२६४८

काय तें वैराग्य बोकडाचे परी । भलतीया भरीं पडतसे ॥१॥

काय ती समाधी कुकुटाचे परी । पुढेंचि उकरी लाभ तेणें ॥२॥

बैसोनी आसनीं वाउगें तें ध्यान । सदां लक्ष्मी मान आपुलाची ॥३॥

घालूनियां जेठा बैसतो करंटा । करीतसे चेष्टा मर्कटापरी ॥४॥

नाहीं शुद्ध कर्म योगाचा विचार । सदां परद्वार लक्षीतसे ॥५॥

ऐशिया पामरा कासया तो बोध । एका जनार्दनीं शुद्ध खडक जैसा ॥६॥

२६४९

वायां शब्दज्ञान बोलावा गौरव पोटींचा पैं भाव मिथ्या सोंग ॥१॥

मैंदाचिया परी बेसती ध्यानस्थ । सदां चित्त ओढत परधनीं ॥२॥

वैराग्य तें फोल सांगताती गोष्टी । काय तें चावटी मिथ्या बोल ॥३॥

एका जनार्दनीं ऐसीया सोंगासीं । कैं हृषीकेशी प्राप्त होय ॥४॥

२६५०

बांधूनियां पर्णकुटी मुढी । त्यावरी गुढी अद्वैताची ॥१॥

ऐसें मिरविती सोंग वायां । नरका जावया उल्हासें ॥२॥

नेणें कधीं सतांचें पूजन । सदां सर्वदां परधनीं मन ॥३॥

शरण एका जनार्दनीं । ऐसें सोंग मिरवितींअ जनीं ॥४॥

२६५१

मुखीं वसे ब्रह्माज्ञान । चित्तीं चिंती धनमान ॥१॥

ऐसें ठक जे पतित । तयां साधन स्वहित ॥२॥

स्त्रीसंगी सदां सक्त । वदनीं गोष्टी परमार्थ ॥३॥

एका जनार्दनीं तयां । देव भेटेल कासया ॥४॥

२६५२

गांठीं बांधोनियां धन मिरविती भक्ति । मनीं ते आसक्ती अधिक व्हावी ॥१॥

चित्तवित्ता वरी भक्ति लोकाचारीं । देव अभ्यंतरी केवीं भेटी ॥२॥

असें चित्त वित्ता लावी कळांतरी । अनुष्ठान करी दिवस गणी ॥३॥

जपतप विधान अवघेंची सांडी । धरणेंची मांडी सावकाश ॥४॥

धन सांडोनी मन धरी जानार्दन । एकाएकीं भक्ती फळेल तेणें जाण ॥५॥

२६५३

मी एक शुची जग हें अपवित्र । कर्माचि विचित्र वोढवलें ॥१॥

देखत देखत घेतसे विख । अंतीं तें सुख केवीं होय ॥२॥

अल्पदोष ते अवघेंची टाळी । मुखें म्हणे सर्वोत्तम बळी ॥३॥

अभिलाषें अशुची झालासे पोटीं । एका जनार्दनीं नव्हेंचि भेटी ॥४॥

२६५४

कनकफळ भक्षितां सहज भ्रांति येती । तैशी ही फजिती संसारिका ॥१॥

मर्कटाचीये परे नाचे घरोघरीं । नाचवोनि भरी पोट तैसें ॥२॥

करिती तितुकें अवघें तें सोंग । नाहीं कांहीं रंग भाव भक्ति ॥३॥

एका जनार्दनीं पडिलासे भ्रांती । नेणें कधीं स्तुति देवाची तो ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel