२७२१

पोटासाठी लागे नीचचियां पायां । करीना भलिया नमस्कार ॥१॥

स्वयंपाकीच्या करितो टवाळ्या । आपण खाये शिळ्या भाकरीतें ॥२॥

अग्निहोत्रादिक त्याची करी निंदा । आपण घेई सदा गुरगुडी ॥३॥

एका जनार्दनीं ऐशी याची मात । नको तयाचा संगात मज देवा ॥४॥

२७२२

दुर्जनाचें संगें दुर्जन लागत । नाना विटंबीत सज्जनासी ॥१॥

दुर्जनाचें अन्न सेउनी दुर्वास । छळिलें पांडवांस निशीमाजीं ॥२॥

एका जनार्दनीं दुर्जनाचा संग । तेणें होय भंग भाविकांचा ॥३॥

२७२३

सकळ दोषा मुगुटमणीं । निंदी जनीं संतां तो ॥१॥

जन्मतांची नाहीं मेला । व्यर्थ वांचला भूभार ॥२॥

त्याचियानें दुःखी धरा । नाहीं थारा जन्मोजन्मीं ॥३॥

दांत खाय यमधर्म । देखोनियां त्याचें कर्म ॥४॥

अभागी तो वसे जनीं । एका शरण जनार्दनीं ॥५॥

२७२४

नाम गातां करीं आळस । निंदा करी बहु उल्हास ॥१॥

कोणी गातसे हरिनाम । तयासी तो अधम उपहासी ॥२॥

आपणा घरीं नाहीं कण । भांडारिया म्हणे बुद्धिहीन ॥३॥

नेणें कधीं स्वप्नीं भाव । मानीं देव वेगळाची ॥४॥

एका जनार्दनीं तें पामर । भोगिती अघोर चौर्‍यायंशीं ॥५॥

२७२५

वेद तो प्रमाण । वचन करी जो अप्रमाण ॥१॥

तो स्वहिता नाडला । जन्मोजन्मीं कुडा जहाला ॥२॥

वेदाची जे मर्यादा । नायकेचि जो कदा ॥३॥

वेदें सांगतिलें कर्म । करी सदा तो अधर्म ॥४॥

जन्मतांचि प्राणी । एका जनार्दनीं वांझ जनीं ॥५॥

२७२६

जन्मला जो प्राणी । रामनाम नेघे वाणी ॥१॥

महापाताकी चांडाळ । अधम खळाहुनी खळ ॥२॥

सदा परद्वारी हिंडे । नाम घेतो कान कोडें ॥३॥

करूं नये तेंचि करी । सदा परद्रव्य हरी ॥४॥

जन्मोनियां अडं । एका जनार्दनीं रांड ॥५॥

२७२७

मर्कटासी मदिरा पाजिली । तैशी भुलली विषयांसी ॥१॥

मातला गज नावरे जैसा । विषय फांसा त्यावरी ॥२॥

रेडा जैसा मुसमुशी । तैसा लोकांसी बोलत ॥३॥

श्वाना जैसे पडती किडे । तैसा चहुकडे रेडे ॥४॥

शरण एका जनार्दनीं । अंतीं यमाची जांचणी ॥५॥

२७२८

भक्तिहीन जन्मला पशु । केला नाशु आयुष्याचा ॥१॥

नाहीं कधीं संतसेवा । करी हेवा भूतांचा ॥२॥

मुखीं नये रामनाम । सदा काम प्रपंचीं ॥३॥

एका जनार्दनीं ते नर । जन्मोनी पामर भूभार ॥४॥

२७२९

मानी नामाचा कंटाळा । तया वोंगळा न पाहावे ॥१॥

सदा त्याचें विषयीं ध्यान । वाचे बोले भलते वचन ॥२॥

आलिया तो घरा । तया न द्यावा पैं थारा ॥३॥

ऐसा चांडाळ जन्मला । वायां भूमीभार पैं जाहला ॥४॥

एका जनार्दनीं निर्धार । तया थार नाहीं कोठें ॥५॥

२७३०

शिकविलें नाईके वचन । वारितां करी कर्म जाण ॥१॥

न देखे आपुले गुणदोष । पारावियाचे बोले निःशेष ॥२॥

न करावें तें करी । न बोलावें तें बोले निर्धारीं ॥३॥

न मानीं स्वयातीचा आचार । सदा करी अनाचार ॥४॥

शिकविलें गेलें वायां । शरण एका जनार्दनीं पायां ॥५॥

२७३१

दीपकाचे ठायीं नाहीं द्वैतभाव । चोर आणि साव सारखाची ॥१॥

तैसं ब्रह्माज्ञान । सांगताती गोष्टी । अभाविका पोटीं स्थिर नोहे ॥२॥

शुद्ध पंचामृतें काग तो न्हाणिला । परी कृष्णवर्ण पालटला नोहे त्याचा ॥३॥

एका जनार्दनीं खळाचा स्वभाव । पालट वैभव नोहे त्यासी ॥४॥

२७३२

कस्तुरी परिमळ नाशितसे हिंग । ऐसा खळाचा संग जाणिजेती ॥१॥

साकरेचे आळा निंब जो पेरिला । शेवटी कडू त्याला फळें पत्रें ॥२॥

चंदनाचे संगेकं हिंगण वसती । परी चंदनाची याती वेगळीच ॥३॥

एका जनार्दनीं हा अभाविकाचा गुण । वमनासमान लखुं आम्हीं ॥४॥

२७३३

मृगजळाचेनि काय तृषा हरे । अर्कफळें निर्धारें नोहे तृप्ति ॥१॥

पाहतां गोजिरें दिसे वृदांवन । कैं गोडपर न ये त्यासी ॥२॥

बचनाग खातां आधीं लागे गोड । शेवटीं अवघड देहपीडा ॥३॥

एका जनार्दनीं दुर्जन अभाविकक । खळ अमंगळ देख संसारांत ॥४॥

२७३४

कथा कीर्तन नेणें । सदा बोलणें वाचाळ ॥१॥

ऐसा अभागी जन्मला । कोण सोडवी तयाला ॥२॥

गाये डपगाणें नानापरी । स्वप्नीं नेणें वाचे हरी ॥३॥

आपण बुडोनि बुडवी लोकां । शरण जनार्दनीं एका ॥४॥

२७३५

न ये मनासी अभागिया गोष्टी । म्हणे बोलती चावटी बहु बोल ॥१॥

सांगतां सांगतां बुडतसे डोहीं । पुढीलाची सोई नेणती ते ॥२॥

वाचेसि स्मरण नाहीं कधी जाण । सदा मद्यपान बडबडतसे ॥३॥

एका जनार्दनीं नायके सांगतां । कोण याच्या हिता हित करीं ॥४॥

२७३६

अमंगळाचा अमंगळ वाण । न ये वाचे नारायण ॥१॥

सदा सर्वकाळ परनिंदा करी । वाचे हरिहरी न म्हणे पापी ॥२॥

कस्तुरी उत्तम परि शेजार हिंगाचा । अमंगळासी साचा बोध नोहे ॥३॥

एका जनार्दनीं तयाची पैं गोष्टी । बोलणें चावटी परमार्थ नोहे ॥४॥

२७३७

अभक्ता दुर्जना यमदुत यातना । नानापरी जाणा करिताती ॥१॥

नाम नाहीं मुखीं दूत तया ताडिती । नेऊन घालिती कुंभपाकीं ॥२॥

ताम्र भूमीवरी खैराचे इंगळ । लाविताती ज्वाळ अंगालागीं ॥३॥

एका जनार्दनीं यातनेचें दुःख । कोणा सांगेल मूर्ख यमलोकीं ॥४॥

२७३८

निर्दय मानसी मारिताती दूत । कां रे चुकलेति रामनाम ॥१॥

प्रपंचाचे कामीं करूनि हव्यास। विसरला मुखास नाम घेतां ॥२॥

म्हणोनि वोढिती तोडिती निष्ठुर । दय ते अंतरा न ये त्यांच्या ॥३॥

एका जनार्दनीं निर्दय साचार । नाही आन विचार तये ठायीं ॥४॥

२७३९

नावडे जयासी पंढरी । तोचि जाणा दुराचारी ॥१॥

नावडे जया चंद्रभागा । तोचि अपवित्र पैं गा ॥२॥

नावडे पुंडलिका वंदन । तोचि चांडाळ दुर्जन ॥३॥

नावडे विठ्ठलाची मूर्ति । तोचि जगी पापमति ॥४॥

एका जनार्दनीं शरण । तोचि दुराचारी जाण ॥५॥

२७४०

स्वप्नींचा भांबावला । म्हणे मज चोरें नागविला ॥१॥

ऐशीं अभाग्याची मती । वायां बुले चित्तवृत्ती ॥२॥

नेणें कधी मुखीं नाम । सदा वसे क्रोधकाम ॥३॥

एका जनार्दनीं देव । नाहीं भेव निरसीत ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel