥४॥

२५४८

नीळवर्ण वृक्ष तो अति दृश्य । पाहतां सावकाश दृष्टी न पडे ॥१॥

भलें कोडें कान्होबा हें तुझें । लय लक्षा न कळे म्हणती माझें आणि तुझें ॥२॥

हो वृक्षांची वोळख धरा बरी । निवृत्ति ज्ञानदेव सोपान अधिकारी ॥३॥

एका जनार्दनीं वृक्ष सगुण निर्गुण । जाहला पुंडलिकाकारणे ब्रह्मा सनातन ॥४॥

२५४९

वृक्ष व्याला आकाश पाताळ । वृक्षीं प्रसवलें लोकपाळ । आठ्ठ्यायेंशीं सहस्त्र ऋषिमंडळें ॥१॥

कान्होबा बोलों तुझें कोडें । अर्थ ऐकतां ब्रह्मा जोडें । अभक्त होती केवळ वेडे रे ॥२॥

वृक्षाअंगीं पंचभुतें । प्रसवला तत्त्वें निरुतें । अहं सोहं पाहतां तें होतें ॥३॥

एका जनार्दनीं पाहिला वृक्ष । गुरुकृपें वोळखिला साक्ष । भेदभाव गेला प्रत्यक्ष रे ॥४॥

२५५०

निर्गुण निराकार वृक्ष आकारला । पंचतत्त्वे व्यापक जाहला ॥१॥

कान्होबा हें बोलणें माझें कोडें । पंचाविसांचे ध्यानीं नातुडे रे ॥२॥

साठ ऐशीं शोभती शाखा । नवलक्ष पल्लव भोंवती रे ॥३॥

चौर्‍यांयशी लक्षांची मिळणी । वृक्षरूपीं एका जनार्दनीं देखा रे ॥४॥

२५५१

ॐ कार हा वृक्ष विस्तारला । चतुःशाखें थोर जाहला ।

पुढें षडंतर शाखें विस्तारला । आठरांचा तया मोहोर आला ॥१॥

उघडें माझें कोडें । जाणती न जाणती ते वेडे ।

पडलें विषयांचें सांकडें । तया न कळे हें कोडें रे ॥२॥

चौर्‍यांयशी लक्ष पत्रे असती । सहस्त्र अठ्ठ्यायंशी पुष्पें शोभती ।

तेहतीस कोटी फळें लोंबती । ऐशी वृक्षाची अनुपम्य स्थिती रे ॥३॥

आदि मध्य अंत पाहतां न लगे मुळ । एकवीस स्वर्ग सप्त पाताळ ।

एका जनार्दनीं वृक्ष तो सबळ । उभा विटेवरी समुळ वो ॥४॥

२५५२

वृक्ष पाहतां परतला आगम । निगमा न कळे दुर्गम ।

वेदशास्त्रांसी निरुतें वर्म । तो वृक्ष देखिला विठ्ठलनाम ॥१॥

माझें सोपें कोंडें । कान्होबा करीं तुं निवाडे ।

अर्थ सखोल ब्रह्मांड । भक्तिभाव तयासि उघडे रे ॥२॥

साहांसी येथें न चाले मती । चार गुंतलें न कळे गती ।

अठरा भाटीव वर्णिती । ऐशियासी न कळे स्थिति रे ॥३॥

चौर्‍यांयशीं लक्ष भुलले वायां । अठ्ठ्यायंशीं सहस्त्र भोगिता छाया ।

तेहतीस कोटी न कळे आयतया । एक जनार्दनीं लागे पायां रे ॥४॥

२५५३

सोपा वृक्ष फळासी आला । विठ्ठलनामें विस्तारला ॥१॥

वेदां न कळे मूळ शेंडा । शास्त्रें भांडतां पैं तोंडा ॥२॥

पुराणें स्तवितां व्याकुळ जाहलीं । निवांत होऊनियां ठेली ॥३॥

मूळ वृक्ष जनार्दन । एका जनार्दनीं विस्तार पूर्ण ॥४॥

२५५४

एक दोन तीन विचार करती । परि न कळे गति त्रिवर्गातें ॥१॥

त्रिरूप सर्व हा मायेचा पसार । त्रिवर्ग साचार भरलें जग ॥२॥

त्रिगुणात्मक देह त्रिगुण भार आहे । त्रिमुर्ती सर्व होय कार्यकर्ता ॥३॥

एका जनार्दनीं त्रिगुणांवेगळा । आहे तो निराळा विटेवरी ॥४॥

२५५५

चार देह चार अवस्था समाधी । कासया उपाधि करिसी बापा ॥१॥

चार वेद जाण युगें प्रमाण । पांचवें विवरण न करी बापा ॥२॥

जनार्दनाचा एक चतुर्थ शोधोनी पांचवें ते स्थानीं लीन झाला ॥३॥

२५५६

पंचक पंचकाचा पसारा पांचाचा । खेळ बहुरूपियां पांचापासोनी ॥१॥

पृथ्वी आप तेज वायु आकाश जाण । पंचकप्राण मन पांचांमाजी ॥२॥

इंद्रियपंचक ज्ञान तें पंचक । कर्म तें पंचक जाणें बापा ॥३॥

धर्म तो पंचक स्नान तें पंचक । ध्यान तें पंचक जाणें बापा ॥४॥

एका जनार्दनीं पंचकावेगळा । पाहें उघडा डोळा विटेवरी ॥५॥

२५५७

सहा ते भागले वेवादती सदा । सहांची आपदा होती जगीं ॥१॥

सहांचे संगती घडतसे कर्म । सहा ते अधर्म कारिताती ॥२॥

सहांचे संगती नोहे योगप्राप्ती । होतसे फजिती सहायोगें ॥३॥

एका जनार्दनीं सहांच्या वेगळा । सातवा आठवो मज वेळोवेळां ॥४॥

२५५८

सातवा तो सर्वाठायीं वसे । शंकरादिक ध्याती तया अपेक्षा ॥१॥

तो सातवा हृदयीं आठवा । आठवितो तुटे जन्ममरण ठेवा ॥२॥

सातवा हृदयीं घ्यावा जनीं वनीं पहावा । पाहुनियां ध्यावा मनामाजीं ॥३॥

एक जनार्दनीं सातवा वसे मनीं । ध्नय तो जनीं पुरुष जाणा ॥४॥

२५५९

आठवा आठवा वेळोवेळा आठवा । श्रीकृष्ण आठवा वेळोवेळां ॥१॥

कलीमाजीं सोपें आठवा आठवण । पावन तो जन्म आठव्यानें ॥२॥

आठवा नामें तरी पांडवा सहाकारी । दुराचारियां मारी आठवा तो ॥३॥

एका जनार्दनीं आठव्याची आठवण । हृदयीं सांठवण करा वेंगीं ॥४॥

२५६०

नववा बैसे स्थिररूप । तया नाम बौद्धरुप ॥१॥

संत तया दारीं । तिष्ठताती निरंतरीं ॥२॥

पुंडलिकासाठीं उभा । धन्य धन्य विठ्ठल शोभा ॥३॥

शोभे चंद्रभागा तीर । गरुड हनुमंत समोर ॥४॥

ऐसा विठ्ठल मनीं ध्याऊं । एका जनार्दनीं त्याला पाहुं ॥५॥

२५६१

मूळची एक सांगतों खूण । एक आधीं मग दोन । तयापासाव चार तीन । व्यापिलें पांचें परिपूर्णं ॥१॥

तें भरुनी असें उरलें । सर्वां ठायीं व्यापियलें । जळीं स्थळीं सर्व भरलें । शेंखीं पाहतां नाहीं उरलें ॥२॥

निवृत्ति ज्ञानदेव सोपान । हेचि जाणती प्रेमखुण । समाधी पावलें समाधान । नाहीं उरलें भिन्नाभिन्न ॥३॥

शरण एका जनार्दनीं । खुण बाणलीं निजमनीं । व्यापक दिसे तिहीं त्रिभुवनीं । गेला देहभाव विसरुनी ॥४॥

२५६२

एक एक म्हणती सकळ लोक । पाहतां एका एक हारपलें ॥१॥

एकाविण एक गणीत नाहीं देख । तें नित्य वोळख निजें आत्मीया रे ॥२॥

त्वंपद असिपद नाहीं । ठायींच्या ठायीं निवोनि पाही ॥३॥

सच्चिदानंद तिन्हीं नाम माया । सूक्ष्म कारण तेथें भुलुं नको वायां ॥४॥

अहं तें मीपण सोहं तें तूंपण । अहं सोहं सांडोनि पाहें निजकानन ॥५॥

एका जनार्दन सांडी एकपण । सहज चैतन्य तेथें नाहीं जन्ममरण ॥६॥

२५६३

लक्ष गांवें तरणी । पृथ्वी व्यापी निज करणीं । तो साक्षी अलिप्तपणीं । जोथींच्या तेथें ॥१॥

तैसा आत्म देहीं । म्हणती त्यासी ज्ञान नाहीं । तो व्यापुनी सर्वा ठायीं । साक्षत्व असे ॥२॥

सदगुरुमुखींचा विचार । जयासी झाला साक्षत्कार । उदेरा ज्ञानभास्कर । अज्ञानतिमिरीं ॥३॥

हिरवा पिवळा । संगें रंग जाला निळा । स्फटिक या वेगळा । आत्मा तैसा ॥४॥

तैसा ज्ञानकिली । जयाचें हातां आली । तयानें उगविलीं । अज्ञान कुलुपें ॥५॥

एकाजनार्दनाचा रंक । त्याचे बोधें कळला विवेक । पूर्ण बोधाचा अर्क । उदया आला ॥६॥

२५६४

परेहूनी कैसें पश्यन्ती वोळलें । मध्यमीं घनावलें सोहंबीज ॥१॥

वैखारियेसी कैसें प्रगट पैं जालें । न वचे ते बोल एकविध ॥२॥

साक्षात्कारे कैसें निजध्यासा आलें । मननासी फावलें श्रवणद्वारे ॥३॥

सुखासुख तेथें जालीसे आटणी । एका जनार्दनीं निजमुद्रा ॥४॥

२५६५

स्वयंप्रकाशामाजीं केलें असें स्नान । द्वैतार्थ त्यागुन निर्मळ जाहलों ॥१॥

सुविद्येचें वस्त्र गुंडोनि बैसलों । भूतदया ल्यालों विभूती अंगीं ॥२॥

चोविसापरतें एक वोळखिलें । तेचि उच्चारिलें मुळारंभीं ॥३॥

आकार हारपला उकार विसरला । मकरातीत केला प्रणव तो ॥४॥

अहं कर्म सर्व सांडियेल्या चेष्टा । तोचि अपोहिष्ठा केलें कर्म ॥५॥

संसाराची तीन वोंजळीं घातलें पाणी । आत्मत्वालागुनी अर्घ्य दिलें ॥६॥

सोहं तो गायत्री जप तो अखंड । बुद्धिज्ञान प्रचंड सर्वकाळ ॥७॥

एका भावे नमन भूतां एकपणीं । एका जनार्दनीं संध्या जाहली ॥८॥

२५६६

झाली संध्या संदेह माझा गेला । आत्माराम हृदयीं शेजें आला ॥धृ०॥

गुरुकृपा निर्मळ भागीरथी । शांति क्षमा यमुना सरस्वती ।

असीपदें एकत्र जेथें होती । स्वानुभाव स्नान हें मुक्तास्थिती ॥१॥

सद्बुद्धीचें घालुनि शुद्धासन । वरी सदगुरुची दया परिपुर्ण ।

शमदम विभुती चर्चुन जाण । वाचें उच्चारी केशव नारायण ॥२॥

बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा । ममता म्हातारी मरोनि गेली तेव्हां ।

भक्ति बहीण धाऊनि आली गांवा । आतां संध्या कैशी मी करुं केव्हां ॥३॥

सहज कर्में झालीं ती ब्रह्मार्पण । जन नोहें अवघा हा जनार्दन ।

ऐसें ऐकेतां निवती साधुजन । एका जनार्दनीं बाणली निज खुण ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel