३२९५

मन एके ठायीं । राहे ऐसें करीं कांहीं ॥१॥

सर्व साधनांचें सार । मनीं करावा विचार ॥२॥

एकाग्र तें मन । करूनि करावें भजन ॥३॥

मन जिंकावें पां आधीं । तेणें तुटेल उपाधी ॥४॥

एका जनार्दनीं मन । दृढ ठेवावें बांधुन ॥५॥

३२९६

मनें करूनि विश्वास । संतचरणीं व्हा रे दास ॥१॥

आणीक न लगे साधन । मन आवरुनी करी भजन ॥२॥

मन धरी मृष्टीमाजीं । वाव तूम न शिणे सहजीं ॥३॥

मन दृढ देवापायीं । एका जनार्दनीं पाहीं ॥४॥

३२९७

मनें कल्पोनियां केली विटंबना । हिंडविले रानां वासनेच्या ॥१॥

तैसें नका करूं वाउगें चिंतन । मन आकळुन कार्य करा ॥२॥

मनाचें आकलन करावें पां आधीं । वाउगी उपाधी तुटतसे ॥३॥

एका जनार्दनीं आवरुनी मन । मग करीं भजन सुखरूप ॥४॥

३२९८

नका धावूं तुम्हीं सैरा । मना मागें या सत्वरा ॥१॥

मन करा पैं आधीन । तेणें जोडे संतचरण ॥२॥

मन आहे महापापी । लावावें तें हरिरुपी ॥३॥

मन स्थिर करूनी निश्चयें । एका जनार्दनीं पाहे ॥४॥

३२९९

करितां अनुष्ठान । मन धांवे सहज जाण ॥१॥

मंत्र जंत्र यंत्र भेद । मनें केला वादावाद ॥२॥

आधीं मनातें जिंकावें । सहज रूप मग पहावें ॥३॥

मन करे आधीन आधीं । एका जनार्दनीं तुटे व्याधी ॥४॥

३३००

मन करूनियां सावध । वाचे स्मरे तूं गोविंद ॥१॥

तेणें साधे सर्व काज । सकळ साधनांचें निज ॥२॥

मन धरी एकमुष्टी । वाचे जपे नाम गोष्टी ॥३॥

मन धांवे भलतीकडे । साधन वायां जाय कोडें ॥४॥

मन आवरुनी साधन । तेणें पावसी निजखुण ॥५॥

खूण संतांवांचुनी । एक जानार्दनीं ध्यानी ॥६॥

३३०१

न करी सायास आणिक संकल्प । वायांचि विकल्प न धरी मनीं ॥१॥

मनाचें जें मन करी ते स्वाधीन । तेणें नारायण कृपा करी ॥२॥

एका जनार्दनीं टाकूनि कल्पना । श्रीसंतचरणा शरण जाई ॥३॥

३३०२

अखंड सदा ध्यान । पाडुरंगी लावा मन ॥१॥

ऐसा उदार हा हिरा । टाकूनी वेचिताती गारा ॥२॥

अमृत सांडोनी । बळें घेती कांजवंणी ॥३॥

कामधेनु कल्पतरु । एका जनार्दनीं आगरु ॥४॥

३३०३

मन करूनियां स्थिर । हृदयीं ध्याई तो साचार ॥१॥

मग सुखाची वसती । सदा समाधान चित्तीं ॥२॥

समाधि समाधान । सहज घडे ब्रह्माज्ञान ॥३॥

तुटे संसाराचा कंद । वाचा नामस्मरण छंद ॥४॥

हेंचि साधनांचें सार । सदा चित्तीं परोपकार ॥५॥

एका जनार्दनीं ध्यानक । ध्यानीं मनीं जनार्दन ॥६॥

३३०४

मन मनासी होय प्रसन्न । तेव्हां वृत्ति होय निरभिमान ॥१॥

पावोनि गुरुकृपेची गोडी । मना मन उभवी गुढी ॥२॥

साधकें संपुर्ण । मन आवरावें जाण ॥३॥

एका जनार्दनीं शरण । मनें होय समाधान ॥४॥

३३०५

संकल्प विकल्प जाण । हेंचि मनाचें लक्षण ॥१॥

सुख दुःखें उभीं । मन वर्तें धर्माधर्मीं ॥२॥

स्वर्ग नरकक बंध मोक्ष । मन जाणतें प्रत्यक्ष ॥३॥

शुभ अशुभ कर्म । मनालागीं कळें वर्म ॥४॥

करा निःसंकल्प मन । म्हणे एका जनार्दनीं ॥५॥

३३०६

मनाचा सविस्तार । ऐका तुम्हीं वो निर्धार ॥१॥

मनें केलें सगुण निर्गुण । मनें दाखविलें चैतन्य ॥२॥

मनें नागविलें देवा । मनें लोळविलें जीवां ॥३॥

मन अज्ञानाची राशी । मन धांवें ते सायासी ॥४॥

एका जनार्दनीं मन । दृढ ठेवावें बांधोन ॥५॥

३३०७

मना तुं परम चांडाळ । अधम खळाहुनीं खळ । विषयीं तळमळ । बह् करसी पापिष्ठा ॥१॥

धरीं विठ्ठलीं विश्वारी । आणिक नको रे सायास । वाउगा तो सोस । सांडीं सांडी अधमा ॥२॥

करी संतांचा सांगात । पूर्ण होती मनोरथ । न धरीं दुजा हेत । विठ्ठलावांचुनीं ॥३॥

बहु सांडीं तुं भाषण । आणिक न करी साधन । एका जनार्दनीं शरण । विठ्ठलासी निघे पां ॥४॥

३३०८

मना तुं अधीर अधीर । बहु पातकी पामर । न राहासी स्थिर । क्षणभर निश्चयें ॥१॥

किती शिकवावें तूंतें । नायकसी एक चिंत्तें । बहु गुणें बोलतां तूंतें । नायकसी पामरा ॥२॥

एकपणें धरी भाव । दृढ चित्तीं विठ्ठलराव । वाउगा तो भेव । नको धरूं आणीक ॥३॥

हेंचि धरीं शिकविलें । कांहीं नको आन दुजें वहिलें । एका जनार्दनीं बोले । करुणा भरीत मनासी ॥४॥

३३०९

बैसतां निश्चळ । मन करी तळमळ ॥१॥

ध्यान धारण ते विधी । मनें न पावेचि सिद्धि ॥२॥

जप तप अनुष्ठान । अवघें मनेंची मळीन ॥३॥

दया शांती क्षमा । मनें न येती समा ॥४॥

ऐशा मना काय करावें । कोठें निवांत बैसावें ॥५॥

एका जनार्दनीं शरण । मन धांवें सहजपणें ॥६॥

३३१०

कौतुक वाटतें मनाचें । नामस्मरण नेणें साचें ॥१॥

कां रे मानिशी कंटाळा । मना खळा अधम तूं ॥२॥

नका घालुं गोंवागुंती । तेणें फजिती मागें पुढें ॥३॥

एका जनार्दनीं भाव । अवघा दिसे देवाधिदेव ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel