२६१९

पतनाच्या भया नोळखे पामर । करी वेरझार नानापरी ॥१॥

नायके कीर्तन न पाहे पंढरी । वैष्णवाचे दारीं न जाये मूढ ॥२॥

नानापरीचे अर्थ दाखवी वोंगळ । सदां अमंगळ बोले जना ॥३॥

हिंडे दारोदारीं म्हणे पुराणिक । पोटासाठी देख सोंग करी ॥४॥

वाचळ आगाळा बोलों नेदी लोकां । एका जनार्दनीं देखा फजीत होय ॥५॥

२६२०

भांडाचें तोंड भांड पुराण । वरी शिमग्याचा सण ॥१॥

काय उणें मग भांडा । बोलती वाउगें तें तोंडा ॥२॥

वेद शास्त्र नीति नाहीं । सैरावैरा बोलणें पाहीं ॥३॥

एका जनार्दनीं पाषांड । म्हणोनि फोडो त्याचें तोंड ॥४॥

२६२१

सांगें ब्रह्माज्ञान गोष्टी । माते पाहतां होती कष्टी ॥१॥

काय ज्ञान ते जाळावें । वदन तयाचें तें न पाहावें ॥२॥

करी कथा सांगें पुराण । वायां मिरवी थोरपण ॥३॥

जन्मला जिचें कुशीं । तिसीं म्हणे अवदसा ऐसी ॥४॥

ऐसें नसो तें संतान । एका विनवी जनार्दन ॥५॥

२६२२

आवाडीने माता बोले बाळकासी । तंव तो म्हणे विवसा पाठी लागे ॥१॥

सांगे लोकांपाशीं ब्रह्मज्ञान । झाला स्त्रीं आधीन स्वदेंहें तो ॥२॥

बैसोनी बाजारीं सांगे ज्ञान गोष्टी । मातेसी करंटी म्हणे नष्ट ॥३॥

एका जनार्दनीं ते जन अधम । चौर्‍याशीं लक्ष जन्म भोगिताती ॥४॥

२६२३

सांगे बहु सोपया गोष्टी । करूं नेणो तो हातवटी ॥१॥

ऐसें याचें नको ज्ञान । ज्ञान नोहें तें पतन ॥२॥

सांगे लोका उपदेश । आपण नेणें तो सायास ॥३॥

शरण एका जनार्दनीं । त्याची अमंगळ वाणी ॥४॥

२६२४

सांडोनी आचार करती अनाचार । ब्रह्माचा विचार न कळे ज्यांसी ॥१॥

वाहाती भार वेदाचा आधार । शास्त्रांचा संभार सांगताती ॥२॥

पुराण व्युप्तत्ती वाउग्या त्या कथा । सांगती सर्वथा हितपर ॥३॥

एका जनार्दनीं अनुभवावांचुनीं । कोरडी ती कहाणी ब्रह्माज्ञान ॥४॥

२६२५

येवढा मंत्र सोपा सांडोनी सायासीं । कां रें प्रपंचासी गुंतुनीं पडसी ॥१॥

वाचे ब्रह्मज्ञान गोष्टी ते फोल । अंतरींचे बोल सर्व वायां ॥२॥

वृंदावनाचे परी वर वर रेखा । तैसें पढतमूर्खा वेद गोष्टी ॥३॥

एका जनार्दनीं प्रपंच टाकुनीं । परमार्थ साधनीं रिघें वहिला ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel