२६४३

तीर्था जाती उदंड । त्याचें पाठीमागें तोंड ॥१॥

मन वासना ठेउनी घरीं । तीर्थां नेली भांडखोरी ॥२॥

गंगेंत मारितां बुडी । मन लागलें बिर्‍हाडीं ॥३॥

नमस्कार करितां देवासी । मन पायपोसापाशीं ॥४॥

लवकर करी प्रदक्षिणा । उशीर झालासे भोजना ॥५॥

एका जनार्दनीं स्थिर मन । नाहीं तंव काय साधन ॥६॥

२६४४

केलें तुवां काय जाऊनियां तीर्था । सर्वदां विषयार्था भुललासी ॥१॥

मनींची तीं पापें नाहीं धोवियेलीं । वृत्ति हे लाविली संसारींच ॥२॥

तीर्थस्नानें अंग तरी शुद्ध केलें । नाहीं धोवियेलें अंतरासी ॥३॥

वरी दिससी शुद्ध अंतरीं मलीन । तोवरीं हें स्नान व्यर्थ होय ॥४॥

तीर्थयात्रायोगें कीर्तिही पावली । बुद्धि शुद्धि झाली नाहीं तेणें ॥५॥

शांति क्षमा दया नाहीं पैं अंतरीं । वायां येरझारी कष्ट केले ॥६॥

एका जनार्दनीं सद्‌गुरु पाय धरी । शांतीचें जिव्हारीं पावशील ॥७॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel