२९९१

कोण हरी आतां संसाराचा छंद । न स्मरतां गोविंद दुःख बहु ॥१॥

शहाणे बुडती शहाणे बुडती । शहाणे बुडती भवडोहीं ॥२॥

तत्त्वज्ञानाच्या सांगताती गोष्टी । परि संसार हिंपुटी होती मूढ ॥३॥

एका जनार्दनीं संसाराचा छंद । टाकुनी गोविंद भजे कां रे ॥४॥

२९९२

संसारासागरी बुडालिया प्राणी । करी सोडवणी कोण त्याची ॥१॥

अविद्यादि पंच क्लेश हे तरंग । बुडालें सर्वांग प्राणियाचें ॥२॥

भ्रमाच्या आवर्तामाजीं सांपडला । सोडवी तयाला कोण आतां ॥३॥

स्त्रियापुत्र आप्त बंधु हे सोयरे । ओढताती सारे मत्स्या ऐसीं ॥४॥

प्रपंच या कामें पसरिलें आलें । त्यामाजीं गुंतलें प्राणिजात ॥५॥

एका जनार्दनीं उच्चारील नाम । सुखाचा आराम प्राप्त होय ॥६॥

२९९३

फट गाढवाच्या लेका । संसार केला फूका ॥ध्रु०॥

खटपट करितां खटपट करितां गेला सारा वेळ । रामनाम घेतां तुझी बैसे दांतखीळ ॥१॥

कैंचा आपा कैंचा बापा मामा काका । कैंची आई कैंची ताई कैंची बहिण आका ॥२॥

कैंचें घर कैंचें दार भुललासी फुका । कैंची सासू कैंची बाईल त्यांनी नेला पैका ॥३॥

बारा सोळा मुलें झालीं त्यांला झालें नातु । द्रव्य होतें तें सरुनी गेलें कंबरेवर हातु ॥४॥

एका जनार्दनीं म्हणे हा संसार खोटा । हरिस्मरण करा कधीं न ये तोटा ॥५॥

२९९४

किती वेळां जन्म किती वेळां मृत्यु । हाचि न कळे अंतु भाग्यहीना ॥१॥

जन्मोनीं संसार मानितां बरवा । परि या राघवा शरण न जाय ॥२॥

पावलिया मरण सहज नरक कुंडीं । कोण तया सोडी अधमासी ॥३॥

स्वप्नामाजीं नेणें परमार्थ मानसीं । सदा चौर्‍यांयंशी फेरे भोगी ॥४॥

एका जनर्दनीं नोहेंचि सुटिका । भाग्यहीन देखा मरे जन्में ॥५॥

२९९५

मृगजळाच्या पुरीं गुंतशीं पामरा । कोण तुज निर्धारा सोडविल ॥१॥

पडशी पतनी चौर्‍यायंशीं आवर्ती । तेव्हा तुझी गती कैशी होय ॥२॥

जीवीं जीवपण शिवीं शीवपण । वेगळें तें जाण दोन्हीं होती ॥३॥

यातना अनंत तुज भोगविती । तेथें काकुळती कोणा येशी ॥४॥

यमाचे ते दूत मारिती पामरा । कां रे संसारा न चुकशी ॥५॥

एका जनार्दनीं सांगतो विचार । रामनामें परिकर जप करी ॥६॥

२९९६

संसारीं तरले बोलती ते कुडे । जाती ते बापुडे अधोगती ॥१॥

नेणती आचार विचार स्वधर्म । करताती कर्म मना तैसें ॥२॥

न तरती भवसागरीं बुडती हव्यासें । लागतसे पिसें धन आशा ॥३॥

एका जनार्दनीं आशा हे सांडोनी । गोविंद चरणी मिठी घाला ॥४॥

२९९७

आपुले पारखे सांगतां नायकती । करितसे खंती संसाराची ॥१॥

काय संसाराचें सुख तें तयासी । कोण फांसा चुकवील ॥२॥

कधीं रामनाम नाठवी पामर । भोगिती अघोर जन्म कोटी ॥३॥

एका जनार्दनीं एकपणें शरण । जनीं जनार्दनीं आम्हां आहे ॥४॥

२९९८

देह नाशिवंत अभ्राची साउली । तैशी परी बोली संसाराची ॥१॥

जळगारीं जैसें उदक नाथिलें । कां मृगजळ पसरलें चहुंकडे ॥२॥

परुषाची छाया वाउगाचि भास । चोराचा पैं लेश काय तेथें ॥३॥

रज्जु देखतांचि भासतसे सर्प । एका जनार्दनीं दर्प संसाराचा ॥४॥

२९९९

वायांचि कासया करितां आटाआटी झणें पाडा तुटी संसारासी ॥१॥

संसार कर्दमीं गुंतलेली बापा । किती वेळां खेपा कराव्या त्या ॥२॥

मरावें जन्मावें मरावें जन्मावें । खंडन केव्हां व्हावें न धरा शुद्धी ॥३॥

एका जनार्दनीं किती तें सांगावें । नायकर्ता हावे भरले जीव ॥४॥

३०००

जे आसक्त संसारीं । ते अघोरीं पडती ॥१॥

तयां नाहीं सोडविता । सदगुरुनाथावांचुनी ॥२॥

त्याचे चरण धरा चित्तीं । मग भीति कासया ॥३॥

एका जनार्दनीं शरण । जन्ममरण चुकलें ॥४॥

३००१

संसार म्हणसी माझा । कां रे गुंतसी बोजा ॥१॥

राहे अलिप्त संसारीं । अंतरीं धरूनियां हरी ॥२॥

तेणें चुकती बंधनें । पावन करिती संतजन ॥३॥

त्रैलोक्यीं ज्याचा शिक्का । एका जनार्दनीं नाम घोका ॥४॥

३००२

मागें बहुतांसी सांगितलें संतीं । वायां हे फजिती संसार तो ॥१॥

अंधाचे सांगाती । मिळालेसे अंध । सुख आणि बोध काय तेथें ॥२॥

विष खाऊनियां प्रचीत पाहे कोणी । तैसा अधमपणीं गुंतूं नको ॥३॥

एका जनार्दनीं जाऊं नको वायां । संसार माया लटिकी ते ॥४॥

३००३

नोहे सायास रामनामीं । संसारासी गुंते प्राणी ॥१॥

आठवी वाचे म्हणे रामनाम । संसार नुरेची श्रम ॥२॥

नका करूं वायां श्रम । वाचे म्हणे रामनाम ॥३॥

आवडीनें नाम घोका । म्हणे जनार्दनाचा एका ॥४॥

३००४

अष्टही प्रहर करिसी संसाराचा धंदा । कां रे त्या गोविंदा स्मरसी ना ॥१॥

अंतकांळी कोण सोडवील तूंतें । कां रे स्वहितातें विसरलासी ॥२॥

यमाची यातना न चुके बंधन । सोडवील कोण तुजलागीं ॥३॥

एका जनार्दनीं गुंतलासी वायां । भजे यादवराया विसरूं नको ॥४॥

३००५

वायांची सोस संसार कामाचा । रामनामीं वाचा रंगी कां रे ॥१॥

यापरती जीवा सोडवण नाहीं । वेदशास्त्रीं पाहीं भाष्य असे ॥२॥

पुराणे डांगोरा पिटती नामाचा । तें तूं कां रे वाचा न वदसी ॥३॥

सायास साधनें न लगे आणीक । एका जनार्दनीं ऐक्य मन करी ॥४॥

३००६

सांडी पां सांडी संसाराचा छंद । आठवी गोविंद वेळोवेळां ॥१॥

न लगे सायास न लगे सायास । आठवी श्रीहरीस मनोभावें ॥२॥

षड्‍वैरीयांचेंक तोडी पां बिरडें । करीं तूं कोरडे आशापाश ॥३॥

एका जनार्दनीं शरण स्वभावें । भोगी तूं गौरव वैकुंठीचें ॥४॥

३००७

अहा रे मुढा अहा रे मूढा । जन्मोनी दगडा काय केलें ॥१॥

साठी घाटी करसी संसाराचा छंद । वाचे तो गोविंद नुच्चारिसी ॥२॥

एका जनार्दनीं श्रीरामावांचून । चुकवील बंधन कोण मूढ ॥३॥

३००८

बुडालिया जळीं धावतसे कोण । तैसे प्राणी जन बुडताती ॥१॥

संसार हा डोहो दुस्तर पारखा । सांगड ती देखा रामनाम ॥२॥

एका जनार्दनीं संतांचा आधार । उतरूं पैलपार भवडोहीं ॥३॥

३००९

अल्प आयुष्य अल्प सर्व । अल्प वैभव समजेना ॥१॥

म्हणे सदा माझें माझें । परी न लाजे काळासी ॥२॥

त्यासी ऐसें न कळें सदा । संसाराधंदा मिथ्या हा ॥३॥

शरण एका जनार्दनीं नाठवई मनीं श्रीहरीसी ॥४॥

३०१०

संसारा आलिया प्राणी । तया यमाची जाचणीं । अंतीं तयासी निर्वाणी । कोणी नाहीं ॥१॥

करी नामाचें स्मरण । तेणें तुटेल बंधन । काया वाचा मनें जाण । संतां शरण जाई ॥२॥

नासती पापें होय होळी । विठ्ठलनामें वाजवी टाळी । कळिकाळ पायातळीं । वैष्णवासांगातें ॥३॥

भाव धरी बळकट । आशापाश तोडी नीट । रामनाम जपे स्पष्ट । यातना ते चुकती ॥४॥

सोस करीं नामाचा । आणीक शीण उगाचि साचा । एका जनार्दनीं म्हणे वाचा । रामनाम गाये ॥५॥

३०११

करूं करूं म्हणता गेले वायांविण संसार तो शीण केला वेगी ॥१॥

अधमा न कळे अधमा न कळे । झांकोनियां डोळे घाणा नेतीं ॥२॥

यमदूत नेती तयांसी तांतडीं । मारिती वरी कोडी यमदंडें ॥३॥

एका जनार्दनीं चुकवी या यातना । संतांच्या चरणा शरण रिघे ॥४॥

३०१२

मी माझें आणि तुझें । टाकी परतें हें वोझें । नामें पावन होसी सहजें । तेंचि सेवीं आवडीं ॥१॥

नको गुंतूं या लिगाडा । सोडी सोडी या दगडा । भवबंधनाचा हुडा । पडेल अंगावरुता ॥२॥

देई टाकुनी लवलाही । रामनाम सुखें गाईं । एका जनार्दना पायीं । तरी सुखा काय उणें ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel