३२२१

विषयीं होऊनि उदास । सांडीं संसाराची आस ॥१॥

ऐसी मुक्ताची वासना । मुमुक्षु चिंती तुझ्या चरणा ॥२॥

ब्रह्माज्ञान लाळ घोटी । येरी वाउगी ती आटी ॥३॥

शब्द निःशब्द खुंटला । एका जनार्दनीं देखिला ॥४॥

३२२२

विषयवासना भाजी त्याचें मूळ । मग सुख कल्लोल प्राप्ति तुज ॥१॥

आशेचें काबाड कल्पना सगळी । अपटोनि मुळी टाकी परती ॥२॥

भेदाचें भांडें वैराग्याचें हातें । धुवोनि सरतें करी बापा ॥३॥

शांतीचेनि सवें धरीं वेगें सोय । एका जनार्दनीं पाय पावशील ॥४॥

३२२३

विकल्प वासना समूळ दे टाकुनी । मग तुज भजनी सुख बापा ॥१॥

आशापाश मोह सांडी तूं निराळा । भजन तें गोपाळा प्रिय वाटे ॥२॥

भेद अभेददाचें मूळ आधीं खंडी । भजन तें तोंडीं मग गोड ॥३॥

एका जनार्दनीं शुद्ध हे वासना । तैं नारायणा प्रिय भक्ति ॥४॥

३२२४

विषयाच्या व्यथें दुःख भोगितो अघोर । तया दुजा थार कोठें नाहीं ॥१॥

शुद्ध करूनि मन घ्यावें रामनाम । संतांचें पूजन क्रिया हेची ॥२॥

उपदेश किती सांगावा वेळोवेळां । अमंगळ अंधळा नेणे कांहीं ॥३॥

एका जनार्दनीं विषयाच्या संगें । कर्मकांड लागे भोगणे तेथें ॥४॥

३२२५

भुलले पामर नेणती ते शुद्धी । बुडतील भवनदीमाजीं जाणा ॥१॥

म्हणवोनि येत करूणा । परी संतचरनां न लागती ॥२॥

खरें खोटें ऐसें न कळेचि जीवा । कां न भीति भेवा यमाचिया ॥३॥

एका जनार्दनीं किती हें सागावेरं । उगवेना दावें गळां बंध ॥४॥

३२२६

देहबुद्धि सांडीं कल्पना दंडी । वासनेची शेंडी वाढवूं नको ॥१॥

तूं तें तूंचि पाहीं तूं तें पाही । पाहूनियां राही जेथीच्या तेथें ॥२॥

तूं तें तूंचि पाही जेथें देहो नाहीं । मीपणे कां वायां गुंतलासी ॥३॥

एका जनार्दनीं मीपण तूंपण । नाहीं नाहीं मज तुझीच आण ॥४॥

३२२७

निज दृष्टीवरी जाण । काम निवारी दारून ॥१॥

याचा नको घेऊं वारा । सैर सांडीं हा पसारा ॥२॥

कामक्रोधाचें हें बंड । याचें छेदी विवेकें तोंड ॥३॥

शांति क्षमा धरूनि आधीं । ब्रह्माज्ञान मग साधीं ॥४॥

हेंचि भक्तीचें लक्षण । सांगे एका जनार्दन ॥५॥

३२२८

सर्व भावें सुख असतां घेई अनुताप । मग करी संकल्प भजनाचा ॥१॥

ऐसा अनुताप घडतां मनासी । भजन तें सुखासी येत स्वभावेंची ॥२॥

एका जनार्दनीं अनुतापाविण । भजन प्रमाण नोहे देवा ॥३॥

३२२९

अनुताप नाहीं ज्यासी । विवेक नुमजे मानसीं ॥१॥

मुख्य पाविजे अनुताप । तेणें निरसे त्रिविधताप ॥२॥

अनुतापावांचुन । ब्रह्माज्ञान होय दीन ॥३॥

एका जनार्दनीं शरण । तैंच अनुताप बाणे पूर्ण ॥४॥

३२३०

वैराग्य अनुताप जाहलियावांचुन । रामनाम वदनीं न ये बापा ॥१॥

मुख्यत्वें कारण साधीं हें भजन । येणें समाधान होय बापा ॥२॥

विरक्ति देहीं जाहलियावांचुनीं । शांति समाधानी नये बापा ॥३॥

एका जनार्दनीं सत्संगावांचुनी । जन्माची आयणी न चुके बापा ॥४॥

३२३१

अनुतापावांचुनी नाम न ये मुखा । वाउगाचि देखा शीण होय ॥१॥

मुख्य तो संकल्प अनुताप वाहे । मग चित्त होय शुद्ध तेणें ॥२॥

अनुताप जाहलिया सहज समाधी । तुटेल उपाधी सहजचि ॥३॥

एका जनार्दनीं अनुतापें पाहे । मग देव आहे जवळी तया ॥४॥

३२३२

मुख्य पाहिजे अनुताप । हेंचि वैराग्याचें रूप ॥१॥

कोरड्या त्या ज्ञानगोष्टी । अनुताप नाहीं पोटीं ॥२॥

अनुतापाविण ज्ञान । कदा नोहे समाधान ॥३॥

एका जनार्दनीं तप । अनुताप हेंचि देख ॥४॥

३२३३

सावध पाहतां तुम्हीं ज्ञानाचें अज्ञान । मानूं तोचि म्हणे महंता महाधन ॥१॥

ज्ञानाचें अज्ञान कवण ज्ञाता फेडी । अनुतापाची जंव जीवीं नाहीं आवडी ॥२॥

नश्वर देह म्हणती ज्ञानेंच निंदिजे । तोचि देह घेउनी ज्ञातेपणे फुंजें ॥३॥

सच्चिदानंद माया या नांवें । याहुनी परती स्थिति तें तें ज्ञान जाणावें ॥४॥

एका जनार्दनीं अनुतापाची गोडी । ज्ञानाज्ञानाची तोडोनि सांडिली बेडी ॥५॥

३२३४

प्रकाश भासे सर्पाकार । सर्प नसोनि जेवीं दोर ॥१॥

कृष्ण वर्ण रक्त श्वेत । स्फटिकीं जेवीं भासत ॥२॥

ऐशी त्रिगुणांची मिळणी । शरण एका जनार्दनीं ॥३॥

३२३५

साधक सर्वदा पुसती । कोण बाधा चित्तवृत्ती ॥१॥

एकचि गुण जैं पुरता जोडे । तैं एकविधा वृत्ती वाढे ॥२॥

एकचि न जोडे गुणावस्था । यालागीं नोहे एकविधता ॥३॥

एका जनार्दनीं पूर्ण । चित्तचैतन्य संपुर्ण ॥४॥

३२३६

पहा कैसा देवाचा नवलावो । पाहे तिकडे अवघा देवो ॥१॥

पहाणें परतलें देवें नवल केलें । सर्वही व्यापिलें काय पाहों ॥२॥

पाहाणियाचा ठाव समूळ फिटला । अवघा देहीं दाटला देव माझ्या ॥३॥

एका जनार्दनीं कैसें नवल जाहलें । दिशाद्रुम दाटले देहें सहजीं ॥४॥

३२३७

तेजाचें जें तेज तेंचि परब्रह्मा । परम मंगलधाम त्यासी म्हणती ॥१॥

तेंचि नेमियेलें जोडोनियां कर । व्यापुनी चराचर भरलेसें ॥२॥

एका जनार्दनीं तोचि पुरुषोत्तम । मनासी आराम तया ठायीं ॥३॥

३२३८

चतुर्भुज श्याममुर्ति । शंखचक्र ते शोभती । पीतांबर वैजयंती । रुळती गळां ॥१॥

देव देखिला देखिला । तेणें संसाराचा ठावो पुशिला । विदेही तो भेटला । भक्त तयातें ॥२॥

दोघा होतांचि मिळणी । नुरे देव भक्तपणीं । फिटली आयणी । सर्व कोड कठीण ॥३॥

छंद पाहिजे नामाचा । निश्चयो काया मनें वाचा । एका जनार्दनीं त्याचा । देव होय अंकित ॥४॥

३२३९

ब्रह्मादिक देव त्यांचें रंगीं नाचती । सनकादिक त्याचें ध्रुपद धरिती ॥१॥

त्यापुढें गीत नृत्य करिती । त्यापुढें मानव केवीं ताल धरिती ॥२॥

हरि हरि हरि म्हणतां वाचे । हरिरंगीं नाचे तोचि धन्य ॥३॥

शास्त्राची व्युप्तत्ती प्रसन्न वागेश्वरी । ती सारजा मुख्य करी नृत्य तेथें ॥४॥

शास्त्र अभिमानें चढला ताठा । मुक्ति ते फुकटा अंतराले ॥५॥

एका जनार्दनीं स्वहितीं तूं नाचे । बोलणें अभावाचें बोलुं नको ॥६॥

३२४०

हरिकीर्तनालागीं प्रल्हाद गाढा । द्वंद्वाचा रगडा तेणें केला ॥१॥

कोरडिया काष्ठीं प्रगटले हरी । म्हणवोनि नृत्य करी तयापुढें ॥२॥

विणा वाहातु गातु नारदु नाचे । न कळे तयाचें महिमान ॥३॥

जनाभिमानें धरिली प्रतिष्ठा । वंचला करंटा मुक्तिसीच ॥४॥

साच अथवा लटिकें नाचतु रंगीं । अभिमान भंगी पैं होय ॥५॥

निरभिमानिया जवळीच देवो । एकाएकीं भावो जनार्दनीं ॥६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel