३०४२

धन कामासाठीं देख । न मनीं दोष महा दोषी ॥१॥

कवडीये लोभें केला असे मूर्ख । नाठवेची नरक पतितासी ॥२॥

कवडी येकु लाभू होतां । तै श्राद्ध करी मातापिता ॥३॥

मी उत्तम पैलहीन । ही धनलोभ्या नाठवे आठवण ॥४॥

एका जनार्दनीं शरण । काय तया ब्रह्माज्ञान ॥५॥

३०४३

घालूनियां काखे धन । सदा मागे जो कोरान्न ॥१॥

धन्य वायां जिणें पाही । श्वान सुकर सम तेही ॥२॥

असोनियां दरिद्रता । सदा धर्मावरी चिंता ॥३॥

द्रव्य पदरीं बहु आहे । अतिथि रिक्त हस्तें जाये ॥४॥

एका जनार्दनीं ऐसें पामर । नरक भोगिती अघोर ॥५॥

३०४४

घरीं धनधान्य पुरून । सदा मागे जो कोरान्न ॥१॥

द्रव्य असोनी नाहीं म्हणे । केविलवाणे म्हणे मी दीन ॥२॥

असोनि द्रव्याचिया राशी । भिक्षा मागे अहर्निशीं ॥३॥

ऐसा संचय करुन । सवेंची पावल मरण ॥४॥

वायां गेला नरदेहीं । एका जनार्दनीं पाही ॥५॥

३०४५

कवडी कवडी घाली खांचे । नित्य नूतन भिक्षा वाचे ॥१॥

अतिथासी दान । तेंतों स्वप्नीं नाहीं जाण ॥२॥

पर्वकळ विधी । न कळे अभाग्यासी कधीं ॥३॥

ठेवुनी चित्त धनावरी । सवेंचि फिरे घरोघरीं ॥४॥

जन्मा येवोनि अघोर । एका जनार्दनीं भोगिती पामर ॥५॥

३०४६

गाठीं बांधोनियां धना । क्षणाक्षणा पाहे त्यातें ॥१॥

न जाय तीर्थयात्रेप्रती । धनाशा चित्तीं धरूनी ॥२॥

बैसलासे सर्प दारीं । तैशापरी धुसधुसी ॥३॥

नको धनाशा मजशी जाण । शरण एका जनार्दन ॥४॥

३०४७

धनलोभ्याचें जाय धन । शोधितसे रात्रंदिन ॥१॥

त्याची निंदा करतील लोक । रांडा पोरें थुंकती देख ॥२॥

भिकेलागीं जेथें गेला । म्हणती काळतोंडी आला ॥३॥

हाता धनलोभें भुलला । संचित ते बरा नागविला ॥४॥

ऐसें धनाचें कारण । शरण एका जनार्दन ॥५॥

३०४८

पाया शोधोनियां बांधिताती घर । ऐसें या दुस्तर नरदेहीं ॥१॥

म्हणती पुत्र माझे नातु हें कलत्र । मिळती सर्व गोत्र तये ठाई ॥२॥

संपत्ति देखोनि गिवसिती तयासी । माझें माझें म्हणती रांडापोरें ॥३॥

चाले बरवा धंदा । बहिणी म्हणती दादा । आलिया दरिद्रबाधा पळुनी जाती ॥४॥

जनार्दनाचा एका करितसे विनंती । संतसंगें चित्तीं जीवीं धरा ॥५॥

३०४९

डोळा फोडोनियां काजळ ल्याला । नाम कापून शिमगा खेळला ॥१॥

वेंचिती धन लक्ष कोटी । आयुष्य क्षणचि नोहे भेटी ॥२॥

मिथ्या बागुलाचा भेवो । बाळें सत्य मानिती पहाहो ॥३॥

ऐसें मिथ्या नको मनीं । एका जनार्दनीं ॥४॥

३०५०

अविद्येचे भ्रांतपण । मिथ्या दावी साच धन ॥१॥

तेथ गुंतती लिगाडा । तेणें पडे पायीं खोडा ॥२॥

जन्ममाण भोंवरा । भ्रमें फिरसी निर्धारा ॥३॥

कळोनि कां रें वेडा होसी । एका जनार्दनीं न पाहसी ॥४॥

३०५१

संपत्ती देखोनि म्हणती माझें माझें । वागवितों वोझें खरा ऐसा ॥१॥

क्षणिक आयुष्य क्षणिक संपत्ती । न कळे तयाप्रती अंध जैसा ॥२॥

जाणार जाणार सर्व हें जाणार । हरिनाम सार जपे सदां ॥३॥

जनार्दनाचा एका सांगतसें मातु । धरी रे सांगातु वैष्णावांचा ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel