२६०९

स्नानसंध्या शौचाचार । स्वधर्म नावडे साचार ॥१॥

कनकफळ नाम गोमटें । बाहेर आंत दिसे कांटे ॥२॥

शरीर श्वेत निर्नासिक । तोंडाळ ओढाळ पतिनिंदक ॥३॥

ऐशीं आचारहीन बापुडीं । एका जनार्दनीं न धरी जोडी ॥४॥

२६१०

सुंदर विभुति लावी अंगीं । मिरवी जगीं भूषण ॥१॥

घालूनियां गळां माळा । वागवी गबाळा वोंगळ ॥२॥

नेणे कधीं योगयाग । दावी सोंग भाविका ॥३॥

एका जनार्दनीं भाव । नाहें तेथें कदा देव ॥४॥

२६११

द्रव्याचिया लोभें । तीर्थामध्यें राहती उभे ॥१॥

सांगती संकल्प ब्राह्मण । तेणें निर्फण तीर्थ जाण ॥२॥

संकल्पानें नाड । उभयतां ते द्वाड ॥३॥

संकल्पाविरहित धन । एका जनार्दनीं पावन ॥४॥

२६१२

नवल दंभाचें कौतुक । अग्नहोत्री म्हणती याज्ञिक ॥१॥

मंत्रतंत्राची कथा कोण । मुख्य गायत्री विकिती ब्राह्मण ॥२॥

आम्ही स्वधर्मनिष्ठ पावन । दंभें म्हणती आपणा जाण ॥३॥

दांभिकांची भक्ति वाव । एका जनार्दनीं नाहीं ठाव ॥४॥

२६१३

वेदाचिया बोला कर्मातें गोंविला । परी नाहीं भजला संतालागीं ॥१॥

घोकूनियां वेद द्वैत नवजाय । वाउगाची होय श्रम तया ॥२॥

तया अद्वैताच्या वाटां जायतो करंटा । शीण तो अव्हाटा आदिअंत ॥३॥

एका जनार्दनीं संतांसी शरण । गेलीया पठण सर्वजोडे ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel